जुने दिवस - स्मरण रंजन - भाग ४

मी नववीतून दहावीत गेले तेव्हा माझ्या भाऊजींची बदली कराडला झाली. त्यांना खोली मिळेपर्यंत आम्ही चौघं ,माझी ताई भाऊजी आणि त्यांची तीन मुलं एवढे त्या एका खोलीत राहत होतो. तरीही त्यावेळी काहीच अडचण वाटली नाही. त्यानंतर त्यांना बुधकर वकिलांच्या चाळीत दोन रूमची खोली भाड्याने मिळाली. ते तिकडे राहायला गेले. माझी लिलाताई खूप अगत्त्यशील होती. त्यामुळे काल्याहून कराडला येणारे लोक आता आधी ताईकडे जात आणि मग आमच्याकडे येत. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. मी पहिलीत असल्यापासून नेमके माझ्या रिझल्टच्या वेळी ताई-भाऊजी सुट्टीमुळे कराडला यायचे. माझा रिझल्ट लागला की भाऊजी पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे,"जा पेढे आण जा". भाऊजींची पर्सनॅलिटी पाहता स्वभाव रागीट वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे त्यांना घाबरून असायचो. ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. आम्ही ताईकडे गेलो असताना मी म्हणाले की आम्हाला भगवत गीता शिकवत आहेत मला एक छोटी गीता आणायची आहे. त्यांनी लगेच एक छोटी गीता काढून मला दिली आणि म्हणाले,"ही घे, ही तुझ्या कंपास मध्ये बसेल."मी आठवीत असताना त्यांनी दिलेली ती गीता अजूनही माझ्याकडे आहे. गुरुकृपा म्हणायची दुसरे काय? भाऊजींना आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा. माझी ताई पण सुगरणच होती. मला तिच्या हातचे जेवण खूप आवडायचे, छानच करायची. तिला चार मुलगे आणि एक मुलगी होती. अनंताच्या पूजेला तर आमच्या काकांची फॅमिली,आम्ही सगळे, माझा अण्णा तोही ओगलेवाडीला बदलून आला होता, त्याचे कुटुंब शिवाय तिच्या सासरचे लोक असे सगळे यायचे. एवढ्या सगळ्यांचे ती अगदी मनापासून करायची. हसत मुखाने, कधी दमले बाई म्हणालेली मला आठवत नाही.

माझा भाऊ अण्णा, त्याचाही माझ्यावर खूप जीव होता. तो ग्रामसेवक होता आधी तो किन्हईला होता, त्यानंतर वाघोलीला, जिथे जिथे त्याची बदली होईल तिथं तिथं आम्ही जाऊन राहायचो. तिथल्या लोकांना भेटायला न्यायचा त्यांना कौतुकाने ही माझी धाकटी बहीण आणि आई म्हणून ओळख करून द्यायचा. तो ग्रामसेवक असल्यामुळे त्याला सगळे अण्णासाहेब म्हणत. तो जिथे जिथे गेला तिथे त्यानेही माणसे जोडली. त्याच्याकडे सुट्टीत महिना पंधरा दिवस आम्ही जाऊन राहत असू. जवळपास जे पाहण्यासारखे असेल तिथे तो आम्हाला दाखवायला न्यायचा. त्याची मित्रमंडळी देखील चहासाठी बोलवत. त्याचाही स्वभाव फार गंमतशीर होता. त्याने भिंतीवर देवांच्या काही फ्रेम्स लावल्या होत्या. तेव्हा तो सांगायचा की हा अमका देव हा तमका देव आणि नंतर तिथे एक कॅलेंडर लावले होते ते दाखवून म्हणायचा आणि हा देव आनंद. एकदा आम्ही दोघं एका दुकानात काहीतरी आणायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली की, "एक रुमाल द्या "तेव्हा हा म्हणाला की, "हो हो लवकर द्या. "आणि माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसत होता. कारण ती मुलगी सारखी नाक फुरफुर करून ओढत होती. तो रिटायर झाल्यावर माझे काका वारले तेव्हा त्याने एक पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. थोडे इकडच्या तिकडे झाल्यावर मला म्हणाला,"अगं हे कपडे मी कोणाच्या अशा कार्याला जाताना घालायलाच ठेवले आहे, कारण हे शिवल्यापासून सारखे कुणाच्या ना कुणाच्या कार्यालाच जावे लागते आहे". आणि म्हणाला "असं कार्याला का होईना यायचे म्हणजे मला बरा टाईमपास झाला आहे" कारण तो ओगलेवाडीत राहत होता आणि बाकी सगळे कराडमध्ये. आईचा पण माझ्या सर्व भावंडांवर जीव होता. सख्खे सावत्र असे कधी मनातही आले नाही. एकदा मी आणि आई ओगलेवाडीला अण्णा कडे गेलो होतो, त्याचवेळी तो समोरून येताना दिसला. त्याला पाहून आई म्हणाली,"बघ कसा अमिताभ बच्चन सारखा दिसतोय" कारण तो खूप उंच होता आणि त्याने दाढी वाढवली होती आणि ती पांढरी झाली होती. आमच्या वहिनी नेमक्या बुटक्या आहेत. त्यामुळे त्यांना जया-बच्चन ची जोडी असे म्हणायचो. फक्त अरुणचा सहवास मात्र मला जास्त लाभला नाही. तो पण ग्रामसेवक होता. पण तो लांब कोकणात असायचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणे झाले नाही तो येईल तेवढाच त्याचा सहवास.

विलास आणि सु हे दोघे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर घरीच होते. आधी विलास आला. त्याचे आणि माझे फार जमायचे. मी पाचवीत गेले तरी तो मला पाठीवर उचलून घ्यायचा. मी सहावीत गेले त्यावर्षी गणिताचे पुस्तक बदलले होते आणि बरीच दुकाने शोधली पण मला काही पुस्तक मिळाले नाही. मग विलास म्हणाला तुझ्या एखाद्या मैत्रिणीचे पुस्तक आण मी लिहून काढतो, त्याचे अक्षरही छान होते. त्याने थोडे लिहायला सुरुवात केली, आणि मग ते पुस्तक मिळाले. त्याने मला सायकल चालवायला शिकवली. विलास मला सायकल वरून काल्याला घेऊन जायचा. त्याचाही स्वभाव विनोदी होता. दुसरे म्हणजे त्याला एक सवय होती आपण म्हणालो ना," जेवण तयार आहे जेवून घे " तर तो म्हणणार "मला आत्ता भूक नाही" आणि एखाद्या वेळेस स्वयंपाक तयार नसेल तर म्हणणार,"मला सिनेमाला जायचे आणि अजून स्वयंपाक तयार नाही". असा उलट वागायचा म्हणून कधी आपण त्याला उलट सांगितले तर मात्र बरोबर सुलट वागायचा. एकदा तो सांगत होता की, हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या वेटरला म्हणालो की,"रवा लाडू दे" वेटर म्हणाला" रवा लाडू नाही ". तर हा म्हणाला मग " गरा लाडू दे ". "तर तो वेटर माझ्याकडे बघून हसला". हा किस्सा त्याने सांगितल्यावर आम्ही सुद्धा खो-खो हसलो आणि त्याला म्हणालो की,"अरे रवा आणि गरा एकच आहे" तो आणि मी सुद्धा एका ताटात जेवायचो. त्याचे मिल्ट्रीतले मित्र त्याला भेटायला यायचे, ते म्हणायचे ,"तुम्ही सावत्र भावंडे आहात यावर विश्वास बसत नाही". एकच खोलीत असल्याने सगळे समोरच असायचे. एकदा विलास त्याच्या एका खेड्यातल्या मित्राकडे जाऊन आला होता. त्यानंतर त्याचा एक मित्र भेटायला आला. तर याने त्याला अण्णांच्या म्हणजे घर मालकांच्या ऑफिसमध्ये बसवले, आणि तिथे नेऊन चहा दिला. सगळे झाल्यावर तो मित्र म्हणाला,"चला आता आईची आणि श्यामाची गाठ घेतो आणि जातो". आणि तो आम्हाला भेटायला घरात आला. तर त्याचे काय झाले होते. खेड्यात मोठी घरे असतात. आणि बायका सहसा बाहेर येत नाहीत हे त्याने त्या खेड्यातल्या मित्राकडे पाहिले होते म्हणून तो पण तसे करायला गेला, पण मित्राने त्याचा बेत हाणून पाडला. पुन्हा काही तो असे काही करायच्या भानगडीत पडला नाही.

पुढे तो मिलीटरीमधून रिटायर झाल्यावर कोल्हापुरला राजाराम कॉलेजला,सुरक्षा रक्षक म्हणुन कामाला लागला. एकदा त्याच्याकडे कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. बऱ्याच वर्षात तिथे राहणारी माझी मैत्रीण आशा नाईक हिला भेटले नव्हते. तिचा पत्ता शोधून काढून आम्ही दोघेच तिच्या घरी गेलो. तिने छान पोहे आणि चहा केला. खूप गप्पा मारून घरी आलो. त्यानंतर विलास मला म्हणाला की,"अगं तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी एक महत्त्वाची वस्तू दिली, थांब मी तुला देतो." आणि त्याने खिशात हात घातला. मला वाटले तिने मला न देता याच्याजवळ एवढे काय बर दिले असेल. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याने त्याची मूठ अगदी अलगद उघडली आणि काय एक छोटासा हरभऱ्या एवढा खडा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. तर म्हणतो कसा,"अग तिने पोहे खायला दिले होते ना त्यात सापडला मला". मग काय बसलो आम्ही हसत.

मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्याकडे गेले होते. वहिनी म्हणाल्या होत्या की मी सगळे करते, तसे त्या हौसेने सगळे करतात. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर विलास मला ताजे ब्रेडचे स्लाईस आणि एक मोठा ग्लास भरून गरम दूध द्यायचा. त्याचे पण माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम होते. तरीही कधी कधी आमच्यात रुसवे फुगवे अबोला एक एक दोन दोन वर्षे चालायचा, कारण तसं किरकोळच असायचं. पण आईसारखी आण्णाला विचारायची की,"विलास कसा आहे रे? तो सारखा माझ्या स्वप्नात येतो". असे आम्ही सगळे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले होतो. सख्खे सावत्र असले आमच्या डोक्यातही नसायचे. तर असाच एकदा एक वर्षाचा अबोला होता. आणि अण्णाच्या सगळ्यात धाकट्या मुलाचे सोमाचे लग्न होते, त्यासाठी आम्ही सगळे ओगलेवाडी जमलो होतो. लग्न वगैरे झाल्यावर आई अशीच गप्पा मारत बसली होती. मीही तिथेच उभी होते. तेवढ्यात विलास समोरून आला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून नुसता रडत होता. आईच्या पण डोळ्यातून दोन दोन धारा आणि माझ्यापण. आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. फक्त अश्रूंचा अभिषेक सुरू होता. अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात आपसूकच पाणी येते. अगदी आताही हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत पुढचे लिहायला दिसेना.

मी आठवीत गेल्यापासून माझा वाढदिवस निदान छोटासा केक आणून साजरा करायला दादांनी सुरुवात केली होती. त्यांचा स्वतःचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र ते म्हणायचे," आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे सुधारस करतो". त्यांना स्वतःला शिरा, उपीट, भडंग, पिठले एवढेच नाही तर कैरीच्या सीझनमध्ये कैऱ्या आणून त्याचा गुळांबा करायचे. आमच्यात कधी दूध नसले तर, नंदाच्या आई म्हणायच्या "द्या ते दूध त्यात साखर घालून आमच्या नंदाला देते तिला आवडते."त्यांचा नवरा म्हणजे तहसील कार्यालयात होते तेच ते शिंदे भाऊ. त्यांचा स्वभाव पण रागीट होता. मात्र तेही सुट्टी दिवशी किंवा ऑफिस वेळ व्यतिरिक्त आमच्याकडे येऊन बसत. त्यांनाही माझ्या अभ्यासाचे कौतुक वाटायचे. आणि आईच्या स्वयंपाकाचे पण. एकदा आई पुरणपोळी करत असताना ते आले होते, ते त्यांच्या बायकोला म्हणजे नंदाच्या आईंना म्हणाले,"जा बघ शामाच्या आई कशा छान पुरणपोळ्या करत आहेत." तसेच एकदा आई मोदक करत होती तेव्हाही म्हणाले ,"बघ जा शामाच्या आईने किती छान मोदक केले आहेत". त्याही नंतर शिकून तयार झाल्या. नंदाच्या आईंचा पण स्वभाव फार हळवा होता. एकदा त्या जोरजोराने रडत आमच्या आईकडे आल्या, आईला वाटले की भाऊंचे आणि दोघांचे भांडण झाले की काय. नंदाच्या आईंना विचारल्यावर कळले की त्यांचे गावाकडचे चुलते बैलाने मारले त्यामुळे त्यांचे निधन झाले. आईने त्यांना थोडे समजावले. त्यानंतर बरेच दिवसांनी तशाच रडत त्या आमच्याकडे आल्या. आईला वाटले आता काय झाले कुणी गेले की काय? ती म्हणाली,"काय झाले ?"तर त्या म्हणाल्या की भाऊंची "बदली वाईला झाली आहे ". त्यावर आई म्हणाली की," अहो चांगले झाले तुमचे जांब गाव तिथून अगदी जवळ आहे ". तेव्हा नंदाच्या आई म्हणाल्या,"तेच तर आता मला घरी म्हणजे सासरी राहावे लागणार, आणि आमची सासू मला मिश्री घासू देत नाही." यावर आई काय बोलणार तेव्हाही तिने कशीबशी त्यांची समजूत घातली. भाऊंना त्या कोणाच्या घरात गेलेल्या आवडायचे नाही पण आमच्या घरी मात्र आलेले चालायचे. आमच्या मिश्री च्या पुड्या त्या पण बांधयच्या. त्या पैशातून त्यांनी सोने घेतले होते. तेव्हा सोन्याचा दर दीडशे किंवा फार तर अडीचशे रुपये असेल. आईने पण हौसेने सोन्याची एकदाणी केली होती. एकदा नंदाच्या आईंना लग्नाला जायचे होते तेव्हा त्या आईला म्हणाल्या,"तुमची एकदाणी जरा देता का? मला लग्नाला जायचे आहे". आईने ती दिली होती. माझ्या दादांनी त्यावेळी नवीन निघालेली पॉलिस्टर साडी पुण्याहून आईसाठी आणली होती. नंदाच्या आई एक दिवस सिनेमाला निघाल्या होत्या तेव्हा आईला म्हणाल्या की,"तुमची ती नवी साडी मला नेसायला देता का?". आईने दिली. दुसऱ्या दिवशी साडी परत देताना नंदाच्या आई, हसत हसत म्हणाल्या,"तुमच्या साडीचा पायगुण चांगला आहे,"आई म्हणाली," का काय झाले ?. त्या म्हणाल्या,"अहो सिनेमाला गेले तेव्हा मला चाळीस रुपये सापडले,". असा तेव्हा साध्या साध्या गोष्टीत खूप मोठा आनंद मिळायचा. तेव्हा जास्त कपडे कोणाकडेही नसत. मी जेव्हा कॉलेजला जायला लागले तेव्हा वाड्यातल्या बायका नवी साडी आणली की, आवर्जून मला घडी मोडायला देत. ती साडी हलकी आहे की भारी आहे असले मनातही यायचे नाही. नवी साडी मिळाली ना नेसायला हेच खूप झाले. एवढेच नाही तर नवीन साडी किंवा कपडे आणले की, यांना हळदी कुंकवाचे बोट लावून देवापुढे ठेवून मग घालायचे, आणि मोठ्यांना नमस्कार करायचा. तेही सुख वेगळेच.

पूर्वी पत्र यायची ती सहसा पोस्ट कार्ड उघडे असायचे. घरमालकांची अरुणा बरेच वेळा वाड्याच्या दिंडी दरवाजाजवळ एक कट्टा होता त्यावर बसलेली असायची, पोस्टमन आला की ही कुणाचे असेल ते पत्र घ्यायची. आणि पत्र आपल्या हातात पडायच्या आत सगळा मजकूर आमच्यापर्यंत पोहोचायचा. कारण झेंडा फडकवल्यासारखे ते पत्र फडकावत मजकूर सांगत आम्हाला द्यायची. आता त्या गोष्टीचे हसू येते आहे पण त्यावेळी खूप राग यायचा. तिला सिनेमाचे खूप वेड होते आणि गाण्यांचे पण. नव्या साडीची घडी पण ती सिनेमाला जाताना मोडायची. दुसरे म्हणजे माझे दादा पुण्याला गेलेले असले आणि त्यांचे कुणी मित्र आले की त्यांना वाड्याच्या दारातच सांगायची,"दादा नाहीत घरी ते पुण्याला गेलेत येतील चार दिवसांनी". त्यामुळे दादा घरी नसल्याची खबर वाड्याच्या दारातच त्यांच्या मित्रांना मिळालेली असायची

माझे दादा अगदी अवलिया होते. सतत काहीतरी उदाहरणे देत असायचे. हे ही विनोदी पद्धतीने. त्यांच्या मित्राची मेहुणी खेड्यातून तिच्या काहीतरी कामासाठी आमच्याकडे नेहमी यायची. तिला बोलताना सवय होती की," मी पण, हंगणे मारले" (म्हणजे टोमणा मारला). मग दादांनी तिचे नावच, हंगणे ठेवले होते. आमची एकच रूम होती आणि बाहेरून आले की थोडासा अंधार वाटायचा, स्पष्ट दिसायचे नाही. त्यांच्या मित्राने एके दिवशी ती मेहुणी येणार असल्याचे सांगितले होते. दादा बाहेरून आल्या आल्या म्हणाले की," हंगणे आले होते का? " मी आणि आई एकदम अवाक झालो कारण हंगणे तर तिथेच बसले होते. नशीब तिला काही समजले नाही. आणि आम्ही हुश्य केले. थोड्याच वेळात त्यांना पण दिसले आणि ते गप्प बसले. त्यानंतर घरमालकांच्या रानातल्या वहिनी असे ज्यांना आम्ही म्हणायचो त्यांना प्रत्येक वाक्यानंतर,"आता का वनवा का का झाला"असे म्हणायची सवय होती. मग त्या बोलायला लागल्या की आधीच दादा,"आता वनवा का का झाला". असे स्वतः म्हणायचे. आम्हाला खूप मजा यायची . बरं समोरच्या माणसाला हे मज्जा करतायेत हे लक्षात पण यायचे नाही. आणि ते आईची पण फिरकी घ्यायचे. आधी जिथे आम्ही राहत होतो तिथे लाखोळे म्हणून राहत होते त्यांची बायको हिची मैत्रीण होती. एकदा तिच्या मुलीचे लग्न होते आणि तिच्याकडे खूप पाहुणे आले होते म्हणून ती आईला म्हणाली की,"मला तुमचे गजराचे घड्याळ आणि बंब देता का?"आईने ते दिले. तेव्हा माझे दादा आईला गमतीने म्हणाले की,"एखाद्या दिवशी तुमचा नवरा जरा उसना देता का म्हटले तर तू मलाही देशील"आई काय बोलणार डोळे मोठे करून गप्प बसायची. कधी दोघांचे कशावरून भांडण झाले तर मला म्हणायचे,". झांटीपी आहे नुसती ". आणि मला स्वतः सांगायचे की सॉक्रेटिस ची बायको. एकदा विलासने मिल्ट्रीत असताना ताज महाल पाहिला तेव्हा त्यावर चांदण्या कशा चमकतात ते पत्रात लिहिले होते. त्यावर यांनी आमच्या डोळ्यासमोर दिवसा चांदण्यात चमकतात (पैशांची कायम चणचण) असे लिहिले होते.

आमच्या दोघांचे एवढे बॉण्डिंग होते की, माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांना माहीत होत्या. माझी एक अलका नावाची मैत्रीण फक्त इयत्ता पाचवी पर्यंत माझ्या वर्गात होती. त्यानंतर तिच्या वडिलांची बदली सांगलीला झाली. पण आम्ही दोघी एकमेकींना पत्र लिहायचो. त्यामुळे सत्तरीला आलो तरी एकमेकींच्या संपर्कात आहोत. तर माझ्या दादांना त्याचेही कौतुक होते. एकदा मला म्हणाले, " चल मी जयसिंगपूरला कामासाठी जाणार आहे जाताना तुला अलकाकडे सोडतो आणि येताना न्यायला येतो" मला तर खूप आनंद झाला. तेव्हा काही आधी फोन करा कळवा असली भानगड नव्हती. उठायचे की वर तोंड करून जायचे. जाणाऱ्याला जेवढा आनंद व्हायचा, तेवढाच आनंद ज्यांच्याकडे गेलो त्यांनाही व्हायचा. आम्ही दोघे गेलो, मी तिथे दिवस भर थांबणार होते. मग काय तिच्या आईने मला छान जेवू घातले नंतर आम्ही पिक्चर ला गेलो मज्जा मज्जा केली. संध्याकाळी माझे दादा मला न्यायला आले. तिकडून आल्यानंतर मी खूप आजारी पडले मला टायफॉईड झाला, उठवत नव्हते खूप अशक्तपणा आला होता. त्यामुळे अलकाला काही पत्र वगैरे पाठवले नाही. मग तिचे पत्र आले की तू गेल्यापासून पत्र का नाही पाठवले. त्या पत्राला माझ्या दादांनी उत्तर पाठवले की अगं ती खूप आजारी आहे बरी झाली की पाठवेल तुला पत्र. त्यावेळची साधारण पाचवीपासूनची तिची आणि दुसरी एक माझी मैत्रीण उज्वला बुरसे यांची पत्रे मी अजून जपून ठेवली आहेत. माझ्या दादांचे त्यांनी विलासला लिहिलेले 1970 चे एक पत्र मी अजून ठेवले आहे. तीच माझी मैत्रीण उज्वला जवळजवळ वीस वर्षांनी भेटल्यानंतर तिच्या नवऱ्याला सांगत होती की शामा म्हणजे तिच्या दादांचा जीव की प्राण होती. खरोखर माझ्या दादांचे जेवढे प्रेम मला मिळाले ते आज सत्तरी पर्यंत मला पुरले आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ते माझ्या सोबत राहील. एकदा त्या गयावळांच्या बायकोने आम्हाला दोघांना चहा दिला नंतर ती सहज मला म्हणाली जा तेवढ्या कप बशा धुवून आण. अरे बापरे, माझ्या दादांना एवढा राग आला, मला म्हणाले पुन्हा त्यांच्या घरचा चहा सुद्धा नको. यांच्या मुलीला तेही लाडक्या लेकीला काम सांगतात म्हणजे काय.

दादांचे आजोबा म्हणजे त्यांच्या आईचे वडील सावकार होते, काले गावात खूप मोठा वाडा आणि शेती होती. माझे आजोबा घरजावई होते. पण हे सगळे वैभव गेल्यानंतर एका खोलीत राहताना मागच्या वैभवाची आठवण काढून दुःखी झालेले कधीच पाहिले नाही. आहे त्या परिस्थितीत राजासारखे राहत. तेच नव्हे तर माझे काका-काकू आणि चुलत भावंडे देखील कधी त्या वैभवाचा उल्लेख करत नसत. आहे त्यामध्ये खुश रहात कधी रडगाणे गात बसायचे नाहीत. वाडा असताना माझे दादा आणि माझा भाऊ विलास मला सायकलवरून काल्याला न्यायचे. कराड पासून काले गाव सात किलोमीटर अंतरावर आहे. माझे वडील आजीला भेटायला जाताना मला घेऊन जात. आजी खूप वयस्कर होती आणि ती वडिलांना म्हणायची ,"बाबू मला विहिरीच्या काठावर नेऊन ठेव". त्यावेळी मला त्याचा अर्थ कळायचा नाही. पण ती जीवाला कंटाळली होती त्यामुळे तसे म्हणत असेल हे नंतर कळले. माझ्या काकांनी एक चारचाकी गाडी घेतली होती ते काले - कराड अशी ट्रिप करत म्हणजे लोकांना ने-आण करत. तेव्हा ते माझ्या वडिलांकडून पण पैसे घेत. त्यावेळी काहीतरी 50-55 पैसे वगैरे असतील.

मला एकच सख्खे काका होते. चुलत काका चार होते आणि चुलत आत्या चार. सगळ्यांची परिस्थिती जेमतेमच होती. फक्त एक मुक्ता आत्या होती, ती खूप श्रीमंत होती तिचा नवरा अकोल्यामध्ये इंजिनियर होता. त्यामुळे ते नातेवाईकांना भेटायला आले की लॉजवर राहत. विमला आत्या म्हणून होती तिच्या मुलाशी माझ्या मोठ्या बहिणीचे म्हणजे लीला ताईचे लग्न झाले होते. त्यांचे गाव कागल होते. ते माझे भाऊजी ठाण्याला होते. मला सगळ्यात जास्त सहवास विठा आत्या आणि बंडू काकांचा लाभला. बंडू काकांची तर मी खूप लाडकी होते. ते किर्लोस्करवाडीत स्टेट बँकेत शिपाई होते. किर्लोस्करवाडीत सगळ्या कर्मचाऱ्यांना मग बँकेतला असो किंवा किर्लोस्कर कारखान्यातला, त्यांना राहायला स्वतंत्र घरे असत बाजूला मोठे कंपाऊंड आणि स्वतंत्र बाथरूम, तीन रूम. माझे चुलत आजोबा आणि आजी काकांकडे असायचे. विठा आत्या पण किर्लोस्करवाडीत राहत होती पण ती थोडी बाजूला राहायची. बरेच वेळा ती आणि तिची मुले काकांकडे असायची. मला काकांचे ते घर खूप आवडायचे. शिवाय ती आजी पण सुगरण होती. छान छान स्वयंपाक करायची. त्या आजोबांना पण चवीचे खायला लागायचे. त्यामुळे ते पुरणपोळी असेल त्या दिवशी आधीच खपली गहू आणून ते दळून वापरायला लावत, आणि बजावत आज काकडी कोचू नका नाहीतर कणिक बिघडेल. त्यावेळी किर्लोस्करवाडीला जायचे म्हणजे रेल्वेने जावे लागे. ते एक अट्रॅक्शन होते. काका माझ्यासाठी कराडला येत आणि मला घेऊन काल्याला जात. नेहमी माझ्या हातून लॉटरीचे तिकीट काढत. दुर्दैवाने कधी लागले नाही ती गोष्ट वेगळी. त्यांनी मला स्टुडिओमध्ये नेऊन त्यांच्याबरोबर माझा एक फोटो पण काढला होता. तेव्हा असे उठता बसता फोटो काढता यायचे नाही त्यामुळे फोटोचे खूप अप्रूप असायचे. काकांना कुणी विचारले की ' काय कसे काय चालले आहे?"तर ते हसून म्हणत "चलती का नाम गाडी". तेव्हा त्या नावाचा किशोर कुमारचा एक सिनेमा आला होता. मी मोठी झाल्यावर सुद्धा मी अभ्यासासाठी काकांकडे महिना महिना जाऊन राहायचे. तिथे विठाआत्याची संजीवनी नावाची मुलगीही असायची, ती माझ्या एवढीच होती त्यामुळे मला तिथे करमून जायचे.

माझ्या दादांना सोव्हिएत देशाविषयी फार प्रेम होते. त्यांनी कुठून एक लेनीनचा फोटो आणून फ्रेम करून घरात लावला होता. शिवाय आमच्याकडे सोव्हिएत नावाचे एक मासिकही यायचे. त्यांचे एक किरपे गावचे देवकर म्हणून मित्र होते. धोतर फेटा असा त्यांचा पेहराव होता. माझे दादा त्यांना सर स्ट्राफोर्ड क्रिप्स असे म्हणत. हे स्टाफोर्ड स्क्रिप्स कोण हे मला अद्यापही कळले नाही. काल्याचे एक बटू अण्णा म्हणून आमच्याकडे येत ते उंच होते. आमची शनिवारातली खोली छोटी होती पण तिला दोन दारे होती. मागच्या दाराची उंची फार कमी होती. ते बटू अण्णा आले की मागचे दार कमी उंच आहे हे त्यांच्या लक्षात यायचे नाही. आणि दर वेळेस त्यांचे टक्कल असलेले डोके चौकटीला धडकायचे. माझे दादा म्हणायचे,,"बटू अण्णा बाहेर जाताना चौकट थोडी बाहेर ढकलतात आणि आत येताना आत ढकलतात."

बरेच वेळा दादा मुंबईला जात असत. माननीय यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र होते. कोणाची मुले शिकली कि त्यांना नोकरी साठी ते त्यांच्याकडे घेऊन जात. माझ्या दादांचा पेहराव म्हणजे नेहरू शर्ट आणि पायजमा. एकदा म्हणे दादा अशाच एका मुलाला घेऊन चव्हाणसाहेबांकडे गेले होते. यांचा पेहराव पाहून तिथल्या शिपायाने यांना अडवले. तेव्हा माझे दादा म्हणाले,"जा यशाला जाऊन सांग बाब्या आलाय म्हणून". त्या शिपायाने आत जाऊन सांगितल्यावर स्वतः यशवंतरावजी यांनी बाहेर येऊन माझ्या वडिलांना मिठी मारली. अर्थात हा प्रसंग मला त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या माझ्या एवढ्याच मुलीने म्हणजे वासंतीने सांगितला.

ते मित्र म्हणजेच काल्याचे यशवंतराव पाटील त्यांना सगळे मास्तर म्हणत. कारण अगदी नोकरीच्या सुरुवातीलाच ते गांधी चळवळीत उतरल्यामुळे त्यांची शिक्षकाची नोकरी गेली होती. पण त्यांची पत्नी सुगंधाबाई शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या, त्यांना आम्ही बाईच म्हणत असू. त्या काळात कोणी स्त्रिया नोकरी करत नव्हत्या. या सुगंधाबाई शाळेमध्ये शिक्षकी पेशा सांभाळायच्या आणि गृहिणी म्हणून घरी नेहमी डोक्यावर पदर ,कपाळाला मोठे कुंकू ,आणि नऊवारी साडी. येणाऱ्या जाणाऱ्या चे अगत्याने करत. मला तर त्या शिक्षिकेपेक्षा कर्तव्यदक्ष गृहिणी जास्त वाटल्या, तेच त्यांचे आरोप माझ्या मनावर ठसले आहे. सातवी होऊन शिक्षिका झालेल्या त्या रिटायर होईपर्यंत विस्तार अधिकारी पदावर पोहोचल्या होत्या. त्यांची खास आठवण म्हणजे त्या पंचायत समितीमध्ये मीटिंगसाठी येत त्यावेळी पांढऱ्या स्वच्छ कपड्यात बांधून ज्वारीची भाकरी आणि तुरीचा डाळ कांदा हमखास आमच्याकडे येताना घेऊन येत. आणि म्हणत," पदरात आपली भाकरी असलेली बरी" ती त्यांची शिदोरी आणि डाळ कांदा अजून मला चवी सहित आठवतो आहे. दुसरी एक त्यांची खास आठवण म्हणजे, कधीही काल्याला मुक्काम झाला आणि सकाळी उठल्यावर दात घासताना लगेच चूळ भरायला गरम पाणी द्यायच्या. एकदा माझ्या दादांनी मुंबईहून त्यावेळी नवीन निघाली होती ती हॅन्डबॅग आणली होती. केव्हा काल्याचे यशवंत मास्तर आले होते ,त्यांनाही आम्ही दादाच म्हणायचो. यांनी त्यांना कौतुकाने ही बॅग दाखवली, तेव्हा ते म्हणाले छान आहे, मी आता कोकणात मुलीकडे चाललो आहे तेव्हा जाताना नेतो, आल्यावर परत देईन. ते घेऊन गेले . मुलीकडून येताना त्यांनी त्या बॅगेतून कोकणातला फणस आणला आणि नव्या ब्यागेची वाट लागली.तोही किस्सा दादा मजेने सांगत बसले. त्यांचा स्वभावच गंमतशीर होता.
आमच्या मिश्रीच्या कारखान्यात एक भामाबाई नावाच्या बाई होत्या. त्याही लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्या सांगायच्या त्यांच्या शेजारी विद्यार्थी भाड्याने राहतात. त्यांचे डबे खेड्यातून एसटी मधून येत. ती मुले बरेच वेळा राहिलेली भाकरी टाकून देत. भामाबाई त्या मुलांना म्हणायच्या मुलांनो त्या भाकरी टाकू नका त्या मला द्या. त्या घेऊन भामाबाई पत्र्यावर छान वाळवायच्या आणि त्यांचा चुरा करून त्यामध्ये कांदा कोथिंबीर घालून मस्त फोडणी करायच्या. हे वर्णन त्या इतके छान करायच्या की, ऐकून तोंडाला पाणी सुटायचे. नेहमी म्हणायच्या "मोत्यासारखे लेणे नाही". आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी सायरा बानू चे' दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे ' हे गाणे सारखे रेडिओवर लागलेले असायचे. भामाबाई मिश्री पुडीत भरता भरता म्हणायच्या ,"जाण जा की तिकड काय पण आम्हाला कशाला विचारतोस?". आम्हाला हे ऐकताना खूप मजा वाटायची.

दादांना गाणी ऐकायला आवडायची. आम्हाला मात्र त्याचा कंटाळा यायचा. माझ्या भावाने, विलासने मिल्ट्रीतून एक रेडिओ आणला होता, त्यावर कधी कधी,'आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है 'हे गाणे लागायचे ते त्यांना फार आवडायचे. दुसरे मिलन मधील ,'सावन का महीना पवन करे शोss र 'तर पुढे ,'अरे बाबा शोर नही सोsss र '. हे पण गाणे त्यांना आवडायचे. आणि पुढची ओळ ते रिपीट करायचे. अगदी मनमौजी होते. तेव्हडेच संवेदनशील होते. मी लहान असताना आम्ही तिघे जेवत होतो आणि माझे दादा अचानक उठून उभे राहिले आणि म्हणाले, "आपली लता गेली, माझ्या डोळ्यासमोर लख्खन वीज चमकली ". लता म्हणजे माझी दोन नंबरची मोठी बहीण. डॉक्टरांनी सांगितले होते की हिच्या हृदयाला छिद्र आहे त्यामुळे हिचे लग्न करू नका. पण काही दिवसांनी तिने हट्ट केला की माझे काहीही होऊ दे पण माझे लग्न करून द्या. तिचे लग्न झाल्यावर ती नाशिक मध्ये होती. आणि डिलिव्हरी च्या वेळेस ती गेली. ती नाशिक मध्ये आम्ही कराडमध्ये देव जाणे त्यांना तो दृष्टांत कसा झाला. कारण ते खरेच घडले होते. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते एक तर पोस्टात फोन घ्यायचा किंवा तार यायची.

मी दहावी तून अकरावीत गेले. दादा तर अजून खुश झाले. माझी पूर्व परीक्षा जवळ आली होती त्यामुळे अभ्यास सुरू होता. तरीही दादांबरोबर बाहेर जाणे काही बंद नव्हते. मी त्यांची काठी होते ना. ऑगस्ट आठ ला माझा वाढदिवस होता म्हणून त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. पण काय झाले कोण जाणे केक काही मिळाला नाही. त्यांच्या मनात पाल चुकचुकली असे का व्हावे?. कारण मी नववीत असताना त्यांना अटॅक येऊन गेल्यापासून जरा काही घडले की मनात शंका यायच्या, असं का झालं बरं. साधारण 18-19 ऑगस्टला माझ्या दादांना परत हार्ट अटॅक आला. डॉक्टर एरम नि त्यांना बेड रेस्ट सांगितली होती. अगदी या कुशीवरून त्या कुशीवर पण वळायचे नाही म्हणून सांगितले होते. त्यांना चैन पडत नव्हता. माझे काका-काकू, भाऊ, माझी ताई सगळे जमले होते. एवढे आजारी असूनही दादा मला अभ्यास कर म्हणत होते. आणि आईला ज्या गोळ्या सांगलीच्या डॉक्टरांनी दिलेल्या त्यांची नावे सारखी घेत होते. ती नावे अजूनही मला आठवतात. आई हात हातात घेऊन सारखे म्हणायचे की,"मी तुमच्या दोघींसाठी काहीच ठेवले नाही आता तुमचे कसे होणार?". आई म्हणायची,"आधी तुम्ही बरे व्हा मग बघू काय करायचे ते." कारण मिश्रीचा कारखाना हे आमच्या उपजीविकेचे साधन होते, आणि आई कधी घराबाहेर पडली नव्हती. पण दैवा पुढे कोणाचे काय चालणार? 21 ऑगस्टला त्यांना खूप त्रास व्हायला लागला. नेमका त्याच वेळी बल्ब गेला आणि ते स्वतःच म्हणाले "गेला बल्ब". त्यानंतर घशातून घरघर आवाज यायला लागला तेव्हाही म्हणाले," आता घरघर लागली". आणि माझे दादा मला पोरकी करून निघून गेले.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.