जर्मनीतलं वास्तव्य - बॉलीवूड आणि भारत
भारताबाहेरच्या लोकांशी भारत या विषयावरील संवादात काही हमखास येणारे मुद्दे असतात, त्यात खाद्यसंस्कृती, लोकसंख्या, ठराविक पर्यटन स्थळं, बॉलीवूड, कपडे, भाषा, सणसमारंभ, स्त्रियांची स्थिती असे काही विषय अगदी आघाडीवर असतात. त्यातल्याच बॉलीवूड या विषयावर ज्या गप्पा रंगतात त्याबद्दलचे आमचे हे अनुभव.
स्थळ जर्मन भाषेचा क्लास - एक रशियन मुलगी होती तिथे. भारत हे ऐकताक्षणी तिने ह्रितिक रोशन तिला खूप आवडतो, त्याचा वाढदिवस, त्याला सहा बोटं आहेत वगैरे सगळी त्याची विकिपीडिया तिने मला ऐकवली. मग त्याचे सिनेमे आणि इतरही बॉलीवूड बद्दल ती नेहमीच बोलायची.
तेव्हाच मी इथे केस कापण्यासाठी कुठे जाता येईल ही माहिती शोधात होते. क्लास मधल्याच मुलीकडून एक ठिकाण समजलं, जवळच होतं, मग तिथेच गेले. अनेक तुर्किश (तुर्कस्तानातले) लोक वर्षानुवर्षे जर्मनीत राहतात, तर या दुकानात बहुतांशी तुर्किश लोक होते. एकीकडे त्या माणसाने जुजबी बोलायला सुरुवात केली, कुठून आलात वगैरे ठराविक प्रश्न. आणि मग म्हणे तुम्हाला शाहरुख खान माहीत आहे का? म्हणजे काय, हा प्रश्न असू शकतो? पण तेव्हा इतकं हजरजबाबी पणे जर्मन येत नव्हतं. मी पण हो माहीत आहे ना असं सांगितलं. मग पुढे पूर्णवेळ त्याने त्याला शाहरुख आणि बॉलीवूड याबद्दल किती प्रेम आहे याचंच वर्णन केलं. बहुतेक काही गाणी पण सांगितली पण उच्चार मला न समजल्यामुळे मी नुसतं हो हो केलं.
वर्षभराने आम्ही एका घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट होणार होतो. त्या घरमालकाला तशी नोटीस दिली. मग लोकांचे ते घर बघण्याचे कार्यक्रम चालू झाले. त्यात एक बाई आली, तिच्यासोबत तिची लहान मुलगी होती. त्या घरात ती राहणार नव्हती, तिच्या कुणा मैत्रिणीसाठी ती बघायला आली होती. दोन मिनिटात घर बघितलं, घराबादल जुजबी विचारपूस झाली. आम्ही पाणी वगैरे विचारलं आणि मग पुढे तिच्या ज्या काही गप्पा चालू झाल्या, विषय होता फक्त बॉलिवूड आणि बॉलीवूड सिनेमे. तिलाही शाहरुखच सगळ्यात जास्त आवडायचा आणि तिचा सगळ्यात आवडता सिनेमा कोणता तर देवदास. ऐश्वर्या (तिचा उच्चार आयषवऱ्या होता ) किती छान दिसते, काय सुंदर कपडे आहेत याबद्दल प्रचंड कौतुक केलं. मी आणि माझे सासरे आम्ही दोघांनी हा सिनेमा किमान दहा वेळा पाहिला आहे आणि मी प्रत्येक वेळी किती रडले हे सांगताना सुद्धा तिला रडू येईल असं वाटत होतं. तिला भेटलेलो आम्ही बहुतेक पहिलेच भारतीय होतो, ते घर तिच्या मैत्रिणीला आवडो न आवडो, ती तिचं बॉलिवूड प्रेम व्यक्त करू शकली याचाच बहुतेक तिला आनंद झाला होता.
एकदा एका मॉल मध्ये गेलो होतो, कॉफी प्यायला स्टारबक्स मध्ये गेलो. माझा नंबर येणार तेवढ्यात पलीकडच्या काउंटरवर असलेल्या मुलीने आधीच्या कस्टमरची अगदी घाईत ऑर्डर घेऊन मला हात दाखवून तिच्या काउंटर वर बोलावलं. आम्ही ऑर्डर दिली, तिथे नाव लिहितात ग्लास वर, मी सवयीने नाव आणि स्वतःहून पुढे स्पेलिंग सांगणार तेवढ्यात तिने या या आय नो म्हणून लिहीलं व्यवस्थीत. मग पैसे दिले आणि तिनी माझ्या चेहऱ्यावरून वरून हात फिरवून तिच्या कपाळावर बोटं मोडली आणि काहीतरी पुटपुटली सुद्धा, जे हिंदी नव्हतं पण नजर ना लगे या अर्थाचं असावं. इथे मराठी हिंदी मालिकांसारखा माझ्या चेहऱ्यावर तीन वेळा फोकस यायला हवा होता इतकी मी अवाक झाले होते. मला माधुरी दीक्षित माहीत आहे, तिचा डान्स खूप आवडतो आणि तू मधुरा म्हणाली, मला माधुरी सारखं तुझं नाव पण खूप आवडलं म्हणून, पाहिलं आहे मी हे असं सिनेमात असं करतात ते, हेही सांगितलं. अगदी आजीने प्रेमाने दृष्ट काढल्यावर वाटेल तसंच वाटलं. हे सगळं झालं, आम्ही बाहेर येऊन कॉफी घेत बसलो तर ही पुन्हा आली, एका लहान कपात अजून काहीतरी डेझर्ट प्रकार घेऊन, हे माझ्याकडून तुला असं म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामावर निघून गेली. मी आपली थँक्यू थँक्यू म्हणत होते फक्त, शिवाय इतकं प्रेमाने कुणी अनोळखी व्यक्ती येऊन आपल्या साठी काही करते आहे यासाठी बॉलिवूड आणि माधुरीचे पण मनातल्या मनात आभार मानले.
एका लायब्ररी मध्ये गेले तेव्हा तिथे अनेक सिनेमांच्या डीव्हीडी होत्या, त्यात कभी अलविदा ना केहना, परदेस, करण जोहरचे अनेक चित्रपट होते. त्यामानाने यश चोप्रांचे चित्रपट ज्यांनी आपल्याला युरोप दाखवला ते तेवढे प्रसिद्ध आहेत असं वाटलं नाही. पण उलट बाजूने मैं प्रेम की दिवानी हूं किंवा हॅप्पी न्यू इअर सारखे अगदीच पडलेले चित्रपट पण डब करून जर्मन भाषेत उपलब्ध आहेत. झी वन हे एक पूर्ण बॉलीवूड चित्रपट आणि गाणी, अर्थात पूर्ण जर्मन भाषेतून दाखवणारं एक चॅनेल पण चालू झालं होतं, शाहरुख खान त्याच्या उदघाटनाला आला होता हेही ऐकलं होतं, पण चार वर्षात हे चॅनेल बंद झालं. त्यापूर्वी एका चॅनेल वर आठवड्यातून एक बॉलीवूड सिनेमा दाखवला जायचा, त्यात पण असेच कोणतेही सिनेमे दाखवायचे.
हायडेलबर्ग हे इथेच जवळ असणारं एक प्रसिद्ध गाव. या गावात बरेच पर्यटक असतात. इथल्या ओल्ड स्ट्रीट वर अगदी टिपीकल युरोपियन वातावरण असतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं, हॉटेल्स, प्रत्येक हॉटेलबाहेर बसलेले लोक, फ्रेंच फ्राईज ते आईसक्रीम ते कॉफी ते केक अशा अनेक पदार्थांचे नाकात शिरणारे स्वाद, जुन्या मोठ्या खिडक्यांची घरं, फुलांनी सजवलेल्या खिडक्या, दगडी रस्ता, मधूनच पाण्याचे कारंजे, दोन तीच चर्च, सुवेनियर शॉप्स, मागे दिसणारा इथला किल्ला, व्हायोलिन किंवा कोणतंही वाद्य वाजवत बसलेले लोक, सुरेख लॅम्पपोस्ट असं चित्रातलं दृष्य असतं. आम्ही दोघं आणि अजून एक मित्र मैत्रीण असे इथून गप्पा मारत चाललो होतो. अचानक एक धून ऐकू आली, आम्ही सगळ्यांनी ओळखीचं गाणं म्हणून मागे वळून पाहिलं आणि ही कोणती धून हे आठवत होतो, ते क्षणभरात आठवलंच, प्यार हुआ इकरार हुआचे ते सूर होते. एक म्हातारे पांढऱ्या दाढीवाले आजोबा होते, आम्ही मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं याचा त्यांना इतका आनंद झाला होता, मला वाटलंच होतं तुम्हाला समजेल असं म्हणून मग त्यांनी पुन्हा वाजवायला सुरुवात केली. मग राज कपूर माझा खूप आवडता होता, मला अजूनही त्याची अनेक गाणी वाजवता येतात हेही सांगितलं. या पूर्ण गावात असे अनेक वादक गायक नेहमीच दिसतात, पण हे आजोबा विशेष लक्षात राहिले.
जिथे व्हिजाची कामं होतात त्या फॉरेनर्स ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी ओळखीची झाली होती. तिच्या खोलीत शाहरुखचं भलं मोठं पोस्टर लावलेलं होतं. त्याबद्दल थोड्याफार गप्पा पण व्हायच्या. तिच्यासाठी भारतातून अजून दोन पोस्टर आणू आणि पुढचं काम लवकर करवून घेऊ असं आम्ही गमतीने म्हणायचो.
सृजनची एक शिक्षिका होती तिलाही शाहरुख खानच आवडायचा. सृजनच्या किंडरगार्टेन मधला एक मित्र होता, त्याची आई आणि माझी भेट ही बहुतांशी तिथे सोडताना फक्त व्हायची, तेव्हा बोलणं व्हायचं नाही. एकदा आम्ही दोघी पण ट्रेन मध्ये भेटलो अचानक, आणि मग भारताबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. तिने मग तिला पण बॉलीवूडची गाणी किती आवडतात असं सांगून बरीच गाणी म्हणून दाखवली. बोले चुडियां बोले कंगना तर फार आवडतं आणि माझ्या मुलांना पण आवडतं त्यावर नाचायला हेही सांगत होती. आता पुन्हा भेटली तेव्हा म्हणे तिचा मुलगा सृजनची गाणी लाव असं तिला सांगतो, कारण सृजन जी भाषा बोलतो ती हीच असं त्याला वाटतं. त्यांना कुणालाही हिंदीचा गंध नाही, सृजनला पण नाही आणि तरी ही सगळी गाणी तिला आणि तिच्या मुलाला सृजनची आठवण करून देतात हे गमतीशीर वाटतं.
भारतातल्या राज्याप्रमाणे बदलणाऱ्या भाषा हे इथे कुणाला माहीत नसतं आणि सांगितलं तरी त्यांना खूप आश्चर्य वाटतं. मग या संवादात जेव्हा अजून पुढे बोलणं होतं, तेव्हा मी हिंदी भाषा म्हणजे बॉलीवूडची भाषा असा संदर्भ सांगते, अजून सविस्तर काही सांगण्यापेक्षा ते सोपं वाटतं. तसंही माझ्यासाठी तरी हिंदी भाषा समजण्यात चित्रपटांचाच हातभार मोठा आहे.
सिनेमे आवडीने बघत असलो तरी आम्ही अगदी सिनेमावेडे गटात मोडत नाही, प्रत्येकच सिनेमा आवर्जून जाऊन बघूच असं होत नाही. इथे तर बाहेर चित्रपटगृहात हिंदी सिनेमे क्वचितच लागतात, त्यातून सगळं जुळून येऊन ते बघायला जमणं हे अजूनच अवघड होतं, युट्युब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरून जमेल तेवढं पाहिलं जात असलं तरी आमच्या डोक्यातली सिनेमा आणि चित्रपटसृष्टी ही तशी जुनी आहे असं म्हणू शकतो. वयाच्या टप्प्याप्रमाणे पण आवड निवड बदलत जाते. त्यामुळे कधी कधी काय हे लोक असे इतके वेडे आहेत आपल्या हिरोंसाठी, कोणतेही रडके सिनेमे काय एवढे आवडीने बघतात असं पण वाटतं. भारताची काय इमेज होत असेल या सगळ्या उगाच श्रीमंती किंवा अति उच्चवर्गीय चित्र दाखवणाऱ्या सिनेमातून असं सुद्धा वाटतं. पण तरी बॉलीवूड आणि भारत ही ओळख तशी बहुतांशी अभिमानास्पदच वाटते. भारताबाहेर भारताची ओळख करवून देण्यात बॉलीवूड आणि पूर्णच सिनेमासृष्टीचा फार मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही. गेल्या काही वर्षात हिंदी सिनेमे पण अधून मधून इथल्या सिनेमागृहात लागतात. जागतिकीकरणाच्या लाटेत हे अजून वाढत जाईल आणि. इतर भाषिक चित्रपट आता ओटीटी कृपेने सहज उपलब्ध आहेत तसेच आपले भारतीय चित्रपट जागतिक पातळीवर पोचत राहावेत. फक्त केवळ हे फॅमिली ड्रामा आणि दोन तीनच हिरो हिरोईन एवढीच ही ओळख मर्यादित राहायला नको, बॉलीवूड मधल्याच अनेक सशक्त कलाकृती, कलाकार आणि विविध भारतीय भाषांमधल्या कलाकृती सुद्धा इथल्या लोकांपर्यंत पोचाव्या असं अजून मनापासून वाटतं. तेव्हा अजून जास्त लोकांशी भारतीय, मराठी म्हणूनही या विषयांवर संवाद होतील आणि आम्ही अभिमानाने याबद्दल अधिकाधिक बोलत राहू.