मनातले आणि वस्तुस्थितीतले, बदलत गेले जसं समजत, उमजत गेले आयुष्य.
काही कल्पना , इच्छा मनातल्या घराशी संलग्नित राहिल्या आणि अनायासे साकार झाल्या , निदान वास्तू म्हणून ...
अशाच एका सकाळी ऑफीस च्या मीटिंगसाठी वेल्स च्या सीमेवर असलेल्या सिन्दरफोर्ड मध्ये जावे लागले , नोव्हेंबर ची थंडी आणि पाऊस , सगळ्या सहकाऱ्यांची नाराजगी , नाखुषी व्हाट्सअप च्या टीम चॅट वर टणाटण आपटत होती. पण थंडी आणि भुरुभुरु पडणारा पाऊस मला आवडतोच , त्यात रस्ता जसा सरला , शहर मागे पडले आणि गाडी वळण रस्ता घेऊन जशी घाटात वर चढायला लागली , तसं एकदम लहानपणीचं पाचगणी महाबळेश्वर जाणवू लागले . तोच कुंद वास , धुकं , आजूबाजूला सुकलेलं आणि भिजलेलं नेचं आणि दगडातली घरं .. दोन मिनिटं गाडी थांबवून, खिडकी खाली करून श्वास घेतला -- पाचगणी आणि महाबळेश्वर आता खूप बदललंय आणि माझ्या आठवणीतलं कॉंक्रिट जंगलात लुप्त झालंय ....
नवऱ्याला फोन करून सांगितले तर म्हणाला , बघ एखादं घर तुला गाव एवढं आवडलंय तर . मी ऐकलं की नाही माहित नाही पण AI ने कान टवकारलेलेच असतात , त्या दुपारपासून इथल्या घरांच्या जाहिराती दिसायला लागल्या. स्क्रोल करता करता एक घर असं छान दिसलं , आणखी फोटो पाहिले , दुसऱ्या दिवशी शनिवार , गाडी काढली आणि पोहोचले ..
एकावर एक हाताने रचलेल्या दगडांच्या भिंती , मोठ्या टेकड्यांना धरून ठेवत , मधल्या सपाटीवर सोळाव्या शतकात इथल्या कामगारांनी बांधलेलं घर - अगदी माझ्या लहानपणी रांजणवाडीला असलेलं दादी च्या घरासारखं ..गावाचा इतिहास ही तसाच ...माझ्या पूर्वजांसारखीच --इथल्या डोंगरातून कोळसा आणि लोह काढणारी लोकं इथे वसली , छोटी घरे cottages बांधली , मोठं शिवार -- टेकडीच मागची, शिवार एका नजरेच्या टप्प्यात दिसतं --इथल शिवार ही महाबळेश्वरच्या चढउतारावरच्या झाडा घरांचं ..अगदी मनातलं घर त्याच्या सर्व स्पर्श गंधासहित समोर साकारलेलं .. घर घ्यायचा काहीही विचार नसताना पुढचे सर्व सोपस्कार पार पडले आणि घर खरेदी झाले ...
त्यानंतर सुरु झाला कामाचा डोंगर. आधीच्या घरमालकाने अगदी वाट लावली होती घराची - हौसेने अनेक गोष्टी स्वतः केल्या होत्या - गडद रंग कसाही फासला होता , दोन कुत्री --सगळीकडे त्यांचा वावर त्यामुळे भयानक वास भरलेला -- १० दिवस रंगरंगोटी चे ठरलेले, दोन महिन्यात बदलले --चार शतके जुन्या भिंती , काही कौले फुटलेली , भिंतीत , जमिनीत पाणी मुरलेलं आणि त्यामुळे सगळ्या भिंतीच्या प्लास्टरमध्ये बुरशी --- एका एका भिंतीची , रूमची अनेक लक्तरं सावरायला दोन महिने गेले आणि एकदाची राहायला आले . त्या आधी सामान चढवायला आठवडा - मोठी पायवाट आणि उभा चढ.. कोणी removal वाला यायला तयार नाही - बाकी सामान आले कसेबसे , लेकाचा ४५० किलोचा पियानो वाटेतच अडून बसला- ६ धट्ट्या कट्ट्या माणसांनी समजूत काढत चार तासात वर चढवला .. गेले १० महिने छोट्या मोठया दुरुस्त्या , कपाटे बसवून घेणे , लावणे चाललेच आहे ...
घर तर आवडलंच होतं पण त्या सोबत मोठठं polytunnel , छोटा माशांचा तलाव असं कधीतरी wish केलेल्या गोष्टीही इथे अवशेष स्वरूपात होत्या , आणि अनपेक्षित पणे तीन मेंढ्या सोबती पण मिळाले --- गवत राखायला म्हणून ठेवून घेतले .
ज्या दिवशी घराचा ताबा मिळाला त्याच दिवशी नवीन नोकरीचा पहिला दिवस होता . घर आणि नवीन कामाची घडी लागत असताना , गाव बघणे , नदीकाठी आणि जंगलात भटकणे चालूच होते . अक्ख्या गावात मी एकटीच non - white व्यक्ती , त्यामुळे गावाची जितकी मला नवलाई तितकेच इथल्या रहिवाश्यांना माझं अप्रूप -- कोण , कुठली, इथं जंगलात का येऊन राहिली आहे .. बहुतेक सगळे इथे सत्तरी पार केलेले किंवा शहरी जीवनाचा कंटाळा आला आणि countryside आयुष्य जगायला आलेले मनस्वी लोक -- आपल्याला काय , बोलायला , स्थानिक भाषा , संस्कृती समजून घ्यायला कोणीही चालते. बऱ्याच ओळखी झाल्यात , कधी कधी रविवारी इथल्या बाप्टिस्ट चर्च ला जाते - त्यांना तेवढेच धर्मप्रसाराचे सुख , मला चार दिवस वर्क फ्रॉम होम नंतर काही हाडामासाची माणसे दिसतात - याचे सुख - अगदी माणसात आल्यासारखे वाटतं :)
एके काळी हे गाव खूप गजबजलेलं होतं , इंग्लंडमधल्या गावात ह्या गावाची longest high street ( बाजारपेठ ) म्हणून नोंद आहे - सध्या एकच दुकान आहे . स्टील उद्योग आणि त्यावर आधारित खाणकाम हे सत्तराव्या दशकात बंद झाले तशी गावाला उतरती कळा आली . पिढ्यानपिढ्या इथे राहणारे लोक , यांची संस्कृती इतर इंग्लिश लोकांपासून वेगळी -- या भागात रोमन , आणि आजूबाजूचे इंग्लिश लोक यांच्यापासून अजूनही यांनी आपली भाषा जपली आहे . Forester म्हणून यांची वेगळी ओळख ते अभिमानाने जपतात, जगतात.
आले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात आवारातली झाडे प्लम्स आणि सफरचंदानी लगडलेली , टोपल्या भरभरून इथल्या ऑरगॅनिक दुकानात जाऊन दिली -- किती खाणार , preserve करणार --त्यांच्या बदल्यात अक्खा Summer गावठी अंडी, मध, चेरी असा शिधा मिळत राहिला. प्रत्येक वेळी एम्मा मला गावाची नवीन कहाणी सांगत असे. तिचं घर नदीच्या वाटेवर , त्यामुळे अशाही गाठीभेटी होत .. जे कोणी भेटे , त्यातले निम्मे लोक तुझं घर घ्यायचा आमचा प्लॅन होता , हे आवर्जून सांगत , काही मिश्किल हसत , काही खूप आस्थेने कशी settle झाली आहेस त्याची चौकशी करत. तसा शेजार नाही , जवळच्या घरी जायला ७ मिनिटे तरी लागतील आणि ८२ वर्षाच्या डेविड ला दार उघडायला पुढची १० मिनिटे , पण आमचं फेसबुक पेज मात्र फार ऍक्टिव्ह आहे - इतकं की झुकरबर्ग कफल्लक झाला तर फक्त या फेसबुक पेज च्या ट्राफिक वर त्याचा उदरनिर्वाह नक्की चालेल ..माझ्या वेगवेगळ्या चौकशांना लगेच उत्तर इथं मिळायची-- अगदी जुजबी दैनंदिन प्रश्नापासून -- मधुमाशी पालन , शेती , मेंढ्यांचे केस भादरणे , त्यांची निगा , फॉरेस्ट चे नियम, स्थानिक सण सगळ्यावर साग्रसंगीत अनुभवसमृसद्ध आणि प्रसंगी आम्ही येतो मदतीला असा शेजारभाव अनुभवायला मिळाला . कदाचित त्या अनुभवातून मी तशी सामान्य , निरुपद्रवी माणूस आहे , याची खात्री पटल्यावर शेजारच्या डेव्हिड ने घराची कर्मकहाणी ऐकवली . उंचवट्यावर असलेले हे घर , पुढून पूर्ण दगडी तटबंदी असल्यामुळे आणि झाडांत लपल्यामुळे इथे काय चालू आहे त्याची कोणाला ही सुतराम शक्यता नसायची . आधीच्या आधीचे जे लोक इथे राहायचे, त्यांना खूप कमी लोकांनी पाहिले होते. डेव्हिड शेजारच्या Ross व Wye चा तीन टर्म महापौर होता त्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय काम त्याला माहीत असायचे . असेच बोलताना त्याने इथल्या पोलीस कर्मचाऱ्याला घराबद्दल सांगितले आणि काही तरी काळंबेरं असावं अशी शंका व्यक्त केली . पोलिसाला त्या दिवशी फार काम नसावं त्यामुळे त्याने डेव्हिड चे बोलणे मनावर घेतले आणि संशोधन केलं-- इथल्या MSEB ला फोन लावून बिल विचारलं -- त्याचा संशय खरा ठरला. इथे मोठी cannabis ची लागवड चालू होती. पोलिसांच्या धाडीत चार व्हिएतनामी गुलाम इथे आढळले - ही १५ वर्षांपूर्वीची गोष्ट त्यानंतर इथे दोन पापभिरू कुटुंबे राहून गेली , पण घराचा इतिहास काही पाठ सोडत नाहीये .. त्यामुळेच बऱ्याच गावातल्या लोकांना हे घर हवे असून , इथे यावे वाटले नाही -- their loss , my gain ...म्हणलं खरं.... पण कधी कधी त्या चार गुलामांचा इथला दगडी भिंतींच्या आतला वावर डोळ्यासमोर दिसतो आणि प्रचंड करूणा दाटून येते मात्र ..
आता थंडी कमी झाली आहे त्यामुळे सगळ्या बागकामासंबधी कल्पनांना मूर्त स्वरूप येवू लागले आहे . कुठलेही काम या घरात करायचे तर कामाचे आणि वर डोंगरघरात चढून यायचे असा दुहेरी दर असतो , त्यामुळे आणि रंगरंगोटीवर प्लॅन केल्यापेक्षा पाचपट जास्त खर्च झाल्यामुळे आता बँक बॅलन्स मायनस मध्येच आहे. त्यामुळे सगळी कामे स्वतः करायची --असं पण इथे सगळेच आपल्या गार्डन मध्ये स्वतः काम करतात . थँक्स to आमचे फेसबुक पेज , मला ६७ वर्षाची उत्साही मदतनीस मिळाली आहे . तिच्या गार्डेनमध्ये आता करायला राहिले नाही त्यामुळे तीपण एका प्रोजेक्ट च्या शोधात होती . शनिवारी दोन तास ती मदतीला असते आणि आमच्या प्लॅन्सला आणखी उधाण येते --सर्वात आधी आम्ही पायऱ्या केल्या , घरापर्यंत तिला आणि इतरांना येणे सुकर व्हावे . polytunnel स्वच्छ केले , भाज्यांचे वाफे केले आहेत , एक एक कोपरा साफ , नीटनेटका करून पुढे सरकतोय .

कधी कधी विचार येतो .. का आपण करतोय हे सगळे . आवड आहे मान्य , पण जे पिकते त्यातले मूठभर पण आपण खाऊ शकत नाही , निम्म्याच्यावर वाया जाते आणि घराचं एवढं करून , कोण राहणार आहे इथे .. मुलं त्यांच्या मार्गानं जाणार, त्यांना यात काही रस नाही वाटत . जगात एवढा विध्वंस चालू आहे , या सगळ्या करण्याला काही अर्थ आहे का ? आजूबाजूला पाहिलं की मग दिसतं -- चार शतकाआधी कुणीतरी किती निगुतीने एकावर एक दगड रचत ही जागा बांधली , त्या आधी इथले काटेकुटे झाडे काढली असतील, जमीन तयार केली , कित्येक लोक इथे राहिले , जगले त्यात हे घर ही जगलं असेल , प्रत्येक नव्या रहिवाशाबरोबर बदलले असेल ... आज मला माझ्या स्वप्नातले घर म्हणून मिळेपर्यन्त या जागेवर, वास्तूवर कित्येक पिढ्या खपल्या असतील - हा वारसा तसा अनाम आहे . माझ्या वाडवडिलांचा , आप्तजनांचा नाही पण त्या पलीकडे जाऊन माणूस, गाव , संस्कृतीचा हा अव्याहत ठेवा आहे .. आज माझा रहिवास आणि सहवास या जागेवर आहे -- पुढच्या येणाऱ्या लोकांसाठी मी तो अजून सुकर , सुलभ करावा ...या विचारातच मला माझे नाना नानी आठवले . लहानपणी नानींकडून त्यांच्या कामाच्या आठवणी ऐकल्या होत्या . दोघेही गवंडी काम करायचे . महाबळेश्वरच्या बहुतेक मोठया बंगले बांधताना त्या दोघांनी तिथे मजूर म्हणून काम केले . त्यांचे घर अगदी छोटे, तुटलेल्या टाइल्सच्या तुकड्यांची नक्षी तिथं होती पण त्यांच्या बोलण्यात केलेल्या कामाचा अभिमान असायचा . नाना माझ्या जन्माआधी गेले , पण अजूनही त्या बंगल्यांच्या इथून जाताना मला त्यांचे काम करणारे हात आणि एकाग्र वृत्तीने निभावलेली जबाबदारी दिसते -- नानींच्या बोलण्यात जो अभिमान असायचा तो त्या निर्मितीचा , सर्जनशीलतेचा असायचा .. त्यांच्या मालकीचं काहीच नव्हतं त्यातलं ..पण त्या साहेबांच्या बंगला बांधकामातली कला त्यांची होती . कदाचित या सगळ्या कामाची आवड तिथूनच आली असावी --काश त्यांच्या इतकं नेटकेपण माझ्या या कामात आलं असतं ...हे सगळे आठवत असताना हेही लक्षात आलं की आपण नेहमी वारणे गुरुजींची नात, मुलगी म्हणूनच आपली ओळख समजली, सांगितली , जोपासली पण आपण कासम आणि कुलसुम कोळेकरांची पण नात होतो --हे का नाही कधी सांगितलं -- patriarchy आहेच पण त्याचबरोबर प्रमाण पेशाचा अभिमान आणि मजूरकामाचं दुय्यमपण हे ही आहेच ...
लहानपणी गाव आवडायचं पण कळत असल्यापासून तिथल्या संकुचित मानसिकतेतून निघायचं होतं, जग बघायचं होतं, स्वतःला शोधायचं होतं... काहीतरी बनायचं होतं...
आता ते सगळं करून झाल्यावर स्वतःला शोधत परत तिथेच आले , गावात परतले नाही तरी तशाच जैव परिसरात परतलेय, रमतेय्...शेवटी तुम्ही गावातून जाता, गाव तुमच्यातून जात नाही ...घर सोडता...पण ते तुमच्यातच वसत असतय ....ज्या गोष्टीपासून सुटका हवी असते , त्याच परत विलोभनीय बनून समोर येतात ..स्थळ, काळ बदलत असतो पण अनुभूतीची आवर्तनं निरंतर चालूच असतात... का, कशासाठी ला उत्तर असेल कदाचित पण अंगणातला हा सम्यक फक्त हसून म्हणतो ...कळेल कधी तरी ... हा क्षण आहे तसा अनुभव ना....
मातीत काम करताना अशी डोक्या- मनाची खुदाई चाललेली असतेच -- त्याचंच शब्दांकन करायचा हा प्रयत्न .म्हणलं तर आपलाच आपल्याशी संवाद - वाद --म्हणलं तर व्यक्त होत , समष्टीशी नाळ जोडत सहचरांबरोबरचा प्रवास ..

