शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं. बाहेर दुकानांमध्ये कामचलाऊ भाषेवर सहज निभाव लागायचा. पण पहिला मोठा बदल होता तो नोकरी सुरू झाली तेव्हा.
नोकरी शोधताना मूळ माझ्या फिल्ड मधला अनुभव जेवढा महत्वाचा होता, तेवढाच मी जर्मन शिकत होते हाही मुद्दा महत्वाचा होता. मला अस्खलित भाषा यावी ही कुणाची अपेक्षा नव्हती, पण मुलाखती दरम्यान तेवढा अंदाज त्यांना आला असावा. पण सुरुवातीलाच सकाळी आठ ते दुपारी चार सतत जर्मन भाषेतून जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं होतं, तेव्हा रोज संध्याकाळी मी प्रचंड वैतागलेली असायचे. आधीच तांत्रिक बाबी, त्यातून समोर कंप्युटरवर सगळं जर्मन मधून दिसतंय आणि सगळं नीट समजावं म्हणून दुप्पट लक्ष देऊन एकून ते समजून घेणे, असं सलग तीन आठवडे आणि मग काम सुरू झालं तेही पूर्ण जर्मन मधून. मग टीम मिटींग पूर्ण जर्मन मधून, त्यात इथे बोलली जाणारी बोलीभाषा आणि सगळे बोलायचे पण फास्ट, रोज तारेवरची कसरतच वाटायची. एक सहकारी जर्मन कुठे शिकलीस वगैरे विचारत होता. तर मी सहज उत्तर दिलं की 'इथे राहायचं असेल तर ते आवश्यकच आहे' असं उत्तर दिलं. तेव्हा माझ्या डोक्यात साधा शिकायला हवा असाच विचार होता, पण त्याने माझा "आवश्यकच" हा शब्द खोडून काढला आणि शिकलीस ते चांगलं आहे पण असा काही नियम नाही असं मला उत्तर दिलं. एकेक शब्द इतका महत्वाचा ठरू शकतो हे माहीत आहे, पण तरी त्यादिवशी त्रासच झाला. मग एकदा 'नाही' या शब्दासाठी जर्मन शब्द आहे 'नाईन'. तर हा त्याऐवजी 'नेट' म्हणाला. नेट चा खरा अर्थ होतो नाईस. मी बराच वेळ विचार केला, मग लक्षात आलं की हा स्थानिक शब्द आहे नाही साठी आणि इथल्या भागात सर्रास वापरला जातो. जेवायला जाताना तो सहकारी माह्ल त्साइट (Mahl Zeit) असं म्हणून उठला. यावर काय रिअक्शन द्यायची असते हेच मला माहित नव्हतं, हा शब्दच नवीन होता. मग आजूबाजूला हेच आवाज ऐकू आले, जेवायला जाताना भेटणारे लोक पण हॅलो म्हणू त्या पद्धतीनं एकमेकांना Mahl Zeit म्हणत होते. मग समजलं की ही पद्धत आहे, लंच टाईम झाला की त्या दरम्यान सगळे Mahl Zeit म्हणतात, थोडक्यात जेवणाची वेळ झाली असं. पूर्वी जेव्हा बहुतांशी प्रोडक्शन फॅक्टरी होत्या, तेव्हा जेवायची वेळ झाली की घंटा वाजवून सगळे जेवायला निघायचे, आणि त्यातून ही माह्ल त्साइट म्हणण्याची पद्धत रुळत गेली जी आजही आहे. पुस्तकी जगातून हळूहळू असे अनुभव बाहेर घेऊन आले.
या भाषेत एक तर प्रत्येक पुल्लिंगी, स्त्रीलिंगी रुपं आहेत प्रत्येक शब्दाला, जो इंग्रजी आणि जर्मन मधला फरक आहे. आणि मराठीशी तुलना करायला गेलो तर आपली बस तर यांच्यासाठी तो बस, आपली खुर्ची तर यांचा तो श्टुह्ल असे अनेक वेगळे शब्द. आपल्याकडे पारसी लोक कसे मराठी बोलतात, तसे आम्ही सुरूवातीला जर्मन बोलताना दिसत असू कारण हे गोंधळ हमखास व्हायचे. वाक्य जर्मन, पण ती बस असं ग्रूहित धरून इतर शब्दरचना जमायची. शिवाय तू, तुम्ही, आपण याप्रमाणे बदलणारी क्रियापदांची रुपं. हे मराठीत पण आहे, फक्त मराठीत आपल्याला त्यावर विचार करावा लागत नाही. एका पहिली दुसरीतल्या मुलाशी मी एकदा "तुम्ही" वापरून बोलत होते. त्याच्या चेहर्यावरचे भाव "मला 'तुम्ही' का म्हणत आहात" असे आहेत हे मला जरा वेळाने लक्षात आलं .पण तुम्ही वापरणं तेव्हा सगळ्यात सोपा आणि कुणाचा अपमान होऊ नये असा सेफ पर्याय होता. ऑफिस मध्ये सगळे तूच वापरायचे, मग तेही सवयीचं झालं. Fabrik म्हणजे फाब्रिक, हे कारखाना या अर्थाने वापरलं जातं. हे समजलं असलं तरी वाचताना पहिले कारखाना डोक्यात येत नाही, कापडच येतं. किंवा कापड हा शब्द वापरायचा असेल जर्मन मध्ये, तर fabric पहिले आठवतो, मग त्याचा या भाषेतला अर्थ वेगळा आहे हे आठवून पुन्हा मूळ शब्दाचा प्रतिशब्द शोधायला लागतो. अनेक इंग्लिश आणि जर्मन शब्द वाचायला सेमच आहेत असं वाटू शकतं, कारण स्पेलिंग सारखं किंवा एखाद्या अक्षराचा फरक, पण उच्चार पूर्ण वेगळे असतात. ही अगदी मोजकी उदाहरणं आहेत, असे अनेक शब्द नेहमीच बुचकळ्यात पाडतात. अनेक जर्मन शब्द हे खूप मोठे आहेत, याबाबत टीका आणि विनोद पण केले जातात. पण बरेच शब्द हे जोडशब्द आहेत. ती शब्दांची फोड जमली की ते खूप सोपे वाटतात.
ऑफिस ही भाषा शिकण्यासाठीची प्रमुख जागा असली, तरी त्याशिवायही सरकारी कार्यालयं, दुकानं, रेस्टॉरंट्स, घराचा भाडेकरार, बँक, दवाखाने, सार्वजनिक वाहतूक अश्या सगळ्याच ठिकाणी भाषेचे धडे आपोआप मिळत होते. स्थानिक बोलीभाषा, त्यांचे काही वेगळे शब्द कळायला लागले. त्यातून इथे प्रचंड प्रमाणात पत्र येतात घरी, प्रत्येक लहान सहान बाबीसाठी पत्र हेच मुख्य संपर्काचं माध्यम असतं. मग ती वाचून कागदोपत्री सरकारी भाषेचा अंदाज यायला लागला. ऑफिसात वार्षिक मिटींग मध्ये परफॉर्मन्स बद्द्लचे जे कागद होते, ते वाचताना बॉसच म्हणायचा की ही भाषा आम्हालाच अवघड वाटते, तुम्हाला अजूनच वाटेल. बोलण्याचा आत्म्वविश्वास आला तरी इमेल लिहीणे बरेच दिवस नको वाटायचं. आता इंटरनेट कृपेने गुगल (चुकीचं पण भाषांतर होतं कधी त्यावर तरी) आणि इतरही बऱ्याच ऑनलाइन सर्व्हिस उपलब्ध आहेत आणि यात सतत नवीन गोष्टींची भर पडते आहे. त्यामुळे इमेल लिहीताना 'प्लीज फाइंड अटॅच्ड डॉक्युमेंट' हे एवढं लिहीतानाही सगळं चेक करून मगच पाठवायचे. आता मात्र तेवढी भीती वाटत नाही.
सृजनचा जन्म झाला तेव्हा बाळंतपण, बालसंगोपन या विषयातली भाषा शिकणं झालं. मग त्याच्या डे-केअर आणि किंडरगार्टन मधून नवीन विषय समजले. आता शाळेत जातो आहे तेव्हा शब्दसंपदा आमचीही वाढलीच, पण त्याच बरोबर आता पहिल्यांदाच तो ही भाषा एक विषय म्हणून शिकतो आहे. एकच भाषा असली तरी पहिलीतल्या मुलांना शिकवायच्या पद्धती, अभ्यासक्रम आणि मोठेपणी आम्ही एक परदेशी भाषा म्हणून शिकलो, ही तफावत कशी आहे हे नवीन समजतं आहे. आम्ही थिअरी मध्ये शिकलेल्या काही गोष्टी, त्याने खूप आधी फक्त किंडरगार्टन मधून ऐकून कश्या आत्मसात केल्या हे लक्षात येतं, आम्ही त्याच्याकडून असं अप्रत्यक्ष बरंच काही गेल्या काही वर्षात शिकलो आणि शिकत आहोत. अर्थातच आम्ही पहिलेपासून सृजनशी घरी मराठीच बोलतो. त्यामुळे मराठी तो नीट बोलतोच. कधी दोन भाषांची सरमिसळ होते, मराठी वाक्य पण जर्मन वाक्यरचना असं होतं, त्यातून गमतीजमती सुद्धा खूप घडत असतात.
मनापासून फार कौतुक करण्यात जर्मन लोक आखडू आहेत, पण भाषेच्या बाबतीत मात्र बहुतांशी कौतुक होतं. इथेच चाळीस पन्नास वर्ष राहूनही जर्मन अजिबातच बोलू न शिकणारे अनेक जण असतात, त्या पार्श्वभूमीवर असेल की आम्ही भाषा शिकलो, बोलतो याबद्दल त्यांना विशेष वाटतं.
पण हेही आहे, की समोरच्याला भाषा येते म्हणजे सगळं समजेलच असं आम्हाला गृहीत धरलं जातं. आपणही संभाषणात वाहवत जाऊन एखादा शब्द अगदीच चुकीचा वापरला जातो आणि गैरसमज होऊ शकतात. एखादा शब्द नाही समजला तर तो तेवढा तरी सांगावा ना इंग्रजी मधून, पण तसं कमी वेळा होतं. तांत्रिक शब्द असतील तर हे अजूनच अवघड वाटतं. घर घेतलं तेव्हा घराचे आणि बँकांच्या व्याजाचे कागदपत्र वाचणे हे एक डोकेखाऊ काम होतं. एक तर त्यात पुन्हा सरकारी न्यायालयीन भाषा, अनेक नवीन शब्द आणि हे करार असायचे शंभर दीडशे पानांचे. काही वेळा एकेक पान वाचून समजून घ्यायला दुप्पट वेळ जायचा.
पण एकूण भाषेला सरावण्याचा काही काळ गेला की मग त्यात आपण वेगळं काही करतो आहोत असं वाटत नाही. आपोआप लोकांशी बोलताना याच भाषेतून संभाषणाला सुरूवात होते. प्रत्येक शब्द समजला नाही तरी पूर्ण बोलण्याचा अर्थ समजतो तेवढंही पुरेसं वाटतं. काही जर्मन शब्द हे रोजच्या बोलण्यातला भाग होतात, जर्मनाळलेलं मराठी इंग्रजी म्हणता येइल असं. जसं ऑलिव्ह ऑइल ला ऑलिव्ह तेल म्हणणं रुचत नाही, तसेच काही शब्द त्या त्या भाषेतच छान वाटतात, तर कधी सोपे वाटतात. अपॉइंटमेंट या शब्दापेक्षा सहजच टर्मिन (Termin) हा शब्द जास्त वापरला जातो. कापुट (Kaputt) हा शब्द तुटले, खराब झाले, गंडले अशा अनेक अर्थांनी वापरला जातो आणि आम्ही पण तोच वापरतो. आता युट्युब वरचे अनेक व्हिडीओ आम्ही सहज बघू शकतो. एक दोन जर्मन सिनेमे पण पाहिले आहेत. जर्मन मधून पाककृती वाचणे, बघणे हे खूप अवघड वाटत नाही. घरी आठवड्याला येणारं वृत्तपत्र, दवाखान्यात वेटिंग रूम मध्ये असताना तिथली मासिकं चाळणं, काही माहिती हवी असेल तर गुगल वर जर्मन भाषेतूनच शोधून जर्मन मधून थोडं वाचणं हे आता सहज घडतं. आता काही वाक्य बरोबर येतात, पण तेव्हा व्याकरणायला नियमांची उजळणी करावी लागत नाही, ते सवयीने जमतात.
याच सगळ्याचा एक भाग म्हणजे इंग्रजी भाषा जी काही येत होती, ती बिघडायला लागणे. अजूनही जर्मन आणि इंग्रजी यात इंग्रजीच जवळची वाटते. ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाला की 'चला बरं आहे आता' म्हणून हायसं वाटतं. पण मग नेमकं खरंच काही लिहीताना अनेक वेळा जर्मन शब्दच डोक्यात राहतो, इंग्रजी प्रतिशब्दच आठवत नाही. कधी इंग्रजी शब्द लिहीताना पण स्पेलिंग मात्र जर्मन प्रमाणे केलं जातं. आधी इंटरनेटवर फक्त जर्मन शब्दाचा अर्थ शोधला जायचा, आता काही वेळा इंग्रजी अर्थ शोधावा लागतो. एकदा dumb charades खेळताना जर्मन शब्दच आठवत होता, पण त्याचा रोजच्या वापरातला मराठी आणि इंग्रजी शब्द त्या क्षणी पूर्ण विसरले होते. आता कधी कधी अनोळखी कुणी माणूस स्वतःहून इंग्रजीत बोलला तरी आम्ही जर्मन मधूनच बोलतो आणि मग आम्हाला येतं समजलं की तोही जर्मन मधून बोलतो. अश्या वेळी मला दहा वर्षांपूर्वी असे लोक का भेटले नाही कधीच, असं पण वाटतं, कारण तेव्हा जास्त अडचण व्हायची. आता तेवढं अडत नाही. पण ज्या इंग्रजीतून आपण सहज उत्तम लिहायचो, बोलायचो, त्यात आता येणार्या अश्या लहान अडचणी मोठ्या वाटतात.
इंग्रजी शब्द विसरण्याबद्दल जे लिहिलं आहे वर, तेच मराठी शब्दांबाबतही होतं कधी कधी, पण त्याच बरोबर आपली मातृभाषा उत्तम यायलाच हवी यासाठी मग स्वतःहून जास्त प्रयत्नही केले जातात. असं म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्या भाषेत विचार करू शकता का, की आधी एका भाषेत विचार करून मनातल्या मनात भाषांतर करता यावरून ती भाषा किती सवयीची झाली आहे याचा अंदाज येतो . यावर मला अजून माझ्याबाबतीत एक असं नेमकं उत्तर कळलेलं नाही. पुस्तक वाचताना मला अजूनही इंग्रजी अवघड वाटतं, मराठी वाचनच सगळ्यात जास्त आवडतं. लिहायला बोलायला आधी मराठी आणि मग इंग्रजी, कामासंबंधित काही असेल तर आधी इंग्रजी असा क्रम येतो, आणि मग जर्मन. इंग्रजीतून काही डॉक्युमेंट असेल तर लगेच जर्मन पेक्षा ते बरं असं वाटतं. पण शेजार्यांशी नेहमीच संवाद जर्मन मधून होत असल्यामुळे, त्यांच्याशी अचानक इंग्रजी बोलता येणार नाही. त्यामुळे त्या त्या स्थळकाळा नुसार मराठी, इंग्रजी आणि जर्मन सगळ्याच भाषा सोयीच्या वाटतात, आणि त्या त्या क्षणी बहुतांशी त्याच भाषेत विचार चालू असतात.
अमेरिका किंवा इंग्लंडला जाणार्यांनाही इंग्रजीचे अॅक्सेंट्स हा प्रश्न येतो, पण त्यापेक्षा वेगळ्या देशांमध्ये, जिथे इंग्लिश ही प्रमुख भाषाच नाही, तिथे हा प्रश्न मात्र जास्त अवघड प्रश्न असतो. मी ही सुरुवातीला जुजबी आलं तरी ठीक अश्या विचारात होते. पण कधी गरज म्हणून, कधी खरंच वेगळं शिकायला मजा येते आहे म्हणून, मग सवयीचा भाग झाला म्हणून पण जर्मन भाषेशी गट्टी होत गेली. पण शेवटी एका मर्यादेपर्यंतच तो आपलेपणा वाटतो. त्यांच्या भाषाप्रेमाचं कौतुक आहेच, तरी काही वेळा अजूनही सहज इंग्रजी बोलणारा देश का नाही हा, याचा त्या त्या क्षणी त्रास पण होतो. दिवसभर जर्मन मधून लोकांशी बोलावं लागलं तर घरी आल्यावर, एक शब्द जर्मन मधून बोलायला लागू नये अजून अशीच स्थिती असते. डॉक्टरकडे जायचं असेल तर मूळ दुखण्याइतकंच, त्यासाठीचे जर्मन शब्द शोधून ते सांगणे हे पण संकटच वाटतं. कामासंदर्भात किंवा इतरत्रही कुठे जर काही प्रतिवाद घालायचा असेल, तर आपली बाजू बरोबर असून सुद्धा ते केवळ या भाषेत नीट मांडता आलं नाही की वाइट वाटतं. आमच्या जर्मन बोलण्यावर इथल्या बोलीभाषेचा प्रभाव आहे . प्रमाण जर्मन ज्या भागात बोलली जाते तिथल्या लोकांना इथलंही अवघड वाटतं. हेच इथून बायर्न राज्यात गेलो तर त्यांचा भाषेचा लहेजा पूर्ण वेगळा आहे. इथले स्थानिक लोक सुद्धा आम्हाला त्यांची भाषा समजत नाहीत असं स्पष्ट सांगतात. मग त्यांच्यापुढे आपण कोण असा प्रश्न पडतो. आपल्याला एखादी गोष्ट नीट जमत असूनही केवळ भाषेमुळे मागे पडलो, तर त्याचाही त्रास होतो. खूप दिवसांचा खंड पडला की पुन्हा ही भाषा पण विसरायला लागतो. पुन्हा जमतं नंतर, पण ते ब्रेक नंतरचे काही दिवस दर वेळी ठळकपणे जाणवतात.
भारतातच एखाद्या वेगळ्या राज्यात असतो तर इतके प्रयत्न करून तिथली भाषा शिकलो असतो का? हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि त्याचं उत्तर नकारार्थीच येतं. गरज नाही, चालून जातंय ना, मग कशाला असाच विचार केला असता. कदाचित थोडं गरजेपुरतं बोलायला शिकले असते, असं वाटतं पण नक्की सांगू शकत नाही. हे लोक कसे इंग्रजीला अजिबात थारा देत नाहीत आणि आपण कसे आपली मातृभाषा विसरून चाललो आहोत याबद्दल बरेचदा टोकाची मते वाचायला मिळतात. काही प्रमाणात मला दोन्ही बाजू पटतात, आपण आपल्या मातृभाषेपासून लांब जायला नको हे मला वाटतं, आणि शक्य तिथे मराठी हीच माझी अजूनही पहिली भाषा आहे आणि राहील. इंग्रजीचा उदोउदो नको हेही खरंच आहे, पण इंग्रजी कडे फक्त एक भाषा म्हणून परीक्षेपुरतं ते शिकायचं ही वृत्ती इथेही थोडी बदलण्याची गरज आहे, असं देखील वाटतं. शिवाय यात भारत, भारतातली राज्य, इथले देश आणि प्रत्येकाची स्थिती बघता सरळ सरळ तुलना सुद्धा करता येणार नाही. पण हा पूर्ण विषयच इथे खूप अवांतर होईल. मला इंग्रजी नीट येतं, अजूनही दुसरी भाषा म्हणून इंग्रजीशी जवळीक जास्त वाटते आणि इंग्रजी येत असण्याचा कामाशिवाय, मला अगदी जर्मन भाषा शिकताना सुद्धा फायदा झाला असं वाटतं.
इथेही काही प्रत्येकाचं या भाषेशिवाय अडत नाही. मोठी शहरं, जिथे वेगवेगळ्या देशातले लोक आहेत, ज्यांच्या कामासंदर्भात पण भाषेशिवाय काही अडत नाही असे अनेक जण वर्षानुवर्ष इथे राहात आहेत. अश्या शहरात एक तर बरेच लोक कामापुरतं इंग्रजीतून सुद्धा बोलतात, आता तर प्रत्येकाच्या हातात उपलब्ध असणारा फोन आणि इंटरनेट यामुळे दैनंदिन जीवनात फार काही अडत नाही. कुणी जबरदस्ती केली नाही, तरी या ना त्या प्रकारे ही भाषा इथे राहताना डोक्यावर आदळतेच आणि त्यातून कामापुरती भाषा आपोआप समजायलाही लागते. सरकारी कार्यालयात अजूनही सगळीकडे जर्मनच वापरली जाते पण अशी वेळ कमी येते, जर्मन भाषा येणारे कुणी ओळखीतले लोक असतील तर त्यांच्या मदतीने ही कामं निभावली जाऊ शकतात. पर्यटक म्हणून ठराविक जागी जायचं असेल तर तिथे लोक इंग्रजीतून व्यवस्थीत बोलतात.
पण एकंदरीत पूर्ण देशातल्या लहान मोठ्या ठिकाणांचा विचार केला, तर बहुतांशी ठिकाणी, इंग्रजीसाठी लोक अजिबातच उत्सुक नसतात, अगदी नाइलाज म्हणूनच बोलतात. कामाची भाषा ही पूर्णपणे जर्मनच आहे अश्या अनेक कंपनीज आहेत. अश्या ठिकाणी पाय रोवून उभं राहायचं असेल तर भाषा आवश्यक ठरते. गरजेप्रमाणे इंग्रजीचा वापर केला गेला तरी तो शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जातो. कितीतरी वेबसाइट्स सुद्धा गेल्या काही वर्षात दोन भाषांचा पर्याय दिसायला लागले आहेत, पण आम्हीच सुरूवातीला आलो, तेव्हा फक्त एका बँकेचे ऑनलाइन व्यवहार इंग्रजीतून करता येत होते. पैशांच्या बाबतीत रिस्क नको म्हणून आम्ही ती बँक तेव्हा निवडली. आता हे प्रमाण वाढलं आहे आणि आम्ही सुद्धा या भाषेत आर्थिक व्यवहार करू शकतो याची खात्री आता आहे. इंजिनियरिंगला असताना इंग्रजी वर्तमानपत्र लावा, सिनेमे बघा म्हणजे इंग्रजी सुधारेल असं फॅड पूर्ण हॉस्टेल मध्ये होतं. आम्ही मैत्रिणीनी पण ते सगळं केलं, पण मला अजूनही वाटतं की खरं इंग्रजी सुधारलं ते नोकरी सुरु झाल्यावर, निदान माझ्यापुरतं तरी. तसंच हे नीट धडे गिरवून व्याकरण समजून घेणे हे जितकं आवश्यक आहे, तितकंच ते रोजच्या वापरात येणं सुद्धा गरजेचं आहे याचा प्रत्यय नेहमीच येतो.
इथे ही भाषा शिकवण्यासाठी या देशातच नाही, तर जगभर अनेक संस्था आहेत, त्यांचे ठराविक आखलेले अभ्यासक्रम आहेत, जागोजागी ते उपलब्ध करून देण्यातून अधिकाधिक लोकांना भाषा शिकण्यासाठी प्रवृत्तही केलं जातं. अनेक विद्यार्थी आधी भाषा पूर्ण शिकून, मग इथे त्यांचं उच्चशिक्षणच पूर्ण जर्मन भाषेतून घेतात, अश्यांचं मला प्रचंड कौतुक वाटतं. आवड म्हणून, व्यवसाय म्हणूनही अनेक जण भाषा शिकतात, शिकवतात. आमच्यासारखे काही जण थोडं शिकून, थोडं सरावाने या भाषेशी, जागेशी जोडण्याचा प्रयत्न करतात.
फक्त गरज बाजूला ठेवली, तरी जिथे राहतो आहोत तिथली भाषा शिकण्यातून एक प्रकारचं स्वातंत्र्य अनुभवता येतं हे आता जास्त जाणवतं. आणि ते मला स्वतःला खूप महत्वाचं वाटतं. इथल्या लोकांशी जोडण्यात भाषा हाच सगळ्यात मोठा दुवा असतो. भाषा येत असेल तर ऑफिस मधले कामाशिवायचे लोकांचे अनेक कंगोरे, लोकांचं आपसातले बोलणं आपल्याला समजणं यानेही फरक पडतो. संगीतात जसं एखादी जागा घेणे असा शब्दप्रयोग केला जातो, तसं इथल्या वास्तव्यात, विविध माध्यमातून ऐकून, वाचून, समजून त्या भाषेतल्या जागा सापडायला लागतात, लय पकडता येते. इथली माणसं ओळखायला, त्यांची वैशिष्ठ्य ओळखायला मदत होते. हे कुठे व्यावहारिक जगात रोज उपयोगी होईल असं नाही, पण काही गोष्टी समजण्यातून वेगळा आनंद मिळतो, समाधान मिळतं. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन अश्या सगळ्याच भाषा आमच्या पद्धतीने आम्ही प्रवाहात पुढे नेत राहतो.