Rheinland Pfalz - ह्राईनलांड फाल्झ हे जर्मनीच्या दक्षिण भागातलं एक राज्य. आम्ही वेगळ्या राज्यात असलो, तरी गाडीने दहाव्या मिनिटाला आम्ही या पलीकडच्या राज्यात पोचतो इतकं ते जवळ आहे. याच राज्यातल्या एका मार्गाचे नाव आहे Deutsche Weinstraße - जर्मन वाईन रोड. द्राक्षांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या राज्यात, Schweigen-Rechtenbach या फ्रान्स बॉर्डर जवळच्या गावापासून सुरू होऊन Bockenheim पर्यंत साधारण ८५ किलोमीटर रस्ता हा जर्मन वाईन रोड म्हणून ओळखला जातो.
या भागात वर्षभर लहान मोठे वाईन फेस्टीव्हल आयोजित केले जातात. इथल्या लहान लहान गावात राहणारे शेतकरी आणि तिथलेच वाईन उत्पादक ( बरेचदा मुख्य उद्योग शेतीचा आणि वाईन उत्पादन हा जोडधंदा ) खास त्यांची शेती, जवळचे काही ट्रेल आणि वायनरी भेट अश्या टूर पण आयोजित करतात. तर यातले काही महोत्सव हे स्थानिक गावकरी संघटना आणि सरकारी कार्यालयं यांच्या कडून आयोजित केलेले असतात. या काही मोठ्या फेस्टीव्हल दरम्यान, त्यांच्याकडच्या खास स्टॉक मधल्या वाईन उघडल्या जातात.
त्यातलाच खास मार्च महिन्यात येणारा वसंत ऋतूतला फेस्टीव्हल म्हणजे Mandelblütenfest - अर्थात Almond Blossom Festival असं म्हणू शकतो. मार्च - एप्रिल या कालावधीत नुकतीच वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते. हीच वेळ साधून, अल्मन्ड ब्लॉसमच्या गुलाबी फुलांच्या सोबतीने, स्थानिक वाईन टेस्ट करता येतील अश्या दृष्टीने हे ठरवलं जातं. त्यासोबत अर्थातच खाणं, भेटीगाठी हे सगळं आलंच.
या वाईन रोडच्या बहुतांशी भागात मुख्य रस्त्याच्या बाजूने पायी आणि सायकलने जाणार्यांसाठी रस्ता, मागे द्राक्षांची शेती आणि डोंगर, तिथे दिसणारी घरं, प्रत्येक गावातलं एक चर्च असं दृश्य असतं. द्राक्षांप्रमाणेच, या भागातलं अजून एक महत्वाचं पीक म्हणजे बदाम. शेती व्यतिरिक्त, या रस्त्यालगत बदामाची झाडं लावली आहेत, जी वसंत ऋतूत साधारण दोन ते तीन आठवडे पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी लगडलेली असतात. या झाडांचा प्रकार आणि त्यांचा फुलांचा बहर कधी येतो, त्यानुसार प्रत्येक गावाकडे एक किंवा दोन विकेंड फेस्टिव्हल साठी ठरवून दिले जातात. ही माहिती, कोणत्या तारखांना कुठे जाता येईल हे सगळं त्यांच्या वेबसाईट वर दिलेलं असतं. जिथे फेस्टीव्हल असेल तिथेला मुख्य रस्ता वाहनांसाठी तेवढे दिवस बंद केला जातो. तिथेच शेजारी बाक टाकलेले असतात. तंबू ठोकले जातात. द्राक्षांच्या पानांच्या आकाराचे बोर्ड आणि त्यावर तिथल्या द्राक्ष शेती आणि वाईन उत्पादन, टेस्टिंग या संदर्भात माहिती तिथेच लिहिलेली दिसते. खायला खरं तर अगदी मोजकेच प्रकार असतात, बटाट्याचे फ्राईज, चिप्स, ब्रेत्सेल, Wurst म्हणजेच हॉट डॉग, केक आणि मफिन (त्यात प्राबल्य बदामाचे काप लावलेल्या केकचं) इत्यादी. आपल्या कितीतरी भारतीय पदार्थांच्या गाड्या इथे लावता येतील असं मनात येतं. अल्कोहोल न घेणाऱ्यांसाठी पण काही पेयं असतात. वाईन महत्वाची असली, तरी जर्मन बियर सुद्धा असतेच. शेतातल्या बाकांवर बसून, विशेषतः वयस्कर मंडळी, वाईनचे ग्लास रिचवत गप्पा मारत बसलेले असतात. लहान मुलं आणि आई बाबा, आजी आजोबा, नातलग, मित्र मैत्रिणी असे अनेक ग्रुप आजूबाजूला दिसतात.
या भागात हायकिंगचे बरेच रुटस आहेत, जे Almond Trail म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे भरपूर चालण्याची तयारी असेल, तर आधी एखादा ट्रेल पूर्ण करून या ठिकाणी पोचायचं आणि मग निवांत बसायचं असंही करू शकतो. त्यासाठी झाडांवर गुलाबी फुलांचे स्टिकर आणि बोर्ड लावून हे ट्रेल मार्क केलेले आहेत. याबद्दल पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा गुलाबी फुलं म्हणजे फक्त चेरी ब्लॉसम बद्दल ऐकलं होतं. या निमित्ताने अल्मन्ड ब्लॉसम बद्दल समजलं. त्याबद्दल अजून माहिती शोधली तेव्हा, सुंदर बहरलेली झाडं दिसत असली, तरी रस्त्यालगत असणाऱ्या काही झाडांची फळं मात्र खाण्यायोग्य नसतात हेही समजलं.
खूप गर्दी मुळे गाड्या पार्क करण्यासाठी जागा शोधणे यात वेळ जातो. बसायला जागा मिळत नाही असंही होऊ शकतं. आम्ही पहिल्यांदा तर फक्त हायकिंग साठी गेलो होतो, तेव्हा या फेस्टिव्हल बद्दल समजलं. त्यानंतर आता ठरवून फुलांचा बहर आणि हवामान बघून, वेगवेगळ्या गावात जाण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी कुठे जाता आलं नाही, पण मागच्या काही वर्षातले फोटो आहेत. मी अधून मधून वाईनचे काही प्रकार टेस्ट करून पाहिले आहेत, तरी त्यातलं "चवीने खाणार" वालं दर्दी Qualification माझ्याकडे अजिबात नाही. पण आम्हाला ते वातावरण, तो माहौल अनुभवायला आवडतं. अश्या ठिकाणी या देशातला निसर्ग, शेती, खानपान संस्कृती, स्थानिक उद्योग, नियोजन, हे सगळं कश्या पद्धतीने चालतं, त्यांची सांगड कशी घातली जाते हे दिसतं. भरपूर लोक दिसतात, त्यांच्या गप्पा नकळत कानांवर पडतात, कधी संवाद होतात आणि त्यातून तिथल्या गोष्टी समजतात. शेती आणि उद्योग एकत्र येऊन या निमित्ताने अनेक पर्यटक आकर्षित करून घेतात. आणि त्यातून दरवर्षी अल्मन्ड ब्लॉसम आणि वाईन फेस्टिव्हल अनेकांच्या स्मरणात राहणारे ठरतात.