औट घटकेची वामकुक्षी आणि मर्फीचे नियम

मस्त भरपेट पुरणपोळी मसालेभात खाऊन आता छान ताणून देऊ..
आज शनिवार आहे, दुपारची झोप हवी म्हणजे हवीच...
आज सुट्टी आहे, दुपारी झोप काढणार आहे मी मस्त...
वामकुक्षी घेतो फक्त, अर्धा तास, जास्त नाहीच पण झोप हवी..
प्रवास झाला आहे रात्रभर, आता दुपारी भरून काढेन झोप...

अशी अनेक वाक्य तुम्ही ऐकली, खरंतर स्वतःच अनुभवली असतील. कारण majority लोकांना दुपारची झोप आवडते. आणि याच्या अगदी उलट म्हणजे दुपारच्या झोपेची फार सूत जुळत नाही अश्या मायनॉरिटी गटात मी असते.

लहानपणी मी तशी अगदी शहाणी शांत मुलगी होते, खाण्याचे कोणतेही नखरे नाहीत, आई बाबांकडे कधी कश्यासाठी कोणताही हट्ट केला नाही. फक्त एका गोष्टीसाठी मी आईला त्रास दिला आहे तो म्हणजे दुपारची झोप. माझ्या शाळेला सुट्ट्या लागल्या की दिवसभर काय करायचं हा प्रश्न पडायचा. रांगोळ्या काढणे, पुस्तकं वाचणे, बागेतून फुलं तोडून गजरे करणे, बाहुलीशी खेळणे, चित्र रंगवणे, खेळभांडी खेळणे हे सगळं करून सुद्धा वेळ असायचाच. आजूबाजूला फार कुणी खेळायला नव्हते, काही होते तेही दुपारच्या वेळेत झोपायचे किंवा मग सुट्ट्या म्हणून अनेक जण आजोळी जायचे. आईचा दिवस कायमस्वरूपी पहाटे साडे चार पासून चालू व्हायचा, त्यामुळे आईला दुपारी झोपावं वाटायचं आणि हमखास त्याच वेळेत मी तिच्या मागे 'आता काय करू' असा धोषा लावायचे. आई मग मला तात्पुरतं काहीतरी सांगायची, पुन्हा तिचा डोळा लागला की मी पुन्हा तिची झोपमोड करायचे. मला दुपारी झोपणे हा प्रकारच आवडायचा नाही, कितीही कुणी म्हणालं तरी मी झोपायचे नाही. मला खरंच रात्री झोप यायची नाही आणि मग ते उगाच रात्री आढ्या कडे बघत बसण्यापेक्षा दुपारी झोप नको असाच माझा कल होता.

मोठ्या इयत्तेत गेल्यावर भरपूर अभ्यास मागे लागला, जागून अभ्यास केला, पहाटे उठून केला तरी सुद्धा मी दुपारी कधीच झोपायचे नाही. मला रात्री झोप येत नाही हे एक कारण खरं होतंच, तेवढंच हेही की दुपारी झोप यायची देखील नाही. अगदी रटाळ लेक्चर असेल तर मी वह्यांवर काहीही नक्षीकाम करा, काहीही गिरवा असं करायचे, पण इकडे शिक्षक शिकवत आहेत आणि मी एक डुलकी काढते आहे असं स्वप्नात सुद्धा माझ्या आयुष्यात घडू शकत नाही.

हॉस्टेल आणि नंतरही सोबतच्या अनेक मैत्रिणी या दुपारच्या झोपेवर मनापासून प्रेम असणाऱ्या. त्यातून एकदा नोकरी सुरू झाली की मग तसा निवांत वेळ फक्त वीकएंडला लाच मिळायचा. त्यामुळे तर दुपारी झोप हवीच असं बाकीच्यांना वाटायचं, तर मी एकटी बसून काहीही करेन पण झोपणार नाही असा पवित्रा घेऊन असायचे. दुपारी ऑफिस मध्ये सुद्धा खूप झोप येते आहे असा कुणाचा फोन आला, की मी त्यांच्यासोबत जाऊन चहा प्यायचे, पण मला झोप येते म्हणून नाही, तर त्यांना सोबत आणि चहा आवडतो म्हणून. अगदी सहा आठ महिन्यातून एखाद्या वेळी हा प्रसंग उलट व्हायचा, म्हणजे मी खूप झोप येते आहे म्हणून कुणालातरी सोबत घेऊन चहा प्यायला जायचे.

मग लग्न झालं आणि सुमेधचं झोपेवर असलेलं प्रेम बघून थक्क झाले. शून्य मिनिटात झोप येणे आणि कधीही कुठेही कितीही वेळ झोपू शकणे हे दोन अजब कसब त्याच्याकडे आहेत. दुपारची झोप असं नाही, कोणत्याही वेळी त्याला झोप येऊ शकते आणि तरीही रात्री निवांत झोपू शकतो. आम्हाला पत्रिका बघायची नव्हतीच, पण समजा बघितली असती तरी त्यात या झोप या गहन आणि आयुष्यभर पुरणाऱ्या गोष्टीबद्दल काहीही समजलं नसतं. इतकी उत्तम झोप येणं हा त्याला गुण वाटतो तर मला दोष. संसार जुना झाला तसतसं हे सगळं अंगवळणी पडत गेलं आणि आम्ही झोपच काय, इतरही बाबतीत जिथे वेगवेगळ्या गटात होतो ते एकूण दोघांच्या भल्यासाठी आहे हे समजून चुकलो. सृजनचा जन्म झाला आणि अर्थातच हे सगळं 'तू दुपारी झोप काढ म्हणजे मी रात्री जरा झोपू शकेन' असं माझ्या दृष्टिकोनातून बदललं, जे दोघांच्याही पथ्यावर पडला. मग सृजन सोबत कुणीतरी झोपला तर तो दुपारी जास्त वेळ झोपून राहतो, हे काम सुमेधने आनंदाने स्वतः कडे घेतलं आणि मीही तेवढ्याच आनंदाने घरातल्या कामांपासून ते फेसबुकवर चकाट्या पिटणे हे सगळं करायला तो वेळ वापरायला लागले.

खरंतर मला झोप आवडत नाही असं अजिबात नाही, मला रात्रीची शांत आणि सहा आठ तास झोप अत्यंत प्रिय आहे. कधीतरी ठीक आहे पण उगाच खूप जागरण मला जमत नाही. पण दुपारी झोप हे काही जमत नाही, खरंतर उठसूठ कधीही कंटाळा आला तरी झोप असं पण होत नाही. खूप सुस्तावले आहे, गुंगी येते आहे खूप असं माझं नेहमी होत नाही. उलट मी दुपारी झोपत नाही त्यामुळे रात्रीची विना व्यत्यय झोप हा माझा हक्क आहे असं मला वाटत असतं आणि तेवढी झोप झाली तर मग दिवसाची सुरुवात उत्तम होते.

फक्त हे नक्की की या मायनॉरिटी ग्रुप मध्ये असल्यामुळे कायमच आजूबाजूला लोकांना अतीव आश्चर्य वाटतं. याचा परिणाम म्हणून काही वेळा बाकीच्यांना झोप मिळावी म्हणून मी जागी राहून बाकीच्यांची कामं करते आहे असं सुद्धा होतं. आता मोठी झाल्यामुळे मी आईला त्रास देत नाही, शिवाय फोन वरच मनोरंजनाची भली मोठी रेंज आहे, त्यामुळे कंटाळा आला असं होत नाही.

पण कदाचित वर्षानुवर्षे या दुपारच्या वामकुक्षी बद्दल ऐकून ऐकून आणि जगाचं प्रेम बघून असेल, आई या भूमिकेत शिरल्यावर रात्रीच्या झोपेचा जो काही बळी गेला त्यामुळे असेल किंवा हळूहळू वाढत्या वयाचा परिणाम असेल, चार सहा महिन्यातून तरी एखाद्या वेळी, मला हल्ली मनापासून दुपारी झोपायची इच्छा होते आणि बरोब्बर त्याच वेळी मर्फी काका एन्ट्री करतात. लहान असतानाही जरी मोजक्या वेळेला मी झोपत असेन, तरी तेव्हा जबाबदाऱ्या नव्हत्या, त्यामुळे फरक पडायचा नाही. आता मात्र मी वर्षातून जे दोन दिवस आज मी दुपारी झोपणार आहे असं ठरवते, ते दोन दिवस जगभरातून काहीही होऊन माझी ती झोपमोड झालीच पाहिजे असा चंग मर्फी काका बांधतात.

उदाहरण म्हणून, सृजन अगदी तीन महिन्यांचा असेल, रोजच जागरण व्हायचं. ते गृहितच धरलेलं होतं, पण एका रात्री अगदीच झोप लागली नाही, रविवार होता, मी सृजन सोबत दुपारी झोपणार असं पक्कं ठरवलं. सृजन दुपारी अगदी ठरल्या वेळेला झोपला, आता तासभर झोप काढू म्हणून मी पडले. जर्मनीत रविवारी कोणतेही मोठे आवाज केलेले चालत नाहीत, खरंतर दुपारी एक ते तीन दरम्यान सुद्धा नाही. याबद्दल एक लेख आहे माझ्या ब्लॉग वर, पण थोडक्यात बाहेरून कोणत्याही मोठ्या आवाजाने झोपमोड होणार नाही याची खात्री होती. आणि अश्या वेळी सगळे नियम मोडून शेजाऱ्यांनी ड्रिल मशीन वापरलं, त्या जोरदार आवाजाने जाग येणार नाही असं शक्य नव्हतं,. त्याहून मीठ चोळायला, एरवी माझ्या पावलांचा आवाज सुद्धा ऐकून जागा होणारा सृजन त्या ड्रिलच्या आवाजात सुद्धा अगदी गाढ झोपला होता. मी हताश होऊन फक्त तो आवाज ऐकत उलटे आकडे मोजत आणि राग गिळायचा प्रयत्न करत पडून होते. शेजाऱ्यांची तक्रार करावी हे फक्त मनातच राहिलं.

अजून एक कॉमन उदाहरण म्हणजे शेजाऱ्यांच्या, पूर्ण बिल्डिंग मधल्या कुणाच्याही कुरिअर साठी पोस्टमन सुद्धा या ताई उघडतीलच दार म्हणून खात्रीने आमची बेल दाबतात. एरवी मी लाख उघडेन, पण जर नेमका माझ्या 'वामकुक्षी योग हवा' अशी आशा करणाऱ्या एखाद्या दिवशीच जेव्हा कुणी शेजाऱ्यांच्या पार्सल साठी उठवतात, तेव्हा मला पुन्हा मर्फी काका आठवतात आणि मी जमदग्नी अवतार धारण करते. तो त्या पोस्टमन दादांना दिसला नाही तरी जवळच्या लोकांपासून लपत नाहीच. मी वर्षातून चारच दिवस झोपते दुपारी, मग मला हा अन्याय वाटतो. त्यातून मी बाकीच्यांना जर झोपू देते तर हे चार दिवस तरी मला मिळावे अशी माझी माझ्या दृष्टीने रास्त मागणी असते.

मी झोपले आणि सुमेध किल्ली न घेता बाहेर गेला आणि मग येऊन बेल मारली की हमखास माझ्या झोपेचं खोबरं होतं, शिवाय आमच्या चर्चा रंगतात त्या वेगळ्याच. शेजारच्या आजीला मुख्य बिल्डिंगचं दार उघडता येत नाही म्हणून ती पण नेमकी कधीतरी दुपारच्या वेळी बेल दाबते, मी हसऱ्या चेहऱ्याने जाऊन तिला मदत करते, ती बिचारी ओशाळून सॉरी तुम्हाला त्रास दिला म्हणते तेव्हा मलाच वाईट वाटतं. मी झोपले होते हे मी तिला दिसू देत नाही, फक्त मर्फी काकांची आठवण काढत बसते.

पण आता बरं नसेल कधीतरी तर काय करणार? गेल्या दोन दिवसांपासून बरं नाही, पहिले जरा थकवा डोकेदुखीने सुरुवात झाली. परवा सृजनला शाळेतून आणेपर्यंत एनर्जी टिकली आणि मग इतकं असह्य वाटत होतं की बाबा येईपर्यंत त्याला हा घे फोन, पण आता मी पडून राहते असं मी म्हणाले. खूप प्रयत्न करूनही झोप टाळता येतं नव्हती म्हणजे मला खरोखर झोपेची गरज असणारा दुर्मिळ दिवस. फोन घेऊन त्यावर काहीतरी बघत, त्याने एकीकडे एक बॉल घेतला हातात खेळायला, ज्यात आत काहीतरी भरलेलं होतं. मला झोप लागली आणि 'हीच ती वेळ हाच तो क्षण' म्हणत तो बॉल फुटला आणि त्यातून आत भरलेला जो काही प्रकार होता ते बाहेर आलं. तो बॉल घेताना दूरवर सुद्धा, आपल्या औट घटकेच्या वामकुक्षी प्रेमात हा बॉल व्यत्यय आणणार आहे याची सुतराम कल्पना नव्हती. मग उठून ते सगळं बाजूला करून साफ करून ठेवा हे करणं ओघाने आलंच.
आता हे सगळं झालंच, पण एक सगळ्याचा कळस म्हणावा अशी घटना अजून बाकी होती.

काल आजारपणं अजून वाढलं. म्हणून सुमेध पण घरीच थांबला, पण औषध आणि बाकी ग्रोसरी घेऊन येतो तोवर तू झोप म्हणून तो बाहेर गेला. मला गाढ झोप लागली आणि फोनवर जोरजोरात कर्कश्य आवाज यायला लागला. फोनची रिंगटोन, मेसेजचा आवाज यातलं हे काहीच नाही याची खात्री मला झोपेत सुद्धा होती इतका तो ठणाणा आवाज होता, मी उठून फोन वर emergency अलर्ट हे पाहिलं, तिथे पुढे हा टेस्ट मेसेज आहे हे दिसत होतं. अख्ख्या देशभर एक emergency alarm टेस्ट करणार आहेत हे मी बातम्यांमध्ये वाचलं होतं, नेमकी वेळ मात्र विसरले. पहिले माझा फोन बंद केला तरी आवाज येतच होता, मग मात्र मला हा alarm खरा असेल असं सुद्धा वाटलं. मी खरंच बिल्डिंगला आग लागली असेल का, काय प्रॉब्लेम असेल असा विचार करत होतेच, स्मोक डिटेक्टर वाजत आहेत का हे पाहिलं तर तेही नव्हतं, आणि मग सुमेधचा ऑफिसचा फोन दिसला ज्यावर हा सेम टेस्ट इमर्जन्सी अलर्ट वाजत होता. मग तोही बंद केला. त्या आवाजाने, दोन क्षण हा खरा असेल तर काय यामुळे वाटलेल्या प्रचंड भीतीने झोप उडाली होतीच. पण लोकांचं जाऊद्या, अगदी देशभर व्याप्ती असणारी अशी एखादी गोष्ट सुद्धा जेव्हा बरोबर अश्या वेळी नियोजित केलेली असते, तेव्हा समस्त जगच मी अगदी आजारी असताना सुद्धा माझ्या दुपारी झोपण्याच्या सगळेच जण किती विरोधात आहे याची मला पुरेपूर जाणीव झाली. उलट नशीब मी झोपेत होते, गाडी चालवताना असा आवाज आला असता अचानक तर घाबरून भलतेच काही होण्यापेक्षा झोपमोड बरी असं पण वाटलं.

आता बाकीचे लोक, ज्यांच्यामुळे माझी यापूर्वी झोपमोड झाली त्यांना सगळ्यांना मी या कालच्या प्रसंगानंतर माफ केलं. शेजाऱ्यांची पार्सल घेण्याचं, आजीला मदत करण्याचं पुण्य मी अजून कमावत राहावं असं बहुतेक देवालाही वाटत असेल. माझी झोप आणि देशभर इमरजन्सी अलर्ट, टेस्ट का असेना, पण हे ऋणानुबंध बघता, मी मायनॉरिटी ग्रुप मध्ये असेन तरी दुपारच्या झोपेपासून लांबच राहणार असा ठाम निश्चय केला आणि मग आज दुपारी मग वामकुक्षी न घेता मी हे लिहून काढलं.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle