इथे आल्यापासून ते अगदी मागच्या चार वर्षांपर्यंत, मला इथल्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अग्रस्थानी होत्या इथे मिळणाऱ्या सुट्ट्या. अर्थात आपल्यासारख्याच बाकीच्याही लोकांना भरपूर सुट्ट्या असतात आणि त्यामुळे कामं अडू शकतात असंही बरेचदा झालं आणि तेव्हा वैताग सुद्धा झाला. मग पालक म्हणून सुट्ट्यांची उपलब्धता बघता आवडीचं पारडं अजून जड झालं आणि मग आता किंडर गार्टन, शाळा या सुट्ट्या बघितल्यानंतर, ते अनुभवत असताना ते पारडं पुन्हा कुठे बसवायचं असा प्रश्नही अधून मधून पडला. जर्मनीतल्या सुट्ट्या - फायदे आणि तोटे हा अगदी सपट परिवार महाचर्चेचा विषय होऊ शकतो असे अनेक अनुभव जमा होत गेले.
आता सुट्ट्या कुणाला आवडत नाहीत? सगळ्यांनाच आवडतात, पण मुळात त्या हव्या तेवढ्या मिळतात का? किती हव्या याची व्याख्या माणसाप्रमाणे बदलेल कदाचित, तरी निदान जेवढ्या कागदोपत्री असतात त्यातल्या सगळ्या विनासायास प्रत्यक्षात मिळतात का? हे विचारलं गेलं तर अनेक ठिकाणी उत्तर बहुतांशी नकारार्थी येतं. पण जर्मनीत चित्र वेगळं दिसतं.
सर्वसाधारण पणे बघता, जर्मनीत काम करणाऱ्या प्रत्येकाला वर्षभरात किमान २० सुट्ट्या घेणे अनिवार्य आहे. २०च तर आहेत, एवढ्या कुठे जास्त आहेत असं वाटलं असेल तर थांबा, किमान २० आणि यापुढे प्रत्येक ऑफिस, कंपनीज यांच्या धोरणानुसार सर्वसाधारण पणे ३० सुट्ट्या या बहुतांशी ठिकाणी मिळतात, त्या घ्याव्याच लागतात. देशभर बघितलं तर २६-३० सुट्ट्या या सर्वसाधारण पणे सगळीकडे आहेत, काही ठिकाणी तर त्या ३६ सुद्धा आहेत आणि केवळ २०च सुट्ट्या मिळणारे लोक फक्त ४ टक्के आहेत. या ३० सुट्ट्या वगळता १० सार्वजनिक सरकारी सुट्ट्या असतातच. शनिवार रविवारच्या विकेंड म्हणून सुट्ट्या या तर आहेतच, मला माहीत आहे की शनिवार रविवार हे वेगळे आहेत, आठवडाभर काम केल्यावर ते हवेतच, पण तरी त्या धरल्या तर वर्षभरात ३०+१०+१०४ असे १४४ दिवस हे झालं बेसिक गणित. आता यांचे काही सण गुरुवारी येतात, म्हणजे अमुक तारीख गुरुवारी आली असे वेगळे, पण एक सण फिक्स आहे गुरुवारीच, मग बऱ्याच कंपनीज त्या शुक्रवारी ऑफिस बंद ठेवतात, तुम्ही त्या दिवसाचे तास इतर वेळी भरून काढा किंवा सुट्ट्या घ्या, हेही मग अनिवार्य. हेच एखादा सण मंगळवारी आला की सोमवारी पुन्हा असंच, सगळं बंद. ख्रिसमसच्या वेळी तर काही ऑफिसेस आठवडाभर बंद ठेवतात, त्या सुट्ट्या आपल्याला आपल्या सुट्ट्यांमधून तेव्हाच घ्याव्या लागतात. आणि मेडिकल लीव्ह यात धरल्या जात नाहीत, त्या वेगळ्या. त्यातही गंमत अशी आहे की समजा, एखाद्याने सुट्टी घेतली आहे आणि तो/ती आजारी पडले, तर त्या चार सुट्ट्या मेडिकल लीव्ह म्हणून धरल्या जातात आणि ते चार दिवस सुट्टी म्हणून नंतर पुन्हा वापरता येतात. शिवाय एक दोन सुट्ट्या राज्यांच्या अखत्यारीत आहेत, बर्लिन मध्ये महिला दिनाची सुट्टी आहे तर आमच्या राज्यात दोन सुट्ट्या जास्तीच्या आहेत. एकूण सुट्ट्या या बाबतीत आपण जर्मनीत आहोत तर भाग्यवान आहोत असं वाटतं. याशिवाय ऑफिसेसच्या धोरणानुसार लग्न असेल तर, तुमचं घराचं शिफ्टिंग असेल, कुटुंबातील कुणाचा मृत्यू अश्या काही कारणांसाठी प्रत्येकी एक सुट्टी मिळण्याची सुद्धा सोय असते.
ज्यांनी जर्मन लोकांसोबत काम केलेलं असेल त्यांना या सुट्ट्यांचा अंदाज आला असेल. सारखे काय हे लोक सुट्टीवर असतात युरोपातले असं बाहेरच्या देशातल्या बऱ्याच जणांना वाटतं. कारण सलग तीन आठवडे सुट्टी घेणे हे इथे अगदीच कॉमन आहे. भारतात स्वतःचं लग्न असेल तरच एवढ्या सुट्ट्या त्याही मुश्किलीने मिळतात आणि त्यात पूर्वतयारी ते हनिमून हे सगळं बसवावं लागतं.
अर्थात तरीही या सुट्ट्या कमीच आहेत म्हणून कुरकुर करणाऱ्या लोकांची मला कमाल वाटते. त्यातही खोट्या आजारपणाच्या सुट्ट्या घेणे हे प्रकार एरवीही आवडत नाही, पण इथे त्याबाबत असणारी मोकळीक आणि उपलब्धता या पार्श्वभूमीवर तर ते जास्त खटकतं. शिवाय एक जरी सार्वजनिक सुट्टी शनिवार-रविवार मुळे वाया गेली तरी त्याचं वाईट वाटतं, असो.
मग आम्ही पालक झालो, तेव्हा या सुट्ट्यांच्या जास्तच प्रेमात पडलो, कारण उत्तम मॅटर्निटी लिव्हची सुविधा. दिलेल्या तारखेच्या ६ आठवडे आधी पासून सुट्टीची सुरुवात होते आणि किमान ८ आठवडे नंतर पर्यंत ही सुट्टी आईसाठी मॅटर्निटी लीव्ह म्हणून दिली जाते आणि ही अनिवार्य असते. म्हणजे एखादीला समजा शक्य तेवढे दिवस काम करावे असे वाटत असेल, तरी त्यात काही बदल करता येत नाहीत. आणि याशिवाय पॅरेंटल लीव्ह ही एक खूप चांगली सोय आहे, जी जन्मापासून पुढे आई आणि वडील मिळून एकूण १४ महिने घेता येते आणि या दरम्यान साधारण पगाराच्या ६५ टक्के रक्कम मिळते, मुख्य म्हणजे नोकरी सुरक्षित राहते. (ही माहिती मी अगदी थोडक्यात लिहिली आहे, त्यात नेमका सुट्टीदरम्यान पगार किती हे तुमच्या मूळ पगाराच्या रक्कामेनुसार बदलू शकतं, दोघंही आई वडील कमावते आहेत की नाही त्याप्रमाणे बदलू शकतं, शिवाय या एक वर्षांनंतर सुद्धा घेता येणारी बिनपगारी पॅरेंटल लीव्ह इत्यादी बाबत सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख नाही त्यामुळे इथे फक्त ठळक मुद्दे घेतले आहेत)
पण मग इतकं सगळं छान छान असून कसं चालेल, शनिवारी किमान दुकानं उघडी असतात, पण रविवार सगळं म्हणजे सगळं बंद. (इथल्या रविवार बद्दल मागे एक लेख लिहिला होता त्याची लिंक इथे) तसंच सार्वजनिक सुट्ट्या असतील तेव्हाही सगळी सगळी सरकारी कार्यालयं, दुकानं, मॉल्स हे सगळं बंद असतं. हेही एक असू देऊ, पण मग डे केअर, शाळा, दवाखाने, बँका यांनाही सुट्ट्या. आपल्याला सुट्ट्या मिळतात तश्याच तिथे काम करणाऱ्या लोकांच्या सुट्ट्याही तेवढ्याच महत्वाच्या. तुमचा व्यवसाय आणि कामाचं स्वरूप कसंही असेल तरी सुट्ट्यांचे नियम अपवाद वगळता सगळ्यांसाठी तेच असतात. आमच्या एका मित्राने चिऊ काऊच्या गोष्टीचं विडंबन केलं होतं. ज्यात चिऊ सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने सुट्टीवर असते आणि म्हणून कावळ्याला तिच्या ऑफिसात घेत नाही अश्या प्रकारचं काल्पनिक वर्णन होतं, अगदी खरं असल्यामुळे आणि अनुभवलं असल्यामुळे ते सगळ्यांनाच पटलं.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच किमान २० सुट्ट्या प्लॅन करून ठेवा असे ईमेल येतात. एकूण ६ पैकी ३ आठवडे सुट्ट्या सलग उन्हाळ्यात घेणे आणि त्या दरम्यान कुठेतरी फिरायला जाणे हे अगदी कॉमन आहे, आणि त्या दरम्यान कामं तशीच राहिली तरीही त्याचंही बरेचदा काही वाटून घेत नाहीत. ३ आठवड्यांची आउट ऑफ ऑफिस ईमेल बघून जर्मनी बाहेरच्यांना बरेचदा नवल वाटत असेल, पण इथे राहणार्यांना त्यात काहीही वेगळं वाटत नाही. घरातली काही कामं असतील, रंगकाम, रिनोव्हेशन वगैरे तर खास त्यासाठी एक आठवडा सुट्टी घेऊन मग ती सगळी कामं उरकणे असंही अनेक जण करतात आणि त्याला बोलीभाषेत वर्क व्हॅकेशन म्हणतात, थोडक्यात मी सुट्टी घेऊन कामच केलं, आराम केला नाही हे त्यातून सांगायचं असतं. उरलेल्या सुट्ट्या मग ख्रिसमस, स्कीइंग किंवा खास अश्याच एखाद्या हॉबी साठी, कुठे हायकिंग साठी अश्या पद्धतीने वापरल्या जातात. सगळे जण असंच करतील असं नाही, पण एकूण ट्रेंड तसा दिसतो. काही ठिकाणी थोड्या सुट्ट्या पुढच्या वर्षी घेऊ शकाल अशी सोय असते, पण बऱ्याच ठिकाणी तीसही सुट्ट्या त्याच वर्षी घ्यायच्या असा नियम असतो आणि मग काही कारणाने जर तुम्हाला जानेवारीत सुट्टी हवी असेल, तरी ती नवीन वर्षाच्या खात्यातून घेऊन शिवाय डिसेंबर पर्यंत आधीच्या सुट्ट्या संपवाव्या लागतात. हे म्हणजे इतक्याश्या सुट्ट्या कश्या प्लॅन करायच्या या प्रश्ना ऐवजी, सुट्ट्या कश्या संपवाव्या असा उलट प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पण या सुट्ट्यामुळे इतरही बरेच प्रश्न आणि अडचणी निर्माण होतात. म्हणजे तुम्ही नवीन जॉब साठी अप्लिकेशन केलं आणि मॅनेजर तीन आठवडे सुट्टीवर आहे, तोपर्यंत वाट बघण्याला पर्याय नाही. शिवाय या प्रोसेस मध्ये असणारे लोक जेव्हा एकेक करून सगळे सुट्ट्यांवर जातात तेव्हा एकूण तो वेळ वाढतच जातो. कधीही, विशेष करून शाळांच्या सुट्ट्या असतात तेव्हा कोणत्याही डॉक्टरला फोन करताना धाकधूक असते, की ही आता सुट्टीवर असेल तर काय? वर्षभरात एकूण ६-८ आठवडे डॉक्टरचा दवाखाना बंद असणे हे बरंच कॉमन आहे. मग ते दुसऱ्या डॉक्टर कडे जायला सांगतात, (त्यातही त्यांनी सांगितलेल्या डॉक्टर कडेच जावं लागतं पण ते नियम यात नको) उपाय असतात तसे पण हे डोक्यात ठेवावं लागतं. सरकारी कोणतीही कामं असतील तर ती सुद्धा एखादा माणूस सुट्टीवर गेला की तीन आठवडे लांबतात. इथे आपली कामं आपणच करण्याची सवय तशी लागली आहे, त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव नाही पण कामवाल्या बायका, माळी, घरातल्या काही डागडुजीचे काम करणारा माणूस यांच्याही उन्हाळी सुट्ट्या आधीपासून प्लॅन झाल्या असतात. वर लिहिलं आहे त्याप्रमाणे, गुरुवार सुट्टी असेल तर शुक्रवारी ऑफिस बंद अश्या नियमांमुळे, आपल्याला इच्छा असो नसो त्या मधल्या सुट्ट्या घाव्याच लागतात, ती एक प्रकारची जबरदस्ती वाटू शकते.
जुलै ऑगस्ट तर सुट्ट्यांचे मुख्य महिने तेव्हा एकूणच कुठेही अनोळखी ठिकाणी फोन करताना पहिला विचार, सुट्टीवर असतील तर काय हाच येतो. आता एक आमच्या घराजवळचं रेस्टॉरंट बंद आहे, कारण मालक चार आठवडे सुट्टीत फिरायला गेला आहे. उन्हाळ्यात अगदी महिना दोन महिने रेस्टॉरंट बंद ठेवून जाणारे लोक आहेत. आज समजा आवडत्या पिझ्झा वाल्या कडून पिझ्झा घेऊ असं ठरवलं तर हमखास त्याची सुट्टी असू शकते. आमच्या ट्रेन स्टेशनवर एकमेव दुकान आहे छोटं, फक्त कॉफी, सिगारेट आणि थोडाफार खाऊ इतपतच तिथे मिळतं, तेही वर्षातून चार आठवडे बंद असतं. असून असून किती असेल याचा धंदा, केवळ ट्रेनने जाणाऱ्या मोजक्या लोकांसाठी आधार असेल तेवढंच पण सुट्टी म्हणजे सुट्टी.
मुलांचे डे केअर, किंडर गार्टन यांनाही वर्षभरात ३ ते ४ आठवडे सुट्टी असते. म्हणजे तिथे काम करणाऱ्यांच्या इतर सुट्ट्या वेगळ्या, पण या दरम्यान या सगळ्या फॅसिलीटीज बंदच असतात. मग आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे सुट्ट्या घ्याव्या लागतात आणि ही अप्रत्यक्ष आपल्यावर केलेली सक्ती वाटते. शाळांच्या सुट्ट्या बघून तर, सुट्ट्यांमध्ये काही दिवस फक्त शाळा आहे असं वाटतं. जानेवारीत पहिला आठवडा नवीन वर्षाची सुट्टी, ती झाली की मग फेब्रुवारीत कार्निव्हल म्हणून आठवडाभर सुट्टी, मग ईस्टरची दोन आठवडे सुट्टी, मग पुन्हा जून मध्ये दोन आठवडे सुट्टी आणि मग शेवटी उन्हाळ्याची सहा ते सात आठवडे सुट्टी आणि पुन्हा ऑक्टोबर मध्ये एक आठवड्याची सुट्टी असं अर्धं कॅलेंडर सुट्ट्या मय असतं. यात ईस्टर आणि ख्रिसमस वगळता कोणतेही सण हे तेवढे मोठे नाहीत, त्यामुळे या सुट्ट्या म्हणजे पालकांना सजाच असते. काही ठिकाणी या दरम्यान आफ्टर स्कुल केअर म्हणून सुविधा असते, पण त्यातही ती सगळ्या सुट्ट्यांमध्ये नसते, मोजून दोन किंवा चार आठवडे सोडलं तर उरलेल्या सुट्ट्या आपल्यालाच बघायच्या असतात. समर कॅम्प असेल तरी त्याचे बुकिंग बरेच आधी करावे लागतात आणि त्यातले बरेच चार ते सहा तासांचेच असतात. दोन्ही पालक जेव्हा पूर्णवेळ नोकरीत असतात तेव्हा त्यांच्या सगळ्या सुट्ट्या मग मुलांच्या सुट्ट्यांमध्येच संपून, स्वतःसाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र असं काहीच उरत नाहीत अशी परिस्थिती येऊ शकते. आजी आजोबा जवळ राहत असतील तर अश्या सुट्ट्यांमध्ये मग ते नातवंडांना सांभाळतात, पण हे नेहमी शक्य असतंच असं नाही. मी नेहमी गमतीने म्हणते की, तुझ्या एवढ्या सुट्ट्या मॅनेज केल्या हे सगळ्यात अवघड काम होतं असं मी मोठेपणी सृजनला ऐकवणार आहे. या दरम्यान तर कित्येक इनडोअर असणारे प्ले एरिया सुद्धा मुलांच्या शाळांच्या सुट्टयांदरम्यान ३ ते ४ आठवडे बंद असतात. बाहेर खेळायला खूप पर्याय असतात आणि ते वापरलेही जातात. पण खूप ऊन, पाऊस किंवा कधी मुलांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी असलेल्या या ठिकाणांची नेमकी सुट्टीतली सुट्टी आपल्याला आश्चर्याची वाटते आणि त्याचा थोडा त्रास सुद्धा होतो.
आता हे सगळं असलं तरी इथल्या सारख्या सुट्ट्यांची चंगळ क्वचितच इतरत्र कुठे दिसेल. दुरून डोंगर साजरे तसे बाहेरच्यांना इथल्या सुट्ट्या नक्कीच आकर्षित करतात, पण त्याची पूर्ण वेगळी बाजू सुद्धा असते जी प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजते. जेवढ्या सुट्ट्या सुखावह असतात तेवढ्याच त्या जीव मेटाकुटीला पण आणतात. कामाच्या वेळी काम आणि सुट्टीच्या वेळी सुट्टी हे विभाजन इथले बरेच लोक व्यवस्थित करू शकतात. कधीकधी 'काम करा आधी मग सुट्ट्या घ्या' असं वाटायला लावणारे प्रसंग येतात, पण कामचुकार ते सिन्सियर असे वेगवेगळे लोक इथेही असतात. तरीही मुळात सुट्टी घेणे म्हणजे काही पाप करणे नाही, कामाच्या रगाड्यातून सुट्ट्या घेणे हे अत्यावश्यक आहे, सुट्ट्या ह्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत ही मानसिकता मला फार आवडते. त्यामुळेच सृजनच्या सुट्ट्या दर वर्षी कश्या manage करायच्या याची रोज चिंता वाटत असतानाही, सुट्ट्यांचे असे प्रश्न सोडवताना नाकी नऊ आले तरी शेवटी ते आवडीचं पारडंच जड राहतं.