मागच्या आठवड्यात गुरुवारी दुपारी जेवत असताना अचानक माझ्या whatsapp वर मला एक मेसेज आला "Dakshina .. from ? मी एक क्षण बावचळले पण नोटिफिकेशन बार खाली ओढून वाचलं ते इतकंच होतं. मी जेवत होते त्यामुळे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. पुन्हा काही सेकंदांनी दुसरा मेसेज ... माझं नाव...XXX मी अवाक.. कारण माझ्याकडे तो नंबर एका पुरुषाच्या नावाने सेव्हड होता आणि मला जो मेसेज आला होता तो एका स्त्रीचा होता.. कारण त्यात तिने तिचे नाव लिहिले होते. मग माझ्या डोक्यात नाना प्रकारचे विचार यायला लागले. की ही स्त्री नक्की त्याची बायको असणार आणि हिला काहीतरी संशय वगैरे आला असेल का? पण एका क्षणात मी तो विचार झटकला कारण हा नंबर माझ्या एका डिलिव्हरी मध्ये काम करणाऱ्या कलिगचा होता. मी सर्व चॅट पुन्हा एकदा वाचून पाहिलं त्यात फक्त डील्स अप्रूव्ह करा... अशी विनंती होती आणि मी त्यांचे whatsapp स्टेट्स पाहून व्यक्त केलेले माझे विचार. कधी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस तर कधी साग्रसंगीत साजरा केलेला सण, उत्कृष्ट बांधलेली पूजा.. मुलीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस...इ. आमच्या घरात ते सगळं सण साजरे करणं वगैरे माझी काकू करायची अत्यंत उत्साहाने आणि मी त्यांना म्हटलं होतं की मला तुमच्या बायकोत माझी काकू भासते. त्यांनी मला आवर्जून घरी या असा निरोप दिला होता आणि मी तो आनंदाने स्वीकारला होता... असं सगळं चॅटिंग. त्यामुळे यातून काही कोणाला वावगं वाटणं अशक्यप्राय होतं. मी पाठ थोपटली स्वतःची की आपण चॅटिंग जसं च्या तसं ठेवलं त्याबद्दल. (अगदीच वेळ पडली तर पुरावा म्हणून दाखवायला.)
जागेवर परतून मी मेसेज ला उत्तर दिलं की मी त्यांची कलीग होते अमूक कंपनीत. तेव्हा मला समोरून उत्तर आलं की मी सकाळीच तुम्हाला मेसेज केला होता बोलायचं आहे म्हणून पण तो तुमच्या जुन्या नंबरवर... पण मला तर मेसेज दुपारी जेवताना मिळाला होता ...
माझा नवरा मला नेहमी तुमचे मेसेज दाखवायचा... आणि तुम्ही मला त्याची कलीग म्हणून कायम माहिती होतात.. आणि मला हे हि माहिती आहे की तुम्ही म्हणायचा मी तुमच्या काकूंसारखी दिसते... ही काही वाक्य समोरून आल्यावर माझ्या जीवात जीव आला.
पण मला त्यात काहीतरी खटकलं आणि मी विचारलं.. दाखवायचा, सांगायचा म्हणजे काय? कुठे आहेत ते?
त्यावर उत्तर आलं हा फोन आज माझ्याकडे आहे आणि मी त्याची जुनी चॅटिंग वाचतेय... मी पुन्हा त्या जुन्या संशय मोड मध्ये गेले. मग मी सावध पवित्रा घेऊन म्हटलं ओह अच्छा, सध्या कुठे काम करतात ते? कारण मला बाईंच्या बोलण्याचा नेमका अजेंडाच समजत नव्हता ... पुढे मी म्हटलं की तुमचा मेसेज वाचल्यावर मी पण आधी सगळं चॅटिंग वाचून काढलं होतं... आणि मला तेव्हा लक्षात आलं कि आम्ही कधी काळी कलिग्ज होतो.
त्यावर... तुम्ही १० मे २०२१ ला तुमचा नंबर बदलल्याचा मेसेज त्याला केला होतात.... इतकीच ओळ आली.
पुढे ओळ आली .."ज्याला त्याचा रिप्लाय नाहीये" ... माझ्या पोटात खडडा पडायला लागला.
मग मी मनाचा हिय्या करून विचारलं... नक्क्की काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? त्यावरही कोड्यात उत्तर आलं की "त्याचा फोन आता माझ्या मुलीकडे असतो.." माझ्या मनात निगेटिव्ह विचार येत असून ते जबरदस्तीने मी मागे ढकलून कदाचित आता मुलगी मोठी आहे, तिच्याशी वारंवार संवाद साधता यावा म्हणून दिला असेल... अशी स्वतःची समजूत घातली.
तरीही नेमकं उत्तर येण्याऐवजी.. "मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी सकाळीच तुमच्या नंबरवर मेसेज केला होता.... " मला कळेना.... शेवटी मी धाडस करून विचारलं "माझ्याशी काय बोलायचं होतं? " इतका वेळ जे असं सगळं कोडं पडलं होतं ते समोरून एका क्षणात सोडवलं गेलं..
"तो ११ मे ला गेला..."
खोलीच्या पलीकडे भूत आहे भूत आहे असं आपण फक्त ऐकतो पण दरवाजा उघडून जेव्हा खातरी करून घेतो आणि ते भूत तिथे असतं तेव्हा जे होतं सेम तसंच मला वाटलं. माझ्या मनातल्या त्या भूत विचाराने माझ्या चांगल्या विचारावर मात केली होती.
मला झटझट ती व्यक्ती डोळ्यासमोरच दिसायला लागली. आमची बस एकच होती...येता जाता दिसलो एकमेकांना तर एक छोटं स्मितहास्य, कामासाठी चॅट आणि स्टेटस आवडल्यास काहीतरी प्रतिक्रिया इतकंच नातं होतं आमच्यात. म्हणावी तर साधी ओळख ... मैत्री सुद्धा नाही... ती बातमी ऐकल्यावर माझ्या फुग्याला टाचणी लागली ... आता मी जिच्याशी चॅट करत होते तिला फक्त कधी फोटोत पाहिलं होतं. कधी बोलले सुद्धा नव्हते.... ती इतक्या आवर्जून आपल्याशी चॅट करतेय . मी सगळं सोडून तिला विचारलं, "फोन करू का?" तेव्हा समोरून बोलणं शक्य नसल्याचं समजलं... आमचं चॅटिंग सुरूच होतं...
सगळ्यातून उलगडा झाला की कोविड च्या दुसऱ्या लाटेत... कोणतीही लक्षणं नसताना अचानक हि व्यक्ती आयुष्याशी लढा देऊन कायमची निघून गेली होती... मला खूप मोठा शॉक बसला....
मला खरंतर काही क्षण असं वाटलं होतं की बायकोचं नाव सांगून तीच व्यक्ती माझ्याबरोबर चॅट करतेय कि काय... फक्त हे बघायला की माझ्या ते अजून लक्षात आहेत की नाही.. पण दुर्दैवाने तसं नव्हतं. ज्या दिवशी मी नंबर बदलल्याचा मेसेज केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच ती व्यक्ती हे जग सोडून गेली होती आणि मला त्याची गंधवार्ता सुद्धा नव्हती... जग सोडून जाताना सुद्धा आम्ही कलिग्जच होतो पण आयटी कंपनीत अक्रॉस प्रोजेक्ट्स आणि अक्रॉस डिपार्टमेंट्स सुद्धा लोक एकेमकांबरोबर काम करतात... त्यामुळे असं काही घडल्यास फक्त कधी कधी प्रोजेक्टच्या लोकांनाच समजतं इतरांना ती बातमी मिळेलच याची खातरी नसते.
"मला आश्चर्य वाटत होतं की तुम्ही फोन कसा काय केला नाही"? हे ऐकून माझ्या काळजाला अक्षरश: घरं पडली. मला जिथे ही बातमी समजलीच नाही तिथे एक व्यक्ती जिने मला कधी पाहिलं सुद्धा नव्हतं... फक्त चॅटिंग मधून कधी मधी तिच्या नवऱ्याशी बोलणारी मी.... माझं काय महत्व असू शकतं? तरी इतक्या दुःखात तिला माझी आठवण आली... आणि नवऱ्याच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होऊन गेल्यावर सुद्धा ती आवर्जून माझ्याशी बोलण्याची संधी शोधतेय हे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं.
"how are you doing behind him ?" या माझ्या प्रश्नावर तिने Just missing missing crying fighting n fighting असं काळीज पिळवटून टाकणारं उत्तर दिलं.
याच विचारात मी संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले, गाडीत बसले आणि मला "आपण आता फोन वर बोलू शकतो असा मेसेज आला...
ज्या व्यक्तीला मी कधी पाहिलं नाही, कधी बोलले नाही... तीच व्यक्ती आता माझ्याशी न थांबता... अगदी जुनी मैत्रीण कित्येक वर्षांनी भेटावी आणि तिला आपल्या आयुष्यात गेलेल्या काही वर्षात काय काय घडलं हे सांगण्याची उत्सुकता असते तशी घडाघडा.... बोलत होती... मी ऐकत होते.
" तो गेल्यावर त्याची त्याच्या सगळ्या मित्र मंडळींशी त्याने केलेली चॅट्स मी वाचत बसते त्यातून मला त्याच्या अस्तित्वाचा भास होतो... आणि तुम्हा दोघांचं चॅट इतकं सुंदर आहे की मी ते अगणित वेळेला वाचलं आहे.. अजूनही कधी कधी वाचते त्यामुळे नकळत तुम्ही माझी पण मैत्रीण आहात असंच मला वाटायचं. हे ऐकून... माझ्या मनात आलं... आपण सहज जाता जाता कोणाला लाईक देतो, बदाम देतो... स्टेट्स आवडल्याचं सांगतो... ते कोणासाठी तरी इतकं महत्वाचं ठरावं ? किंवा महत्वाचं असू शकतं? हे माझ्या विचार शक्तीच्या पलीकडे होतं.
अखंड पाऊण ते एक तास ती फक्त आणि फक्त त्याच्याबद्दलच बोलत होती. ती दुसऱ्या स्टेट मधली असून लव्ह मॅरेज साठी तिने स्वतःला कसं बदललं... किती गोष्टी आत्मसात केल्या.... ते सगळं ऐकताना मला आशा काळेच्या एका गाण्याची ती एक ओळच आठवत राहिली.."अपर्णा तप करते काननी.."
जेव्हा मी तिला बोलून दाखवलं कि कलीग च्या बायकोचा उगीचच मेसेज वगैरे आल्यावर आपल्या मनात पटकन काय विचार येतो तेव्हा तिने मला सांगितलं "माझा नवरा आणि मी मित्रच होतो आमच्यात प्रचंड पारदर्शकता होती..."
त्याच्या जाण्यानंतर तिच्या आयुष्यात झालेले बदल, निर्माण झालेली पोकळी.... त्याचं आजारपण.... आणि कोणतीही कल्पना नसताना झालेला त्याचा मृत्यू.... नन्तर लगेच काही महिन्यात झालेला आईचा मृत्यू आणि वडिलांचं डिप्रेशनमध्ये जाणं ह्याच्याशी लौकिकार्थाने जरी चार हात केले असले तरीही... आज २ वर्ष उलटून गेल्यानन्तर सुद्धा माझ्याशी बोलताना तिचा त्याच्याबरोबरचा बॉण्ड... मला जाणवत होता.... ती त्याच्या आकंठ प्रेमात होती... आणि ती त्याला किती मिस करते हे जाणवत होतं. जगातले कोणतेच शब्द वापरून मला तिचं त्याच्याबद्दल जाणवलेलं प्रेम इथे शब्दात मांडता यायचं नाही. त्याच्या इच्छेखातर केलेली पी एच डी... तो गेल्यावर तिने नेटाने पूर्ण केली.... मी तिला मनोमन सलाम केला....
तो गेला तेव्हा मुलगी आतापेक्षा ३ वर्षांनी लहान होती.... आणि वडिलांशी असलेला तिचा बॉण्ड हा अजूनच निराळा होता... मुलीला मी शेवटचं दर्शन घेऊ दिलं नाही कारण त्याची स्वतःची इच्छा नव्हती की तिने त्याला असं बघावं. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यावर सुद्धा तो तिच्याशी व्हिडीओ वर बोलला नाही... थेट घरी आल्यावर बोलतो... असं म्हटला होता... हे सांगताना ती फोनवर पलीकडे नक्कीच खूप रडली असणार... कारण मला तिचा आवाज कापरा झालेला.. स्पष्ट कळत होता...
एक मोठा कळीचा प्रश्न माझ्या मनात आला आणि तो मी पटकन विचारून टाकला.... "तुमचे सासरे वगैरे तुम्ही एकत्र कुटुंबात रहात होतात ना? त्यावर तिने मला जे सांगितलं ते ऐकून मला जे वाटलं ते मी... शब्दात व्यक्त करूच शकत नाही... सासरे आणि थोरले (अविवाहित) दिर हे वेगळे रहात होते आणि हे तिघे वेगळीकडे. माझे कलीग गेल्यावर... सासरे आणि दिर तिच्या जवळच राहायला आले... आणि तिच्या सासऱ्यांनी एक अनोखा निर्णय घेतला... आणि हिला विनंती केली की दोन मुलांपैकी एक गेला... एकुलती एक नात आम्हाला आमच्याच घरात हवी... तु ही आम्हाला मुलीसारखीच आहेस... त्यामुळे तू हि याच घरात राहावीस अशी माझी इच्छा आहे... यास्तव तू माझ्या थोरल्या मुलाशी लग्न कर... सगळं साध्य होईल... थोरल्या मुलाचा संसार होईल, तुला नवीन आयुष्य लाभेल, मुलीला वडील मिळतील.... आणि वडील म्हणजे खुद्द स्वतःचा लहानपणापासून घट्ट बॉण्ड असलेला काकाच.. याने तिला जुळवून घ्यायला कठीण जाणार नाही.
पण हिचे मन या गोष्टीला तयार होत नव्हते.... शेवटी मुलीने पुढाकार घेऊन... आईला तयार केलं आणि सांगितलं की तू काकांशी लग्न करणार असशील तर मला चालेल.... आणि सहा महिन्यापूर्वी... हा निर्णय.. पूर्णत्वाला पोहोचला... आपण म्हणतो गेलेली व्यक्ती जिथे कुठे असेल तिथून बघत असेल तर त्या व्यक्तीला पण हा निर्णय अगदी नक्कीच पटला असेल... याची मला खातरी आहे. आणि असा निर्णय घेणाऱ्या सासऱ्यांना तर अजून कडक सलाम.
लहानपणी आपण आटपाट नगरातल्या खूप गोष्टी वाचल्यात.... त्याचा शेवट कायम... अशी हि साठा उत्तरांची पाचा उत्तरी कथा सुफळ संपूर्ण... असा असे... तो कायम मला एक लेखन प्रपंच वाटे...
पण असा शेवट असलेल्या घटनेची मी साक्षीदार झाल्यावर मात्र मला 'कथा नक्कीच सुफळ सम्पूर्ण झाली... याचं खूप समाधान वाटलं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ताजा कलम - यात नमूद केलेलं अक्षर अन अक्षर खरं आहे.