पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.
ऑक्टोबर मध्ये एकीकडे थंडीची सुरूवात होते, पानगळ म्हणून झाडांचे रंग बदलताना दिसतात. तेव्हा मुख्य वाट असते ते हॅलोवीनची. घरांवरची सजावट, दुकानातलं सामान सगळीकडे भुतं आणि भोपळे दात दाखवत नाचत असतात. मग त्यातलं उरलेलं सामान ऑक्टोबरच्या शेवटी पुन्हा गुंडाळून आत जातं. नोव्हेंबर मध्ये हिवाळ्याची सुरूवात म्हणून एक लाइट फेस्टिव्हल असतो, आपली दिवाळी आणि इकडे हा सण साधारण एकाच वेळी येतात, पण या सणाचं मुख्य सेलिब्रेशन लहान मुलांपुरतंच असतं. आणि मग हळूहळू दुकानात लाल पांढरा रंग आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात करतात. अनेक प्रकारचे पॅकिंग पेपर्स, ख्रिसमस थीमची डिझाईन असलेल्या पिशव्या, ग्रीटिंग कार्ड्स, सॅन्टाच्या आकारातल्या अनेक वस्तू, स्टिकर्स, ख्रिसमस ट्री वर सजावट करण्यासाठीचं सामान, विविध आकारातल्या आणि रंगातल्या लाइट्सच्या माळा हे प्रत्येक दुकानात दिसायला लागतात . स्नो आणि ख्रिसमस हे नातं गेल्या अनेक वर्षात दुरावलंच आहे, पण मग निदान दुकानातल्या वस्तूंमधून स्नो मॅन, बर्फ पडलेली घरं अशा रुपातूनच फक्त व्हाइट ख्रिसमस अनुभवता येतो.
अॅडव्हेंट आणि अॅडव्हेंट कॅलेंडर हा एक खास जर्मन प्रकार, यांची एक परंपरा म्हणूयात. ख्रिसमस आधीचे चार रविवार हे ख्रिसमसची पूर्वतयारी म्हणून धरले जातात, थोडक्यात दार वर्षी ख्रिसमसची मुहूर्तमेढ रोवली जाते. दुकानांमध्ये चार मेणबत्त्या ठेवता येतील असे wreath दिसायला लागतात. ख्रिसमस पूर्व चार रविवार धरले, तर त्या पहिल्या रविवारी एक मेणबत्ती लावून मग लोक तयारीला लागतात. मग ख्रिसमस केक करणे, कुकीज बेक करणे, गिफ्ट्स घेणे, ते पॅक करणे, भेटीगाठी अश्या गोष्टीना सुरुवात होते. दर रविवारी एक मेणबत्ती लावली जाते, असे चार रविवार झाले की मग येतो नाताळ. तयारी साठी आताच्या काळात एवढं काटेकोर पाळलं नाही, तरी रविवारी आवर्जून एकेक मेणबत्ती सगळे जण लावतात. याशिवाय अजून एक असतं ते म्हणजे ऍडव्हेंट कॅलेंडर. फार फार पूर्वी जर्मनीतच, गेरहार्ड नावाच्या कुणा मुलाच्या "अजून किती दिवस राहिलेत ख्रिसमसला?" या प्रश्नाच्या उत्तरावर उपाय, म्हणून त्याच्या आईने एक कॅलेंडर तयार केलं, त्यावर एक डिसेंबर पासून ते चोवीस पर्यंतचे काउंट डाऊनचे नंबर्स होते आणि दर दिवशी मग एक कँडी त्याला मिळायची. मग ही प्रथा सगळी कडे पसरली. आता या सगळ्याचं खूप मार्केटिंग झालं आहे, प्रत्येक दुकानात चोवीस चॉकलेट्स भरलेल्या कॅलेंडरचे असंख्य प्रकार मिळतात. आता त्यात चॉकलेट शिवाय दर दिवशी नवीन खेळणं मिळेल असेही अनेक प्रकार येतात. सध्या प्रसिद्ध असलेल्या कार्टुन प्रोग्राम्सशी संबंधित असे अनेक प्रकार दिसतात. दोन चार युरोपासून ते पन्नास पन्नास युरो पर्यंत यांच्या किमती दिसतात. मुलांना या ठिकाणी न नेणे हाच पर्याय दिसतो. जरी मुलांना जरा संयम शिकवायला याचा उपयोग होईल असं वाटलं, तरी प्रत्यक्षात आधी शाळेतून ऐकून अमुक प्रकारचं कॅलेंडर हवं अश्या मागण्या असतात, शिवाय एखाद्या दिवशी खाऊ दे की दोन चॉकलेट्स, मग उद्या नाही खाणार अश्या युक्त्या पण असतात. डीआयवाय प्रकारातल्या, अगदी क्रिएटीव्ह अशी घरी करण्याच्या कॅलेंडरने पिंटरेस्ट सारख्या साईट्स भरलेल्या दिसतात.
नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात गावागावातल्या ख्रिसमस मार्केट्सची तयारी सुरू होते. गावातला मुख्य चौक, प्रसिद्ध जागा अशा ठिकाणी तंबू ठोकले जातात. मुलांसाठी आकाशपाळणे, मेरी गो राउंड, ट्रेन्स असे खेळ उभे राहतात. बर्याच लहान गावात फक्त एक विकेंडचही मार्केट्स भरतात, पण मोठ्या शहरात मात्र नोव्हेंबरच्या शेवटापासून तर २२-२३ डिसेंबर पर्यंत ही मार्केट्स असतात. एका गावात सँटाची गाडी जाते ठराविक वेळी वरून, ते बघायला मजा येते. दर वर्षी तीच तीच दुकानं असतात असं अनेक वेळा गेल्यावर लक्षात येतं. इथे मेड इन चायना माल भरपूर असतो, स्पेशली वेगवेगळे दिवे, काही क्रोकरी अश्या दुकानात जास्त. यावर्षी तर गणपतीच्या पितळी मूर्ती सुद्धा ख्रिसमस मार्केट्स मध्ये दिसल्या. अर्थातच अनेक स्थानिक लोकांची दुकानं पण असतात. मध, मेणबत्त्या, विणकाम केलेल्या वस्तू, मातीच्या वस्तू, हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिक, क्रोकरी असे विविध प्रकार घेऊन जवळच्या लहान सहान गावातले व्यावसायिक या ठिकाणी आपला माल विकायला येतात. अनेक वेळा या वस्तूंच्या किमती बर्याच जास्त असतात, त्यांच्या कारागीरीची ती किंमत असते त्यामुळे त्या त्यांच्या जागी योग्य असल्या, तरी खास विकत घ्याव्या असं सहज होत नाही, अगदीच काही वेगळं वाटलं तर घेतलंही जातं. बरं गंमत अशी की हे दुकानदार लोक अगदीच निवांत बसलेले असतात. लॉट है सेल है असं कुणी ओरडत नसतंच, पण स्वतःहून काही म्हणजे काहीच मार्केटिंग सुद्धा करत नाहीत. त्यावेळी एकीकडे उगाच आपल्याला भरीस पाडत नाहीत हे जसं बरं वाटतं, तसंच अश्या सेम ठिकाणी भारतात अश्या ठिकाणी लोक किती जास्त खप करू शकतील असंही वाटतं.
खाण्यापिण्याबाबत म्हणायचं तर या मार्केट्समधली सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे म्युल्ड वाइन/ग्लु वाईन. वाइन आणि त्यात थोडी साखर, काही खडे मसाले घालून ती उकळली जाते आणि मग गरमच दिली जाते, त्यात लिंबाचा तुकडा किंवा संत्र्याचा लहान तुकडा पण असतो, म्हणजे तोही स्वाद उतरतो. वाईन घेताना वाईन आणि कपचे डिपॉझिट द्यायचे, कप परत देताना मग डिपॉझिट परत मिळतं. प्रत्येक गावातल्या या मार्केट्समधले कप हे तिथले सुवेनियर म्हणून पण बरेच जण घेतात. सहसा प्रत्येक ठिकाणी काही ठराविक खाण्याचे स्टॉल्स असतात. एक म्हणजे फळांवर चॉकलेट कोटिंग करून देणारं दुकान, एक क्रेप्स/पॅनकेकचं दुकान जिथे काही गोड तर एक दोन चीज, टोमॅटो अश्या प्रकारचे क्रेप्स मिळतात. एक गरम मश्रुम आणि ब्रेड असा पदार्थ मिळतो ज्यात जरा मसाले असतात, कधी एखादा सूप आणि ब्रेडचा स्टॉल, एक दोन जर्मन ब्राट वुर्स्ट (Brat Wurst) म्हणजे सॉसेजेसचे स्टॉल्स असतात. हल्ली एखाद्या ठिकाणी व्हेगन पदार्थांची गाडी असते. फ्रेंच फ्राईज शिवाय जर्मनीतलं कोणतंच मार्केट नसतं, ते असतातच. स्पॅनिश चुरोज, ग्रीक लांगोस हे काही प्रकार असतात. याशिवाय जर्मन ख्रिसमस केक, विविध प्रकारचे नट्स साखरेत आणि अजून वेगळ्या फ्लेवर्स मध्ये घोळवून ते नट्स असे काही स्टॉल्स हमखास असतात.
ठिकठिकाणी लोकांना उभं राहून वाईन प्यायला, खायला म्हणून लाकडी टेबल असतात, पण गर्दी इतकी असते की जागा सहज मिळतच नाही. सुरुवातीला भारतातून आल्यावर जेव्हा इथे लोकच दिसत नाहीत असं वाटत असतं, तेव्हा ख्रिसमस मार्केट एकदा बघितले की इतकी गर्दी होऊ शकते याची कल्पना येते, धक्का बुक्की नाही होत, पण एकूण सतत लोकांना बाजूला करत रस्ता शोधातच पुढे जावं लागतं.
पहिल्या काही वर्षात नव्याची नवलाई म्हणून पदार्थ घेऊन पाहिले, तरी नंतर तेच ते चार प्रकार आहेत असंही वाटतं. या सगळ्यात शाकाहारींसाठी पर्याय अगदीच मोजके असतात, त्यातून या सगळ्या प्रकारात भाजीची मजल जाते फक्त टोमॅटो पर्यंत. एकदा फुलकोबी, मश्रुम, ब्रोकोली यांचे भजे दिसले होते, पण ते म्हणजे नुसता मैदा किंवा कॉर्न फ्लोअर मध्ये तळलेले, त्याला भज्यांची सर येऊच शकत नाही. आपल्याकडे दहा प्रकारच्या भाज्या घालून क्रेप्स, ब्रेडचे प्रकार दिसले असते असं वाटतं. शिवाय गोड खाऊन पण कंटाळा येतो. आम्ही दर वर्षी ख्रिसमस मार्केट्स मध्ये वडापावची गाडी चालवण्याची स्वप्नं बघतो. इतक्या थंडीत मस्त गरमागरम सूप पासून तर पाव भाजी, भजी, दाबेली हे सगळंच खपेल असं वाटतं.
आता गेल्या काही वर्षात जर्मनी सोडून इतरही देशात अशी मार्केट्स भरतात, पण तरी मूळ जर्मनीत चालू झालेली म्हणून जर्मन लोकांना त्याचा फार अभिमान वाटतो. केवळ हेच नाही तर आपापल्या गावात भरणारी मार्केट्स, तिथली वाईन याचाही अभिमान असतो. खास डिसेंबरमध्ये आलेले पर्यटक सुद्धा हा अनुभव चुकवत नाहीत. आम्हाला पण दर वर्षी तेच प्रकार असले असं वाटलं तरी दर वर्षी जावंच वाटतं. दार वेळी नवीन गावांमध्ये जाऊन तिथले मार्केट्स आणि नेहमीचे आता माहिती असलेले अश्या दोन तीन ठिकाणी तरी जाणं होतं, आणि ते झालं नाही तर ख्रिसमस सेलिब्रेट केल्यासारखा वाटत नाही. मागची दोन वर्ष मार्केट्स बंद होती, त्यामुळे यावर्षी लोक जास्त उत्साहात होते, तरी युद्धामुळे वाढलेल्या महागाई मुळे सगळ्या किमती वाढलेल्या जाणवल्या आणि लोकांची गर्दी पण थोडी कमी होती. ख्रिसमस मार्केट्स चे म्हणावे तसे फोटो नाहीत, मुख्य तिथे मिळणाऱ्या पदार्थांचे तर नाहीतच, हे लेख लिहिताना लक्षात आलं, आता पुढच्या वर्षी खास फोटो साठी जाणं होईल.
या सगळ्या शिवाय नोव्हेंबर मध्येच प्रत्येक गावातल्या सरकारी कार्यालयातर्फे गावातल्या मुख्य रस्त्यावर, चर्च जवळ, एखाद्या पार्कात ख्रिसमस ट्री उभी केली जातात, त्यावार लाइट्स लागतात. शिवाय रस्त्यांवर लायटिंग लागतं. प्रत्येक गावात वर्षानुवर्षे एकाच पद्धतीचं लायटिंग असतं, जे मग हळूहळू सवयीचं झाल्यामुळे वेगळं वाटत नाही. पण दुपारी साडेचारलाच जेव्हा अंधार व्हायला लागतो, तेव्हा बाहेर दिसणारे हे दिवे, सजावट बघूनच बरं वाटतं. प्रत्येक गावागावातलं डेकोरेशन वेगळं असतं, त्यामुळे मग जवळच्या एखाद्या गावात चक्कर मारली की पूर्ण वेगळं वातावरण अनुभवता येतं. लोकांच्या घरात, बागेत फार सुरेख रोषणाई असते. याचे फोटो व्हिडीओ काढणं सहज जमत नाही, कारण नुसतं बघत बसावं वाटतं. कुठे लाइट्सचा रेनडीअर, कुठे सॅन्टाक्लॉज बागेत उभे दिसतात. स्पेशली लोकांच्या खिडक्यांमध्ये कापडी सॅन्टाक्लॉज चढतो आहे हे एक चित्र अनेक घरांमध्ये दिसतं. घरांच्या खिडक्यांमध्ये दिवे दिसतात. ऑफिस, किंडर गार्टन, शाळा सगळ्या ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि त्या खाली रिकामेच पण सुंदर पॅक केलेले बॉक्सेस ठेवले जातात. लहान मुलांच्या शाळेतल्या ऍक्टिव्हिटी, क्राफ्ट्स सगळ्याला ख्रिसमस ट्री, स्नो मॅन हे मुख्य विषय असतात. ख्रिसमसची गाणी मुलांसोबत शाळेत म्हटली जातात.
जर्मनीत सहा डिसेंबरला निकोलाउस टाग (Nikolaus Tag) असतो, हा लहान मुलांचा आवडता दिवस. त्या दिवशी सुट्टी नसते, पण लहान मुलांसाठी निकोलाउस येतो. निकोलाऊस आणि सॅन्टा हे दोन्ही वेगळे नाही, संत निकोलाऊसचेच वेगळे नाव पुढे सॅन्टाक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले, इतर बऱ्याच देशात तो ख्रिसमसच्या आदल्या दिवशी आणि ख्रिसमसला गिफ्ट्स वाटप करतो, जर्मनीत निकोलाऊस खास सहा तारखेला येतो, सहा डिसेंबर हा निकोलाउसचा स्मृतीदिन म्हणून. पाच तारखेला रात्री मुलं मोठे स्टोकिंग/मोजे/बूट बाहेर ठेवतात, निकोलाउस त्यात गिफ्ट्स ठेवतो, ती मुलांनी सकाळी उघडायची. किंडरगार्टेन मध्ये या दिवसासाठी आधीच आम्हाला मोजे देऊन ठेवा असं सांगायचे, हे मुलांचे नेहमीचे नाही तर खास ख्रिसमस साठी मिळणारी मोठी मोज्यांच्या आकाराची पिशवीचा म्हणू शकतो. आणि निकोलाऊस तिकडे मुलांना एखादं फळ, चॉकलेट्स द्यायला यायचा. आता शाळेत यावर्षी मुलांनी पिझ्झा केला, गोल चेहरा कापून मग त्यावर एक टोपी आणि हवं तसं त्यावर मग चीज, भाज्या टाकून निकोलाऊस पिझ्झा तयार करून खाल्ले. त्या दिवशी मुलांना निकोलाऊसची लाल टोपी घालून शाळेत येण्याची परवानगी होती, त्यामुळे सगळी मुलं अजूनच गोड दिसत होती. शेजार्यांकडून यावर्षी पण आधी निकोलाउस टाग म्हणजेच सहा डिसेंबरला गिफ्ट्स मिळाली, दारात ठेवलेली होती. आणि नंतर मग पुन्हा चोवीस डिसेंबरला पण काही मिळाली.
सहा तारखे नंतर मग पुन्हा चोवीसची संध्याकाळ म्हणजे इथल्या लोकांच्या खास फॅमिली गेट टुगेदर साठी महत्वाचा दिवस. हेही पुन्हा जर्मनी आणि काही युरोपीय देशांचं वेगळेपण. बऱ्याच देशांमध्ये सॅन्टाक्लॉज या दिवशी येतो, पण इथे जर्मनीत निकोलाऊस आधीच येऊन गेल्यावर, मग ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसाठी angel किंवा Christ-kind येऊन गिफ्ट्स देऊन जातो. चोवीस तारखेला कुटुंबातले लोक एकत्र येऊन प्रार्थना करून मग सोबत डिनर करतात. पंचवीसला अनेक जण सकाळी चर्च मध्ये जातात आणि नंतर पुन्हा कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतात. हे सगळं असलं तरी या दोन दिवसात सगळीकडे नुसती शांतता असते. एकतीस डिसेंबरला जसा जल्लोष, फटाके, गोंधळ असतो तसं ख्रिसमस ला होत नाही. सगळे कौटुंबिक कार्यक्रम असतात आणि रस्त्यावर तशी खूपच शांतता असते.
चोवीसचा अर्धा दिवस आणि पंचवीस सववीस हे अडीच दिवस आणि मग एकतीस एक या सुट्ट्या सगळ्यांना असतात. बऱ्याच कंपनीज ख्रिसमस ते नवीन वर्ष या दरम्यान पूर्ण कामकाज बंद ठेवतात. म्हणजे तेव्हा तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुट्टीतून दर वर्षी त्या सुट्ट्या टाकाव्या लागतात. चोवीस तारखेला दुपारी एक दीड पासून ते सव्वीस तारखेपर्यंत सगळी दुकानं, म्हणजे एकूण एक दुकान, मॉल, सरकारी कार्यालयं, काही रेस्टॉरंट्स चालू असतात, पण तीही कमीच आणि सगळीकडे गर्दी असण्याची शक्यता असते. ट्रेन, बस, संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच चोवीसच्या संध्याकाळ पासून नेहमी पेक्षा पूर्ण वेगळ्या टाइम टेबल प्रमाणे चालते, मोजक्याच बस ट्राम चालू असतात. या सगळ्यामुळे आधीचे काही दिवस दुकानात प्रचंड गर्दी असते. पोस्ट आणि कुरिअर वाल्यांचं काम या शेवटच्या काही दिवसात अनेक पटींनी वाढतं. परवा एक कुरिअर आलं तेव्हा तो माणूस इतका थकलेला होता, त्याला पाणी दिलं तेव्हा तो सांगत होता, की मी आज अर्ध्या दिवसात साडे तीनशे घरी पार्सल दिलेत, आणि अजून पन्नासएक द्यायचे आहेत. अजून दोन दिवस हे चालेलच. दोन तीन दिवसात काही कमी पडू नये म्हणून जास्तच सामान आणून ठेवलं जातं. सुरुवातीला इथे आल्यावर दर ख्रिसमसच्या सुट्टीत बहुधा आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. वेगळ्या ठिकाणी जाऊन बर्फ बघणे, तिथला ख्रिसमस अनुभवणे या सगळ्याची हौस आता फिटली आणि आता सुट्ट्या असल्या तरी घरीच बसू निवांत असं वाटतं. त्या कडाक्याच्या थंडीत, लवकर अंधार होतो अश्या वेळी फार कुठे जाण्याचा उत्साह आता कमी झाला आहे. शिवाय चोवीस तारखेला संध्याकाळीच जेव्हा अनेक रेस्टोरंटस सुद्धा बंद होतात, तेव्हा कुठे बाहेर खायला शोधण्यापेक्षा घरीच खाऊ असं वाटतं.
सृजनला किंडरगार्टन मधून जेव्हा ख्रिसमस बद्दल हळूहळू समजायला लागलं, तेव्हा त्या वर्षी ख्रिसमस ट्री आणलं, खरंच झाड. हायवे वर ठिकठिकाणी आणि प्रत्येक दुकानात सुद्धा ख्रिसमस ट्री विकायला असतात. लहान, मोठ्या साईज प्रमाणे किमती असतात, आणि गाडीतून आणता यावं म्हणून ते पूर्ण गुंडाळून ठेवलेलं असतं. ते कव्हर काढलं की मग ते आपले हातपाय पसरतं. ते खाली ठेवण्यासाठी एक स्टँड असतो हेच आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही नुसतंच झाड आणलं आणि ते काहीतरी जुगाड करून उभं केलं. हे झाड नंतर पूर्ण वाळलं, पण ते नेण्यासाठी खास एक दिवस कचर्याची गाडी येते हेच माहीत नव्हतं. आम्ही बरंच उशीरा ते मग कचर्यापाशी ठेवलं, तेव्हा ते सुकून सगळी पानं टोचत होती. मग ही बाकीची माहिती शोधून पुढच्या वर्षी तो स्टँड आणला, मग ते झाड नीट उभं राहिलं. आता त्याच स्टँड वर आमच्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमात भगवा झेंडा फडकतो आणि डिसेंबर मध्ये ख्रिसमस ट्री सुद्धा. ते झाड नेण्यासाठी कचऱ्याची एक वेगळी गाडी येते, जेणेकरून तो कचरा वेगळा जैविक कचऱ्यात दिला जाऊन त्याची नीट विल्हेवाट लावली जाईल. यावर्षी आम्ही झाड आणलं तेव्हा फक्त साईज आणि किंमत बघून घेतलं. तिथल्या बाईने आम्हाला अनेक वेळा तुम्हाला हे उघडून बघायचं नाही का हा प्रश्न विचारला आणि आम्ही नाही म्हणालो. ती पुन्हा एकदा उघडून दाखवून पुन्हा पॅक करून देईन असं म्हणाली, पण आम्ही त्यात काय चिकित्सा करायची म्हणून सरळ एक घेऊन आलो. पण त्यामुळे इथले लोक ख्रिसमस ट्री घेताना कसे घेतात हे आम्हाला समजलं.
जर्मन शिकत असताना तिथली एक मैत्रीण मला म्हणाली होती की माणूस कसाही असो, ख्रिसमस दरम्यान तो चांगलाच वागतो, या दरम्यान लोक मदतीला एरवी पेक्षा जास्त तत्पर असतात. पहिल्याच वर्षी मला हे मी तिच्याकडून ऐकलं, तेव्हा काही समजलं नव्हतं. पण मग हळूहळू या दरम्यान लोक दान जास्त देतात, कुठे अनाथ मुलांना मदत, कुणी गरीब मुलांना मदत करतात या बद्दलच्या पोस्ट पाहिल्या तेव्हा लक्षात आलं. या सणाच्या निमित्ताने खास चर्च मधून, विविध संस्थांमधून देखील वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते असं ऐकलेलं आहे. यावर्षी इथल्या लोकल ग्रुप वर एक पोस्ट होती, की बरेच ट्रक ड्रायव्हर असतात ज्यांना या सुट्टीत काम नसलं, तरी ते प्रवासात मध्येच दोन दिवस थांबून असतात, त्यांचे कुटुंबीय सोबत नसतात. म्हणून काही लोकांनी मिळून त्यांना एक दिवस खायचं सामान आणि प्रेझेंट्स नेऊन दिली.
इथले स्थानिक ओळखीचे लोक आम्हाला 'तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करता का?' असं विचारतात. आम्ही कोणतीच खास परंपरा म्हणून ख्रिसमस सेलिब्रेट करत नाही. खरंतर भारतीय सण साजरे करताना सुद्धा त्यातल्या आम्हाला जमतील, पटतील तेवढ्याच गोष्टी करतो, त्याचं दडपण न घेता, त्यातून आनंद मिळेल हे बघतो. गणपती गौरीच्या वेळी आता आमच्या भारतीय मित्र मैत्रिणींसोबतच इथलीही काही मंडळी घरी येतात आणि आमच्यासोबत उत्साहाने सहभागी होतात. तेच ख्रिसमसला सुद्धा, एक ट्री उभं करणे आणि सृजनला गिफ्ट्स देणे या गोष्टी आम्ही करतो, मित्रांना शुभेच्छा देतो. शेजाऱ्यांकडून सृजन साठी गिफ्ट्स मिळतात, म्हणून आज सृजन सोबत त्यांच्या साठी ग्रीटिंग कार्ड तयार केलं आणि त्यांना दिलं. दिवाळीला लायटिंग लावलं की त्या माळा आम्ही ख्रिसमस पर्यंत तश्याच ठेवतो. ते खास ख्रिसमस मय झालेलं, भारलेलं बाहेरचं वातावरण बघून आपसूकच उत्साह वाटतो. भारतातल्या दिवाळीची हमखास आठवण येते. ख्रिसमस निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी, कुटुंबीयांनी एकत्र येणे, घराची सजावट, स्नो मॅन, ख्रिसमसची गाणी, निकोलाऊस, नवीन खरेदी, दर वर्षीचे खरेदीचे ट्रेंड अशी विविध रूपातली नवीन देशाची संस्कृती समजत जाते. आपलं भारतीयत्व जपून, दोन संस्कृतींचा मिलाप होण्यात आमचाही खारीचा वाटा असेल असं म्हणून नवीन वर्षाची आतुरतेनी वाट बघतो.
मेरी ख्रिसमस - Frohe Weihnachten
ख्रिसमस मार्केट
मॉल मधली सजावट
घरचे ट्री
किंडरगार्टन मधली तयारी
शेजार्यांकडून आलेले गिफ्ट्स
गिफ्ट्स आणि सृजनने तयार केलेलं ग्रिटींग
अॅडव्हेंट कॅलेंडर