ब्लॅक फॉरेस्ट

एखाद्या ठिकाणी अनेक वेळा जाणं होतं, त्याबद्दल थोडंफार कुठेकुठे लिहून ठेवलेलं असतं, पण ते लिखाण पूर्ण होत नाही अश्यातलंच ब्लॅक फॉरेस्ट हे ठिकाण.

जर्मनीतल्या जर्मनीत सुद्धा, प्रत्येक प्रदेशाची, राज्यांची काही ठळक वैशिष्ट्यं आहेत. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे निसर्ग सुद्धा बराच वेगळा आहे. बाडेन वुर्टेंबेर्ग (Baden-Württemberg) हे आम्ही राहतो ते राज्य. जगभरात कुठेही गेलो तरी जशी आमची भारतीय ही ओळख आम्ही अभिमानाने मिरवतो, तसे इथे दहा वर्ष राहून आम्हाला आमच्या या राज्याबद्दल पण अभिमान वाटतो. इथेच दुसर्‍या राज्यात गेलं की हे बदल जास्त जाणवतात. या राज्यातल्या अनेक गोष्टींधले ब्लॅक फॉरेस्ट हे एक अत्यंत आवडतं ठिकाण.

मॉन्जिनिज या बेकरी मध्ये पहिल्यांदा ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री खाल्ली होती. मग नंतर बरंच उशीरा कळलं की हा ब्लॅक फॉरेस्ट केक मूळचा जर्मनीतल्या ब्लॅक फॉरेस्ट मध्ये प्रसिद्ध आहे. ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे जर्मनीच्या दक्षिण-पश्चिम भागातला डोंगररांगांचा प्रदेश. एका बाजूला फ्रान्स तर एका बाजूला स्वित्झर्लंड असे शेजारी देश. दूरवर पसरलेले डोंगर, त्यावर उंच हिरवीगार दाट झाडी, अधून मधून दिसणारी तळी, लहान सहान झरे, धबधबे, एकीकडे शेती आणि त्यात दिसणारी गुरं, त्यांचे गोठे, त्यातून दिसणारं ग्रामीण लोकजीवन, डोंगरात आणि तळ्याकाठी पायी जाता येतील अश्या अनेक पायवाटा, हिवाळ्यात बर्फाने झाकलेली झाडी, आणि त्याच वेळी इकडून तिकडून दिसणार्‍या ट्रेन्स, डोंगरातले घाटरस्ते, बोगदे या सगळ्यामुळे स्थानिक आणि बाहेरून येणारे पर्यटक सगळ्यांनाच आवडेल असा हा प्रदेश आहे. इतरत्र लाल आणि करडी कौलं जास्त दिसतात, पण ब्लॅक फॉरेस्ट मध्ये बहुतांशी सगळी चॉकलेटी रंगाची कौलारू घरं जास्त दिसतात. शेती आणि शेतीला पूरक असे अनेक लहान मोठे उद्योगधंदे या भागात गेलो की दिसायला लागतात. लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे लाकूडकाम बरंच चालतं, लाकडावर काम करणारे मोठे कारखाने हे पण दिसतात, अश्या ठिकाणी सहसा बाहेर लाकडाचे ओंडके दिसतात एकावर एक रचलेले. ज्या प्रमाणात लाकूडतोड होते, त्याच प्रमाणात नवीन लागवड सुद्धा केली जाते. सगळीकडे दिसणारी हिरवळ, दाट झाडी आणि सुबक घरं, कलात्मकतेने सजवलेले अंगण हे चित्र इतर ठिकाणीही दिसलं, तरी ब्लॅक फॉरेस्ट जवळ आलं की त्यात नवीन रंग भरल्यासारखं हे चित्र अधिकाधिक सुंदर होत जातं. प्रत्येक बदलत्या ऋतुप्रमाणे वसंत ऋतूत सगळीकडे दिसणारी फुलं, ऑक्टोबरमधली पानगळ, हिवाळ्यात बर्फ पडला की दिसणारं अजून वेगळं दृश्य या वेगवेगळ्या कारणांनी इथे दर वेळी वेगळा अनुभव मिळतो. आम्ही राहातो त्या भागातून ब्लॅक फॉरेस्ट तसं अगदीच जवळ. अगदी एका दिवसाची ट्रिप करता येईल अश्या अंतरावर त्यातला काही भाग आणि मग फिरायचं ठरवलं तर इथेच आठवडाही काढता येईल इतक्या तिथे बघण्यासाठीच्या जागा आहेत.

या ब्लॅक फॉरेस्ट मधल्या काही आवडत्या आणि भेट दिलेल्या जागांबद्दल -

ममेलझे (Mummelsee / Seebach)- आम्ही पहिल्यांदा गेलो ते हे ठिकाण. भाड्याने गाडी घेऊन निघालो होतो, जाताना पावसाळी हवा, घाटाचा रस्ता आणि शिवाय आमच्या गाडीने काहीतरी ऑइल कमी अशी वॉर्निंग दिली. मग एका जागी नीट जागा बघून थांबलो, रेंज पण नव्हती फोन ला, तरी फोन लावला, जर्मन पण नुकतंच शिकलो होतो, हेल्पलाइन ला फोन करून बोललो आणि मग पुढे निघालो. पहिल्यांदाच काय हे प्रॉब्लेम असंही वाटत होतं. तिथे गेल्यावर मात्र इतकं फ्रेश वाटलं आणि मग या जागेवर नंतर अनेक वेळा गेलो. कधी वाढदिवस म्हणून, कधी कुणाला सोबत घेऊन, कधी नुसतं कंटाळा आला म्हणून. तलावातल्या पाण्याचा बर्फ झाला आहे, जागोजागी बर्फ आहे आणि सगळं सुंदर पांढरं शुभ्र दिसतं आहे असं चित्र काहीच वर्षांपूर्वी बघितलं होतं, पण मागच्या वर्षी ३१ डिसेंबर ला गेलो तेव्हा मात्र अजिबात बर्फ नव्हता. ते बघून ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गोष्टी किती जवळ येऊन ठेपल्या आहेत याची एकदम जाणीव झाली.

ट्रिबेर्ग (Triberg)- हा जर्मनीतला सगळ्यात उंच धबधबा म्हणे..आम्ही फार उत्साहाने गेलो होतो बघायला आणि विशेष काही ही जागा आवडली नाही. वाइट नाही, पण खूप गर्दी आणि एक सर्वसाधारण धबधबा असं आमचं मत झालं.

ओपन एअर म्युझियम Gutach - जुन्या काळाचं चित्र उभं करणारं एक दहा घरांचं खेडेगाव म्हणू शकतो. गेट मधून आत गेलो की वेगवेगळी घरं दिसतात, कुठे जुनी शाळा दाखवलेली असते तर कुठे जुन्या काळातलं स्वयंपाकघर, मोठ्ठी भांडी, वजन काटे. डिजिटल क्रांती होण्यापूर्वीचा काळ आपल्यासमोर उभा केलेला दिसतो. एका घरात मोठ्ठी आडवी शिडी लावली होती, वर चढून कौलांचं काम करण्यासाठी वापरता येइल अशी. भांडी धुणी करायला वेगळी जागा दिसते. कपडे कंपाउंड वॉल वर वाळत घातलेले दिसतात. एक जण कुंभारकाम करत असतो, कुणी सुतारकाम. मधूनच आपल्या पायाशी कोंबड्या येतात. बकर्‍या दिसतात, बैलगाडी बाहेर उभी असते. गुरांचा चारा असतो. भारतातलं पण मी लहानपणी पाहिलेलं ग्रामीण जीवन बरंचसं असंच होतं. बदल होत जाणारच, पण जुन्या गोष्टी अश्या प्रकारे तरी अनुभवता येतात. फक्त तिथेही आता खायला पिझ्झा आणि फ्राइजच असतात, सगळी प्लास्टिकच्या वेष्टनातली आइसक्रीम असतात.

Geroldsauer waterfalls - अगदी डोंगरात लपलेला धबधबा, लहान नदी आणि खूप आवडलेली जागा.

टिटिझे (Titisee)- हा अगदी खास टुरिस्ट लोकांचा स्पॉट. एक तलाव आहे, इथे बोटींग करता येतं. शिवाय अनेक सुवेनिअर शॉप्स आहेत. एकदा जायला छान आहे, पण गर्दी असते त्यामुळे नेहमी जावं वाटत नाही.

श्लुकझे (Schluchsee) - हा पण एक सुंदर तलाव. इथे लोकल लोकांची गर्दी जास्त असते, बोटिंग, कयाकिंग वगैरे प्रकार करता येतात. शिवाय या पूर्ण तलावाबाजूने जाणारे ट्रेल्स आहेत, तेही छान आहेत.

टोडनाऊ (Todnau) - इथे Rodelbahn म्हणजेच डोंगरात वरून खालपर्यंत यायला काही ट्रॅकस बांधले आहेत अश्या काही adventure स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत.

फेल्डबर्ग (Feldberg) - हिवाळ्यात बर्फ पडला की स्किइंग आणि इतरही अनेक हिवाळी खेळांसाठी इथे दुरदुरून लोक येतात. बर्‍याच स्पर्धा इथे होतात. हा या पूर्ण डोंगरातला सगळ्यात उंच भाग आहे.

शोनाख - शोनाखबाख - (Schonach / Schonachbach) -

कुकु क्लॉक्स (Cuckoo Clocks) -

हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा शेतीचे उद्योग बंद असतात, तेव्हा अनेक जण जोडधंदा म्हणून लाकूडकाम करत. असं म्हणतात की चेक रिपब्लिक मध्ये इथल्या एका माणसाने जरा आधुनिक पद्धतीचं घड्याळ पाहिलं. मग परत येऊन त्याने ते तंत्र वापरून लाकडी घड्याळ तयार केलं. त्यातून जर्मन इंजिनियरिंग प्रसिद्ध आहेच. याच सुपीक डोक्यातून कुकु क्लॉक्स घडले, दर एक तासाने बाहेर येणारी चिमणी सुरूवातीला त्यात नव्हती, टप्प्याटप्प्याने सुधारणा होत होत मग पुढे ही घड्याळं सगळीकडे प्रसिध्द झाली. स्वित्झर्लंड मध्ये ही घड्याळं विक्रीला अनेकांनी पाहिली असतील, पण मूळ जे ब्लॅक फॉरेस्ट मधलं. आता तर चीन मध्येही या घड्याळांचं मास प्रोडक्शन होतं. पूर्णपणे बॅटरी ऑपरेटेड घड्याळं मास प्रोडक्शन मधून कमी किमतीत उपलब्ध झाली, पण पाइन कोनच्या आकाराचे पेंडूलम आणि सुबक नक्षीकाम केलेली घड्याळं, जी बॅटरीविना पूर्णपणे मेकॅनिकल सिस्टीम वर चालतात अजूनही मेड इन जर्मनी हा शिक्का मिरवतात. या घड्याळांवर इथल्या ग्रामीण लोकजीवनाचं रोजचं चित्र दिसतं. लाकडी नळ, खिडक्यांमधली फुलं, झाडांचे ओंडके वापरून प्राण्यांसाठी केलेले पाण्याचे हौद, बर्फ पडलेले ख्रिसमस ट्री, अंगणातली झाडं अशी सुरेख कलाकुसर त्यावर असते.

काही लोकांनी मेहनतीने मोठमोठी, दोन मजली म्हणता येइल अशी कुकू क्लॉक्स सुद्धा तयार केली, त्यातलेच एक शोनाख ला आहे, इथे आत जाऊन पूर्ण घड्याळाचं काम कसं चालतं त्याची माहिती देणारी टुर पण करता येते. इथेच या रस्त्याने पुढे गेले की अजून एक असंच मोठं घड्याळ आहे, जे सगळ्यात पहिलं असं मोठं बांधलेलं घड्याळ आहे. इथेच काही घड्याळाची दुकानं पण आहेत.

House der 1000 Uhren हे एक ठिकाण - नुसतं दुकान बघायलाही खूप छान आहे. एकेक घड्याळ मोहात पाडतं अगदी. घड्याळाशिवाय या भागातल्या स्थानिक वाइन, लिकर, स्वयंपाकाची लाकडी भांडी पण इथे बघायला मिळतात. या दुकानांमध्ये आत गेलो की सतत इकडून तिकडून घड्याळाचे टोले आणि कुकूचे आवाज ऐकू येतात. शिवाय या दुकानात भारतीय लोकांची पण खूप गर्दी असते. आम्ही इथे गेलो तेव्हा मागोमाग एक दाक्षिणात्य कुटुंब आणि एक सरदारजी कुटुंब असे आले, आम्ही एकदम अक्ख्या भारताने धाड घातल्याचा फील येईल दुकानात असं म्हणत होतो तर बाहेरच्या घड्याळाने दिल्लीची वेळ पण दाखवली.

कोणत्याही पर्यटन स्थळी गेलो तर घड्याळांची दुकानं आहेत, पण वरची काही ही खास आवर्जून बघण्यासारखी आहेत. खरंतर एक पूर्ण रस्ता आहे जो "Deutschen Uhr Strasse" म्हणजेच 'जर्मन क्लॉक रोड' म्हणून ओळखला जातो. Furtwangen फुर्टवांगेन ला एक संग्रहालय पण आहे, जे आम्ही अजून पाहिलं नाही.

Bundesstraße 500 म्हणजेच ज्याला बी५०० म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता, ब्लॅक फॉरेस्ट मधल्या काही महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा आणि या पूर्ण भागाची झलक दाखवणारा सिनीक रुट म्हणून ओळखला जातो. बराचसा घाटाचा रस्ता आहे, पण गाडी असेल तर जायलाच हवा असा.

या पूर्ण भागात बर्‍याच ट्रेन्स आहेत ज्या आपल्याला ट्रेन ने या भागाचं दर्शन घडवतात. त्यामुळे गाडी नसेल तरीही या भागात फिरता येतं. हायकिंग, नुसते वॉकिंग ट्रेल्स करण्यासाठी इथे अनेक मार्क केलेले ट्रेल्स आहेत. त्यामुळे तिथे फिरणार्‍यांची पण गर्दी असते, बर्‍याच रस्त्यांच्या बाजूला गाड्यांसाठी जागा दिलेली असते, तिथे गाडी पार्क करून मग लोक जंगलात पायी किंवा सायकलने जातात आणि परत येऊन पुन्हा गाडीने परतू शकतात.

याशिवाय फ्रायबुर्ग (Freiburg), बाडेन-बाडेन (Baden Baden - Spa Town), शिलटाख (Schiltach) याही काही जागा आहेत, ज्याबद्दल स्वतः तिथे फिरल्याशिवाय लिहीणं उचीत ठरणार नाही.

आणि इथे फिरताना आवर्जून आस्वाद घ्यायला हवा असा म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केक. Schwarzwälder Kirschtorte हे त्याचं जर्मन नाव म्हणजेच ब्लॅक फॉरेस्ट चेरी केक. तर मूळचा ब्लॅक फॉरेस्ट केक हा खरा चेरी वॉटर वापरून केला जातो. गंमत अशी आहे की हे खास चेरी वॉटर (ठराविक अल्कोहोल कंटेंट असलेले) वापरून केलेला केक असेल, तरच तो या नावाने विकता येतो. पूर्वीच्या काळी याच भागात होणार्‍या आंबट-तुरट चवीच्या चेरीज फर्मेंट करून ही ब्रँडी तयार केली जायची, ज्याला किर्शवासर म्हणजे चेरी वॉटर असं नाव आहे. आता इतर प्रकारच्या चेरीज वापरूनही ब्रँडी तयार होतात, पण या आंबट-तुरट प्रकारच्याच केक साठी वापरल्या जातात. चॉकलेट स्पाँज केक, त्यावर चेरी वॉटर, त्यावर व्हिप्ड क्रीम ज्यातही काही वेळा चेरी वॉटर वापरले जाते, चेरी ज्यूस आणि चेरीज वापरून एक फिलिंग केलं जातं ते, पुन्हा केक, क्रीम असे तीन ते चार लेयर्स आणि मग वरून पुन्हा व्हिप्ड क्रीम आणि चॉकलेट आणि चेरी असं रूप असलेला हा केक -

यामागे एक कथा अशीही आहे की या भागात पूर्वी लग्न न झालेल्या मुली लाल रंगाचे लोकरीचे पॉम पॉम असलेल्या विशिष्ट टोप्या वापरत (बॉलेनहुट Bollenhut), त्याच्याशी साधर्म्य साधणारं हे या केकचं एक रूप आहे. या टोप्या सुद्धा सुवेनियर म्हणून सगळ्या पर्यटन स्थळांवर दिसतात.

एक स्लाइस सुद्धा खूप मोठी असते, आणि त्यात केक पेक्षाही क्रीम जास्त असतं असं वाटू शकतं. भारतात मिळणारी ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आणि इथली यात पूर्णच फरक आहे. मला दोन्ही चवी आवडतात. पारंपारिक म्हटलं तरी याच्या अनेक पाककृती इंटरनेटवर सापडतात. पण घटक साधारण तेच असतात. ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आलात तर अवश्य खाऊन बघायलाच हवा असा हा पदार्थ.

स्वयंपाकाची लाकडी भांडी, चमचे, चमचे ठेवायचे स्टॅन्ड, ब्रेड ठेवण्या साठी टोपल्या, जर्मन बीअर क्रुग हे इथल्या दुकानांमध्ये दिसतात. त्यात पण ब्रेड कापण्यासाठी वापरले जाणारे लाकडी बोर्ड विविध आकारात असतात, त्यावर आपलं नाव कोरून देणारे लोक पण तिथेच असतात. घरावर लावायच्या पाट्या पण आपलं नाव कोरून लगेच घेता येतात. वेगेवेगळे घरगुती पद्धतीने केलेले फळांचे जॅम, वाईन, साठवलेले मांसाचे प्रकार हेही दिसतात. जुन्या काळी असायचे तसे विस्तवात भाजलेले ब्रेड मिळतील अश्या पाट्या पण दिसतात, जिथे इलेक्ट्रिक नाही तर पारंपरिक ओव्हन मध्ये भाजलेले ब्रेड घ्यायला लोकांची गर्दी पण असते.

ब्लॅक फॉरेस्ट मध्येच अजूनही जाणं होइल, नवीन जागा शोधल्या की त्याबद्दल लिहीन, पण अनेक दिवसांपासून डोक्यात असलेलं हे सगळं आज लिहून पूर्ण झालं. दहा वर्षात उन्हाळ्यात फुलांनी फुललेले, बर्फातले, धुक्यातले असे असंख्य फोटो या निमित्ताने पुन्हा पाहिले, केक रेसिपीज पुन्हा पाहिल्या आणि तेवढ्याच प्रकर्षाने मग आता पुन्हा इथल्या अजून नवीन जागा शोधून जायला हवं हेही वाटलं. इति ब्लॅक फॉरेस्ट पुराण समाप्त.

1

2

3

4

5

6

7

8

8.1

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

29

30

31

32

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle