माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल. आई पेक्षा माझे वडिलांशी जास्त जमायचे कदाचित आई सतत कामात असल्यामुळे असेल. मी शाळेतून आल्यावर कोणत्या बाई काय म्हणाल्या सर काय म्हणाले हे सगळे मी दादांना सांगायचे. आणि तेही कौतुकाने ऐकायचे आणि वर काहीतरी मजेशीर बोलायचे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवायचो. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून मला झोपायची सवय होती. आठवीत असताना आम्ही दोघांनी एक प्लेटोचे शाळेचे पेन आणले होते. पाच रुपयाचे ते मी अकरावीपर्यंत वापरले. नंतर त्याचे निब खराब झाले त्यामुळे वापरायचे बंद करावे लागले. तेव्हा घड्याळ, पेन किंवा तत्सम वस्तू आम्ही कशी 20 किंवा 25 वर्ष वापरतो आहे हे अभिमानाने सांगितले जायचे.
आमचा बराचसा मिश्रीचा खप पुण्याला असायचा. घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट ने आम्ही माल पाठवायचो. तिथे एक गयावळ नावाचे आमचे दूरचे नातेवाईक होते. ते पुण्यात कस्तुरे चौकात राहत. नंतर वडील तिथे जाऊन दुकानदारांना ते सगळे पोहोचवायचे. बरेच वेळा माझे दादा मला पुण्याला त्यांच्याबरोबर घेऊन जात. दादा म्हणायचे की पुण्यात असल्यावर तू मला पाहिजे ते माग कारण मी इथे असल्यावर राजा असतो. तिथे त्यांच्याजवळ मिश्री विकून आलेले पैसे असत म्हणून ते तसे म्हणत. मग काय आम्ही दोघे सिनेमा, नाटक, हॉटेल सगळी मजा मजा करायचो. त्यांना बारीक-सारीक ठिकाणे पण सापडायची त्याचे मला नवल वाटायचे. एकदा ते पुण्याहून एकटेच येत होते आणि त्यांच्याजवळ सुट्टी नाणी एका पिशवीत होती ती त्यांनी एसटीमध्ये वरती जी जागा असते तिथे ठेवली होती. शेजारी बसलेल्या माणसाने जेव्हा त्यांना विचारले की काय आहे त्या पिशवीत तेव्हा ते म्हणाले की," अहो घराचे बांधकाम सुरू आहे त्यासाठी लागणाऱ्या चकत्या आहेत". माझ्या दादांचा स्वभाव फार मजेशीर होता. वाड्यात राहायला येण्यापूर्वी आम्ही जिथे राहत होतो तिथे अलीकडे पोलीस स्टेशन होते तिथून पुढे जाऊन थोडे वळले की आमचे घर होते. एकदा एका पोलिसाने त्यांना सायकलला लाईट नाही म्हणून पकडले. तो म्हणाला" चला पोलीस स्टेशनला"हे निघाले त्याच्या मागून पोलीस स्टेशनला, तो गेला आत मध्ये आणि हे मागच्या मागे घरी निघून आले. त्यांनी हा किस्सा आम्हाला सांगितला आणि आम्ही हसत बसलो.
मी सतत माझ्या दादांबरोबर असायची. असेच एकदा आम्ही दोघे पुण्याला कामानिमित्त गेलो होतो. रस्त्याने जाताना माझे दादा मला म्हणाले,"जरा बाजूला बसू या माझ्या छातीत दुखते आहे आणि हे जरा वेगळे दुखणे वाटते आहे."आम्ही दोघे बाजूला एका कट्ट्यावर बसलो. त्यावेळी मला इतके काही त्याचे वेगळे वाटले नाही. त्यानंतर ते म्हणाले ,"छातीचा कार्डिओ ग्राम काढून घ्यावा लागेल."1967 68 मध्ये एवढे काही उपचार नव्हते. आम्ही कार्डिओग्राम काढला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आहे. तेव्हापासून आमच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असायची. जरा कुठे ते नजरेआड झाले की वाटायचे त्यांना काही झाले का? त्यांना काही होईल का?. तशी मी तर सतत त्यांच्याबरोबर असायची. आई मला कधीच घरातले काम करू द्यायची नाही. खरंतर वाड्यातल्या माझ्यापेक्षा लहान मुली काम करताना बघून मला वाटायचे आपणही काम करावे आपणही भांडी घासावीत. ती छान चकचकीत झालेली भांडी बघायला मला आवडायचे. पण आई म्हणायची,"आपलं कुठं एवढं काम असतं "आणि मला काम करायला लावलेले माझ्या दादांनाही आवडायचे नाही. एकदा आईला ते म्हणाले की," मला रात्री स्वप्न पडले की तू शामाला भांडी घासायला लावली आहेत."आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना वाटले की त्यांचे काही झाले तर आई मला काम करायला लावेल. दोघांनी मिळून माझा नुसता लाडोबा करून ठेवला होता. मला मग पुस्तके वाचायचा नाद लागला. जेवढी मिळतील तेवढी पुस्तके मी हावऱ्यासारखी वाचून काढायची. माझ्या वडिलांना पण पुस्तके वाचायचा फार नाद होता. त्यांच्या एक दोन मित्रांची हॉटेल्स होती कुणाचे दुकान होते. मी शाळेत गेले की माझे दादा डुलत डुलत पाठीवर हात बांधून प्रत्येक मित्राकडे जाऊन पेपर वाचन करून येत. त्यातले अग्रलेख त्यांना विशेष आवडत. माझे दादा सातवीपर्यंत शिकले होते. पण त्यांना भरपूर माहिती असायची. एकदा ते म्हणाले १९७३ नंतर आपल्याला टीव्हीवर कार्यक्रम बघता येतील. आम्हाला त्यावेळी इतके काही कळले नव्हते. पण त्यानंतर कराड मधील अर्बन बँकेत टीव्हीवर कसे दिसेल त्याचे प्रात्यक्षिक बघायला शाळेने आम्हाला नेले होते. तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले होते.
मी आठवीत असताना आमची सहल पुण्याला सारसबाग, सरपोद्यान, आकाशगंगा बघायला गेली होती. आमचा मुक्काम एका शाळेत होता. तिथे आमची रहायचे म्हणजे झोपायची सोय केली होती. कडेला सगळे बेंच रचून ठेवले होते रात्री ते सगळे धडधड वाजले आणि हलत होते. आम्हाला असे का होते आहे हे कळले नाही. आमच्या बाई म्हणाल्या की, "भूकंप होतो आहे ". आम्हाला सगळ्यांना त्याची खूप मजा वाटली की, कसा भूकंप होतोय म्हणून. नंतरही त्याबद्दल आम्ही मजेने चर्चा करत होतो. कारण तो आमचा पहिलाच अनुभव होता. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. शिवाजी हायस्कूलच्या इथे बस थांबवली. आमचे आई वडील आम्हाला न्यायला आले होते. पण शाळेत सगळीकडे बेंचेस बाजूला करुन व्हरांड्यात ठेवून लोकांची राहायची सोय केली होती. कारण आम्ही अनुभवलेला तो भूकंप साधा नव्हता. कोयने मधील बऱ्याच घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती आणि बरेच लोक जखमी झाले होते. ते पाहिल्यावर आम्हाला भूकंपाचे गांभीर्य समजले. जिकडे तिकडे भीतीचे वातावरण, सतत भूकंपाचा धसका. त्यामुळे थोडे जरी हालायला लागले की वाड्यातील सगळे लोक बाहेर येत मग रात्र असो की दिवस. मी तर एवढी भीती घेतली होती की एकदा मध्यरात्री मला स्वप्न पडले की, भूकंप झाला आहे आणि आमचे घर अंगावर पडले आहे. मी पालथी पडून जोर जोरात ओरडत होते. माझे आई दादा मला उचलत होते पण मला काहीच कळत नव्हते. रात्रीचे तीन वाजले होते, आणि श्यामाला काय झाले म्हणून वाड्यातले सगळे लोक माझ्या भोवती जमले होते. थोड्यावेळाने मला पूर्ण जाग आली आणि मग लक्षात आले की अरे हे तर स्वप्न होते. तरीही माझ्या मनातली भीती काही कमी झाली नाही. सगळेच सतत काळजीत असायचे. रात्री कुणालाही नीट झोप यायची नाही. मग वाड्यातल्या पुरुष माणसांनी ठरवले की आपण रात्री अंगणात पत्ते खेळत बसू किंवा गप्पा मारत बसू, बायका मुलांना रात्री निवांत झोप काढू देत. आपण दिवसा झोपू. तसेही एक शिंदे भाऊ सोडले तर कोणाची बांधील नोकरी नव्हती. एक दोन ट्रक ड्रायव्हर होते पण बाकीचे लोक जमवून घ्यायचे. तरीपण सारखे घाबरल्यामुळे एक दिवस रात्री काही एक-दोन कुटुंब म्हणजे ते तोडकर गोटे गावचे होते ते त्यांच्या गावाला आणि आम्ही काल्याला यशवंत मास्तर होते त्यांच्याकडे गेलो. कारण आमचे गाव काले असून आमचा तिथला वाडा विकला होता. रात्री राहिलो सकाळी लक्षात आले की अरे हे तर दुमजली घर बाहेर पडेपर्यंत अंगावर पडायचे त्यापेक्षा घरीच जाऊ. पण आई म्हणाली तुम्हाला यायला पण दम नाही आणि जायला पण नाही, तुम्ही दोघे जा मी नंतर येते. आम्ही दोघे आलो. आई नंतर आली. सगळेजण परत आले . भूकंपाची भीती तर होतीच त्यात आता धरण फुटण्याची शक्यता वर्तवली जायला लागली. म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर 'अशी अवस्था झाली. त्यावेळी सावधानता म्हणून पोस्टामध्ये एक अलार्म बसवला होता, तो रोज सकाळी दहा वाजता ट्रायल म्हणून वाजवला जायचा. म्हणजे लोकांना कळायला की धरण फुटले तर असा अलार्म वाजेल. एकदा संध्याकाळी सहा सात वाजता कुणीतरी ओरडा केला की धरण फुटले. आणि सगळे लोक पळत सुटले, आम्ही पण सगळे पळत होतो. थोडे अंतर गेल्यावर कुणीतरी सांगत आले की अहो धरण वगैरे फुटलेले नाही. चोर लोक खोटे सांगतात त्यामुळे लोक घाबरून दारे उघडी टाकून पळत सुटतात आणि हे चोऱ्या करतात. मग पुन्हा सगळे परत आलो आणि हुश्य झाले. भूकंपाचा गोंधळ चालू असताना दादा म्हणाले,"आता आपण पुण्याला राहायला जाऊया. झाले पुन्हा' उचल तेल्या लाट, पुढची गल्ली गाठ', याप्रमाणे थोडं सामान घेऊन आम्ही तिघं पुण्याला गेलो. पण वाड्यातली खोली काही सोडली नव्हती. कारण विलास पेक्षा धाकटा भाऊ ज्याचे नाव देवदत्त होते पण त्याला आम्ही सगळे सु म्हणायचो. तर तो कारखाना सांभाळणार होता. मग काय पुण्याला गेलो त्याच गयावळांच्या वाड्यात एक छोटीशी खोली घेऊन राहिलो. तिथे कसे बसे तीन चार महिने काढले आणि पुन्हा भूकंपाचे वादळ थोडे शांत झाले असे वाटले म्हणून परत कराडला आलो.
आम्ही पुण्याला राहत असताना माझ्या वडिलांच्या मनात आले की माझ्या मुलीला धीट करावे, तिला स्वतःचे स्वतः बाहेर जाता यावे, बसने प्रवास करता यावा. त्यावेळी आम्ही कस्तुरे चौकात राहत होतो. मला एकदा दादा म्हणाले की, मंगळवार पेठेतून जिथे माझी मावशी रहात होती तिथून तू कस्तुरे चौकात एकटी बसने ये, त्याप्रमाणे मी एकटी जीव मुठीत धरून का होईना पण आले. जसे काही मी फार मोठा पराक्रमच केला आहे असे मला वाटले. दादानाही वाटले वावा माझी मुलगी धीट झाली. त्यानंतर एक दिवस मला म्हणाले तू आणि पपडी म्हणजे गयावळांच्यात एक मुलगी पाहुणी म्हणून आली होती. तर तुम्ही दोघी सारसबागेत बसने जा. मला वाटले हो मी करू शकते. ती मुलगी माझ्या एवढीच होती पण खेड्यात राहत होती आणि थोडी बुजरी पण होती. आम्ही दोघी बसने गेलो सारसबागेत. इकडे तिकडे थोडे भीत थोडे मजेने फिरत होतो. तेवढ्यात एक माणूस आमच्या मागे लागला. आम्हाला कळेना आता इकडे पळू की तिकडे . मग गेलो पलीकडे तळ्यातल्या गणपतीला. पण कसले काय हा माणूस तिथे पण आला. मग मात्र आम्ही खूप घाबरलो आणि पळत सुटलो. कुठे पळत होतो देव जाणे. तोही आमच्या मागे आला. तेवढ्यात समोरून पोलीस मामा येताना दिसला. थोडा धीर एकवटून आणि रडत रडत तो माणूस आमच्या मागे लागल्याचे मी त्याला सांगितले. त्या पोलिसाने लगेच त्याचे मानगुट पकडले, आणि त्याच्या थोबाडीत मारल्या. त्याला चल पोलीस स्टेशनला म्हणाला. आम्हाला वाटले आता आपले काम झाले आपण आपले घर गाठू या. पण कसले काय पोलीस मामा म्हणाले चला पोलीस स्टेशनला पोरींनो पोलीस स्टेशनला. पोलीस मामांना काही नाही वगैरे म्हणू शकत नव्हतो. मग आमची वरात पोलीस स्टेशनला निघाली. त्यांनी घरचा पत्ता विचारला आणि वडिलांचे नाव. एक पोलीस गेला दादांना बोलवायला. दादा आल्या आल्या त्यांनी आधी माझी पाठ थोपटली. पण तरीही मी खूप घाबरले होते. त्यामुळे रडायला लागले ती पपडी पण रडायला लागली. माझे दादा येईपर्यंत त्या माणसाला पोलीस स्टेशन मधल्या अजून एक दोन पोलिसांनी पण चांगला चोप दिला होता. पोलीस दादांना म्हणाले याची तक्रार नोंदवा पण मग तारखा पडल्या तर तुम्हाला कोर्टात यावे लागेल. दादा म्हणाले,"त्याला समज द्या आणि सोडून द्या". घरी गेल्यावर कळले की जेव्हा तो पोलीस दादांना बोलवायला घरी गेला, त्याने नाव वगैरे विचारले आणि आमचे नाव वगैरे सांगून चौकशी केली तेव्हा दादा त्या पोलिसाला म्हणाले की,"पोरींचा एक्सीडेंट वगैरे झाला की काय?". तेव्हा त्यांनी सांगितले की असे काही नाही आणि घडलेला प्रसंग सांगितला.
तर पुण्याहून आमचे 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर 'पुन्हा कराडला आले. माझी नववी आणि दहावी झाली. वडिलांना माझे फारच कौतुक, कारण माझी सगळी भावंडे सातवीपर्यंत शिकली होती. मी अकरावीत तरी गेले. शाळे व्यतिरिक्त ते मला घेतल्याशिवाय बाहेर पडत नसत. आई त्यांना म्हणायची,"अहो आता तिची अकरावी आहे तिला अभ्यास असतो, तिला कशाला नेता बरोबर?". माझे दादा म्हणायचे,"हे बघ ती माझी काठी आहे तिला मी नेणारच", वाड्यात तसे खेड्यातलेच भाडेकरू होते. त्यामुळे बायकांचे नाव घेऊन कोणी नवरे त्यांना बोलवत नसायचे. पण माझे दादा मात्र ही शेजार्यांकडे गेली असली तर , जोरात "सीता SS"म्हणून हाक मारायचे. आणि वाड्यातल्या बायका गालातल्या गालात हसायच्या. माझ्या दादांना पान खायची खूप सवय होती. ती पाने आणून पुसून त्या पानाच्या डब्यात ते अगदी निगुतीने ठेवायचे. त्यांचे तोंड सतत रंगलेले असायचे त्या पानांचा वासही छान यायचा. सण असेल त्या दिवशी मात्र बायका हौसेने," दादा आम्हाला पण पान द्या" म्हणून हक्काने मागायच्या. ते पण छान पानाचा विडा करून द्यायचे. ते जेव्हा जेव्हा बांगड्या, रिबन किंवा जे काही माझ्यासाठी पुण्याहून आणत ते वाड्यातल्या सगळ्या मुलींसाठी पण आणत. तसेच आवळे, बोरे, जांभळे हे देखील सगळ्यांसाठी आणत. त्यामुळे माझे दादा सगळ्यांचे आवडते होते आणि माझे सुपर हिरो. कारण मला त्यावेळी नेहमी वाटायचे की माझे दादा काहीही करू शकतात आणि कुठलाही प्रसंग आला तरी त्याला तोंड देऊ शकतात. वाड्यात असताना मजा म्हणजे कोणीही कुणाकडे कधीही जायचे अगदी स्वतःच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यासारखे. त्यामुळे एका खोलीत राहतोय असे कधी वाटले नाही आणि वैषम्य तर मुळीच नाही. उलट दोन रूम मधून चार रूम चार रूम मधून नऊ रूम मध्ये आले तरी त्या वेळची मौज माझ्या मनाला अजून सुखावते. एकदा अण्णांची अरुणा आली आणि दादांना म्हणाली," मला रात्री स्वप्न पडले की तुम्ही पुण्याहून रेडिओ आणलाय". त्यावर दादा म्हणाले की,"हो आणि शामा रेडिओच्या गाण्यावर डुलतेय आणि तू तिकडून पुक्कन लाईट बंद केलीस,हो ना ?" काय बोलतील आणि काय नाही कळायचे नाही. विशेष म्हणजे आमच्या दोघींना लागणाऱ्या सगळ्या वस्तू दादा स्वतः आणायचे.
कराडला परत आल्यानंतर एकदा माझी आई पुण्याला माझ्या मावशीच्या डिलिव्हरीसाठी गेली होती. तेव्हा नेहमीप्रमाणे मी व माझे दादा रात्रीच्या वेळी एका ताटात जेवत होतो आणि अचानक तो धरण फुटल्याचा अलार्म वाजायला लागला. मी दादांकडे आणि ते माझ्याकडे असे नुसते बघायला लागलो. मला वाटले आता काय करायचे. नंतर दादा मला म्हणाले की,"हे बघ मी जरी पळालो तरी कुठेतरी पडेन."(कारण त्यावेळी त्यांना अटॅक येऊन गेलेला होता.) "त्यापेक्षा तू वाड्यातल्या लोकांबरोबर पळत जा". त्यांना सोडून जायचा माझा काही जीव होईना. आम्ही दोघे स्तब्ध,असहाय्यपणे एकमेकांकडे नुसते बघत राहिलो. त्यावेळी देवाचा धावा करण्याचे देखील सुचले नाही. पण थोड्याच वेळात कोणीतरी सांगत आले की, तो अलार्म चुकून वाजला होता आणि आमचा जीव भांड्यात पडला. नंतर एकदा दुपारी मी आई आणि माझे दादा घरात होतो, अचानक त्यांना घाम आला आणि ते बेशुद्ध झाले. बापरे त्यावेळी मला कळले की ब्रम्हांड आठवणे म्हणजे काय असते ते. तो प्रसंग घडून जवळजवळ 50 एक वर्ष होऊन गेली पण अजून मला जसाच्या तसा आठवतो आहे. त्यानंतर ते बरे झाले पण तरीही सतत काळजी असायची.
