जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
मी ही भाषा शिकायला सुरूवात केली ती नोकरी लागल्यानंतर, त्यालाही आता पंधरा वर्ष होऊन गेली. तेव्हा काहीतरी शिकूयात वेगळं असा विचार चालू होता. तेव्हाच सुमेध जर्मनीत आला, मग आपोआपच काय शिकायचं या प्रश्नाला 'जर्मन' हे उत्तर मिळालं. मधल्या काही वर्षात भारतातले, अनेक लोक जर्मन भाषा शिकलेत, शिकत आहेत. पुण्या मुंबईत जर्मन भाषा शिकणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. कोथरुड हे कसं दुसरं जर्मनीच आहे आणि तिथे कसं सगळ्यांनाच जर्मन येतं यावर अनेक विनोद आणि मीम्स पण व्हॉट्सअॅप वर फिरत असतात. पुण्यात गोइथे इन्स्टिट्यूट आणि रानडे इन्स्टिट्यूट या दोन्ही नावाजलेल्या संस्था आहेत. पण वेळेच्या बंधनामुळे मी एका वेगळ्या ठिकाणी सुरूवात केली, त्यात अधून मधून खंडही पडला, पण तिथे या भाषेची तोंडओळख झाली. इथल्या व्हिजा साठी लागणारं एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षा दिली, खरी परीक्षा तर इथे आल्यावरच होती.
येऊन लगेचच जवळ कुठे भाषेचे कोर्सेस आहेत हे शोधायला सुरुवात केली. बर्याच गावांमध्ये Volkshochschule (फोक्सहोखशुलं) ही एक संस्था असते, ज्याला अगदीच शब्दश अर्थ घेतला तर लोकशाळा म्हणू शकतो. तिथे संगीत, कुकिंग, मेकअप अश्या विविध विषयातले कोर्सेस असतात. तिथेच जर्मन भाषा देखील शिकवली जाते. आमच्या जवळच्या अश्याच एका ठिकाणी एक कोर्स नुकताच चालू झाला होता म्हणून तिथे गेले, मी आधी एवढं एवढं शिकले आहे, त्यामुळे आता पुढच्या लेव्हल पासून सुरूवात करू शकेन, हे ही सांगितलं. पूर्ण जर्मन भाषेतून अडखळत, त्यांचं बोलणं दोन दोन वेळा ऐकून समजून घेत, एक दोन इंग्रजी शब्द वापरून ते संभाषण पार पडलं आणि दुसर्या दिवसापासूनच खर्या क्लासला सुरूवात झाली.
जर्मन भाषा शिकण्यासाठी खरंच उत्सुक असलेले, काही नाइलाज म्हणून शिकणारे, नोकरीसाठी गरजेचं आहे म्हणून शिकणारे, जर्मनीत काही काळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्याची इच्छा असणारे असे वेगवेगळ्या उद्देशाने आले नॉन जर्मन लोक तिथे होते. क्लास सुरू झाला त्यादिवशी मला पहिले दिसली ती मोनिका. गोरी, उंच, मोकळे केस सोडलेली आणि चुणचुणित तरूण मुलगी. मुख्य म्हणजे टीचर येईपर्यंत ही कुणाशीतरी इंग्रजीतून बोलत होती म्हणून मला अजून लक्षात राहिली, तो एक आपलेपणा वाटला. मी नवखी होते. इतर अनेक जण या बॅचमध्येच सुरूवातीपासून होते, त्यामुळे ओळखत होते. वय २० ते पार चाळीशीच्या पुढचे लोक, अल्बेनिया, टुंगा या कधी नावंही न ऐकलेल्या देशातले लोक यांच्यासोबत हा भाषा शिकण्याचा प्रवास सुरू झाला. शिक्षिकेची ओळख झाली. मग कुठून आलीस, कशासाठी आलीस, भाषा का शिकायची आहे, आधी कुठे शिकले, व्यवसाय काय असे ठराविक प्रश्न आले. तिथे अजून दोन भारतीय मुलं बघून जरा हायसं वाटलं. ब्रेक मध्ये या भारतीय क्लासमेट्स सोबत बोलताना आधीचेच कोण कुठली हे प्रश्न देशावरून राज्यांपर्यंत आले. पहिल्या दिवशी, अगदी पहिला आठवडा सुद्धा मला काहीच समजत नव्हतं. एक तर माझ्या शिकण्यात बराच खंड पडला होता आणि त्यातून इथली शिकवण्याची पद्धत वेगळी होती. दोन-तीन आठवड्यात लोक ओळखीचे झाले, मी पण त्यांच्यातलीच एक झाले.
भाषा शिकण्याच्या निमित्ताने इथे कचरा व्यवस्थापन कसं केलं जातं, काही गावांची माहिती, खाण्याच्या पद्धती, वेगवेगळे व्यवसाय, महिलांचं आयुष्य, इथल्या सणांची माहिती असेही अनेक विषय असायचे. भाषा आणि त्यानिमित्ताने मग या देशातले नियम, इथल्या पद्धती, जीवनशैली या सगळ्यांची आपोआप या निमित्ताने सांगड घातली जायची. याशिवाय इथे राहताना, भविष्यात भविष्यासाठी मदत व्हायला हवी म्हणून रेल्वे स्टेशनवर असणार्या उद्घोषणा समजून घेणे, पेपर मधल्या जाहीराती समजून घेणे, नोकरीसाठी पत्र लिहायला शिकणे अश्याही बाबी यात अंतर्भूत होत्या. मग कधी कानगोष्टी खेळल्या जायच्या. फळांची नावं सांगा, फुलांची नावं सांगा असे अनेक खेळ खेळत शब्दसंग्रह वाढायचा. त्याच वेळी इथेच राहात असल्यामुळे मुख्य फायदा व्हायचा की वर्गात जे काही शिकलो त्यातलं बरंचसं रोज अनुभवता यायचं. रोज ट्रामने या क्लासला जाताना, प्रत्येक स्टॉपचा उच्चार आपोआप कानावर यायचा. ट्राम मध्ये लोकांची बोलीभाषा ऐकू यायची. ट्रेन प्रवासावेळी तिथल्या घोषणा ऐकून मग एक पद्धत लक्षात यायची, त्याचा परीक्षेत फायदा व्हायचा. सुपरमार्केट मध्ये अनेक वस्तू दिसायच्या त्यावरची नावं समजायला लागायची. थोडक्यात अभ्यासेतर असं शिक्षणही रोजच व्हायचं.
क्लास मधली मोनिका होती ग्वाटेमालाची, बारावी होऊन पुढे मेडिकल शिक्षण सुरू होण्याच्या आधी तिनी आणि तिच्या घरच्यांनी मिळून एक वर्ष ब्रेक घ्यायचं ठरवलं. इथे तिच्या मावशीकडे राहून ती भाषा शिकत होती. हे सगळंच मला अगदी वेगळं आणि कौतुकास्पद वाटलं होतं. त्याच वेळी तिला मावशीच्या घरात राहायचं येणारं दडपण, इथला खर्च खूप आहे त्यामुळे करावी लागणारी काटकसर याही बाबी तिच्याकडून समजायच्या. तिला तिच्या देशाबद्दल अफाट प्रेम होतं. ग्वाटेमाला सांगितलं की समोरच्याच्या चेहर्यावर बरेचदा प्रश्नचिन्ह असायचं, मग ही पण अक्खा दक्षिण अमेरिकेचा नकाशा घेऊन समजावून सांगायची. मी पुण्यात असताना बुलढाणा सांगायचे तेव्हा असंच "शेगाव जवळ, अकोला माहिती आहे का, मग लोणार?" असे जवळचे संदर्भ देऊन समजावून सांगायचे. तेच इथे दिसत होतं. मोनिकाने आम्हाला अॅपल पाय शिकवला होता. मी तिला पुर्या, पाव भाजी खायला बोलावलं होतं. एका जॅपनीज मुलीने क्लास मधल्या प्रत्येक मुलीला सगळ्यांसमोर 'तुझ्या नवर्याचं अफेअर असेल तर काय करशील?' असा प्रश्न विचारला तेव्हा आम्ही बाकी सगळ्या आश्चर्याने बघत बसलो होतो, म्हणजे असे प्रश्न बेधडक क्लास मध्ये विचारणं हा कल्चर शॉकच होता. याच मुलीने कचरा वर्गीकरण बाबत बोलताना 'मी गेल्या सहा महिन्यांपासून जर्मनीत आहे पण मला काहीच माहीत नाही, कारण कचरा टाकणे हे माझ्या बॉयफ्रेंडचंच काम आहे' असंही बाणेदारपणे सांगितलं होतं. दोन नवीन लोक भेटले की कश्या पद्धतीने ओळख करवून घेतात, यात आपापल्या देशातल्या पद्धती काय अशी चर्चा चालू होती. क्लास मधल्या दक्षिण भारतीय मुलाने, मोठे लोक भेटले तर नमस्कार कसा केला जातो हे तिथे साष्टांग नमस्काराचं लोटांगण घालून त्या टीचरला समजावून सांगितलं होतं. काही शिक्षकांच्या पुढे पुढे करणारे, त्यांना ब्रेक मध्ये जाऊन भेटणारे असेही लोक होते. सगळ्यांनी मिळून आणलेलं गिफ्ट फक्त स्वतःच आणलंय अशा आवेशात एकटीनेच एकीने दिलं होतं. असे काही देशोदेशीचे नमुने तर काही अवली लोक यांच्यासोबत तीन महिने रोज दुपारी दोन ते सहा या वेळात मी वर्गात बसून भाषा शिकत होते. बुलढाण्यातून पुण्यात आले तेव्हाही अशा कक्षा रुंदावत गेल्या, त्या आता जागतिक पातळीवर बदलत होत्या. सगळ्यांचे आपापल्या देशातले अनुभव आणि त्यामुळे जर्मनीकडे सुद्धा बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन, इथल्या आवडत्या आणि नावडत्या गोष्टी सुद्धा वेगळ्या असायच्या. भाषा शिकण्याइतकाच हा नवीन देश या सगळ्यांच्या मार्फत अनुभवणे हेही रोचक होतं.
दोन्ही शिक्षकांकडून परीक्षेची चांगली तयारी करवून घेतली गेली आणि शेवटी परीक्षा होऊन अजून एक मोठा टप्पा पार पडला. "पहिला आठवडा तू खूप दबकून होतीस, दोन दोन शब्द बोलायला सुद्धा खूप विचार करायचीस पण आता तीन महिन्यात मला तुझ्यात खूप फरक दिसतो आहे, सहज बोलू शकते आहेस, त्यामुळे परीक्षेत चांगलेच गुण मिळवशील याची खात्री आहे" हे एका शिक्षिकेने केलेलं कौतुक त्या परीक्षेइतकंच महत्वाचं वाटलं होतं. मग नोकरी सुरू झाली आणि रोजच ही भाषा वापरताना खर्या अर्थाने व्यावहारिक संबंध यायला लागला. इथलं वास्तव्य पण एक दशकाहून जास्त झालं. त्यातून अजून नवीन गमतीजमती घडल्या, तशीच नवीन आव्हानं पण येत गेली. ही भाषा पूर्ण आपली अशीही कधी वाटली नाही, पण तरी सरावाची झाली, या भाषेशी, शब्दांशी मैत्री होत गेली. त्या टप्प्याबद्दल पुढच्या भागात...
क्रमशः