हा अमेरिकेतला तिसरा दिवस होता, आलो तो दिवस वगळला तर हा दुसराच दिवस. अजूनही सकाळी खूप लवकर जाग येत होती, त्यामुळे सहा वाजताच ब्रेकफास्ट करून आलो. पुढच्या हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट काही वेगळा असेल तर बरं होईल असं ते खाताना सारखं वाटत होतं. मग थोड्या वेळाने आवरून पुन्हा टॅक्सी करून विमानतळावर असणाऱ्या कार Rental area मध्ये पोचलो. तिथे एकाच ठिकाणी दहा वेगवेगळ्या रेंटल कंपनीजची ऑफिसेस होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी होती, बरेच जण विमान प्रवास करून लगेच गाडी घ्यायला आले होते, आम्ही लांबचा प्रवास असल्या मुळे एक दिवसानंतर आलो होतो. गाडी घेण्याबद्दल या आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे, ती इथेच देते.
जर्मनीत जेव्हा आम्ही रेंटल कार बुक करतो, आणि मग प्रत्यक्ष कार घ्यायला जातो, तेव्हा साधारण हा क्रम असतो -
कागदपत्र (ओळखपत्र आणि लायसन्स आणि जे लोक गाडी चालवणार आहेत त्या सगळ्यांचे, नवरा बायको असले तरी प्रत्येकाचे) तपासले जातात आणि मग गाडीच्या किल्ल्या हातात दिल्या जातात, त्यावर ठराविक गाडी क्रमांक लिहिलेला असतो, त्या गाडीचे कागदपत्र असतात. बहुतांशी वेळा तिथला माणूस आपल्या सोबत गाडी पर्यंत येतो, गाडी चेक करतो आणि मग बाय करून जातो. आम्ही गाडी पूर्ण चेक करतो, कुठे काही प्रॉब्लेम दिसला तर त्या कागदांवर लिहून घेतो आणि मग ती गाडी घेऊन निघतो. हे असंच युरोपात बहुतांशी देशात घडतं.
आता आज अमेरिकेत -
गाडी आम्ही आधीच बुक केली होती. हॉटेल मधून Taxi करून तिथपर्यंत आलो. बरीच मोठी रांग होती पण पटकन नंबर लागला, कागदपत्र पाहिले, क्रेडिट कार्ड वगैरे सोपस्कार झाले आणि दोन कागद हातात दिले. वर parking लॉट मध्ये आमचा माणूस असेल तो पुढे सांगेल एवढं सांगितलं आणि झालं. त्यावर गाडीचा नंबर कुठेही नव्हता, किल्ल्या नव्हत्या. आम्ही वर गेलो, तर त्या माणसाने फक्त कोणत्या प्रकारची गाडी हे विचारलं (Compact, Van etc), तो कागद पाहिला आणि त्या पुढच्या लेन मध्ये जा गाडी आहे म्हणाला. इथे आम्ही पूर्ण confused लुक मध्ये होतो, कोणती गाडी वगैरे काहीच सांगितलं नाही, किल्ल्या कुठे आहेत असे सगळे प्रश्न होते. त्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, की आमच्या कडे ७००० गाड्या आहेत, एवढ्या किल्ल्या मी नाही ठेवू शकत, किल्ल्या गाडीत आहेत. हवी ती घेऊन जा. ओके म्हणून, 'ऐसा भी होता है' असा विचार करत जरा साशंक मनानेच आम्ही तिथे पुढे गेलो, तर चार वेगवेगळ्या गाड्या होत्या, आम्ही ठरवू शकत होतो यातली कोणती घ्यायची ते. हे असं काहीही सवयीचं नसल्या मुळे, तिथेच थांबून बघत होतो. तेवढ्यात त्याच कंपनीचा अजून एक जण तिथून चालला होता, त्याने any problem? असं विचारलं. आम्ही यातली हवी ती घेऊ शकतो हे एकदा त्याला पुन्हा विचारलं, मग त्याच्याशी अजून गप्पा झाल्या आणि त्याला ही पार्श्वभूमी सांगितली आणि सगळे त्यावर हसलो. उपलब्ध गाड्यांमधून आम्ही दोघांनी एक गाडी एकमताने निवडली (जर्मन ब्रँड
), सवयीने सगळं चेक केलं, एक दोन फोटो काढून ठेवले आणि अजून नवीन अनुभव घेत पुढे निघालो.
तर गाडी घेऊन मग आता गाडीने प्रवास सुरू झाला, हा दिवस Vegas मध्येच होता. गाडीत in built navigation नव्हतं, फोन वर पत्ता टाकला आणि गाडी घेऊन निघालो वॉलमार्टकडे, अमेरिकेतलं सुपरमार्केट/डिपार्टमेंटल स्टोअर. एक म्हणजे तिथून सृजन साठी बुस्टर सीट घ्यायचं होतं, आम्ही सोबत नेलं नव्हतं. रोड ट्रिप साठी स्नॅक्स आणि अजून काही सामान पण घ्यायचं होतं.
आणि कोणत्याही नवीन ठिकाणी गेलो की तिथली सुपरमार्केट बघायला मला आवडतं. काय वेगळं मिळतं इथल्यापेक्षा ते समजतं, किमती कश्या आहेत समजतं, याही सगळ्यातून देशाबद्दल समजून घेता येतं. पहिले काही वेळ गाडी पूर्ण नवीन ठिकाणी चालवत असल्यामुळे सरावाचं नव्हतं . खरंतर जर्मनीत खूप जास्त नियम आहेत, रस्ते तसे लहान आहेत, अमेरिकेत त्यामानाने रस्ते प्रचंड मोठे, पार्किंग मोठे आणि रहदारी कमी. ड्रायव्हिंग साईड दोन्ही कडे एकच आहे त्यामुळे ते सोपं होतं. तरीही सगळ्याचा अंदाज यायला थोडा वेळ लागतो, त्यातून आम्ही इकडे किलोमीटर वापरतो आणि तिकडे माईल. पुढचा टर्न अमुक मीटर नंतर म्हणजे किती असेल याचा आमच्या नजरेला अंदाज आहे, ते सगळं बदललं. तसा रस्ता फार दूर नव्हता, गाडीची रंगीत तालीम चांगली झाली आणि आम्ही वॉलमार्ट पर्यंत पोचलो. आत जाऊन सीट घेतलं, फोन गाडीत लावण्यासाठी होल्डर घेतलं. आणि बाकी काही बघे पर्यंत भूक लागली, म्हणून अजून काही खरेदी न करता तिथून सरळ एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो.
एक भारतीय किराणा माल दुकान आणि शेजारीच एक लहान रेस्टॉरंट सारखी खायची सोय. तिथे जाऊन पराठे, छोले असं सगळं खाऊन बरं वाटलं. तीन दिवसानंतर भारतीय पदार्थ खाल्ले. गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे तिथल्या ताईंसोबत भरपूर गप्पा झाल्या. (मी सवयीने काकूच म्हणणार होते पण हल्ली मी स्वतःचं वय लक्षात घेते आणि कुणाला एकदम काकू म्हणत नाही
) कुठून आलात, कुठे फिरणार आहात वगैरे बोलणं झालं. त्या म्हणाल्या की मी वाटल्यास मला फोन करा मी उद्या पण बनवून देईन, तुमच्या वेळेप्रमाणे करून देईन काहीतरी तुम्हाला न्यायचं असेल तर. कुणी हे म्हणणं सुद्धा खूप आहे, बघू ठरवू असा विचार केला. पण ते पराठे पण फ्रोजन गरम करून दिले असावेत असं वाटलं, सगळ्याची चव चांगली होती हे महत्त्वाचं)
खाऊन मग त्या शेजारच्या भारतीय दुकानातून ३ मिनिटात होणारे पोहे, उपमा आणि काही चिक्की, बनाना चिप्स असे पदार्थ घेतले. पुढे जिथे जाणार तिथे हॉटेल मध्ये किचन होतं आणि बाहेर सोयी कमी होत्या, त्यांच्या वेळा पण बघाव्या लागतात, त्यामुळे अश्या वेळी हे पदार्थ उपयोगाला येतात. तिथल्या फ्रोजन सेक्शन मध्ये अळू वड्या बघून मला त्या घ्याव्या वाटल्या पण तेवढ्या संपणार नाही असं वाटलं, म्हणून नाही घेतल्या.
ती खरेदी करून मग पुन्हा वॉलमार्ट मध्ये गेलो. आता तिथल्या रस्त्यांची जरा सवय झाली होती. तरी Vegas मध्ये रस्त्यावर मार्किंग कमी आहेत, जे आहेत ते पेंट केलेले नाही त्यामुळे ते जरा समजायला अवघड होते. ही अडचण नंतर आली नाही, Vegas पुरतीच होती. ट्रॅफिक सिग्नल अमेरिकेत चौकाच्या पलीकडे आहेत, जर्मनीत अलीकडे आपल्याच बाजूने आहेत, अश्या लहान सहान गोष्टी लक्षात येत होत्या.
आता वॉलमार्ट मध्ये जाऊन काही फळं, बिस्कीट, नट्स असे स्नॅक्स, एक दोन औषधं सोबत असावीत म्हणून ते अशी खरेदी केली, प्रत्येक सेक्शन आता निवांत फिरून बघितला. का माहीत नाही, माझा जरा भ्रमनिरास झाला. खूप मोठं दुकान असेल, भव्य असेल असं मला वाटत होतं. मोठं असलं तरी इथे जर्मनीत पण काही तसे आहेत त्यामुळे खूप वेगळं वाटलं नाही. हे Vegas मधलं असेल म्हणून, कदाचित California किंवा न्यूयॉर्क या बाजूला अजून मोठे असतील. जर्मनीशी तुलना केली तर मला पास्ता प्रकार खूप कमी दिसले, इथे इटालियन Influence खूप आहे म्हणून असेल. इथे कॉफी आणि चहा, भारतीय चहा नाही पण विविध प्रकारचे tea जे मिळतात ते तिथे अमेरिकेत खूप कमी दिसले. पाणी घेतलं त्यात पण इथे खूप ब्रँड आणि मोठे सेक्शन आहेत, ते तिथे अगदीच लहान वाटले. औषध, जे without prescription मिळतात ते सेक्शन खूप मोठे होते. फ्रोजन प्रकार खूप होते पण शाकाहारी प्रकार त्यात इथल्या पेक्षा कमी दिसले. आणि आत ट्रॉली घेऊन फिरण्यासाठी काही गल्ल्या अगदीच लहान होत्या, जिथे चार लोक एकाच वेळी येऊन गडबड होत होती. शिवाय काउंटर वर प्लास्टिक पिशव्या बघून जर्मनीची आठवण आली, इथे त्या अजिबात वापरल्या जात नाहीत, सगळेजण आपापल्या पिशव्या किंवा बास्केट घेऊन येतात. मी एक लहान घडी होईल अशी कापडी पिशवी सोबत घेतली होती, पण ती पुरली नसती म्हणून काही प्लास्टिक पिशव्या घ्याव्या लागल्या. पण हे असं रोज अमेरिकेत वापरलं जातं हे काही पचनी पडत नव्हतं.
किंमती बघितल्या तर काही गोष्टी जर्मनी पेक्षा स्वस्त तर काही महाग वाटल्या. अशा प्रकारे सुपरमार्केट ॲनालिसिस करून खरेदी करून बाहेर पडलो. (नंतर अजून काही स्टोअर पाहिले, त्याबद्दल नंतर येईलच)
या पूर्ण प्रवासात प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे जर्मनीतून इथे आल्यामुळे, बरेचदा जर्मन दृष्टिकोनातून सगळीकडे पाहिलं जातं. अर्थात वेगळे देश, वेगळे खंड त्यामुळे बरेच फरक आहेत. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत आणि अजून फक्त दोन दिवस झालेत, तेही या महाकाय देशाच्या एकाच शहरात. तेवढ्यात 'फरक स्पष्ट करा' या एकाच प्रश्नावर उत्तर काय, अख्खा पेपर लिहिता येईल एवढ्या गोष्टी दिसत आहेत. ते एकेका भागात येत राहील.
पुन्हा हॉटेल वर गेलो. अमेरिकेत बहुतांशी हॉटेल मध्ये washer dryer होते ही सोय चांगली वाटली, आम्हीही मग काही कपडे धुवून घेतले. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं म्हणून बॅग पुन्हा भरल्या. पहिले दोन दिवस तसे बरेच संथ, निवांत घालवले होते. नीट आराम केला होता, अमेरिकेतला वॉर्म अप झाला होता . मोठ्या प्रवासासाठी भरपूर खाऊ सोबत होता. आता पुढचे पाच दिवस मात्र Arizona राज्यात, Colorado नदीच्या वळणा वळणांवर, यापेक्षा फार वेगळे होते, भारावून टाकणारे होते. ते तसे असावेत असं वाटत असलं तरी त्या क्षणी हे माहित नव्हतं. त्याच Grand canyon ला डोक्यात ठेवून झोपलो..
क्रमशः
मधुरा देशपांडे - शेंबेकर
०२-०५-२०२५
