२०१२ साली जर्मनीत नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते. भाषा शिकणे, नोकरी, युरोपात फिरणे, मग सृजनचा जन्म असे एकेक टप्पे पार झाले. घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली. चांगले वाइट अनुभव घेत आम्ही इथे रुळत गेलो. इथे येऊनच हौस म्हणून ब्लॉग चालू केला होता. २०२० मध्ये इथल्या अनुभवांबद्दल जरा सलग लिहून काढूयात असा विचार केला. मला माझ्या मर्यादित आवाक्यातून समजलेलं जीवनमान, इथे भेटलेले लोक, कामाच्या पद्धती, सण-संस्कृती, आवडत्या जागा, ऋतूमान, शिक्षणपद्धती या आणि इतरही प्रवासाबद्दलची ही लेखमालिका.
---------
बरोब्बर आठ वर्षांपूर्वी याच दरम्यान, म्हणजे १५ जुलैला मी जर्मनीत पोचले. जर्मन भाषा शिकतानाच्या सुरुवातीलाच "तुम्ही जर्मनीत का आलात?" हा प्रश्न हमखास असतो. मी आले ते लग्नाच्या निमित्तानेच. हे त्याचं साधं सरळ उत्तर होतं.
परदेश काही माझ्यासाठी नवीन नव्हता. पूर्वेकडचा जपान तर युरोपातलाच राणीचा देश, यांची महिना-दोन महिन्यांच्या वास्त्व्यात तोंडओळख झाली होती. हे दोन्ही देश बरेचसे परस्पर विरोधी अनुभव देणारे होते, पण भारताच्या तुलनेत बघायला गेलं तर त्या दोन्हीकडे बरंच साम्य सुद्धा होतं. त्यामुळे स्वच्छता, कमी रहदारी हे बघून एकदम दचकायला होत नव्हतं. जर्मनीला एका सुट्टीत महिनाभर राहिले होते, पण तेव्हा नवर्याच्या होस्टेल आणि स्टुडंट लाइफमध्ये सगळं वेगळं जग होतं. मग २०१२ ला इथे आल्यानंतर हा पूर्ण वेगळा प्रवास चालू झाला, कारण तेव्हा भारतातली नोकरी सोडून, इथे नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते.
२०१२ मध्ये आताच्या तुलनेत अगदीच कमी भारतीय होते. सुमेधचं ब्रेमेन मधलं शिक्षण संपवून, मग नोकरीसाठी म्हणून 'मानहाइम' हे आमचं पाहिलं वास्तव्याचं गाव. तिथे कुणीही ओळखीचं नव्हतं, सुमेध त्या कंपनीतला पहिलाच भारतीय होता. फेसबुक, ऑर्कुट किंवा इतरही ओळखींमधून या गावात किंवा आजूबाजूला राहणारी एकही व्यक्ती 'तेव्हा' माहीत नव्हती. नवऱ्याचं शिक्षण पूर्ण इंग्रजीतून आणि त्याच्या सोबत असलेले काही भारतीय विद्यार्थी, इतरही आंतर्राष्ट्रीय लोक यांच्याशीच तोवर त्याचा संबंध जास्त आला होता, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी नवीनच असणार होत्या. इथे येताना खास जर्मन संस्कृती, इथले लोक, वेगवेगळी गावं याची मलाही तशी विशेष माहीती नव्हती. जर्मन लोकांचा वक्तशीरपणा, अफाट प्लॅनिंग, तांत्रिक क्षेत्रातलं वर्चस्व, महायुद्ध याबाबतीत थोडंफार वाचून, ऐकून होते, नंतर सुमेध कडून त्याचे युनिव्हर्सिटीतले अनुभव ऐकले होते.
लग्न म्हणजे दोन कुटुंबियांचं नातं यासारख्या लग्नपत्रिकेतल्या गोष्टी बघताना वाटतं, की कुठल्याही मुलीने सासरी राहताना सुरुवातीला येणारं दडपण म्हणा किंवा हळूहळू ते घर, गाव आपलंसं करून घेणं ही प्रोसेस हळूहळू चालू असते. जेव्हा तुम्ही नव्या देशात संसार करायला जाता, तेव्हा हा देश हेही एक पूर्ण नवीन नातं असतं, इथले लोक, इथेच भेटणारे भारतीय मित्र मंडळ जे नंतर तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होतात, इथल्या जीवनमानाच्या पद्धती, हवामान, हेही सगळं अंगवळणी पडायला वेळ जावा लागतो. इथे अर्थात बरेचदा हे सगळं नवरा-बायको दोघांसाठीही नवीन असतं, आणि या सगळ्यात रुळायला प्रत्येकालाच कमी-अधिक वेळ लागू शकतो, ते व्यक्तीप्रमाणे बदलतं.
मला भाषा जुजबी येत होती, पण अजून शिकावं लागणार हेही माहीत होतं. अनेक वर्षांची आमची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप संपण्याचा आनंद होता. आजवर दोघंही स्वतंत्रपणे राहात होतो, तर आता जरा काही जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलू असा विचार होता. माझ्या दोन बॅग्ज, सुमेधच्या २ बॅग्ज आणि थोडंफार फर्निचर असलेलं एक घर इतक्यावर संसार चालू होणार होता. हे म्हणजे मला अगदी जुन्या काळात कुणीतरी आजी आपल्याला तिच्या संसाराची गोष्ट सांगते आहे असं वाटत होतं.
घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. भाषा, घरशोध, सोशल लाइफ, भारतीय ग्रोसरी, अनेक प्रश्न होतेच. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली.
इथे येऊनच हौस म्हणून ब्लॉग चालू केला. त्यात योगायोगाने प्रवासवर्णनं जास्त लिहीत गेले, काही पोस्ट मधून कधी इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर कधी भाषेच्या गमती, वेगवेगळ्या पोस्ट लिहील्या. आठ वर्ष झाले म्हणून मागच्या आठवड्यात जेव्हा हा भूतकाळ आठवत बसले, तेव्हा त्यातले अनुभव, तेव्हापासून तर आतापर्यंत माझ्यातलेच झालेले अनेक बदल हे सगळं ओघाने आठवलं. तेव्हा इथल्या अनुभवांबद्दल जरा सलग लिहून काढूयात असा विचार केला. मला माझ्या मर्यादित आवाक्यातून समजलेलं जीवनमान, इथे भेटलेले लोक, कामाच्या पद्धती, सण-संस्कृती असे अनेक विषय डोक्यात आले. अजून दहा वर्षांनी मलाच वाचता येईल पुन्हा हा एक स्वार्थ. (चुकाही दिसतीलच त्यातल्या कारण हे माझं नेहमीच होतं की जुनं काही वाचताना कधी शुद्धलेखन तर कधी लिखाण यातले दोषच दिसतात) पण त्या निमित्ताने माझा आळस दूर सारून, स्वतःलाच काही डेडलाईन घालून देऊन हे करूयात असा विचार केला, त्याचीच ही पाल्हाळिक सुरुवात...भेटूयाच पुढच्या पोस्ट मध्ये...
क्रमशः