जर्मनीत आल्यानंतर काही वर्ष इथल्या शिशूवर्ग ते पुढे माध्यमिक शिक्षण, या शैक्षणिक व्यवस्थेची काही विशेष माहिती नव्हती. सुमेध आला तो उच्च शिक्षणासाठी, त्यामुळे तो अनुभव पूर्ण वेगळा होता. सृजन मुळे या सगळ्याबद्दल हळूहळू शोधाला सुरूवात झाली, मग त्यातून नवीन माहिती, अनुभव येत गेले. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात कशी होते, काय नियम आहेत, शाळांचे कसे प्रकार आहेत इथपासून तर मग प्रवेशप्रक्रिया, भाषा, विषय कोणते, लोकांची मानसिकता अश्याही विविध बाजू कमी अधिक प्रमाणात समजायला लागल्या, आणि नव्याने समजत आहेत. आधी डे केअर आणि मग किंडरगार्टन असा प्रवास करून, आता यावर्षी सृजन पहिलीत गेला.
अगदी सुरुवातीलाच इथे आल्यावर Stuttgart ला मर्सिडीज म्युझियम बघायला गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा बेर्था बेंझ हे नाव ऐकलं. ते म्युझियम खूप आवडलं होतं, केवळ भारी भारी गाड्या बघायला मिळाल्या म्हणून नाही, तर चाकाच्या शोधापासून ते आताच्या अत्याधुनिक गाड्यांच्या तंत्रज्ञानाचा प्रवास तिथे अतिशय उत्तम पणे दाखवला आहे म्हणून ते खूप आवडलं. त्या आधी मानहाइम या गावाबद्दल माहिती शोधत असताना, कार्ल बेंझ हे नाव वाचून थोडी त्याचीही माहिती वाचली होती. पण ही ओळख इथवरच मर्यादित होती.
२०१२ साली जर्मनीत नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते. भाषा शिकणे, नोकरी, युरोपात फिरणे, मग सृजनचा जन्म असे एकेक टप्पे पार झाले. घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली.