नभ उतरू आलं - १२

पलोमा

तासाभरापूर्वी मी राजारामपुरीत आमच्या घरी आले. आजीला तिच्या खोलीत जेवण द्यायला गेले तर ती मुटकुळं करून झोपली होती. कुठे आमच्या लहानपणी सत्ता गाजवणारी, ठणकावून बोलणारी, आम्हाला दम देणारी लक्षूमबाई आणि कुठे ही अशक्त दिसणारी, सुरकुतलेली आजी. आईला तिने मुलगा हवा म्हणून दिलेला सगळा त्रास आमच्या डोक्यातून कधीच विसरला जाणार नाही. दोन मुलींवर पुन्हा वंशाच्या दिव्यासाठी तिने आईला ऑपरेशन करू दिलं नाही. तर जाई - जुई झाल्या! एकावर एक फ्री! तेव्हापासून आजी ने चार मुली म्हणून आमचा आणि आईचा जो दु:स्वास केला त्याला तोडच नाही.

आई गेल्यावर पप्पांना आजीला आमच्याबरोबर ठेवावेच लागले, काही पर्यायच नव्हता. तिने जरी आम्हाला कसली ददात पडू दिली नसली तरी बोलून बोलून आमची डोकी नक्की खराब केली होती. आई गेल्यानंतर मला तर तिच्याशी बोलायचीच इच्छा नव्हती. आजीला उठवून टीपॉय समोर ओढला आणि ताट ठेवलं. दिदीने जरा मऊ शिजवलेला भात आणि अळणी रस्सा कालवून दिला होता. आजीने जेवायच्या आधी मला शेजारी बसवून घेतलं आणि तोंडावर बोटं मोडली. "माई, आम्हाला म्हईताय तुम्ही आमचा रागराग करताय. पन बसा जरा इथं. आमची वागण्यात चूक झाली. रजनीला पण आम्ही लै त्रास दिलो. आम्ही कबूल करतो."

मी गप्प बसून राहिले.

"बगा, आमच्या दोन मोठ्या बहिणी सासरच्यानी मारल्या. एक बाळतपणात, एक हुंड्यापायी. पोरीना हुंडा देऊ देऊ आमचं माहेरचं घर रिकामं झालं. सासरी आमचे मालक लौकर वारले पण तुझा पप्पा होता आमच्याजवळ म्हणून आम्ही जिवंत राहिलो, आमचं घरदार राखू शकलो. मुलगी म्हणजे डोक्यावर भार अशीच आमची आपली जुनी समज म्हणून आम्ही तशे वागलो. पोरीनो, तुम्ही चांगलं शिकला, घर संबाळू लागला त्यात मला आनंदच आहे. आता वाटतं नातू असता तरी त्यानं मला तुमच्यासारखा प्रेमाने सांभाळला असता की नाही. आता शेवटच्या दिसात आमचा राग नगं करू, आम्ही माफी मागतो.." आजीचे पाणावलेले डोळे बघून मी जरा विरघळले. शेवटी अंगात रक्त तिच्याकडून आलेलंच होतं. "आजे..जीवाला त्रास नका करून घेऊ." म्हणून मी तिचा हात घट्ट धरून ठेवला आणि "निवांत जेवा आता" म्हणून बाहेर पडले.

किचनमध्ये गेले तोच जाईजुई उगवल्या. मला बघून त्यांनाही हसू आलं कारण आम्ही तिघीनीही गुलाबी कपडे घातले होते. मी व्हाईट लेगींग्ज आणि गुलाबी पिनटक स्लीवलेस कुर्ता, जाईने फाटकी ब्लॅक जीन्स आणि राणीवर पांढरे पोलका डॉट्स असलेला शर्ट आणि जुईने पांढऱ्यावर गुलाबी बारीक फ्लोरल डिझाईनचा मॅक्सी ड्रेस घातला होता. रंग एकच असला तरी आमचे आपापले लूक्स होते!

जाईने सॅक खुर्चीत टाकली आणि ओट्यावर मी करून ठेवलेल्या नारळाच्या पचडीकडे पाहिलं.
"ओह, मीपण काही बनवायचं होतं काय?" तिने जीभ काढत विचारलं.

जुईने हॉट चिप्समधून आणलेल्या केळ्याच्या किलोभर तिखट चिप्स पिशवीतून काढून दाखवल्या. "लकी आहेस! आम्ही दोघींनी काय काय आणलंय तेवढ्यावर तुझं चालून जाईल."

"मग काय तर, मी दुसऱ्या पातेल्यात दहीकांदा पण करून ठेवलाय. आता फक्त ही भांडी घेऊन शेजारी जायचय. त्यात मदत कर!" मी म्हणाले.

"पप्पा आधीच तिकडे जाऊन बसलेत." जुईने इनपुट दिलं.

आम्ही डबे, पातेल्या घेऊन शेजारी जायला निघालो.

"जुई, दोन चिप्स चार ग मला." हातात पातेलं धरून जाई म्हणाली. आम्ही तिच्याकडे बघितल्यावर "मग? आपण रस्त्यात आहोत म्हणजे पार्टी सुरूच झाली की!"

"तू आणि तुझं लॉजिक महान आहात!" मी डोकं हलवंत म्हणाले. जूईने हसत तिच्या तोंडात चिप्स टाकल्या. "जाऊदे, तिने खायला काही आणलं नाही तर नाही, एन्टरटे्नमेंट तरी नक्कीच आणली आहे!"

"थँक्यू! एन्टरटे्नमेंटवरून आठवलं, आपला बॅटमॅन कुठाय?" जाई खातखात म्हणाली.

"त्याचा टीमच्या ओनर्सबरोबर कॉल सुरू आहे. तो डायरेक्ट दिदीकडे येईल." मी खांदे उडवले. इतका वेळ एकत्र घालवल्यावर आता तो बरोबर नाहीय तर जरा सुनंसुनं वाटत होतं आणि ह्या गोष्टीने मी खरंच घाबरले होते.

इतकी वर्ष वेगळं राहून आता थोडासा वेळ एकत्र घालवल्यानंतर तुम्ही कोणाला एवढं मिस कसं करू शकता?

नथिंग मेड सेन्स व्हेन इट केम टू समर...

"मग, काय चाललंय तिकडे?" जुईने विचारलं.

"विशेष काही नाही. एकत्र काम करतोय. जुनी ओळख आहे त्यामुळे इतक्या वर्षांनी त्याच्या बरोबर छान वाटतंय."

"त्याला मिस करत होतीस म्हणायला काय तोंड शिवलंय व्हय?!" जाईने तोंड उघडलं. "सांग की मग बिंधास. तुम्ही असा अचानक ब्रेकअप केला होता, कठीण झालं असेल तुला."

मी श्वास सोडला. "हम्म, आम्ही बोलतो त्याबद्दल. मला बरं वाटतंय की तो माझा राग तरी करत नाही."

"मक्काय तर!" जुईने मान हलवली.

"ए पोरी, तो मुलगा तुझा राग तर अजिबातच करत नाही. तुमच्यात इतक्या वेड्यासारखा ठिणग्या उडत असतात! काय केमेस्ट्री, काय केमेस्ट्रीss कोणपण सांगेल."  पायाने दार ढकलत जाई म्हणाली.

हॉलमध्ये अजयच्या घरचे लोक, मित्रमंडळी, पप्पा आणि आम्ही असा सगळा कोटा फुल झालेला दिसतोय. मागच्या अंगणात अजयने बार्बेक्यू सुरू केला होता. शीग कबाब, मक्याची कणसे, तंदुरी पनीर वगैरे स्टार्टर्स बहुतेकसे तयार होत आले होते. दीदीच्या सासूबाईंनी एकहाती ज्वारीच्या पन्नासेक भाकऱ्या बडवल्या होत्या. गॅसवर भल्यामोठ्या पातेल्यात मटन रसरसून उकळत होतं. तांबडा, पांढरा खास आमच्या पप्पांनी स्वत:च्या एक्स्पर्ट हातानी बनवला होता. एकीकडे आमच्या शेतातल्या घनसाळ भाताचा गोडसर सुगंध येत होता. मी जाऊन दीदीला सॅलड चिरायला मदत करू लागले.

"पलो, इकडे बघ काय मजा आहे!" पप्पानी एका कढईवरचे झाकण उघडुन दाखवले. सुक्क मटन दिसत होतं, मी एक फोड उचलून तोंडात टाकली तर विरघळण्याएवढी कोवळी आणि मसाला आतपर्यंत मुरलेली! "वॉव!"

"आजऱ्याला आपल्या शेतात रानडुकरांचा त्रास लै वाढला होता. कितीबी छर्रे झाडा, मागंच हटत नव्हती. म्हणून शेवटी पोरांनी परवानगी घेऊन शिकार केली. त्यांनी आधनावर शिजवून चरबी बाजूला काढली मग त्यातलंच किलोभर हिकडं घेऊन आलो. नुसता तेल, हळद, खोबरं, मीठ चटणी लावून रातभर चुलीच्या निखाऱ्यावर शिजत टाकलं. कसंय?" पप्पा नेहमी रंगवून किस्से सांगतात तसं सांगत होते.

"तरीच! एक नंबर स्मोकी फ्लेवर आलाय!" मी बोट चाटत म्हणाले.

पप्पा समाधानाने हसले आणि एकदम जरा शांत झाले. "मग, समरची ट्रीटमेंट कशी चाललीय? तुम्ही दोघे एकमेकांशी बरे वागताय ना?" त्यांनी पाठीवर थोपटत विचारले.

"हो पप्पा. सगळं नीट सुरू आहे. पुढचा सीझन खेळायचा की नाही हा शेवटी त्याचा डीसीजन आहे, पण तोपर्यंत तो फिट तरी नक्की असेल."

तेवढ्यात दार उघडलं आणि समर दोन्ही हातात सोलकढीचा भलामोठा कॅन धरून आत आला.

"काय अंतर्ज्ञानी आहेस का काय? परफेक्ट आयटम घेऊन आलास!" म्हणत अजयने त्याला टाळी दिली. सगळ्यांच्या मिठ्या आणि हँडशेक स्वीकारत, बोलत तो आत आला. जाईजुई लगेच त्याला चिकटल्या आणि दीदीच्या घरात केलेले नवे बदल फिरून त्याला दाखवायला लागल्या. माझं पप्पांकडे लक्ष गेलं तर ते माझ्याकडेच बघत होते. "काय?" मी भुवया उंचावून विचारलं. जणू मी त्या गावचीच नाही असं दाखवत!

"काही नाही. हल्ली जरा हलकी, निवांत झालेली वाटते आहेस."

"म्हणजे चांगलं की वाईट?"

"म्हणजे आनंदी दिसते आहेस, पलोराणी. ते तर कायम चांगलंच. परत येऊन कोल्हापूर मानवलंय तुला!" ते मिश्किल हसले.

मी गालात हसत असतानाच जाईजुई समरला घेऊन आमच्याकडे आल्या. मी दिदीला सगळे पदार्थ टेबलवर मांडायला मदत करू लागले. पण मी जेव्हाही वर बघितलं, माझे डोळे समरला शोधत होते. तो पप्पांशेजारी बसून वेगवेगळ्या बोलिंग टेक्निक्सबद्दल सांगत होता. आमची बऱ्याच वेळा नजरानजर झाली पण प्रत्येक वेळी त्याला कोणीतरी काहीतरी विचारायचं आणि तो जाऊन त्यांच्याशी बोलायचा. सगळ्याभर फिरून शेवटी तो येऊन माझ्याशेजारी डायनिंग टेबलाला टेकून उभा राहिला आणि माझ्या दंडावर कोपर मारलं.

"हे!" मी त्याच्याकडे बघितलं आणि माझ्या गालांवर हळूहळू उष्णता पसरली. व्हॉट द हेल इज राँग विथ मी?! आम्ही रोज एकत्र असतो. अचानक मी नर्व्हस का होतेय...

"काय चाललंय? डिड यू मिस मी?" त्याने डोळा मारत चिडवले.

पण मी खरंच त्याला मिस करत होते. अर्थात हे कबूल करून मी स्वतःचा बावळटपणा सिद्ध करणार नव्हते. पण ह्या माणसाबरोबर असताना मला खरंच बाऊंड्रीज सेट करायला हव्यात.

"ऑल ओके. तुझी मीटिंग कशी झाली?"

"दे आर कूल. ओनर्सना टीम आणि प्लेअर्सची खरंच काळजी आहे. त्यांनी फक्त मला परत खेळायला येण्यासाठी थोडं पटवायचा प्रयत्न केला, बस." त्याने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि थोडा माझ्या अजून जवळ सरकला. "इट्स ऑल्वेज नाइस टू बी वॉन्टेड!" तो माझ्या कानात कुजबुजला आणि सरळ बाहेर हॉलमधल्या घोळक्यात निघून गेला!

अचानक इथली उष्णता वाढलीय!
तो डबल मिनींग बोलला की काय?
इट इज नाइस टू बी वॉन्टेड, शुअर!

"बघ, मी हेच म्हणत होते तायडे!" जाई माझ्याकडे झुकून म्हणाली. "तुमच्यातलं हे छोटंसं एक्सचेंज!"

"कसलं छोटंसं एक्सचेंज? काहीही झालं नाही. मी फक्त त्याच्या मीटिंगबद्दल विचारत होते."

"त्याने तुला आँखो ही आँखों मे इशारा केला, तोही पप्पा इथून पाच फुटावर असताना आणि तू लाजून लाल झालीस. कोल्हापुरात तरी ह्याला काहीही नाही बरंच काही समजतात!"

मी डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. पण तिच्या बोलण्यात तथ्य आहे. ह्या गोष्टी इथे आल्यापासून मला 24*7 फील होतायत.

मी इतके गुड लूकींग, हॉट बंदे रोज बघते, पण मला कधीच असं फील होत नाही. मी कायम पूर्ण कंट्रोलमध्ये असते. पण समर भेटल्यापासून अगदी विरुद्ध सुरू आहे.

"आपल्याकडे काय हॉटेल सारखं फॅन्सी काय नाय. सगळ्यांनी आपापली ताटं वाढून घ्या आणि आवडत्या लोकांशेजारी जागा पकडा!" अजयने हसत घोषणा केली. सगळे आपल्या प्लेट भरून मिळेल त्या जागी बसले. समर नेमका त्याच्या शाळेतल्या मित्रांच्या घोळक्यात खाली सतरंजीवर बसला होता. मी सोफ्यावर जाईशेजारी बसले. तेवढ्यात शेजारच्या केतीचा तीन वर्षाचा मुलगा समरकाकाबरोबर सेल्फी हवा म्हणून त्याच्या मांडीत बसून सेल्फी काढायला लागला. मोबाईलमध्ये स्माईल देताना समरचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्याचे डोळे माझ्यात मिसळले. मी माझी नजर हटवूच शकले नाही.

"आता तुझ्या कानातून धूर यायचा बाकी राहिलाय ताया! इथे लहान मुलं आहेत, आणि पप्पापण.." जाई माझ्या कानात बोलतानाच समोरच्या खुर्चीत पप्पा येऊन बसले आणि तिने तोंड बंद केलं.

"पलो? बेटा बरं वाटतंय ना तुला?" ते माझ्याकडे काळजीने बघत म्हणाले.

जाईने तिचा थंड हात माझ्या गालाला लावला. "होय! पोरगी चरचरीत तापलीय जणू!" ती मोठ्याने हसत म्हणाली.

"आय हेट यू!" मी हसता हसता तिच्या दंडाला चिमटा काढत पुटपुटले.

"काहीतरी घे लवकर.." पप्पा काळजीने म्हणाले.

"हो, घ्यायलाच पायजे!" जाई खोकत खोकत हसली.

"मग, समरबरोबर एवढं रनींग, स्विमिंग वगैरे करतेस ते झेपतंय काय तुला? पाण्यात जाऊन ताप आला असेल." ते पुढे म्हणाले.

"बरोबर बरोबर!" जाई अजून हसून वेडीच झाली.

मी माझी आणि तिची प्लेट टेबलवर ठेवली आणि तिला सोफ्यावर पाडून कुशन मारायला लागले.

"काय चालू आहे तुमचं?" जुईने मध्ये घुसून कुशनचा एक फटका जाईला दिला. "जस्ट मजा करतोय!" जाई ओरडली.

"मी काहीतरी मिस केलं का? काय चाललंय इथे?" समरचा आवाज येताच मी उठून बसले आणि विस्कटलेले केस नीट केले.

"काही नाही, जाई तिचा जाईपणा करतेय!"

"जाईपणा माय फूट! इथे कोणाला तरी ताप आलाय!" तिने उठून तिचं ताट हातात घेतलं.

मी वर बघितलं तेव्हा समर माझ्याकडेच पहात होता. "आर यू ओके?" त्याने फक्त ओठ हलवून विचारलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी बघून माझा श्वास अडकला.

"जिथं तिथं बघते तुला, विसरून माझी मला
जगण्याची झाली मारामारीss "
जाई माझ्या दुसऱ्या बाजूने गायला लागली.

मी त्याला हो म्हणून मान हलवली.
पण मी अजिबात ठीक नव्हते.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle