(२००८ मध्ये ब्लॉगवर खरडलेले.. )
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!!
सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते..
वास म्हटलं की मला आठवते ते माझं पर्फ्युम्सचं कलेक्शन.. सगळ्यात पहील्यांदा माझं असं पर्फ्युम मला मिळालं १०वी च्या रिझल्ट नंतर.. आत्याने अमेरीकेमधून आणलेलं.. ते मी ११-१२वी मधे वापरलं.. आणि जेव्हा संपत आलं तेव्हा ती बाटली बाजूला ठेऊन दिली.. तेव्हापासून मला हा छंद लागला.. आवडतं सेंट पूर्ण संपवायचे नाही..
अजुनही ती बाटली उघडली की माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ समोर येऊन ठाकतो! ११-१२वी ! शाळा संपवून नुकतीच कॉलेज नावाच्या विश्वात पाऊल टाकलेलं.. फारसा अभ्यास करायची पद्धतच नाही.. त्यामुळे बारावीला देखील डोक्याला चिंता नव्हत्या! इझिली , लकीली मार्क्स पडत होते.. खूप नाही, पण वाईटही नाहीत.. त्यामुळे मी ते दिवस सगळ्यात एन्जॉय केले.. तिथेच मला माझे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी भेटले.. २-२ वेगळ्या शाळा केल्यामुळे मला पूर्वी अशा जवळच्या मैत्रिणी वगैरे फार नव्हत्याच! पण ज्यु. कॉलेजमधे आमचा ६ जणींचा जो ग्रुप जमलाय.. तो १-२ सोडल्यास सगळा कॉन्टॅक्ट मधे आहे.. आणि सगळ्यात जवळचा आहे!
ती दुसरी बाटली उघडली, की फर्ग्युसन मधले ते दोन महीने आठवतात! तेच माझे शेवटचे काहीही चिंता नसलेले,सुंदर दिवस !! नंतर इंजिनिअरींगला आधीची अभ्यासाची मेथड फॉलो करणं चुकीचे होते.. त्यामुळे टेन्शन्स आली, अभ्यासाचा बोजा वाढला.. त्यामुळे ते दिवस खरेच सोनेरी!!
परवा असच मॉल मधे फिरताना Freesiaची बाटली दिसली!! आणि परत भुतकाळात गेले.. आई तेव्हा अमेरीकेमधे गेली होती.. २ महीन्यांनी जेव्हा ती घरी आली.. तेव्हा माझी खरेदी स्पेशल एका बॅगेमधे ठेवली होती! बॅगभरून कपडे ... वॉव !! पण खरी मजा पुढे.. ती बॅग उघडली आणि पूर्ण खोलीभर freesia चा मंद,सुंदर सुवास पसरला!! प्रवासात ती बाटलीचे झाकण निघून निम्मं पर्फ्युम रिकामं झालं होतं!! पण पुढे किती तरी दिवस माझ्या त्या कपड्यांना तो मंद वास येत राहीला.. वेडावणारा वास खरंच !!
हे झाले पर्फ्युमचे, कृत्रिम वास! असेच किती तरी सुवास आहेत.. जाईच्या कळ्या, फुलं दिसली की मला आमच्या पूर्ण बाल्कनीला वेढून टाकलेला जाईचा वेल आठवतो.. मोगरा दिसला की, उन्हाळा, गार पाण्याचा माठ आणि आत मोगर्याचे फुल , आणि त्या पाण्याला येणारा मोगर्याचा वास हेच आठवते.. (उन्हाळा म्हटलं की आंबे,बाबांच्या हातचा रोजचा मॅंगो मिल्कशेक,सुट्ट्या, पोहोणं, मृत्युंजय,स्वामी वगैरेंची पारायणे करणे, कॅरम,व्हीडीओ गेम्स,३०४,चॅलेंज,बदाम सात असं काहीबाही पण आठवत राहतंच... )
कुठल्याही उदबत्तीचा,धूपाचा वास आला की संध्याकाळी चालणारी आई,आज्जीची पूजा आठवते.. आज्जीची भजनं,आरत्या,आईचे सुस्पष्ट आवाजातले ओम यद्नेन.. आठवायला लागते.. मंत्रपुष्पांजली आली की कॉलनीचा गणेशोत्सव ओघाने येणारच.. ज्यावर मी मागच्या वर्षी लिहीलेच आहे.. परत लिहीत नाही बसत..
कॉफी मी इतक्या वेळेला घेते.. पण मला अजुनही कॉफीचा वास आला, की पीएल्सच्या वेळेसची रात्रीची जागरणं आठवतात.. चहा म्हटलं की दोन गोष्टी समोर येतात! एक म्हणजे कॉलेज कँटीनचा चहा, मस्त वेलदोडे घातलेला, भरपूर दुधाचा दाट उकळलेला वाफाळता चहा! ज्याने मला पक्की चहाबाज केले.. मी इंजिनिअरींग पर्यंत चहा पीत नव्हते.. पण त्या चहाने समीकरणे बदलली सगळी.. ! चहाची दुसरी गोष्ट ही, की पावसाळ्यातली शनिवार दुपार आठवते.. शनीवारी आई घरी.. आणि बेदम पाऊस पडत असेल, तर आईच म्हणणार, चल चहा घेऊ गरम! बाबा यायच्या वेळेला मस्त गरम भजी!! वाह.. काय मस्त वाटायचं आमच्या कॉलनीच्या रस्त्याकडे ,मुसळधार पावसाकडे, त्यात भिजणारी कॉलनीमधली हिरवीगार वृक्षराजी पाहात चहा प्यायचा! कधी कधी आम्ही दोघी मुद्दम भिजायला बाहेर पडायचो!! धम्माल होती राव इंडीयात !!
बकुळीची फुलं दिसली की मला सातवी आठवते माझी ! बाबा सोलापूरला होते तेव्हा काही काळ.. तिथल्या गेस्टहाऊसच्या लॉन वर, सलग २ ते ३ दिवसात बकुळीच्या झाडाखाली बसून श्रीमान योगी वाचले होते तेव्हा मी.. भान हरपून वाचणारी मी, वरून बकुळफुलं पडतायत, आणि माझं सगळं जग शिवाजीमहाराजांमधे गुंतलेले.. ! तेव्हापासून झपाटून मोठी मोठी पुस्तके १-२ दिवसात देखील वाचू लागले..
huh.. फार फार आठवणी आहेत.. सगळ्या लिहून ठेवता येणार नाहीतच.. पण थोड्याफार आठवल्या त्या लिहील्या.. तुमच्या आहेत अशा काही आठवणी??