दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या रविवारी इथे घड्याळ बदलते ही आता दहा वर्षात सवयीची बाब झालेली आहे. घड्याळ एक तास पुढे केलं जातं, पहिले दोन तीन दिवस जरा भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा सेट होण्यात जातो, पण सगळं पुन्हा नेहमीसारखं चालू होतं. वसंत ऋतू सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. एकदाची थंडी कमी होइल, जास्त वेळ सूर्यदर्शन व्हायला लागेल आणि एकदाचे हिवाळी कपड्यांचे जोखड उतरेल या आशा पल्लवित होतात. खरंतर अजूनही थंडी आहेच, रात्री तापमान एक दोन पर्यंत जातं आहे, पण तरी हवेतला बदलही जाणवायला लागतो.