जुन २०२० ला मी आंबोलीला सहकुटूंब राहायला आले तरी प्रत्यक्ष शेती सुरू करायला डिसेंबर २०२० उजाडले. मला शेतीचे ज्ञान शुन्य! शेतीत रस निर्माण होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची ओळख झाल्यावर काही शेतांना भेट दिली होती. शेतीनिगडीत वाचन सुरू होते. पाळेकर गुरूजींची तिन, दोन दिवसीय शिबीरे करुन झाली होती, त्यांच्यासोबत एक शिवारफेरी झाली होती. त्यांचे व इतरांचे शेतीविषयक यु ट्युब चॅनेल्स पाहात होते. तरीही गच्चीत केलेल्या कुंडीतल्या शेतीचा अनुभव सोडता प्रत्यक्ष अनुभव मात्र शुन्य होता. अनुभव मिळणार तरी कसा? हाती जमिन नाही तर शेती करणार कशी?? त्यामुळे जेव्हा जमिन हाती लागली तेव्हा आता शेंडी तुटो वा पारंबी, शेती करायचीच हे ठरवुन शेतीत ऊतरले.
पर्यावरणाला हानीकारक कृत्रिम रसायने न वापरता नैसर्गिकरित्याच शेती करायची हे डोक्यात पक्के होते, पण प्रॅक्टिकल्स शुन्य! शेती करण्यामध्ये वातावरण हा एक खुप मोठा भाग आहे. तोवर जी शेती मी पाहिलेली तिथले वातावरण शेती साठी योग्य होते. पण आंबोलीतली परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टी हा आंबोलीत मोठा त्रास आहे. पावसाळ्याचे चार-पाच महिने सुर्यदर्शन होत नाही हे लहानपणापासुन ऐकले होते. जुन २०२० पासुन आंबोलीत राहायला लागल्यानंतर ते खरेच आहे याचा प्रत्यय घेतला होता. या वातावरणात शेती कशी करतात याचे कुठलेही मार्गदर्शन कुठल्याही यु ट्युब चॅनेलवर नव्हते.
आंबोलीत शेती म्हणजे पावसाळ्यात नाचणी व भात. ऊन्हाळ्यात वायंगणी भातशेती व ऊस. ज्यांच्याकडे घराच्या आजुबाजुला १-२ गुंठे जागा आहे ते पाऊस गेल्यावर म्हणजे नोव्हेंबरानंतर लाल भाजी, मका, घरापुरते कांदे, सांडगी मिरची करण्यापुरत्या मिरच्या इत्यादी करतात. बाजारात जाऊन भाजी विकण्याइतपत भाजी कोणी करत नाही.
बारा वाड्यांचे आंबोली तसे मोठे गाव आहे, १० ते १५ किमी रुंद व १०-१२ किमी लांब. कर्नाटकातल्या घटप्रभा नदीची उपनदी हिरण्यकेशी नदी आंबोलीत उगम पावते आणि आजरा-चंदगड मार्गे कर्नाटकात पोचते. ह्या नदीला बारा महिने पाणी आहे, आटत नाही. पावसाळ्यात नदीत पाणी खुप वाढते आणि ऊगमापासुन चार पाच किमी खालपर्यंत तिच्या नेहमीच्या मार्गाच्या दोन्ही बाजुने फुटून ती वाहते. ह्या जागी लोकांच्या शेतजमिनी आहेत ज्या पावसाळ्यात पाण्याखाली जातात. नोव्हेंबरांत पाणी ओसरायला लागते तसे लोक आपापल्या जमिनीच्या चारी बाजुला फुटभर ऊंच बांध (मेर) घालुन पाणी शेतात धरुन ठेवतात व डिसेंबरात तिथे भात लागवड करतात. ह्याला वायंगणे म्हणतात व त्यात करतात ती वायंगणशेती.
सावंतवाडीहुन घाट चढुन वर आल्यावर पहिली लागते ती बाजारवाडी. पुढे जकातवाडी, गावठाणवाडी, कामतवाडी वगैरे १२ वाड्या येतात. कामतवाडीपर्यंत सह्याद्री घाटमाथ्याचा अतीवृष्टीचा प्रदेश विस्तारलेला आहे. इथे पावसाळ्यात कायम दाट धुके असते, पावसाची संततधार सुरू असते, हवेत प्रचंड आर्द्रता असते. अर्थात माझ्या बालपणी जितका होता तितका पाऊस आता उरलेला नाहीय पण आंबोलीतील इतर वाड्यांच्या तुलनेत ह्या तिनचार वाड्यांवर खुप पाऊस पडतो, हवा कायम कुंद असते. इथे पावसाळ्यात फक्त स्थानिक झाडे झुडपे कशीबशी तग धरतात; विकतची शोभेची रोपे, गुलाबाची कलमे, झाडे इत्यादी सगळे कुजुन जाते. स्वानुभव आहे.
या वातावरणात कोणी शेती करत नाहीत. इथे मैलोनमैल एकर शेती कोणाचीही नाही. १०-१५ गुंठ्यांचे तुकडे असतात, दहा जागी विखुरलेले. या तुकड्यांना इथे वाफल्या म्हणतात. या वाफल्यांवर फक्त भातशेती होते - पावसाळी किंवा वायंगणी. बाकी काही करता येत नाही कारण पावसाळा सोडून इतर वेळी पाणी नसते. वर लिहिलेय तसे शेतात पाणी धरुन ठेवले तर त्यात फक्त भातशेती करता येते, भाज्या करता येत नाहीत.
गावठाणवाडी वगैरे ऊगमापासुन जवळ असल्याने पावसाळ्यात भातशेती होत नाही. कामतवाडीपर्यंत लोक फक्त वायंगणशेती करतात. पावसामुळे ऊस व पावसाळी भात करत नाहीत.
कामतवाडीच्या पुढे वातावरण जरा बरे आहे. त्यामुळे तिथुन पार गडदुवाडीपर्यंत भात व नाचणी व्यतिरिक्त नदीच्या दोन्ही तिरी ऊस करतात. ऊसशेती हे तुलनेत सोपे काम आहे असे लोक म्हणतात. ऊस लावायचा, एक दोनदा भरपुर रासायनिक खत द्यायचे, भरती करायची म्हणजे ऊसाच्या बाळरोपाला दोन्ही बाजुने माती चढवायची. ऊस मनाजोगा वाढत नसेल तर टॅानिक द्यायचे, एक दोनदा तणनाशक फवारायचे आणि निंदणी करुन तणाचा सफाचाट करायचा. दोनचारदा गवे येऊन ऊस चरुन जातात पण तरी तो बिचारा वाढतो. गव्यांना हाकलायला रात्रीचे भर थंडीत शेतात जागत बसावे लागते. डिसेंबरात ऊस लावला की मे पर्यंत हे काम अधुनमधुन करायचे. पाऊस सुरू झाला की मग काहीही बघायची गरज नाही. सगळी ऊसशेती नदीकिनारी असल्याने पावसाळ्यात कित्येकदा शेतात पाणी भरते पण ऊस उभा राहतो. डिसेंबरांत ऊस तोडणीच्या वेळी शेतात परतायचे. ऊस तोडुन कारखान्यात पाठवला की महिनाभरात पैसे खात्यात येतात. म्हणजे शेतमाल कुठे विकावा, किंमत काय मिळणार ह्याचेही टेंशन नाही. त्यामुळे आंबोलीत प्रत्येकजण ऊस लावायला ऊत्सुक असतो.
मी शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा काय पिक घेऊ हा प्रश्न ऊभा राहिला. करायचे भरपुर काही होते पण शेतात काय होणार हे माहित नव्हते. त्यात सल्ले देणाऱ्यांनी वात आणला. आंबोलीत सर्व काही होते यावर सगळेजण ठाम होते पण प्रत्यक्ष केल्याचा अनुभव सांगणारे कोणीही नव्हते.
मी ठरवलेल्या नैसर्गिक शेतीचे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे चार स्तंभ आहेत. बीजामृताचा संस्कार करुन बीज लावायचे, जमीन आच्छादित ठेवायची आणि जीवामृत देत राहायचे. आच्छादन कुजत राहते, त्याचा ह्युमस बनत राहतो त्यामुळे वाफसा टिकुन राहतो. सर्व प्रकारच्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे हेच तंत्र आहे. फरक तुम्ही जीवामृत वापरता, गोकृपा वापरता, गांडुळखत वापरता की अजुन काही अठरापगड जातीची सैंद्रिय खते वापरता यातच. बाकी आच्छादन हवेच, ह्युमस वाढायला हवाच व वाफसा टिकवायला हवाच. अर्थात हे किती सोपे किंवा अवघड आहे हे कळायला शेतकर्याच्या वंशालाच जावे लागते.
माझे शेत साधारण चार एकराचे असले तरी एका बाजुची दिडेक एकर जमिन म्हणजे निव्वळ खडक. याला इकडे तळाप म्हणतात. कधीकाळी तिथे खोल खड्डा मारुन त्यातुन चिरे काढले होते. तो खड्डा तसाच सोडलाय जो आता विहीर म्हणुन मी फेब्रुवारी पर्यंत वापरते. असेच अजुन अर्धवट मारलेले चारपाच खड्डे शेतात होते. खड्ड्यातुन बाहेर काढलेली दगड माती तशीच कडेवर मोठे ढिग बनुन पडलेली होती. त्याच्या आजुबाजूस झाडेझुडपे वाढलेली. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र अजूनच आकुंचले होते. शेती करणार हा २०१९ मध्ये निर्णय झाल्यावर जेसीबी घालुन सगळी माती मी खड्ड्यांत परत लोटली, सोबत झुडपांनाही लोटले. तेवढीच थोडी जमिन मोकळी झाली. असे करुन साधारण तिनेक एकर जमिन मी लागवडीसाठी तयार केली.
इतक्या क्षेत्रावर आच्छादन घालायचे म्हणजे टनावारी पालापाचोळा लागेल. तो आणायचा कुठून ?? ऊस पाणी भरपुर पितो आणि जमिनीचा कस कमी करतो असे भरपुर वाचले असल्यामुळे ऊस लावायचा नाही असे मी ठरवले होते. मी घातलेल्या लोखंडी कुंपणावर व तिथल्या मांगरावर सहा-सात लाख खर्च झाले होते. जंगली प्राणी वावरण्याचे प्रमाण आंबोलीत भरपुर आहे त्यामुळे कुंपण गरजेचे. तर हा खर्च भरुन काढण्यासाठी ऊस लावायचा आणि पैसे वसुल करायचे हा सल्ला प्रत्येकजण देत होता. माझ्या शेताला भक्कम कु़ंपण असल्यामुळे प्राण्यांचा त्रास न होता ऊसशेती सहज करता येईल असे लोकमत होते. पण मला ऊसशेतीत रस नव्हता.
माझ्यासाठी व माझ्या सगळ्या कुटूंबियांसाठी लागेल इतका तांदुळ, गहु, भाज्या, कडधान्ये कुठलीही हानीकारक खते, किटकनाशके, तणनाशके न वापरता पिकवायची हे माझ्या डोक्यात होते. मला नैसर्गिक शेती करायची होती आणि ती आंबोलीत अजिबात होणार नाही असे लोकांचे मत होते. आणि हे फारसे खोटे नव्हते. आज रसायनांचा अपरिमित वापर आंबोलीत होतोय, युरिया टाकला नाही तर साधी लाल भाजीही ऊगवुन येत नाही ही स्थिती आहे. गावात कॅंसर पेशंटची संख्या लक्षणीय आहे. पण रासायनीक निविष्ठा वापरल्यामुळे होणार्या दुष्परिणामांकडे लोकांनी डोळेझाक केलेली आहे. भरपुर खते देऊन ऊस करायचा आणि पैसे कमवायचे हेच ध्येय आहे. खतांमुळे व एकसुरी पिकांमुळे जमिनीवर होणारे परिणाम, तणनाशकांमुळे पाण्याचे होणारे प्रदुषण इत्यादी बाबी त्यांच्या गावीही नाहीत.
अर्थात याला कारणेही तशीच आहेत.
ईथे गंमत अशी आहे की ईथल्या बहुतांश शेतजमिनमालकांना शेतीत रस नाही आणि जे शेती करतात ते त्या शेतीचे जमिनमालक नाहीत. नोकरी मिळण्याची शैक्षणिक पात्रता नसलेला मोठा तरुण वर्ग इथे आहे जो शेतीकडे पैसे कमावण्यासाठीचा एक जोडधंदा म्हणुन पाहतो. जगण्यासाठी अनेक खटपटी इथले लोक करतात, त्यात ऊसशेती अग्रभागी येते कारण ऊसाचे एकरकमी पैसे हातात येतात. जमिन भाड्याने म्हणजे खंडाने घेऊन ऊस लावायचा. ऊस पाच वर्षे टिकतो, जमिनही पाच वर्षांसाठी मिळते. मग या पाच वर्षात पैसे कमवायचे की प्रयोग करायचे? त्यामुळे न करताच आंबोलीत नैसर्गिक किंवा युरीयामुक्त शेती होणार नाही हा ठप्पा मारला गेलेला आहे. स्वतः शेती करणारे जमिनमालक हाताच्या बोटावर मोजले जातील इतकेच आणि त्यात प्रयोगशील कुणीच नाही. प्रयोग करायला जावे तर निसर्गाची साथ नाही. पावसाळा जवळजवळ सहा महिने रेंगाळतो. इतर प्रदेशाच्या तुलनेत आंबोलीत पिकवाढीचा वेग कमी आहे, ज्या पिकाला गवश्यात किंवा आजर्यात तिन महिने लागतात त्याला आंबोलीत सहज साडेचार महिने तरी लागतात. त्यामुळे मार्केटसाठी झटपट भाजीपाला शेतीही फारशी करता येत नाही.
सर्व साधक बाधक विचार करुन मी शेवटी ऊस लावायचा बेत पक्का केला. माझ्यासाठी यामुळे दोन गोष्टी होणार होत्या. एक म्हणजे ऊसाच्या पाल्याचे आच्छादन मिळणार होते व वर्ष अखेरीस थोडे पैसेही मिळाले असते. पुर्ण तिन एकर भाजी वगैरे लावली तर ती विकण्याचा प्रश्न ऊभा राहिला असता. तीन एकरभर भाजी लावायचे ज्ञान व अनुभव तेव्हा नव्हता आणि आजही तितकासा नाही.
ऊसाव्यतिरीक्त अजुन काहीतरी करायची खुमखुमी होती त्यासाठी अर्धा एकर जमिन ठेवायची व ऊरलेल्या अडिज एकरात ऊस लावायचा असे ठरवले. नेहमीसारखा यालाही थोडा विरोध झाला. पण मी दुर्लक्ष केले. पाळेकर गुरूजी एक किस्सा सर्व शिबिरात सांगतात. त्यांना भेटणारे काही शेतकरी त्यांचा किती एकर ऊस आहे हे अभिमानाने सांगतात. घरचे तांदुळ, डाळ, ज्वारी, शेंगदाणा कुठुन आणता विचारले तर बाजारातुन आणतो हे ऊत्तर मिळते. गुरूजी म्हणतात काय हे कर्मदारिद्र्य!! जो आपण खात नाही तो ऊस लावायचा आणि जे आपण खातो ते पैसे देऊन विकत आणायचे, तेही विषयुक्त. मला अर्थात हे करायचे नव्हते. आपल्याला लागणारे धान्य जमेल तितके आपण पिकवायचे हे मी ठरवले होते. त्यासाठी सद्ध्या अर्धा एकर जमिन पुरेशी होती.
क्रमशः
( चार वर्षांचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न आहे, थोडे लिहिलेय, बरेचसे लिहायचे आहे, त्यामुळे पुढचा भाग काढण्यास वेळ लागु शकतो.)