जर्मनीतलं वास्तव्य - भारतीय रेस्टॉरंट्स

बाहेर खाण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांमध्ये दोन प्रकारचे लोक दिसतात, एक ज्यांना इथेही बाहेर रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवण आवडतं आणि दुसरे ज्यांना ते आवडत नाही. जे इथे बाहेर भारतीय नको असे म्हणणारे असतात, त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणी म्हणतात की घरी ते खातोच, पुन्हा बाहेर काय तेच? कुणी म्हणतात की इथे भारतीय म्हणजे फक्त पंजाबी, त्याच चवी सगळीकडे त्यापेक्षा ते नको, किंवा अजून काही आपापली कारणं असू शकतात. तर काहींना भारतीय पदार्थ आवडतात म्हणून, घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून तिथे जायला आवडतं. इथल्या स्थानिक ओळखीतल्या लोकांना भारतीय पदार्थ खायचे तर त्यांना सोबत म्हणून त्या निमित्ताने सुद्धा अनेक जण जातात. आम्ही घरी प्रामुख्याने भारतीय स्वयंपाक करतो, इतरही वेगवेगळे प्रकार करतो, तरी सुद्धा बाहेर जाऊन भारतीय पदार्थ खाणे हेही आम्हाला आवडतं. कारण घरी तसा मराठी पद्धतीचा स्वयंपाक होतो तर बाहेर पंजाबी मिळतं, जे घरी क्वचितच केलं जातं. शिवाय घरकामात इतर कोणतीही बाहेरून मदत नसते, मग दोघानांही आयतं हवं असेल आणि भारतीय चव हवी असेल तेव्हा आम्ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये जातो किंवा आता पार्सल आणतो. या अनुभवांची ही कहाणी. 

बारा वर्षांपूर्वी जपान मधल्या एका अगदी लहानशा खेड्यात जेव्हा होते, तेव्हा पहिल्यांदाच तिथल्या एका मूळ नेपाळी माणसाच्या रेस्टॉरंट मध्ये गेले. ठराविक सात आठ भाज्यांचे प्रकार आणि नान, भात असा शाकाहारींसाठी असलेला मेन्यू. मी घरी रोज करायचेच, पण ऑफिस मधलं अखंड काम आणि इतर ठिकाणी असलेली शाकाहारी पदार्थांची उपलब्धता बघता, बाहेर तेवढेच पदार्थ मला पंचपक्वान्न वाटले होते, तोच एक आधार होता. एकदा तर माझा वाढदिवस आहे हे समजल्यावर त्याने डेझर्ट पण दिलं होतं. एवढ्या दुरून हे लोक इथे येऊन भाषा शिकून हा व्यवसाय करतात, त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं होतं.
 
मग यु.के. मध्ये असताना इतकी खाण्याची आबाळ होत नव्हती आणि मी पण अभारतीय पदार्थाना सरावले होते. त्यामुळे तिथे भारतीय रेस्टॉरंट मध्ये क्वचित जाणं झालं. तरी एकदा पौंड ते रुपये असा हिशोब करत तिथली पाणी पुरी सुद्धा खाल्ली होती. आता सर्वाना भवन हे जे नाव अगदी माहितीचं झालं आहे, ते दहा अकरा वर्षां पूर्वी माहीत नव्हतं, पण तिथे साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले होते. इतरत्र पायी चालताना जी काही भारतीय रेस्टॉरंट्स दिसायची, ती तेव्हा (दुरून) खूप हाय फाय वाटायची. नंतर ऐकीव माहिती, सोशल मेडिया यातून तिथली बरीच ठिकाणं कळली, पण महिना दोन महिन्याच्या तिथल्या वास्तव्यात फार कुठे जाणं झालं नाही.

जर्मनीत आले आणि इथल्या स्थानिक बेकरीज, रेस्टॉरंट्स यांच्यासोबतच भारतीय रेस्टॉरंट्स मध्ये सुद्धा जायला लागलो आणि तिथे मिळणारे भारतीय पदार्थ, फक्त तिथेच मिळणारे भारतीय पदार्थ, जर्मनांची भारतीय चवीची आवड निवड अशा गोष्टींची माहितीत भर पडली. 

पहिल्यांदाच एका ठिकाणी गेलो होतो, मेन्यू कार्ड बघून एक भाजी आणि नान अशी ऑर्डर दिली. सगळ्यात आधी मिळाला मात्र भात, जिरा राईस नाही, पण तसाच मोकळा शिजवलेला भात. आम्ही ऑर्डर केला नाही असं आम्ही सांगितल्यावर हो, पण भात येतोच प्रत्येक भाजी सोबत असं सांगितलं. ते मेन्यू कार्ड वरही बारीक अक्षरात कुठेतरी लिहिलेलं होतं, फक्त आम्ही वाचलं नव्हतं. तिथे भाजी आणि नान दोन्ही काही विशेष आवडलं नाही, बरेच टेबल रिकामेच होते, त्या ठिकाणावर काट मारली. इथेच पहिल्यांदा मँगो लस्सी हा प्रकार मेन्यू कार्ड वर पाहिला, ती इथे (आणि इतरही देशात) किती प्रसिद्ध आहे हे मात्र तेव्हा माहीत नव्हतं.
 
नंतर एका ठिकाणी गेलो तर तिथे दोन लोक शेअर करू शकतील असा थाळीचा प्रकार होता, तो घेतला. त्यात रोटी मात्र एकच होती, बाकी भात आणि भाज्या. आम्ही पोळी प्रेमी लोक, ती एक रोटी इतकी पटकन संपवली की आता एक्स्ट्रा ऑर्डर करायची का असा विचार करत होतो. तेवढ्यात त्याने एक रोटी आणून दिली आणि ही कॉम्पलिमेन्टरी आहे म्हणाला. आपल्या पोळी खाण्याच्या स्पीड वरून त्याने ओळखून आपल्याला आणून दिली पोळी याचं आम्हाला नंतर अनेक वेळा हसू यायचं. पण चव चांगली होती, त्यानंतर आम्ही तिथे गेलो की पोळी आणि भाजी अशीच ऑर्डर द्यायचो. भात उरायचाच, त्याचा घरी आणून दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात करायचा अशी पद्धतच रूढ होत गेली.

मग अजून बऱ्याच ठिकाणी गेलो. समस्त जर्मनीतल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये अनेक कॉमन गोष्टी आढळतात. इंडिया, ताज, हाऊस, पॅलेस, प्रिन्स, महाराजा, नमस्ते, गांधी, बॉंबे अशा ठराविक शब्दांचे विविध कॉम्बिनेशन करून तयार होणारी नावंच नव्वद टक्के वेळा असतात, नवीन ट्रेंड मध्ये नान, करी, मसाला वगैरे. हात जोडून नमस्कार करणाऱ्या साडीतल्या बाईचा, जिने खूप दागिने घातलेले आहेत आणि स्वागत करते आहे असा फोटो, ती साडी पण बहुतांशी लाल रंगाची, याला दुसरा पर्याय म्हणजे स्वागताला एखादा राजाचा पुतळा. आत लाकडी कोरीव काम केलेलं डार्क ब्राऊन रंगाचं पार्टिशन, जे सगळीकडे अगदी एकाच कारागिराकडून करवून घेतलेत असं भासवणारे, एकच रंग आणि डिझाईन सगळीकडे आणि त्याच मुशीतून घडवलेली वॉलपिसेस. कमानीचे डिझाईन असलेलं इंटेरियर, गणपतीची मूर्ती, नटराजाची मूर्ती, बुद्धाची मूर्ती, हत्ती, पंजाबच्या ग्रामीण जीवनाचं एखादं चित्र, अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा फोटो, राजे राजवाडे यांची काही चित्र, पालखी घेऊन निघालेला हत्ती, टेबल वर ठेवलेली एक फुलदाणी, सुरेख कोरीव काम केलेले दिवे, टेबल वर ठेवलेली फुलदाणी, त्यात खरी किंवा खोटी फुलं, पितळी मेणबत्ती स्टॅन्ड आणि बॅकग्राउंडला सदैव चालणारं इंस्ट्रुमेंटल म्युझिक. हे इंस्ट्रुमेंटल म्युझिक नव्वदच्या काळातल्या बॉलिवूड गाण्यांचं, काही थोडी जुनी. काही ठिकाणी एखादा टीव्ही, त्यावर बॉलिवूडची गाणी लागलेली असतात नाहीतर आता युट्यूब वरून रेसिपीजचे व्हिडिओ सुद्धा असू शकतात किंवा क्रिकेटची मॅच पण असू शकते. काही ठिकाणी झगझगीत वॉलपेपर, लाल रंगाच्या पूर्वी लग्नात असायच्या तश्या खुर्च्या हेही दिसतात. काउंटर मागे बीअर आणि वाईनचे ग्लास आणि बाटल्या ठेवलेल्या असतात, तिथेही काही मूर्ती आणि भारताचा झेंडा. एका ठिकाणी तर साडीचं डेकोरेशन केलं होतं, कसं तर भिंतीला झेंडूच्या माळा लावू त्या पद्धतीने छताला साड्या लावल्या होत्या. त्याही जुनाट. आवड असते प्रत्येकाची, पण हे अगदीच ऑड दिसत होतं. रिसायकल वगैरे ठीक आहे पण ते अश्या ठिकाणी आणि असं? त्या इमारतीच्या आसपास येणारा खास एक वास असतो, कितीही धुराडी लावली तरी बाहेर आणि आत पण तो वास भरून राहिलेला असतो.

मेन्यू कार्ड पण साधारण एकाच पद्धतीची, त्यावर भारतीय मसाल्यांची माहिती, मेंदी रांगोळीची असतात तश्या डिझाईनची बॉर्डर किंवा मसाल्यांच्या चित्राचं बॅकग्राऊंड. पाणी तर इथे जर्मनीत फुकट मिळत नाही, त्यामुळे पहिल्या दोन तीन पानांवर पाणी, विविध पेय, किंगफिशर बियर आणि सुला वाईन या खास भारतीय म्हणून, बाकी इथले लोकल प्रकार, सोबत सॉल्टी लस्सी आणि मँगो लस्सी. स्टार्टर्स म्हणून पापड (मसाला पापड नाही) भाज्यांची भजी, पनीर भजी, कांदा भजी आणि चिकन भजी, काही ठिकाणी समोसा. मग पुढे मांसाहारी पदार्थ त्या त्या प्राण्यानुसार वर्गीकरण करून, सगळ्यात ग्रेव्हीचे तेच चार पाच प्रकार. शाकाहारी म्हणून छोले, बटाटा, पनीरच्या त्याच चार ग्रेव्ही. डिशची नावं. भाजीच्या वर्णनात मँगो, मद्रास, कढाई, मोगुल, मसाला असे शब्द.
 
ऑर्डर दिली की तीन वाट्या आणि तीन लहान चमचे असं ठेवलेला एक ट्रे येतो. एकात लोणचं असतं, एकात आंबट गोड चटणी आणि एकात पुदिन्याची चटणी भरपूर दह्यात मिसळून ती. थोडं कॉम्बिनेशन बदललं तरी बहुतांशी हे असतंच. साधारण सगळ्यांकडची भांडी पण एकाच पद्धतीची असतात. मँगो लस्सी ऑर्डर केली जातेच, ती आधी येते, अगदी काठोकाठ भरू द्या प्यालाच्या थाटात. सोबत अजून काय मागवले असतील ती पेयं. मग भाज्या ठेवायला एक गरम स्टॅन्ड येतो, आधी भात आणि मग भाज्या, रोटी असं एकेक येऊन मग सुरुवात होते. या सगळ्या ग्रेव्ही मध्ये क्रीम बदाबदा टाकलेलं असतं. पालक पनीर मध्ये फ्रोझन पालक, त्यातही फ्रोझन पालक आणि क्रीम यांची जी एक प्युरी मिळते तीच वापरून केलं असेल तर ती पालक पनीरची चवच येत नाही. तिखट इथल्या लोकांना मानवेल इतपत, पण जरा तिखट करा सांगितलं तर वरून नुसत्या मिरच्या, एखादा तिखट सॉस असं टाकून ते तिखट म्हणून देतात. बिर्याणी म्हणून दोन भाज्या टाकलेला फोडणीचा भात सुद्धा एकदा पाहिला आहे, पुलाव सुद्धा नाही. 

बहुतांशी ठिकाणी सोमवार ते शुक्रवार सकाळी बुफे असतो. त्यात पापड, भजी, सूप, दोन भाज्या, एक चिकन करीचा प्रकार आणि भात, नान असे पदार्थ असतात आणि या बुफे साठी लोकांची गर्दी असते. एक तर बुफेची किंमत तशी कमी आणि त्यामानाने बरेच प्रकार चाखून बघता येतात, म्हणून आपोआप जास्त गर्दी होते. स्थानिक जर्मन लोकांना भारतीय जेवण खूप मनापासून आवडतं. बुफे मध्ये लोक पापड, लोणचं, भजी यावर तुटून पडतात. ते पोळी आणि भाजी असं खात नाहीत, भात, करी आणि सोबत नान असं, त्यातूनच इथे ही भात देण्याची पद्धत आली असावी. मँगो लस्सीची डिमांड बघता भारताने तो राष्ट्रीय पदार्थ म्हणून जाहीर करावा असं चित्र दिसतं. त्याच त्या चार भाज्या बघून आम्हाला कंटाळा येतो. रोजच्या स्वयंपाकाशिवाय इतरही थोड्या वेगळ्या भाज्या घरी केल्या जातातच, पण कधीतरी बाहेरची चव हवी असते, अश्या वेळी बाहेर तर जावं वाटत आहे पण तिथे पुन्हा तेच सगळं म्हणून मग पुन्हा घरीच करू असं पण होतं. जेव्हा सुरुवातीला इथे खूप मर्यादित भाज्या, मसाले मिळायचे तेव्हा ठीक होतं. पण आता काळानुसार त्यात बदल करायला कुणी फार उत्सुक नसतात असं वाटतं. आता कच्चा माल तसा सहज उपलब्ध असतो, पण मेन्यू कार्डमधल्या किमती फक्त वाढतात, बाकी काहीच बदल दिसत नाहीत. मग ज्या ठिकाणी ज्या भाज्या चांगल्या मिळतात तेवढ्याच फक्त मागवल्या जातात. चाट, पुऱ्या, भाजीचा एखादा वेगळा प्रकार, गुजराती, मराठी पदार्थ हे सहज कुठे दिसत नाहीत, भाताचे काही वेगळे प्रकार मिळत नाहीत. मोठ्या शहरात नक्कीच फरक पडतो, तशी मागणी सुद्धा असेल, पण सर्वसाधारण चित्र हे दिसतं. अगदी तिथे वर्षानुवर्षे ऐकू येणारी तीच इन्स्ट्रूमेंटल गाणी ऐकून आम्ही नेहमी यांना आता आपण नवीन सीडी भेट देऊयात का असं वाटतं.
 
एका ठिकाणी गेलो तेव्हा तिथले पांढरे दिवे बघूनच मी खुश झाले. शिवाय त्यांनी कांदा पातीची एक चटणी दिली होती सोबत, आणि एक मटारचं सारण भरलेली स्टफ नान/पराठा प्रकार पण मिळाले, चवही थोडी वेगळी होती. त्यामुळे ते आपोआप आवडत्या यादीत आले, आता तिथून बरंच लांब राहत असल्याने जाणं होत नाही. सर्वाना भवन मध्ये संमिश्र अनुभव आहेत. तिथे कधी चव चांगली असते तर कधी नाही, कधी सर्व्हिसच वाईट तर कधी आंबट सांबार. पण पंजाबी खाण्याच्या कंटाळ्यातून शरण जायला ती एकच जागा आहे, त्यामुळे बरंच लांब असूनही तिथे जाणं होतं. एवढ्यात एक जरा वेगळा मेन्यू असलेलं नवीन ठिकाण कळलं. चव चांगली होती, मुख्य जरा वेगळ्या भाज्या होत्या, आणि भात कंपलसरी नव्हता, भाजीसोबत नान, रोटी किंवा भात तुम्हाला हवं ते असा पर्याय होता, हे आम्हाला फार आवडलं. एकदा दिवाळीत काही मित्र मंडळी मिळून एका ठिकाणी गेलो, दिवाळी म्हणून गुलाबजाम दिले त्यांनी, पण तिथल्या काकांनी दिवाळीच्या प्रथा आणि दंतकथा यावर आमची परीक्षाच घेतली, गुलाबजाम नको पण प्रश्न आवरा अशी आमची स्थिती होती. आता जवळच्याच गावात तीन भारतीय बायकांनी मिळून एक रेस्टॉरंट चालू केलेलं म्हणून आम्ही पण आवर्जून तिथे गेलो. तेही दाक्षिणात्य पदार्थ, उत्साहाने आम्ही गेलो. सुरुवातीला ठीक होतं, त्यांचं कौतुकही केलं पण नंतर मात्र शिळेच पदार्थ ताजे करून दिले, चटणीला वास येत होता, डोसे आणि इडल्या आम्ही घरी जास्त चांगले करू असे, सांबार तयारच नाही असे एकेक अनुभव बघून आता तिथे जाणं बंद केलं. कधी कधी भारतीय म्हणून स्पेशल ट्रीटमेंट मिळते. जिथे आता अनेक वेळा गेलो आहे ते मालक, त्यांची बायको या सगळ्यांची ओळख झाली आहे. ते आम्हाला पाणी आणि सलाड आणून देतात, ऑर्डर शिवाय. पार्सल असेल तर आम्ही आधीच भात कमी द्यायला सांगतो. त्याबदल्यात आम्ही न मागता ते स्वतःहून एक रोटी जास्त देतात. त्या मालकीण भाभी, त्यांच्या लहानपणी पुण्यात खडकीला होत्या. त्या तिथल्या पोह्यांची नेहेमी आठवण काढतात. मी प्रेग्नंट असताना जेव्हा गेले, तेव्हा त्या खास काय हवं ते सांग, हवं तर तुला हवी तशी भाजी बनवायला सांग असं येऊन सांगायच्या. एकदा सृजन कडून मँगो लस्सीचा ग्लास सरकला आणि सांडली तेव्हा त्यांनी आम्हाला नवीन आणून दिलीच, शिवाय त्याला रागावू नका, होतं असं मुलांकडून हे चार चार वेळा सांगितलं.
 
इटलीत एका ठिकाणी गेलो तिथे मालकीण बाई पण पुण्यात ओशोंच्या आश्रमात येऊन गेल्या होत्या. स्पेन मध्ये शेवटच्या दिवशी मालागा मध्ये गेलो, तिथे गर्दी नव्हती. शिवाय त्याने salty लस्सी जरा नीट ग्लास मध्ये आणून दिली, ग्लासचा आकार वेगळा हे बघून सुद्धा मला बरं वाटलं, इतके ते बाकी ठिकाणी एकाच पद्धतीचे होते. गप्पा मारताना तो मुलगा पुण्यात पण शिकला होता हे कळलं. आम्ही तिथेच शिकलो या गप्पा झाल्या आणि त्याला एकदम घरचं कुणी भेटल्याचा आनंद झाला. 
 
या व्यवसायात प्रामुख्याने इथे पंजाबी लोक आहेत. पण गेल्या काही वर्षात काही तरुण मंडळी, विविध प्रांतातली मंडळी या व्यवसायात येत आहेत. दाक्षिणात्य रेस्टॉरंट्सचं प्रमाण वाढतं आहे.मोठ्या शहरात रेस्टॉरंट्स वाढत आहेत. विद्यार्थी, नोकरी करणारी तरुण मंडळी यांच्या सोयीसाठी त्यातल्या त्यात माफक किमतीत उपलब्ध होतील असे पर्याय दिसायला लागले आहेत. मोठ्या रेस्टॉरंट शिवाय काही अगदी लहान जागेत काही ठराविक पदार्थच मिळतील अशी सोय असणाऱ्या जागा पण आता बऱ्याच आहेत.काहींनी आता चाट, वेगळ्या भाज्या, विविध स्टार्टर्सचे प्रकार, इंडियन चायनीज पदार्थ अशीही सुरुवात केली आहे आणि त्यांना उत्तम मागणी पण आहे. 

आमच्या परीने आम्हाला जे रेस्टॉरंट्स आवडले, त्याबद्दल आम्ही आमच्या भारतीय आणि स्थानिक मित्रांना सुद्धा सांगतो. केस कापायला गेले की तिथल्या बायका ते ऑफिसातले सहकारी, शेजारी असे अनेक जण आम्हाला तुम्ही कोणतं रेस्टॉरंट रेकमंड कराल असं विचारतात, तेव्हा त्यांना सुचवतो. तेच ठराविक पदार्थ आणि त्यांच्या चवीतला तोच तोच पणा, कधी मिळणारी वाईट सर्व्हिस हे कंटाळवाणं वाटलं, काही कटू गोड अनुभव असले, तरी हे नक्की की या लोकांमुळे इथे आमच्यासारख्या भारतीय लोकांना आपले पदार्थ खायला मिळतात. कधी मित्रांची गेट टुगेदर तर कधी पार्टी साठी खूप मदत होते. आपले पदार्थ या पाश्चिमात्य देशातल्या कानाकोपऱ्यात पोचवण्यात त्यांचा फार मोठा हातभार आहे. इथे वेगळी भाषा शिकावी लागते, हा व्यवसाय सुरु करणे, चालवणे हे नक्कीच आव्हानात्मक असेल याची कल्पना आहे. इथली ब्युरोक्रसी अतिशय वेळखाऊ आणि किचकट आहे, पण तरी असे अनेक जण इथे पाय रोवून उभे आहेत, नवीन सुरुवात करत आहेत. अजून काही वर्षात बरेच पदार्थ मिळायला लागतील आणि कुणाकुणाच्या रूपात भारतीय पदार्थ जगभर पोचत राहतील. 

ता.क. - इतके वेळा कुठे कुठे जाऊन सुद्धा कधीच पदार्थांचे फोटो काढले नाहीत हे लेख लिहिताना लक्षात आलं. मग काल फक्त तेवढ्या साठी जाऊन फोटो काढले, गर्दीमुळे इंटेरियरचे फोटो काढता आले नाहीत.

1

2

3

4

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle