फॅमिली कम्स फर्स्ट

खूप दिवसापासून एखादा हलकाफुलका / अगदी डोके बाजूला काढून ठेवता येइल असा कार्यक्रम बघावा अशी इच्छा होत होती. नेटफ्लिक्सवर "डायनिंग विथ कपूर्स" नावाचा कार्यक्रम दिसला. अगदी १ तासाचा असल्याने फार कंटाळा येणार नाही आणि टाइमपास होइल ह्या आशेने चालू केला.

राज कपूरच्या १०० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या नातवाने अरमान जैन कपूर कुटुंबियांसाठी एक जेवण आयोजित केले होते. अरमान जैनने कपूर कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ, राज कपूर ह्यांच्या पत्नी कृष्णा कपूर ह्यांच्या रेसिपीज स्वतः बनविल्या होत्या. शशी कपूर आणि शम्मी कपूर ह्यांच्या काही कुटुंबिंयानीसुद्धा येथे हजेरी लावली होती.

राज कपूरचे चेंबुरमधील देवनार कॉटेज विकले जाणार आहे. त्या कॉटेजची छोटीसी झलक, जेवण आणि अनंत आठवणी अशी साधारण कार्यक्रमाची रुपरेषा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नविन पिढीने पुढाकार घेऊन प्रत्येक प्रसंनी अशी स्नेहसंमेलने आयोजित करावित असा ठरावसुद्धा झाला.

हे सर्व बघताना, हा दिखावा आहे, नाटकी आहे वगैरे असे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. आणि कदाचित ते तसे असेलही (किंवा नसेलही). पण गेले अनेक वर्षे ख्रिसमस, दिवाळी, लग्ने, वाढदिवस इत्यादी प्रसंगी ह्या कुटुंबातील घट्ट नाती मला जाणवत आलेली आहेत. कपूर कुटुंबाचे घनिष्ठ नातेसंबंध हा कार्यक्रम बघताना मला प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवले. एवढ्या मोठ्या परिवारामध्ये यशस्वी, अयशस्वी, सुंदर, थोडे कमी सुंदर, श्रीमंत थोडे कमी श्रीमंत, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यात रुसवे फुगवे, अहंकार, भांडणे नसतील का? निश्चितच असतील. पण महत्वाच्या प्रसंगी, सणवार असताना सर्वजण जरा वेळ तरी रुसवे फुगवे, भांडणे बाजूला ठेवून एकत्र येतात, मजा करतात आणि पुन्हा आपापल्या कामाला लागतात.

आपल्या आजूबाजूला आपल्याला कितीतरी लहान सहान गोष्टीवरून रुसून बसणारे, आयुष्यभरासाठी उभा दावा धरून बसणारे, एकमेकांवर अविश्वास असणर, आपापले अहंकार कुरवाळत बसणारे परिवार दिसतील. एकमेकांच्या आनंदाच्या प्रसंगीसुद्धा आपल्यामधील हेवेदावे बाजूला सारून आपल्या माणसांच्या मागे न उभे रहाणारे लोक दु:खाच्या/संघर्षाच्या प्रसंगी साथ देत असतील का?

माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्या यशाचे कौतुक करणारी माणसेच नसतील तर त्या यशाची किंमत थोडी का होईना कमी होईलच. संघर्ष करत असताना पाठीवर हात ठेवून बळ देणारी माणसे जीवनात फार फार महत्वाची आहेत. अनेक प्रकारची आव्हाने झेलत असताना कुटुंबाचा आधार असेल तरच आयुष्याला स्थैर्य मिळते. वैयक्तिक यशापयश, पैसा, करीयर ह्या सर्व गोष्टींना महत्व देताना संवादसुद्धा महत्वाचा आहे. आपलाच अहंकार सांभाळत बसण्यापेक्षा प्रेरणेच्या, जिव्हाळयाच्या, प्रेमाच्या आणि हक्काच्या जागेला सांभाळणे अधिक मोलाचे आहे.

जेव्हा अनेक प्रथितयश व्यक्ती माणसांना महत्व देताना दिसतात तेव्हा असे वाटते की बाहेरच्या झगमगाटात वावरताना त्यांना त्यांच्या माणसांचा शांत सहवास अधिक आनंद आणि समाधान देत असावा. अनेक वर्षांच्या, पिढ्यांच्या अनुभवातून त्यांना हे समजले असेल की यश, संपत्ती, रूप, प्रसिद्धी हे सगळे चंचल आहे; आज आहे तर उद्या नसेलही. कदाचित म्हणूनच हे लोक चिरकाल टिकणार्‍या नात्यांची जोपासना करत असावेत. माणसे जोडणे आणि जोडून ठेवणे हे कौशल्य आहे. त्यासाठी प्रथम आपल्या मनाची तयारी लागते आणि त्यानंतर जाणीवपूर्वक केलले प्रयत्न.

आपल्या मनात अनेक भावना, गुणदोष, असुरक्षितता सदैव निवास करत आहेत आणि म्हणूनच नात्यांचे गणित थोडेसे क्लिष्ट आहे. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. दुसर्‍या माणसाच्या अपूर्णतेचा स्वीकार करता आला, आणि त्याचबरोबर आपल्या अपूर्णतेला कोणीतरी स्वीकारते आहे हे लक्षात ठेवले की नात्यांचे हे गणित आपोआप सुटते. आपल्या अंतर्मनामध्ये "फॅमिली कम्स फर्स्ट" हेच कोरून ठेवले तर आपल्या माणसांशी असलेला आपला बंध कधीच तुटत नाहीत. एखाद्या शांत क्षणी आपले अंतर्मन आपल्याला साद घालतेच आणि तेव्हा पुन्हा एकदा कुटंबाचे महत्व अधोरेखित होते.

बाकी "डायनिंग विथ कपूर्स" हलकाफुलका न ठरता माझ्या विचारांना चालना देणारा कार्यक्रम ठरला एवढे मात्र खरे.

लेख: 

वर
0 users have voted.