10th November 2023
मी हल्ली सकाळी फिरून आलो की अजिबात पोर्चमध्ये थांबायला तयार नसतो. दरवाजा जोरजोरात वाजवून उघडायला लावतो. मग पळत जाऊन बेडवर शेपटीत नाक घुसवून बसतो. प्राची म्हणत होती की जिंजरने विंटर डिक्लेअर केला आहे. आता जिंजरची औषधं आणून ठेवली पाहिजेत. तिच्या मते मी शंतनुसारखाच नाजूक तब्येतीचा आहे. लवंगाने उष्णता आणि वेलदोड्याने थंडी... असं काही तरी म्हणत होती.
काल फिरून आल्यावर मला खूप खोकला आला. शेकोटीच्या धुरामुळे तसे झाले असावे असे प्राची म्हणाली. 'दिल्लीचा असूनही असा कसा काय रे तू' म्हणाली.
मला एरवी खोकला झाला की ती मला मध पाणी देते.
मला मध पाणी आवडतं म्हणून मी मुद्दाम कधी कधी खोटा खोटा खोकतो. पण ती बरोब्बर ओळखते. 'खोकला येईपर्यंत भुंकतोसच कशाला?' असं म्हणते आणि मध घालत नाही पाण्यात.
आता थंडी सुरू म्हणजे ताकपण मिळणार नाही दुपारी. जेवण दिल्या दिल्या पटकन् खाऊन घ्यावे लागेल, नाही तर पोळी कडक होते.
थोडी थंडी वाढली की फिरायला जाताना मला कपडे घालून जावे लागेल. दोन वर्षांपूर्वी आणलेला ड्रेस आता होतोय का बघायला हवा. तो घातला की मी चिअरलीडर दिसतो असं प्राची म्हणते.
माझे पांघरूण पण मी पूर्ण फाडले आहे त्यामुळे नवे आणावे लागणार आहे.
थंडी वाढली की शंतनु रुममध्ये हिटर लावायला सुरुवात करेल. मला त्या लाल लाल रॉडस्ची भीती वाटते. मग सुरुवातीला मी त्या हिटरकडे बघून लांबूनच खूप भुंकतो. पण जरा जवळ गेलं की छान गरम गरम वाटतं. तो हिटर मला आवडतो की नाही हे मी अजून ठरवलं नाहीये. पण मला हिवाळा आवडतो.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle