Rheinland Pfalz - ह्राईनलांड फाल्झ हे जर्मनीच्या दक्षिण भागातलं एक राज्य. आम्ही वेगळ्या राज्यात असलो, तरी गाडीने दहाव्या मिनिटाला आम्ही या पलीकडच्या राज्यात पोचतो इतकं ते जवळ आहे. याच राज्यातल्या एका मार्गाचे नाव आहे Deutsche Weinstraße - जर्मन वाईन रोड. द्राक्षांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या राज्यात, Schweigen-Rechtenbach या फ्रान्स बॉर्डर जवळच्या गावापासून सुरू होऊन Bockenheim पर्यंत साधारण ८५ किलोमीटर रस्ता हा जर्मन वाईन रोड म्हणून ओळखला जातो.
इथे आल्यापासून ते अगदी मागच्या चार वर्षांपर्यंत, मला इथल्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अग्रस्थानी होत्या इथे मिळणाऱ्या सुट्ट्या. अर्थात आपल्यासारख्याच बाकीच्याही लोकांना भरपूर सुट्ट्या असतात आणि त्यामुळे कामं अडू शकतात असंही बरेचदा झालं आणि तेव्हा वैताग सुद्धा झाला. मग पालक म्हणून सुट्ट्यांची उपलब्धता बघता आवडीचं पारडं अजून जड झालं आणि मग आता किंडर गार्टन, शाळा या सुट्ट्या बघितल्यानंतर, ते अनुभवत असताना ते पारडं पुन्हा कुठे बसवायचं असा प्रश्नही अधून मधून पडला. जर्मनीतल्या सुट्ट्या - फायदे आणि तोटे हा अगदी सपट परिवार महाचर्चेचा विषय होऊ शकतो असे अनेक अनुभव जमा होत गेले.
असा असून असून किती उन्हाळा असेल? आपल्या सारखा कडक उन्हाळा थोडीच असेल तिकडे, कारण मध्य युरोप म्हणजे मुख्य थंडी, हिवाळा, बर्फ हेच पहिले डोक्यात येतं. मध्यपुर्वेकडचे देश, आखाती देश इथल्या त्रासदायक उन्हाळ्याबद्दल आपण ऐकलेलं असतं, पण युरोपात येताना आवर्जून करायच्या खरेदीत नेहमीच हिवाळी कपडे, थर्मल्स हे आघाडीवर असतात. थोडे दिवस उन्हाळा असला तरी 'आपल्याला' एवढा काही वाटणार नाही, सवय असते तशी असं वाटू शकतं. भारतात चोवीस तास डोक्यावर फिरणारे पंखे इतके सवयीचे असतात, की त्यांना आपण गृहीत धरलेलं असतं. शिवाय कुलर, एसी सगळंच असतं आणि इथे त्यातलं काहीच नसतं.
दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या रविवारी इथे घड्याळ बदलते ही आता दहा वर्षात सवयीची बाब झालेली आहे. घड्याळ एक तास पुढे केलं जातं, पहिले दोन तीन दिवस जरा भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा सेट होण्यात जातो, पण सगळं पुन्हा नेहमीसारखं चालू होतं. वसंत ऋतू सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. एकदाची थंडी कमी होइल, जास्त वेळ सूर्यदर्शन व्हायला लागेल आणि एकदाचे हिवाळी कपड्यांचे जोखड उतरेल या आशा पल्लवित होतात. खरंतर अजूनही थंडी आहेच, रात्री तापमान एक दोन पर्यंत जातं आहे, पण तरी हवेतला बदलही जाणवायला लागतो.
भारताबाहेरच्या लोकांशी भारत या विषयावरील संवादात काही हमखास येणारे मुद्दे असतात, त्यात खाद्यसंस्कृती, लोकसंख्या, ठराविक पर्यटन स्थळं, बॉलीवूड, कपडे, भाषा, सणसमारंभ, स्त्रियांची स्थिती असे काही विषय अगदी आघाडीवर असतात. त्यातल्याच बॉलीवूड या विषयावर ज्या गप्पा रंगतात त्याबद्दलचे आमचे हे अनुभव.
शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं.
जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.
जर्मनीतल्या ख्रिसमस मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. खरंतर गावागावात वर्षभर असे अनेक मार्केट्स लागतातच, वसंत ऋतूची सुरुवात म्हणून, उन्हाळ्यात तर अगदी रेलचेल असते, पुन्हा ऑक्टोबर मध्ये पानगळीच्या दरम्यान आणि मग शेवटी ख्रिसमस मार्केट्स. इतर वेळी बहुतांशी फक्त विकेंडला, सुट्टी दरम्यान ही मार्केट्स असतात. पण ख्रिसमस मार्केट्स नोव्हेंबरच्या शेवटी चालू होतात आणि २२-२३ डिसेंबर पर्यंत असतात. स्थानिक तर असतातच, अनेक पर्यटक सुद्धा खास ख्रिसमस मार्केट्स बघायला येतात. या मार्केट्स मध्ये हमखास एक स्टॉल तरी या मशरुम्सचा असतोच. एका भल्या मोठ्या पॅन मध्ये हे मशरुम्स शिजत असतात.