शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.
उसरोपाच्या दोन ओळीतले अंतर सरीमुळे फिक्स होते पण दोन रोपांत मला २ फुट अंतर हवे होते. गावच्या बायकांना रोपे जवळजवळ लावायची सवय. त्यांना सांगुनही अंतर ठेवणे जमेना. शेवटी दोन फुटांच्या काठ्या करुन दिल्या आणि काठी जमीनीवर ठेऊनच रोप लावा ही तंबी दिली. तेव्हा कुठे रोपलावणी मला हवी तशी सुरू झाली.
एवढ्या मोठ्या शेतावर मी कुठे व किती लक्ष देणार? त्यात मलाही फारशी माहिती नाही. आमची लावणी बघायला एक शेजारी आले. ते म्हणाले , हे काय? सर्यांच्या सुरवातीला का नाही रोप लावत? एका रोपाची जागा फुकट घालवताय तुम्ही..... आम्ही मग तसे केले. परिणाम हा झाला की नंतर पाणी लावताना ह्या बिचार्या टोकाच्या रोपाला जोरात पाणी मिळून त्याची माती वाहुन जायची, मुळे उघडी पडायची..
सर्या पाडणार्याने पुर्व पश्चिम सर्या पाडल्या होत्या आणि उत्तर -दक्षिणेला एक लांबचलांब पाट ठेवला होता. बायकांनी या पाटातही रोपे लावली. नंतर भरती करायला त्याच ट्रॅक्टरवाल्याला बोलावले. तो पाटातली रोपे बघुन म्हणाला, हे काय? ह्याच्यात का रोपे लावली? मी ही जागा मुद्दाम खाली ठेवली होती, भरती करताना ट्रॅक्टर फिरवायला जागा राहावी म्हणुन... मी गप्प.
रासायनिक शेती करणारे लोक रोपे लावल्यावर लगेच एक आळवणी घेतात. म्हणजे रोप मरु नये, वाढु लागावे म्हणुन एक टॉनिक + खत असे काहीतरी केमिकल पाण्यात मिसळून एकेक पेला प्रत्येक रोपाच्या बाजुला गोल टाकायचे. माझ्या जमिनीत तेव्हा काहीही खत नव्हते, त्यामुळे मला जरी रासायनिक शेती करायची नव्हती तरी आळवणी केली. रोपे मरुन गेली तर काय करणार? त्यानंतर एका महिन्याने रासायनिक खतांचा एक डोस दिला. आजवर मी वापरलेली रासायनिक खते एवढीच. यानंतर मी कुठलेही रासायनिक खत वापरले नाही.
खत म्हणुन मी जीवामृत देणे सुरू केले. साधारण दर दहा पंधरा दिवसांनी मी उसाला पाणी देत होते. पाण्याचा उपसा जिथे होता तिथे मी जीवामृताचा बॅरेल ठेऊन पाईपने पाण्याबरोबर जीवामृत सोडून देत होते. साधारण एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. म्हणजे मला २ बॅरेल जिवामृत पुरायला हवे होते. पुर्ण शेतात पुर्व पश्चिम सर्या पाडल्यावर त्यावर पाणी देण्यासाठी उत्तर दक्षिण पाट काढले होते. हे पाट शेताचे आयताकृती भाग करतात. या प्रत्येक भागालाही सरी असे म्हणतात. म्हणजे पश्चिमेच्या कोपर्यातुन सुरवात करुन सरी १, सरी २ अशी नावे आम्ही ठेवली होती. अशी नावे ठेवणे आवश्यक असते कारण गड्याला काम सांगताना अमुक सरीत अमुक करायचे आहे असे सांगणे सोपे जाते. माझ्या शेतात अशा ११ सर्या होत्या.
माझ्या गड्याचा काम करण्याचा स्पिड अगदीच कमी असल्यामुळे त्याची एका दिवसात साधारण १ सरी पाणी देऊन व्हायचे आणि त्या दिवसभरात एक बॅरेल जीवामृत संपायचे. मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सर्यांत जीवामृत द्यायचा प्रयत्न करायचे. पण पुर्ण शेताला जीवामृत मिळतेय असे मला वाटायचे नाही. कारण दोन बॅरेल जीवामृत ३-४ सर्यात संपायचे. माझ्याकडे बॅरेले दोनच होती आणि डिसेंबरातल्या थंडीत जीवामृत तयार व्हायला ५-६ दिवस लागायचे. तेच उन्हाळ्यात ३-४ दिवसात जीवामृत तयार व्हायचे. शेताची खतांची पुर्ण गरज मी भागवू शकत नव्हते. याचा अर्थातच उत्पादना वर परिणाम झाला.
पुर्णपणे रासायनिक शेतजमिनीवर मी पहिल्याच वर्षी उसाचा प्रयोग करायला नको होता. त्या जमिनीवर आधी द्विदल पिक घेऊन जमिनीतला नत्र वाढवायला हवा होता आणि मग उसाचा प्रयोग करायला हवा होता. यासाठी ऑक्टोबरात शेत नांगरुन घेऊन लगेच पुर्ण शेतात चवळी, मुग किंवा हिरवळीचे खत (ताग, धैंचा वगैरे) लावून त्याची जानेवारी शेवटपर्यन्त काढणी करुन मग फेब्रुवारीच्या पहिल्या दुसर्या आठवड्यात ऊस लावायला हवा होता.
मी पाळेकर पद्धतीने शेती करणार्या शेतकर्यांच्या संपर्कात होते, त्यांनी साधारण अशाच स्वरुपाचा सल्ला दिला होता पण सगळेच सल्ले अंमलात आणता येत नाहीत. आजुबाजुला सगळेच जण अमुक एका प्रकारची शेती करत असताना तुम्ही काही वेगळे करायला लागलात तर तुम्ही कसे चुक आहात हे सांगणार्यांची गर्दी जमते. आणि त्यात शहरातुन पुस्तकी ज्ञान गोळा करुन आलेली एक बाई हे करतेय म्हटल्यावर ती मुर्ख आहे हा शिक्का मारणे अगदीच सोपे जाते. मला कुठल्याही शिक्क्याने काहीही फरक पडत नव्हता पण माझ्या सोबत मावशी होती, लोक तिच्यावर प्रेशर घालायचे, तिला फरक पडत होता. इतके पैसे खर्च केलेत तर जरा चांगली शेती करा, नैसर्गिक शेतीची फॅडे आंंबोलीत चालणार नाहीत, उगीच वेळ वाया घालवू नका वगैरे वगैरे भरपुर कानावर यायचे. मी डोक्यावर बर्फाची लादी ठेऊन दिलेली होती. मी सगळे ऐकायचे आणि काहीच उत्तर द्यायचे नाही. तसेही मी एक वर्ष शेती केल्यावर शेती सोडून पळणार याबद्दल बहुतेकांची खात्री होती.
ऑक्टोबरात शेत तयार असणे अशक्यच होते त्यामुळे द्विदल वगैरे विचार सोडुन द्यावा लागला आणि लोकांचे प्रेशरही होते व माझी गरजही होती म्हणुन मी ऊस लावला. ऊस लावल्यानंतर 'तुमचे जीवामृत वगैरे द्या पण थोडा युरियाही द्या, नाहीतर काहीही वाढणार नाही' हा सततचा सल्ला मात्र मी सरळ धुडकाऊन लावला. मी सरळ सांगायला सुरवात केली की शेतात काहीही आले नाही तरी चालेल पण युरीया वगैरेचा सल्ला मला अजिबात देऊ नका. पहिले पुर्ण वर्ष मला ह्या सल्ल्याविरुध्द लढाई करावी लागली. मला लोकांचे वाईट वाटायचे कारण मी त्यांचे अजिबात ऐकणार नाही हे मला माहित होते पण सल्ला देणार्यांना आशा होती की सततच्या हॅमरींगमुळे मी शहाणी होईन. आता मला कोणीही खतविषयक सल्ला देत नाहीत , इतर सल्ले मात्र देतात. ही बया खताच्या बाबतीत अजिबात ऐकत नाही हे त्यांनी आता स्विकारलेय. पण माझे पुस्तकी ज्ञान चुकीचे आहे हे मला अधुन मधुन ते ऐकवतात.
बर्याच जणांना वाटते की शेतीत काय शिकायचे? आपले वाडवडिल शेती कुठुन शिकुन आले का? तरी ते करत होतेच ना? मग आपल्याला का शिकायचे? शेती शिकायची गोष्ट नाही, ती आपोआपच येते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांना हे कळत नाही की वाडवडिल शेती करत होते तेव्हाची हवा, पाणी, पर्यावरण आता राहिलेले नाही. आजोबापर्यंत शेतात जे पिकत होते ते त्यातला माणसांनी खायचा भाग माणसे खात होती व बाकीचा गुरे. तेच परत शेण बनुन शेतात येत होते. एक सुंदर निसर्ग चक्र शेतात होते ज्यात शेतातली प्रत्येक गोष्ट वापरात होती, परत शेतात येऊन पडत होती. वडलांच्या काळात हरित क्रांती झाली, गुरे नाहीशी झाली, त्यांच्या जागी पेट्रोल्/डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर आले. शेतात शेण पडायचे बंद झाले. त्याजागी युरिया आला.
२०२३ च्या जागतिक मृदा दिनानिमित्त आमच्या ग्रामपंचायतीत कार्यक्रम होता. (हे कार्यक्रम कसे साजरे होतात त्याची जम्माडी गंमत मी नंतर लिहिन ) मी गेले होते. सरकारी कृषी अधिकारी आले होते. कार्यक्रमात उत्तम भाषणे झाली. जगभर आणि भारतात शेतजमिन कशी नापिक झालेली आहे आणि ती परत सुपिक करण्यासाठी जगभर व भारतात काय काय प्रयत्न होताहेत याचा आलेख अधिकार्यांनी उत्तमरित्या मांडला. एका अधिकार्याने सांगितले की भारतिय शेतकरी युरिया वापरायला लागले आणि त्यानी शेण वापरणे बंद केले म्हणुन अधःपात झाला. १ किलो युरियाबरोबर १० किलो शेण असे केले असते तर आजची परिस्थिती आली नसती. मी ऐकुन थक्क झाले. म्हटले हे शेणाचे आजवर कधी ऐकले नाही. कुठल्या पिकाला कुठले खत कधी द्यावे याचे कृषी विद्यापिठाचे कोष्टक असते. त्यात एक वाक्य सुरवातीला असते, अमुक एक टन शेणखत द्या. नंतर कुठेही शेणखताचा उल्लेख नसतो. अमुक दिवसांनी अमुक खत इतके किलो हे अगदी डिटेलवार लिहिलेले असते. ही सगळी खते सर्वत्र उपलब्ध असतात, त्यावर सबसिडीही आहे. पण शेणखत कुठेही उपलब्ध नाही. लोकांनी गुरे बाळगणे बंद केल्यावर शेण बंद झाले. उत्तमोत्तम खते गावागावात उपलब्ध आहेत पण शेणखत नाही. शेतकर्यांना शेणखत वापरायचे हे माहितच नाही. शेणखत वापरल्यामुळे शेतात हुमणी उर्फ रोटा म्हणजे व्हाईट ग्रब ही अळी होते हे आमच्या शेतकर्यांचे मत आहे त्यामुळे ते शेणखत टाळतात. विकतचे खत घेणे परवडत नसेल तर नाईलाजाने शेणखत घालतात. आणि इथे हा अधिकारी शेतकर्यांना दोष देत होता की शेतकरी चुकले म्हणुन जमिनीचे नुकसान झाले. मी म्हटले धन्य रे बाबा हे सरकारी अधिकारी!!! शेतात युरिया घाला हे यांनीच शिकवले, सोबत शेणखतही घाला हे यानी सांगितलेच नाही आणि आता म्हणताहेत हे शेतकरीच गाढव.... नशिबाने या कार्यक्रमाला आंबोलीतील शेतकरी उपस्थित नव्हते त्यामुळे सरकार त्यांच्यावर असला ठपका ठेवतंय हे त्यांना कळले नाही.. असो.
तर लावणी होत आली, मी आळवणी घेतेय, मोकळ्या जागेत काय भाजी लावायचीय वगैरे नियोजन करतेय तेवढ्यात मुंबईला जाऊया असे टुमणे आईने लावले. माझे सर्व भाऊ मुंबईत, जुनपासुन कोणाचीही भेट नाही, करोनामुळे कोणी गावी आलेही नाही त्यामुळे आईला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यात भावाच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायचे ठरल्याचा निरोप मुंबईतुन आला आणि आता चलाच म्हणुन आईने हट्ट धरला.
तिला एकटीला पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतातले काम अर्धवट सोडुन जाणे माझ्या जीवावर आले तरी आम्ही मुंबईला जायचे ठरवले. तोवर ऊस लागवड होत आलेली पण राखुन ठेवलेल्या अर्ध्या एकरात कडधान्ये लावायची होती. घाईघाईने मी दोन सर्यांत झुडपी चवळी लाऊन घेतली. रोजच्यासाठी थोडी भाजी, कडधान्यात मुग व भुईमुग आणि काही ऊसरोपे जर मरुन गेली तर त्यांचा जागी ऊरलेली ऊसाची रोपे लावणी इत्यादी कामे मावशीच्या गळ्यात टाकुन मी मुंबईला गेले. मुंबईला आल्यावर साठलेली एकेक कामे काढली गेली, ती करण्यात पंधरा दिवस गेले आणि त्यानंतर आम्ही आंबोलीत परतलो. आई मुलांकडे थोडे दिवस राहते म्हणत मुंबईत राहिली आणि भावाची मुलगी शाल्मली चेंज हवा म्हणत आमच्यासोबत आली. तिचेही वर्क फ्रॅाम होम होते.
क्रमशः