फॉरेस्ट डायरी ३ - वस्ती

घरावर वस्तीला यायचे तर  आधी वहिवाटीची सोय बघायला हवी . वसंत ग्रीष्माच्या सीमारेषेवर इथे आले त्यामुळे सगळीकडे फुलापानांचा बहर होता . दिवस बऱ्यापैकी मोठा त्यामुळे उशिरापर्यंत उजेड असायचा . बाहेर लोक दिसायचे , बऱ्यापैकी चाहूल होती आणि पहिले काही दिवस सामान टाकून ऑफिसच्या वाऱ्यांसाठी मी बाहेरच होते. एक दिवस मध्यरात्री नंतर पोहोचले , असंही सगळं सामसूम असतंय , त्यादिवशी गडद अंधार , गाडी ते घराचे दार ५-७ मिनिटं लागतात, त्यात चढ, मग लागणारा दरवाजा आणि मग घराचं दार, काहीच दिसत नव्हते. सोलर लाईटस मिणमिणते प्रकाशायला पण सूर्यप्रकाश मिळत नव्हता. वाट आणि प्रकाशाची सोया करणं क्रमप्राप्त होतं. मुख्य घरापासून गेट पर्यंत विजेचे कनेक्शन घेऊन आधी प्रकाशाची सोय केली. अस्त्यावस्त वाढलेली झुडुपे काढून वाट केली आणि मग पायऱ्या टाकून चढणे, उतरणे सोपे केले.

पायर्‍या करायच्या आधी असा रस्ता होता:
path.jpg
 

हळू हळू सामान थोडे इकडे तिकडे हलवून आवश्यकतेनुसार लावत होते . किचन लावायला घेतले आणि लक्षात आले की सिंकच्या खाली बरीच गळती होऊन कॅबिनेट अगदी कुजल्यागत झाले आहे . दोन तास वेळ काढून सगळी भांडी लावायच्या कामात तिथेच खंड पडला . फेसबुक पेजवरविचारणा करून प्लम्बर ची व्यवस्था केली , सगळ्या कॅबिनेट पुसून , प्लास्टिक लावून वॉटरप्रूफ केल्या आणि हळू हळू भांडीकुंडी विसावली पण ओल काही निघेना . घर टेकडीच्या उतारावर , पाऊस तसा बारा महिने , आजूबाजूला भरपूर झाडी आणि डोंगर खोदून मध्ये इमारत रचलेली - सगळ्या पाण्याचा ओघ इमारतीच्या आजूबाजूने आणि खालून त्यामुळे ओलावा आणि त्याची सोबतीण बुरशी सगळीकडे वस्तीला . एक एक भिंत फूटभर तरी जाड आणि पाणी दगडात मुरलेलं , त्यात दोन कौले फुटलेली , पन्हाळ्या पाचोळ्याने गच्च भरलेल्या --एक एक काम निपटवत राहिले. घरात चारी रूम ना जुनी फायर प्लेस आहे, लाकडे आणून त्या सुरू केल्या. ऍडम नी भरपूर लाकडे ठेवून गेला होता. दगडी भिंतीत जसं पाणी मुरतं तशी उब मुरायला खूप वेळ लागतो. पण एकदा ती उब आली की घराची रौनकच वेगळी भासते.
fireplace.jpg
बाहेर  पाऊस,  थंडी असताना धगधगत्या निखार्यांकडे बघत काम किंवा संध्याकाळी वाचन. tv हेही स्वप्न या घराने पूर्ण केलंय . मग आता त्या निखाऱ्यांवर  शेंगा भाज , आत डबा ठेवून भात , केक कर , त्याच्या आसपास कडधान्याला मोड आणायला ठेव --असं कायबाय अखंड चाललेलं असतंय.

 घरी असले की जागेपणीचा ६० टक्क्यांवर वेळ बाहेरच्या लुडबुडीतच जातो . मी वस्तीला आले त्याच्या आधीपासून खूप काही इथे वस्ती करून आहे , त्यांची गाठभेट होत राहते . सकाळी सकाळी इतकी पक्षांची किलबिल असते , छोटे छोटे रॉबिन आसपास बागडत असतात . थोडा वेळ गेला की हाफिन्च , ब्लॅकबर्डस शाही बुलबुल येतात , वेगवेगळ्या प्रकारच्या घारी,  ससाणे, उंचावर घिरट्या मारत असतात . टेकडीवर मा मीं मॉं च्या आसपास  अनेक तित्तर डौलात पदन्यास करत असतात . संध्याकाळ झाली की घुबडांचे चीत्कार वाढत जातात . इथून दोन मैलावर प्रायोजित युनेस्को biosphere आणि इतर संरक्षित जंगल आणि गुंफा आहेत . त्यामुळे बरेच वेगळे पक्षी इथे असतात . एकदा सगळं काम झाल्यावर आरामात शॉवर घेत होते , एकदम मागच्या बाजूला कोणाचा तरी फोन वाजला .  म्हणलं इथं कोण आल?  , मला वाटलं गेट उघडं राहिलं का, कोण असेल ?  तातडीनं आवरून बाहेर बघायला गेले तर कोण नव्हते , पण परत तो आवाज . मग लक्षात आलं हा फोन नाही , हमिंगबर्ड ची शीळ , जी नोकिया ने प्रसिद्ध केली आणि आपल्याला रिंगटोन म्हणुणच माहीत झाली . तो पक्षी दिसला नाही म्हणून पुढचं संशोधन केलं तर कळलं की हमिंगबर्ड इंग्लंडात नसतातच पण या भागात त्यांच्यासारखा आवाज करणारा , दिसणारा पतंग असतो. तो शीळ घालत नाही, तर त्याच्या पंखांच्या अतिशय जलद हालचालींचा  - ७०-८५ वेळा प्रति सेकंड पंख हलवायचा  तो आवाज असतो. फुलांचा मध मिळवण्यासाठी ची सगळी धडपड ..

गांधील माशा , मधमाशा आणि साध्या माशा कुठलाही घराचा कोपरा बघून तिथं बस्तान बांधायचं ठरवतात , त्यांना समजावून , न मारता बाहेर काढायचे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात . त्यात टॉवेल घेऊन त्यांना हुसकावताना बरेचदा घरातले बल्ब , टेबलावरच्या वस्तू धारातीर्थी पडल्या आहेत. घरात कुठल्याही खिडकीला आम्ही पडदा लावला नाही. सकाळचा उजेड, दिवसाचा प्रकाश , संध्याछाया ते गडद अंधार सगळं अनुभवणं हा दिनक्रमाचा भाग झाला आहे . त्यांच्या वेळा  ऋतूप्रमाणे बदलतात आणि एका दिवसात इथे २-३ ऋतू अनुभवायलाही  मिळतात . ढग आणि  पाऊस नेहमीचे  सोबती - कधी रिमझिमत तर कधी कडाडत --त्यांचा मनोहारी संचार या खिडक्यांतून पाहण्यासारखे सुख नाही .

रोज नवा नजारा आणि अनुभव असतो . परवा तलावावर ---आता तलाव हे खरं तर फसवं संबोधन आहे . It is a garden pond . डबकं म्हणावसं वाटत नाही आणि तलाव म्हणजे विस्तीर्ण असं भाषिक समीकरण डोक्यात बसल्यामुळे प्रत्येक वेळेस तलाव म्हणलं की चुकीचं वाटतं , त्यामुळे pond च म्हणूयात . तिथे उभं राहून मी आणि ख्रिस्तिना , माझी मदतनीस  काय काम करायचं त्याचं नियोजन करत होतो. ख्रिस्तिना दर शनिवारी येते दोन तासासाठी , तिला मदतनीस म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलणं आहे , कारण तिला जेवढी झाडांची, बागेची , प्राण्यांची आणि एकूणच eco system ची माहिती आहे , त्या समोर मी म्हणजे किस झाड की पत्ती ...( सगळी झाड माहित असलेल्या   ख्रिस्तिना को  भी नही पता  :) ) . अचानक त्या pond मध्ये खूप बेडूक दिसले , भरपूर अंडी घातलेली . आम्ही दोघी अगदी हरखून गेलो . कसे ते बेडूक आता त्या विनाशकारी गोगलगाया , छोटे किडे  खाऊन टाकतील वगैरे . ते सगळे भलतेच आनंदात दिसत होते . आपण लहानपणी कसे साखरेचं पोतं ss खेळायचो तसं एकमेकांना पाठीवर घेऊन हुंदडत होते. मी ख्रिस्तीनला म्हणलं काय छान खेळताहेत , मला वाटतं मोठी बेडकं छोट्याना पोहायला शिकवत आहेत . ख्रिस्तीनला आता मी किती अज्ञानी जीव आहे ते कळलंय,  त्यामुळे लुक वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता ती मला मॅटर ऑफ फॅक्ट गोष्टी सांगते ... ते काही शिकवत नाहीयेत , त्यांच्या खाली पाण्यात मस्त रासक्रीडा चालल्यात , थोडा ऑक्सिजन घ्यायला ते टाइम्पलीज म्हणून पाण्याच्या वर येत आहेत . मोठी बेडकं नारी आहेत आणि त्यांच्या पाठीवर छोटे नर , त्यांच्यात असंच असतंय ...   हो का अच्छा sss

बऱ्याच दिवसाआधी मला रेडिओ वर ऐकलेली मुलाखत आठवली . इथे UK  मध्ये FRoglife म्हणून बेडकांचं संवर्धन करणारी संस्था आहे , त्यांच्या २८० शाखा आहेत आणि हजारो volunteers दरवर्षी जानेवारी ते मे मध्ये संध्याकाळी हातात बकेट घेऊन रस्ता ओलांडायला बेडकांना मदत करतात. त्याची पार्श्वभूमी अशी .. बेडूक अंडी घालायला त्यांच्या दरवर्षीच्या त्याच ठिकाणावर जातात. वाढणाऱ्या रस्ते आणि काँक्रीट  मुळे त्यांच्या परतायच्या वाटा बंद झाल्यात , पण ते आपला मार्ग काही बदलत नाहीत . आणि दरवर्षी या चार महिन्यात हजारो बेडूक गाडीखाली येऊन मरतात - इतके की त्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ४०% कमी झाली आहे आणि  त्याचे दूरगामी परिणाम शेती आणि अन्नधान्य निर्मितीवर होणार. गार्डन मध्ये छोटं पॉन्ड आणि त्यात किडींचा कर्दनकाळ बेडूक असणे ,  हे इथल्या गार्डन प्रेमींचं... बस इतनासा ख्वाब हैं ... असतंय ...

दुसरं या ख्वाब चं रूप म्हणजे गांडूळ -- जिथे माती सारावी , खणावं तिथं आहेत . खूप हरकायला होतं त्यांना बघून .  पण त्यांना सांभाळत , इजा न होऊ देता काम करणं काही शक्य नाही . त्यामुळं सगळी अहिंसा बाजूला ठेवून , चार्वाकाला स्मरून मी त्यांना पुढच्या जन्माची वाट दाखवते- बऱ्याचदा सांभाळून उचलून भाजीच्या वाफ्यांमध्ये नेणे यात बराच वेळ जातो .परवा भलं मोठं गांडूळ आत बाहेर करत होतं , मी थांबून ते बाजूला जाईल याची वाट पाहत होते . अशा वेळेला माझे ज्ञान चक्षु उघडतात एकदम --त्या दिवशी मला आपल्या आदिम संस्कृतीची नाळ किती घट्ट आहे वगैरे जाणवलं .. त्या गांडळा चं दिसणं , आकुंचन , प्रसरण , रंग पोत --- कुछ तो देखा पहचाना वाटलं . मग स्त्रियाच त्या आदिम संस्कृतीच्या वाहक हे अर्धसत्य आहे ,  हा साक्षात्कार झाला . मला एकदम माझ्यात  जगदीश चंद्र बोस यांची निरीक्षण शक्ती आणि रा चिं ढेरे यांचा  विश्लेषक मेंदू असल्याची जाणीव झाली ..या अभ्यास तंद्रीत अजून काही  गोष्टी त्या दिवशी कळल्या . 

मुळात माझं आणि गणित , विज्ञान यांचं काही फार सख्य नव्हतं . मोठी बहीण डॉक्टर , तिच्यानंतर ची इंजिनीअर आणि त्या जिथे शिकल्या तिथेच काही वर्षांनी मी गेल्यावर त्यांच्या इतके मार्क्स मिळवायची माझी आणि द्यायची शिक्षकांची तयारीच नसल्यामुळे कधी फार लक्ष ही दिलं नाही त्या विषयात. पण मला ज्या गोष्टी तेव्हा दिसायच्या , between the lines अँड behind the pictures ---त्याच दिसल्या . म्हणजे बोस साहेब -जाड भिंगाचा चष्मा आणि तासनतास एखाद्या पानाकडॆ बघत बसायचे , तो जेम्स वॉट्स किटलीतलं पाणी उकळून बाहेर सांडतंय तरी त्याच्याकडे बघत बसलाय , आर्किमेडिस आधी  पाण्यात पाय टाकून टाईमपास करत  बसला आणि मग गावभर  युरेका युरेका म्हणत तसाच बिन कपड्याचा बोंबलत गेला , न्यूटन टप टप पडती डोक्यावरती फळे अवस्थेत तसाच बसून राहिला ---- म्हणजे या बाप्याना काही कामधंदा होता की नाही?  -- असा गहन प्रश्न अगदी  ऐरणीवर आलेला असताना , त्या गांडूळाने शेवटी घमेल्यात उडी मारली आणि आपलं बरंच काम राहिलं आहे .. असं चिंतन करत बसायला आपण घुंगराळ्या केसांचे बापे माणूस नाही आहोत , याची सखोल जाणीव मला झाली. 

निसर्गात सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालू असतात, त्यांना एक लय असते पण मनुष्य प्राण्याच्या हस्तक्षेपामुळे हे संतुलन बिघडते असं आपण नेहमी ऐकतो .. आपला मेंदू खरंच तिरक्या चालीने चालतो असा माझा ही अनुभव आहे . संध्याकाळी चहा घ्यायला मी घरासमोर खुर्ची टाकून बसते.
shabana.jpg

काम झालेलं असतंय , मस्त व्यायाम झालेला असतोय -- सोशल मीडियाच्या रीळ मध्ये -- हा पाय दहा वेळा असा हलवला , वजन घेऊन इतके चाललात तर तुमचे  हात , पाय , कंबर कमानदार होईल-- तत्सम हालचालींपेक्षा भरपूर हालचाल झालेली असते आणि तरीही आपल्या वेगळ्याच कमानी तयार होत आहेत -- हे स्वीकारून छान चहाचा आस्वाद घ्यावा ..त्याच वेळी समोरच्या फांदीवर पारव्याची जोडी येऊन बसते.
titar.jpg
इकडून तिकडे , तिकडून इकडे - चकरा नखरा , नखरा चकरा चालू होतात . त्यात तो ( असा कयास आहे ,त्यांना they them म्हणलं तर कळणार नाही ) इतका रुंजी घालत असतो तिच्या आसपास , वेगळा रुबाब , ऐट असते त्याच्या चालीत तेव्हा . त्यांचे  आरव काही कळत नसले तरी त्याचा नाद तेव्हा महानोर आणि खेबूडकरांच्या गीतांसारखा वाटतो . हे प्रणयाराधन सात आठ मिनिटे चालते --ती राजी होते आणि दोन सेकंदात पुढचा कारभार आटोपतो -- माझ्या मानवी मेंदूला महानोर बाजूला ठेवून ते लहानपणी शाळेत लसीचे इंजेकशन द्यायला जे डॉक्टर  यायचे ते आठवतात -- तिकडे बघ, काय नाही होणार , पटकन सुई खुपसणार आणि लगेच -- झालं काही ? झालं काही ? दुखलं का नाही ss  नाss ... त्या वेळी जशी पोरं लंपास व्हायची , तसं वो परिंदी  तिसऱ्या सेकंदाला उडालेली असते ...पारवे आयुष्यभर जोडीनेच राहतात, प्रत्येक वेळेला एवढा प्रयास करणाऱ्याला आणि करवून घेणारीला मानलं पाहिजे . 

आजूबाजूला खारी, उंदीर , चिचुंद्र्या पाठशिवणीचा खेळ खेळात असतात . मागे हेझल , pine nuts ची झाडे आहेत . एक nut बघायला मिळत नाही - सगळी टरफलेच पडलेली -- चला आपल्या कंपोस्ट साठी तेवढी तरी ठेवतात यातच समाधान . थोडं आत गेलं की walnuts , chestnuts ची खूप झाडे आहेत . सप्टेंबर मध्ये भरपूर जमा केले. घराजवळ फार लावता येत नाहीत कारण त्यांच्या मुळ्या लांबपर्यंत जातात 

हरणं आणि जंगली रानडुक्करं जवळच वस्तीला आहेत , कुंपणामुळे आत येत नाहीत एवढेच . रात्री प्रवास करताना कधीही समोर येतील , हरीण ठीक आहे , गाडीसमोर रानडुक्कर आलं आणि जखमी झालं तर अख्खा ट्राफिक जाम होतो . इथले कसाई मग येऊन घेऊन जातात त्यांना - एका रानडुक्कराची विक्री साधारण २००० पाउंड पर्यंत होते . रानात फिरायला जायचे तर काही मार्गांवर एकटे जावू नकोस अशी तंबी गावातल्या लोकांनी दिली आहे . डुक्कर दिसले की काही न करता शांत उभी राहा , पण जर मिसेस डुक्कर आणि मुले असतील तर काही खैर नाही . जंगलात बरेच लोकांनी त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावलेत . त्यांची छायाचित्रे फेसबुक पेजला टाकलेली असतात.

जितकं हे सगळे बघून हरकायला व्हायचं तितकंच कधी कधी संध्याकाळ , रात्र वाढत जाईल तसं टरकायला पण व्हायचं. कोणीतरी घराबाहेर चालतंय असा सततचा  भास , काहीतरी वाजवतंय , दार लोटतंय , काहीतरी पडतंय -- नाना प्रकारचे आवाज . खूपदा बाहेर टॉर्च घेऊन बघितले -- किती शूर वाटतंय त्याच्यावर , बऱ्याचदा डोक्यावर गोधडी घेऊन बसून राहिले . आता हे फेसबुक पेज वर विचारण्याची हिम्मत नाही कारण त्यातून आलेल्या माहिती धीर देणारी असू नाही शकत . इथे alternative lifestyle वाले खूप आहेत . त्यामुळे energy healing , फॉरेस्ट बाथ , तऱ्हा तऱ्हेचे योगा क्लासेस वाले यांची खूप चलती आहे . काही दिवस टरकून राहिल्यावर --- किती दिवस तुम्ही रात्री भीती वाटते म्हणून सू दाबून ठेवणार - कधी ना कधी या existential प्रश्नांना भिडावेच लागणार ना . मग शांत विचार  केला --- असतील जे कोणी , ज्या कुठल्या स्वरूपात त्यांच्याशी आपण मैत्री केलेली बरी . पुढे जाऊन त्यांच्याबरोबर सलोखा तर ठेवावाच लागणार आहे . स्वर्गात जाऊ याची काही खात्री नाही , आणि गेलो तर तिथल्या कारभाऱ्याचे सततच डळमळलेले आसन असते, सगळ्यांची कामे नेमून दिलेली , आपल्याला करायला काय असणार ?  बरं तिथून जर घरवापसी झाली तर जन्नत मध्ये तर अजून बोरिंग ---नाना सुविधा , खायची प्यायची लूटमार -- हूर परी काय आपल्या कामाच्या नाहीत -- बसून करणार काय त्यापेक्षा  हा ट्रान्सीट चा आणि दुसरा पर्यायच  परवडला . तिथे कचऱ्यातून क्रांती , टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच कल्पनांना मूर्त स्वरूप देता येईल . त्यामुळे भीती फेकून मी मैत्रीला अगदी सज्ज होते पण हाय दैय्या --

 बाहेरचा पावलांचा आवाज म्हणजे २०० फुटावर जो रस्ता आहे , तिथे कोणी चाललं तर त्याचा निनाद वरपर्यंत येतो आणि घुमतो , त्याच्याच बरॊबर रस्त्याच्या पलिकडे एक लोखंडी सळी निघाली आहे त्याच्यावरून गाडी जोरात गेली की टण्ण असा आवाज येतो आणि त्याचा इको येऊन कोणी काही वाजवल्यासारख वाटतं. वरच्या कौलातून हवा येऊन दारं किलकिलतात , जोरात फांद्या हलल्या की वाऱयाच्या घुमण्याचा वेगळाच आवाज येतो, दगडांच्या कुंपणात सिमेंट काही भरलेलं नाही त्यामुळे चिचुंद्र्या खेळताना छोटे दगड खालीवर होत राहतात , पडतात ---- असं एक एक ज्ञानाचं कवाड उघडायला लागलं आणि  सलोखा भरे मैत्रीचे प्लॅन बासनात गेले. 

निवांतपणाच्या अशा संध्येला कुमारजींचे खोल स्वर मग वस्तीला असतात... 

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है....
 .   

लेख: 

वर
0 users have voted.