फॉरेस्ट डायरी २ - मा मीं मॉ

मार्टिन , मॉली आणि मिंटी M x३ - मार्टिन बाप, मॉली, मिंटी जुळे भाऊ बहीण, त्यांची आई एक दीड वर्षाआधी गेली. घर बघायला आले तेव्हाच ऍडमनी विचारले होते, 'तुला मेंढ्या हव्यात का?' हजारो ख्वाहिशें मध्ये मेंढ्या कधीच नव्हत्या त्यामुळे मी बावचळून बघितले त्याच्याकडे.
'...तीन एकरची जागा साफ कशी ठेवशील - मेंढ्या असतील तर गवत फार वाढणार नाही ...'
'पण त्यांच्या निगेचं काय?'
'... काही नाही, वर्षातून एकदा त्यांची लोकर काढावी लागते, ती काढायला माणसे येतात, एक दोनदा त्यांना स्प्रे मारावा लागतो मग उवा होत नाहीत. बाकी चरायला त्यांना एवढे रान आहे आणि पावसाच्या पाण्यावर त्यांची तहान भागते ---- so सिम्पल ...'
m1.jpg
या संभाषणानंतर आम्ही मेंढ्या बघितल्या. ऍडमनी त्यांचा गोठा दाखवला, खाण्या पिण्याच्या जागा दाखवल्या.
' ... अगदीच थंडी, बर्फ पडली तर त्यांना पेंड देत जा, त्याची मोठी कणगी भरून ठेवली आहे.' असं सगळं व्यवस्थित सांगितले.
मार्टिन मॉली मिंटी -- मा मीं मॉ त्याच्या हातून मस्त गाजरं खात माझ्याकडे ढुंकून न पाहता उभे होते. माझा लेक आणि भाची सोबत होते आणि त्यांची काय आता हिचं नवं थेर अशी स्पष्ट कुजबुज चालली होती . भाची --- मासी कितना अच्छा है , सो फ्रेश वगैरे आणि लेक, इथे जिम नसेल, दुकान नसेल, डायरेक्ट ट्रेन नाही मग मी कसा येणार - तुला असं का राहायचं असतं असं वैतागाचें सूर काढायला लागला होता. नवरा इथे छान वूड केबिन करूयात असं मुंगेरीलाल रूप घेऊन टेहळणी करत होता. ऍडमची उत्साही बडबड मीच ऐकत होते . त्यांनी मेंढ्या, शेळ्या , कोंबड्या , लव्ह बर्डस पाळले होते. त्याच्या छोट्या मुलीला खूप लळा होता सगळ्या प्राण्यांचा, बायकोला आवड होती पण दोघांचे बिनसले आणि आता त्याला एकट्याला सांभाळता येत नाही म्हणून सगळं देऊन टाकलं. फक्त मा मीं मॉ ठेवल्यात. त्यांना काढायला मन होत नाही , तू राहू दे त्यांना ....इ इ

सगळं बोलून, घर, आवार बघून आम्ही परत जायला निघालो तर लेकाचा चेहरा पार पडला होता. आधीचा वैताग, उपहास जाऊन डोळे डबडबले होते. मला परत एकदा, 'ममा तुला इथेच रहायचे आहे का?' असं गदगदून लेकरू विचारत होतं. मलाही दाटून आलं एक क्षण - किती माझी काळजी सोन्याला ...? मी निग्रहाने हो म्हणलं आणि त्याला आश्वस्त करू लागले. तेव्हा त्याने मान वर करून - छे छे तुझी काय काळजी करायची ? असा लुक दिला ... पण त्या मेंढ्या जर तिथे असतील तर मला lamb meat खाता नाही येणार त्याचे काय?? म्हणून सोन्याचे डोळे भरून येत होते .. मी गाडी काढता काढता म्हणलं काय संबध दोन्ही गोष्टींचा. मटणाचं दुकान असेलच जवळ पास ...ममा , it is not about finding a shop , but if MX3 are in the backyard , how can we cook and eat lamb meat at home ? Have you thought ,how they will feel about it ....ही भ्रातुर्भाव अनुकंपा चालली बरेच दिवस . घरात तो असेपर्यंत lamb meat आले नाही आणि अनुकंपेची पुढची पायरी म्हणजे अजून माझ्या कुक्कुट पालनाच्या प्लॅन ला हिरवा कंदील मिळालेला नाही ... तू कोंबड्या पाळल्या की मला इथे चिकन ही खाता येणार नाही, अशी भूमिका आहे त्याची ...

या घटनेनंतर लेक शाळेत, नवरा परत भारतात, भाची तिच्या कामात आणि मी सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून, सामान हलवून माझ्या ऑफिसच्या कामात मग्न. यात दोन महिने निघून गेले. एक दिवस थोडी फुरसत मिळाली म्हणून शिवारात लांब फेरफटका मारला. तर मा मीं मॉं चे कुठे नामोनिशाण नव्हते. बराच वेळ थांबून बघितले आणि मग लक्षात आले कि ऍडम गेल्यापासून त्यांना आपण पहिलेच नाही. मधले दोन महिने काम चालू असताना गेट उघडेच असायचे. कोणीतरी चोरल्या वाटतं! ऍडमला फोन केला तर तो म्हणाला थोडं खायला घेऊन जा, त्या चाहुलीने येतील त्या. ते ही केलं, कुठेच पत्ता नाही. मग तो म्हणाला टेकडीच्या पलीकडे पॅट राहते, मेंढ्याना तिचा लळा आहे, येतील एक दोन दिवसात. असे एक दो तीन -- दस बारा , तेरा करू इंतेजार झालं आणि माझा धीर सुटायला लागला. आपण बिलकुल लक्ष दिले नाही त्यांच्याकडे म्हणून खंत वाटत राहिली. नक्की कोणी चोरल्या म्हणून मग पोलिसांना फोन केला, पोलीस ऑफिसर ने वर्णन विचारलं. "दोन काळ्या आणि एक पांढरी ..." तिला हसू आवरलं नाही, माझी माफी मागून ती म्हणाली इथे हजारो मेंढ्या आहेत आणि त्या काळ्या किंवा पांढऱ्या आहेत. फॉरेस्टचा नियम आहे की त्या हवं तिथं भटकू शकतात, कोणाच्या गार्डन किंवा शेतात गेल्या की त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्या लोकांची असते, सापडल्या की त्यांच्या खाण्याचा खर्च देऊन परत आणायच्या. आजूबाजूला बघत राहा. असं शोधणं अवघड आहे.

आतापर्यंत गावच्या FB पेज वर मी लिहिल्यामुळे गावात खबर झाली होती. कुठे ही गेलं की लोकं थांबवून विचारायचे, मिळाल्या का मेंढ्या? घर लागलं का हे विचारण्यासाठी येत असलेले मैत्रिणींच्या फोनची सुरुवातच --- आल्या का साळकाया म्हाळकाया परत? भवान्या सापडल्या का? --- एकतर आपण दुर्लक्ष केलं याची अगतिकता , त्यात लेकाचं आमची एवढी कधी काळजी केली नाही आणि त्या मेंढयांसाठी रडतीये , असं टुमणं आणि त्यात दोन मेंढे पुरुष आणि एक स्त्री --असं असताना त्यांना मैत्रिणीनं सर्रास स्त्रीलिंगी संबोधणं --- काय काय वाढून ठेवलंय असं म्हणत एका सकाळी चहाचे आधण ठेवले आणि गवती चहा तोडायला बाहेर आले तर मा मीं मॉ आरामात टेकडीवर चरताना दिसले --- असं खेकसावं वाटलं त्यांच्यावर -- नको नको , परत गेल्या तर म्हणून आपला चहा निमूट गाळला आणि शांतपणे घोटाळला .. FB पेजवर त्यांच्या पुनरागमनाची दवंडी पिटली , भरपूर लाईक्स सहित निगराणी सल्ल्यांची तिथे बौछार झाली . ऍडमनी सांगितल्याप्रमाणे एका बादलीत थोडी पेंड घेऊन गेल्या की त्या खायला येतात हे रोज न चुकता करायचा निर्णय घेतला आणि मी पुढच्या कामाला लागले.
m4.jpg
दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे बादलीत पेंड घेऊन गेले. मा मीं मॉ सकाळच्या कोवळ्या उन्हात एका उंचवट्यावर उभे राहून, बादली घेऊन येणाऱ्या मला न्याहाळत होते.. गेट उघडले आणि तिन्हीजण जोरात धावत खाली यायला लागले. त्यांचा आवेग आणि वेग बघून मला घाम फुटला, बादली खाली टाकून मी गेटच्या अलीकडे धूम ठोकली. मागे वळून बघते तर ते तिघेजण भांबावून निश्चल उभे होते ... आता पर्यंत आपण पळायचो , हा मनुष्यसदृश प्राणी असं आपल्याला बघून का धूम ठोकतोय -- त्यांना अजूनही कळत नाही. वर्ष होत आलं, मी खाणं घेऊन जाते, त्या सुसाट धावत खाली यायला निघतात, मी परत फिरून धूम ठोकते, त्या स्तब्ध उभ्या राहतात , मी मधले गेट लावते, मग एकमेकांचा अंदाज घेऊन त्या खाली येतात, पेंड खाऊ लागतात आणि मी आपल्या चहासाठी घरात परतते ...

मध्ये ऑगस्ट मध्ये लोकर काढायची असा ऍडमनी पुन्हा मेसेज पाठवला. मी मग त्यांचा खास न्हावी असतो त्याला बोलावले . २५-२७ वर्षाचा तरणाबांड गडी त्याची भादरण्याची सामग्री घेऊन आला. जुजबी चोकशी करत आम्ही गोठ्याकडे निघालो. मा मीं मॉ ने मुझे देखा , मैने उनको देखा .. न्हावी माणसाला काही कळेना हे तळ्यात मळ्यात पळणे काय चाललंय यांचं ..मग मी त्याला लहानपणी माझा कुत्र्यांनी कसा पाठलाग केला होता , त्याचा trauma आहे अजून असं सांगितलं . त्याने अनुकंपा तत्वावर त्या तिघांना एकत्र आणून त्यांची भादरायची जबाबदारी मोठ्या जबाबदारीने आपल्या खांद्यावर घेतली . पुढचा एक तास मा मीं मॉ आणि त्यांचा न्हावी यांच्यात मस्त कबड्डीचा सामना रंगला. खाली वर धावून, नाना प्रलोभने दाखवून पण त्या तिघांपैकी एकही जण गोठ्यात किंवा हातात आला नाही. अंधार पडायला लागला तसा सामना आवरता घ्यावा लागला. Traumatised मी गेटच्या अलीकडे उभी होते. 'तुझ्या मेंढ्या जंगली प्रजातीच्या आहेत , हे तुला माहीत आहे ना?'
" --- मी कशी शब्दांत सांगू .. " काना-डोकयात माझ्या 'तान' स्वर... चेहऱ्यावरच्या भावावरून त्याला कळलं --- "तू तुझा समजून घे रे , या अज्ञानी जीवा ..."

धावून हपापत्या अवस्थेत असलेला तो, आणि मला एकदम धीर गंभीर अरुण दातेंचा आवाज आला --- "अंतरीच्या स्पंदनाने थरारे ही हवा , यांना गोठ्यात आणायचे तर तू एक कुत्रा पहा s s ."
त्या 'तान' लेल्या अवस्थेतून एकदम खाडकन मी बाहेर आले - तो सांगत होता ...- त्यांना गोठ्यात आणायचं तर आपल्याला शिकारी कुत्री लागतील . बघ कोणी मदत करेल का आणि त्यांना गोठ्यात आणलं की मला फोन कर मी येतो.

झालं बट्ट्याबोळ 😱 - कुत्री!! ती पण शिकारी!!!

सब मर्ज की दवा, गाठले फेसबुक पेज परत !

बाप्टिस्ट चर्चच्या मिनिस्टर जॉय ने मेसेज केला. 'आपल्या चर्च मध्ये ग्रॅहम आणि जिल येतात. त्यांना विचारु का तुझ्यावतीने? ग्रॅहम मेंढपाळ आहे आणि तो नक्की मदत करेल.' नेकी और पूछ पूछ -- मी आनंदाने हो म्हणलं, फक्त या वेळेला नवरा येईल तेव्हाच भादरायण कार्यक्रम ठेवायचा म्हणजे सोयीनं, काही gulit न वाटता गेटच्या अलीकडे उभं राहता येईल. शेवटी महिन्याभराने योग जुळून आला. ग्रॅहम. जिल आणि विक्रम तिघांनी ग्रॅहमने सांगितल्याप्रमाणे मोर्चेबांधणी केली. आधी कबड्डी, मग खो खो, मध्येच काठ्यांची भालाफेक मग ते झिंगलाला गाण्यात जसं नाचतात ते असं सगळं बराच काळ चाललं . मी पण हिम्मत करून तळ्यातून मळ्यात गेले आणि जिल च्या मागे मागे शूरपणे फिरले . पुरुषमंडळी वर खाली मा, मीं मॉ च्या मागे त्यांच्या गनिमी काव्याना पुरून उरत, परत परत पाठलाग करत असतांना, जिल ने अगदी चिंतीत होऊन विचारलं --- तुझा नवरा असले विचित्र आवाज का करतोय . विक्रम अगदी धनगरकुलीन असल्यासारखा हर्र्रर्र्र हुर्रर्र करत त्यांना पिटाळत होता . मी तिला सांगितलं आमच्याकडचे गुराखी , मेंढपाळ असा आवाज काढून गुरांना हाकतात . यावेळेला स्तब्ध व्हायची तिची बारी - म्हणजे भारतातली गुरं हर्रर्रर्र हुर्रर्रर्र असा आवाज काढतात का ? अगदी genuine प्रश्न होता -- नाही ते ब्या ब्या असाच आवाज करता -- युनिव्हर्सल अभिजात भाषा आहे त्यांची ... नशीब तेव्हा ग्रॅहम ने जोरदार हाळी दिली आणि जिल चे लक्ष परत मेंढ्या जमा करण्यात गेले . शेवटी दोन तासांनंतर आयी मेंढिया गोठे में, असा सुवर्णक्षण आला आणि एकदाची लोकर उतरली. ते दोघेही ७५ च्या वर आहेत पण इतके हसमुख आणि काटक. तेव्हापासून अधून मधून येतात कधी असच विचारपूस करायला, कधी चाऱ्याची बंडलं घेऊन. ग्रॅहम ला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे , विशेषतः इंडियन . आले त्या दिवशी चहा सोबत पातळ पोह्याचा चिवडा दिला . दोघांना खूप आवडला म्हणून एक पाकीट दिले . काही आठवड्यानंतर मी चर्चला गेले असताना ग्रॅहम च्या ९२ वर्षाच्या आई शेजारी बसले होते . ती मला विचारत होती , तू दिलेला पदार्थ काय होता .. ग्रॅहम आणि जिल ने मला थोडा दिला आणि मग एका बरणीत ठेवला आणि रोज दोघे एक एक टेबल स्पून भरून खातात.. संपू नये म्हणून पुरवून पुरवून . तेव्हापासून विक्रम नेहमी त्यांच्या साठी येताना पातळ पोह्यांचा चिवडा आणतो आणि ग्रॅहम मा मीं मॉं साठी चारा -- अशी आमची बार्टर सिस्टम . परवाच येऊन गेले दोघे , विक्रम कधी येतोय , लोकर काढायची आहे , भारतातल्या मेंढ्यांचे आवाज ऐकायचे आहेत असं मिश्किल पणे सुचवून तुझी काय भूमिका असणार यावर्षी , अशा गप्पा मारून गेले .. गेल्यावर्षीच्या सामन्याचे विजेते आणि उपविजेते यांचे फोटो टाकते आहे इथे .

m2.jpg

m5.jpg

------
सप्टेंबर ला लेक युनिव्हर्सिटी ला गेला. थंडी पडायच्या आधी polytunnel आवरत होते . मागच्या बाजूला गेले तर काही हाडं आणि कवटी सापडली , बापरे . घराचा इतिहास माहीत होता -- आता हे काय नवीन प्रकरण म्हणून तिथून धूम ठोकली . विक्रम चा फोन आला तर तो म्हणाला मला माहीत आहे ती कवटी , प्राण्याची आहे , काही काळजी करू नकोस . तो भारतातून परत येईपर्यंत मी त्या प्रतिबंधित क्षेत्रात पाऊल टाकले नाही . तो आल्यावर त्याने मला दाखवले बघ वर ही दोन भोके आहेत ना , ती शिंगं होती . मग ती मॉली मिंटीच्या आईची खोपडी असेल असा आम्ही निष्कर्ष काढला . असं काही सापडलं आहे , हे लेकाला अजून सांगितले नाही . उगा ... मॉली मिंटीला काय वाटेल त्यांची आई खोपडी स्वरूपात आणि माझी अजून चालती बोलती -- हे बरोबर नाही अशी भूमिका घेतली तर ?

लेख: 

वर
0 users have voted.