A page from a diary of Ginger Kulkarni - 21st March 2023

21st March 2023
या प्राचीच्या कानांचं काही तरी करायला हवं. माझ्या सोबत राहून राहून एकदम तिखट झाले आहेत तिचे कान. एरवी गच्चीवर गेल्यावर मी उंच उडणाऱ्या विमानावर उड्या मारत मारत भुंकतो, तेव्हा आकाशाकडे बघत म्हणते,"तुला कसं कळतं रे विमान उडत असलेलं? एवढासा ठिपका दिसतोय अगदी लक्ष देऊन बघितलं तर. आवाज पण ऐकायला येत नाहीये मला. तुला कसं कळतं?"
पण तिचेही कान तिखट आहेत. मी घरात कुठेही बसून पाय चाटायला सुरुवात केली की पाचव्या सेकंदाला ती समोर उभी असते. कमरेवर हात ठेवून म्हणते," तुला काय वाटलं, इकडे येऊन पाय चाटलास तर मला कळणार नाही? ऐकायला येतंय मला. पाय चाटायचा नाही. जखम होईल मग. तू औषधपण लावून घेत नाहीस. गोळ्या घेत नाहीस. डॉ कडे नेलं की दंगा घालतोस तिकडे. अजिबात कोऑपरेट करत नाहीस. जर का यावेळी जखम झाली तर मी गळ्यातला पट्टा काढून जंगलात सोडून येईन तुला."
ही जंगलात सोडून यायची धमकी मी गेले साडेसहा वर्षे ऐकत आहे. याआधीच्या घराच्या जवळच जंगल होतं तरीही तिने मला कधी सोडले नाही जंगलात. इकडे तर जंगलपण नाही आहे... तरीही ती धमकी देते आणि मी पाय चाटायचा थांबून तिच्या कडे बघत राहतो. पण जोवर मी हवेतला पाय खाली ठेवून मान टेकून झोपत नाही, ती समोरून हलत नाही. बघत राहते माझ्या कडे. मग मी मुकाट गरीब तोंड करून पडून राहतो.
संध्याकाळी शंतनु आला की जेवण झाल्यावर मला बोलावतो, मग ट्रिटस् देतो, कॅल्शियम बोन देतो आणि हळूच पायावर स्प्रे मारतो. त्याला वाटतं मला कळत नाही. मला जरासं झोंबतं पण मी तक्रार करत नाही. पुढचा अर्धा तास प्राची माझ्या वर लक्ष ठेवून असते. "औषध चाटू नकोस. नाही तर पाय बरा कसा होणार?" असं म्हणत पाठीवरून हात फिरवत राहते.
त्यांना त्रास होतो म्हणून मला वाईट वाटतं. आता परत पाय चाटायचा नाही असं मी ठरवतो. पण तसं होत नाही. मी परत रात्री पाय चाटतोच. आवाज ऐकून प्राची उठते, दिवा लावते. वैतागून रागाने 'नो नो नो' म्हणते. मी तिचं ऐकून थांबतो आणि परत झोपून टाकतो. ती कधी झोपते काय की. तिला एकदा जाग आली की परत झोप लागत नाही. ती चिडचिडते. शंतनुला ' तुझं कुत्रं छळतंय मला ' म्हणते...
But I know She loves me...

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle