जुने दिवस - स्मरण रंजन - भाग ५

आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची. मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली. तेव्हा त्यांनी तिला सगळी माहिती सांगितली. आप्पा म्हणाले," आमच्या घरातल्या बायकांना ड्राफ्ट म्हणजे काय हेही माहिती नाही". खरंतर त्या बायकांचा काय दोष, त्यांनी काही विचारले असते तर यांनी थोडेच सांगितले असते. साधा डोक्यावरून पदर खाली पडला तर म्हणायचे खिळा ठोकला पाहिजे म्हणजे पदर राहील डोक्यावर. ते काहीही असले तरी माझ्या आईला सगळ्यांनी भावाप्रमाणे धीर दिला. आईने कधी नातेवाईकांकडे तर हात पसरला नाहीच पण ओळखीच्या कुणाकडे देखील उसने कधी काही मागितले नाही.

दादा असताना स्वातंत्र्य सैनिक पेन्शन चा काहीतरी जीआर आला होता, त्यासाठी एक वर्षाची कैद ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भोगली त्यांना पेन्शन मिळणार होती. त्यासाठी त्यांनी जिथे जिथे कैद झाली होती तिथले दाखले मागवले होते. त्यांची कैद एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त होती. पण काही ठिकाणाहून रेकॉर्ड उपलब्ध नाही असे पत्र आले होते. पण तरीही जेवढे दाखले मिळाले होते ती एक वर्षाची होती. त्यांचे निधन झाले त्यामुळे तात्पुरते सानुग्रह अनुदान म्हणून सरकारकडून एकूण पाच हजार रुपये मंजूर झाले होते. माझ्या वडिलांचे मित्र राजाराम पाटील म्हणून होते त्यांनाही गोष्ट कळली. त्यांनी सचिवालयात जाऊन सांगितले की हे पैसे तुम्ही त्यांना एक रकमी देण्यापेक्षा दरमहा ठराविक रक्कम द्या. आणि त्या लोकांनी पण दरमहा 100 रुपये असे तहसील कार्यालयात पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी हेही नसे थोडके, तेवढाच ' बुडत्याला काडीचा आधार '. कारखान्यातील मालापासून तयार केलेले मिश्रीचे पुडे विक्रीसाठी पाठवले पण लोकांनी पैसे बुडविले. आधी चे जे मटेरियल होते त्याचे पैसे द्यायचे होते. आईला वाटले होते की हे सगळे विकून झाल्यावर ते पैसे देता येतील, पण विक्रीचे पैसे आलेच नाहीत. जयसिंगपूरहून त्या माणसाचे सारखे तगादे यायला लागले की पैसे पाठवा म्हणून. आई तर हतबल झाली होती. एक दिवस त्यांचे पत्र आले की मी समक्ष येऊन जे असेल ते जप्त करतो, त्याप्रमाणे तो माणूस एक दिवस आला. घरातले जुजबी सामान पाहून त्याला परिस्थितीची कल्पना आली. आणि तो आल्या पावली काहीही न बोलता परत गेला. त्यानंतर त्याने कधीही पैसे मागितले नाहीत. आईने मग शिलाई वरच भिस्त ठेवली. कसेतरी दिवस पार पडत होते. दादा गेले त्यावर्षी तर मी अकरावीत नापासच झाले. शरदनेच रिझल्ट आणला होता. मी तर अगदी निराश झाले. पण सगळ्यांनी समजावल्यावर मी पुन्हा तयारीला लागले. आईला मिळणारे पाच हजार रुपये संपल्यावर ते मिळणारे पैसे बंद झाले. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांना मिळणाऱ्या पेन्शन साठी दादांचे जवळचे मित्र रामजी पाटील (ज्यांना मी आप्पा म्हणते) त्यांनी तिला अर्ज करायला सुचवले वेळोवेळी सातारला येऊन मार्गदर्शनही केले. तिने स्वतः पण कोर्टात जाऊन अ‍ॅफिडेव्हीट करून, कोर्टासमोर जे काही करावे लागेल ते केले. माझी वाघीण आई सगळीकडे बेधडक एकटी लढत होती. मी एवढी अकरावी झाले तरी मला अजिबात मॅच्युरिटी नव्हती. जेवढी आत्ता माझ्या बारा वर्षाच्या नातीला आहे.

माझे दादा १९७० मधे गेले आणि १९७२ ला आईला शंभर रुपये आणि मला ५० रुपये वयाचे २४ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत मंजूर झाले. ते मंजुरीचे पत्र आले तेव्हाही अरुणा बाहेर होती. त्या पत्रावर आड्नाव चुकीचे होते . तिने तिथेच पोस्टमनला सांगितले की इथे कोणी मोरेवाडीकर रहात नाही. पण आधी आईचे नाव होते. आणि आईने हे ऐकले होते ती म्हणाली,"ते माझेच पत्र आहे आडनाव चुकले आहे. ते मी ऑफिसमधून दुरुस्त करून आणेन". नशीब ते रजिस्टर पत्र असल्यामुळे आईच्या सहीसाठी आमच्यापर्यंत आले. तहसील कार्यालयातील ओळखीचे माने होतेच, त्यांना आईने विचारले तेव्हा ते म्हणाले सातारच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. मग माझी वाघीण निघाली त्या मोहिमेवर तेही एकटीच. तेव्हा सातारचे ऑफिस राजवाड्यामध्ये भरत होते. तिथे गेल्यावर ऑफिस मधला क्लार्क म्हणाला,"द्या इकडे मी ते दुरुस्त करून देतो". त्यावर आई म्हणाली,"नको, ते जिथून आले आहे तिथेच पाठवा ". त्यावेळी हे तिने मला सांगितले होते पण मला त्याचे काही विशेष वाटले नव्हते. पण आता विशेष वाटते कारण माझी आई कशीबशी चौथीपर्यंत शिकलेली होती. आणि तिला हे कसे सुचले असेल. त्यानंतर ते पत्र दुरुस्त होऊन आले. ती पेन्शन केंद्र सरकारने मंजूर केलेली होती. नंतर राज्य सरकारने पण शंभर रुपये दरमहा आईला पेन्शन मंजूर केली. दोन्ही पत्रे इंग्लिश मध्येच होती. आईला इंग्लिश येत नव्हते. पण कसे कोण जाणे कधी कशासाठी पत्र लागले तर ती बरोबर हे केंद्र सरकारचे हे राज्य सरकारचे असे म्हणून शोधून द्यायची. त्याचे मात्र मला तेव्हाही कौतुक वाटायचे, आणि नेहमीच वाटते. घरमालकांचे सगळे भाऊ तिला बहिणीचा मान देत. पैकी आप्पा सगळ्यांच्या वतीने तिच्याकडून भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला न चुकता ओवाळून घेत. आणि त्यांच्या घरातील मुले माझ्याकडून ओवाळून घेत. त्यापैकी सुरेश नेहमी मला 50 पैशाचे लॉटरीचे तिकीट ओवाळणी मध्ये द्यायचा. आप्पांचा रवी अगदी चार-पाच वर्षांचा होता. तो पण माझ्याकडून ओवाळून घ्यायला आला. ओवाळळ्यावर त्याने मला खिशातून 50 पैसे काढून ओवाळणी दिली. मी म्हणाले,'"अरे नको काही देऊस मोठा झाल्यावर दे काय द्यायचे ते". पण तो काही ऐकेना. शरद मात्र काही ना काही विशेष वस्तू देत असे. फक्त भाऊबीज आणि राखी पौर्णिमेलाच नाही तर माझ्या वाढदिवसाला देखील आवर्जून काहीतरी विशेष भेट देई. त्यासाठी त्याला कुठून पैसे मिळाले असतील हेही विचारले नाही. मी मात्र करंटी त्याचा वाढदिवसही लक्षात ठेवला नाही.

आईसारखीच ही इतर कमी शिकलेली माणसेही खूप हुशार होती. म्हणजे आईला पेन्शन मंजूर झाली त्यापूर्वी त्यांनी तिच्या जन्माचा दाखला मागितला होता. यापूर्वी त्याची कधीच गरज पडली नव्हती. तिचा जन्म पाटण तालुक्यातला. पुन्हा मानेंना विचारले ते म्हणाले,"पाटण तहसील कार्यालयात अर्ज द्यावा लागेल." तेव्हा नेमके नरसिंहपुरचे आबासाहेब पाटील आमच्या वाड्यात राहायला होते त्यांचे मेहुणे पाटण तहसील कार्यालयात होते. मग त्यांनाच पत्र लिहायचे ठरले. तेव्हा घरमालक आण्णांनी सुचवले की, १९३० नंतरचे आणि १९३५ च्या आधीचे रेकॉर्ड चेक करावे लागेल. आणि आईचा जन्म ऑगस्ट १९३२ चा होता. या गोष्टीचेही त्यावेळी विशेष वाटले नव्हते पण आता नवल वाटते आहे. मनोमन अण्णा नाही नमस्कार करते आहे. तसेच माझे दादा गेल्यानंतर वाड्यात आम्हाला जी सुरक्षितता मिळाली त्याचे ऋण आम्ही आयुष्यात विसरणार नाही. कारण माझे दादा गेले तेव्हा मी सतरा वर्षांची आणि आई फक्त 38 वर्षांची होती.

आणखी एक प्रसंग म्हणजे एकदा कसल्या तरी निवडणुका होत्या. त्यामध्ये दोन उमेदवार आमच्या दादांचे मित्र होते. एक होते शामराव मुळीक पैलवान आणि दुसरे होते जिरगे. तेव्हाही घरमालक आप्पा आमच्याकडे आले आणि आईला म्हणाले,'तुम्ही त्या अमक्याला मत द्या". आई म्हणाली,"हो मी देईन त्यांना मत" त्यावर अप्पा म्हणाले,"नुसते हो नाही तो देवाचा तांब्या घ्या, त्यावर हात ठेवून हो म्हणा". ही म्हणाली," मुळीच नाही, मी एकदा शब्द दिलाय ना तो मी खरा करेन". अशी स्पष्टवक्ती होती ती. मला त्यावेळी भीती वाटलेली, पण आप्पांनी कधी त्या गोष्टीचा आकस मनात ठेवला नाही. तसेच माझे दादा गेल्यानंतर एकदा अप्पा आले आणि म्हणाले की,"दादांनी मला सांगितले आहे की त्या सोनाराकडे त्यांनी आईची एकदाणी गहाण ठेवली आहे, ती आपण आणूया". ते परत आणण्याएवढे पैसे आमच्या जवळ होते. एकदा मला कॉलेजला पास काढायला पैसे नव्हते. त्यावेळी फक्त नऊ रुपये मध्ये कराड स्टॅन्ड ते विद्यानगर असा पास मिळायचा. तेव्हा मात्र आईने घर मालकांकडून नऊ रुपये घेतले होते. धन्य ते घर मालक आणि धन्य ते भाडेकरू. कधीही असे जाणवले नाही की ते घर मालक आणि आम्ही भाडे करू. असा जिव्हाळा आणि असे प्रेम पुन्हा कधी अनुभवायला मिळाले नाही.

त्यांच्यातली आणखी एक व्यक्ती म्हणजे अण्णांचा शरद. तो इकडून तिकडून यायचा आणि आमच्या दाराजवळच भिंतीवर जो आरसा होता त्यामध्ये भांग पाडत उभा राहायचा. कधी कधी त्याच्याशी जास्त संवादही नसायचा. एकदा असेच डॉक्टर शांताराम पोतदार हे अमचे काल्याचे स्नेही कधी कधी आमच्याकडे येत ते आले आणि दारात उभे राहिले. आम्ही दोघी पोळ्या लाटत होतो. एकीने लाटायची आणि दुसरीने भाजायची असे आमचे सुरू असायचे. तर ते शांताराम पोतदार येऊन दारात उभे होते आणि आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरद असेल म्हणून आम्ही पाहिले नाही. तेव्हा ते आश्चर्याने म्हणाले,"मी पाच मिनिटे झाले इथे उभा आहे आणि तुमचे लक्ष नाही". तेव्हा कुठे आम्ही पाहिले आणि त्यांना म्हणालो की आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरदच आहे.".

शरद चा मित्र सुरेश लाटे म्हणून होता त्याचे दुकान मंडईत होते. शरद त्याच्याकडे दिवसातून दहा वेळा जायचा. आणि मधून मधून आईला विचारायचा,"तुमची तपकीर आणायची आहे का ?"आणि येता जाता घेऊन यायचा. तेव्हा कोणाकडे फ्रिज मिक्सर गॅस असे काही नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात कोणी आमच्याकडे आलेले दिसले की शरद विचारायचा,"लिंबू आणायचे आहे का?"आणि घेऊन यायचा. तो जसा काही आमच्या घरातलाच सदस्य होता. एकदा मी काल्याला यशवंत मास्तरांच्या वासंतीकडे एक दोन दिवस राहायला गेले होते. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी शरद हजर, म्हणाला,"तुला आईने बोलावले आहे, तुझे मामा आले आहेत." माझे सख्खे मामा तेव्हा मुंबईत टॅक्सी चालवायचे आणि कधीतरी गावाकडे आले की आईला भेटायला कराडला यायचे. पाच भावंडांमध्ये दोन मामा आणि दोन मावश्या यामध्ये माझी आई तीन नंबरची होती पण का कुणास ठाऊक ही सगळ्यांची लाडकी होती.

वाड्यात एकूण चार नळ होते शिवाय बाहेर एक जास्तीचा नळ होता. नंबर लावायची पद्धत होती. आणि तिथेच कपडे धुण्यासाठी दगड ठेवलेले होते, त्यामुळे एकावेळी चार चार बायका बसून नळाचे पाणी घेऊन तिथेच धुणे धुत गप्पा मारत बसत. धबक धबाक करत धुणे धुवायला मजा यायची. मला कधी कसला राग आलेला असला की मी जरा जास्तच धबाक धबक करायची जेणेकरून पाणी आजूबाजूला उडावे आणि तिथेच कपड्याबरोबर राग पण धुवून निघायचा . त्यामुळे कपडे आणि मन दोन्ही स्वच्छ व्हायचं. पाणी सकाळी एक दोन तास असायचे तेवढ्यात धुणे धुऊन, प्यायचे पाणी आणि वापरायचे पाणी भरून ठेवायचे. चांगला व्यायाम व्हायचा. त्या पाण्याच्या वेळात कोणीही आले तरी पाणी भरून झाल्याशिवाय कोणीच लक्ष द्यायचे नाही. आम्ही गमतीने म्हणायचो,"पाण्याच्या वेळात मुख्यमंत्री, पंतप्रधान नव्हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तर त्यालाही म्हणतील थांब बाबा आमचे पाणी भरून झाले की बघू तुझ्याकडे ". खूप मजा यायची.

पुढे कॉलेजला असताना माझी मैत्रीण आशा नाईक ओगलेवाडीहून अभ्यासासाठी नेहमी माझ्याकडे राहायला यायची तशी ती एकदा आली होती. आम्ही वाड्यातल्या काही बायकांसहित चतुर्थी दिवशी कोटातल्या गणपतीला अगदी लवकर उठून जायचो. आम्हाला वाटायचे पहिला हार आमचा पडला पाहिजे. आशा आली होती तेव्हा दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे जाणार होतो. पण आशा म्हणाली मी घरीच थांबते. कारण ती उशिरा उठणार होती. पण विशेष म्हणजे आम्ही परत येईपर्यंत तिने नंबरने पाणी भरून ठेवले होते याचे आम्हाला नवल वाटले. दुसरे म्हणजे दर चतुर्थीला मी एक गणपतीच्या मंदिरा समोर असणाऱ्या लॉटरीच्या स्टॉल वरून तिकीट घ्यायचे 50 पैशाचे. आणि प्रत्येक वेळेस मला फक्त एक रुपयाचे तिकीट लागायचे. आशा नेहमी माझ्याकडे राहायला यायची. आणि आमच्या घरी उन्हाळ्यात खूप गरम व्हायचे त्यावेळी फॅन वगैरे तर नव्हता मी तर कॉट खाली झोपायचे. आशाला जास्त गरम झाले की ती टॉवेल ओला करून अंगावर घ्यायची. आम्हाला सकाळी उठायला नको वाटायचे त्यामुळे आम्ही रात्री तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो. असेच एकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसल्यामुळे आम्हाला दोघींना उन्हाळे लागले. मग आईने आम्हाला दूध पाणी एकत्र करून त्यामध्ये वेलची पूड घालून खाली वर करून दिले. आशाचाही माझ्यावर खूप जीव होता. एकदा मी आजारी पडले होते आणि बरी झाल्यावर तिच्याकडे राहायला गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींकडून तिने माझी दृष्ट काढून घेतली होती. तिचे आई-वडील आणि भाऊ बहिणी सगळेच प्रेमळ होते. त्यांचे गाव गोव्याकडील सावंतवाडी होते. त्यांच्या घरी गोव्याकडची भाषा बोलली जायची आणि मला ती खूप आवडायची. आशा मुळे मी जुने हिंदी सिनेमे खूप पाहिले. आमचे कॉलेज सकाळी असायचे. आम्ही शेवटचा पिरियड बुडवून मॅटीनिला जायचो. मॅटिनी बारा वाजता असायची. धावत पळत बस ने जाताना आशा देवाला म्हणायची," देवा तिकीट मिळू दे तुला साखर ठेवी ठेवीन". एकदा तिला मी विचारले," आशे, दर वेळेस देवाला साखर ठेवीन म्हणतेस खरेच ठेवतेस का ग?"त्यावर,"हो तर". असं ती म्हणाली. खरं खोटं देवच जाणे .

आमचा कॉलेजमधला एक ग्रुप होता. मी आशा नाईक , हाजरा शेख, आणि सावित्री आठवले. पण आमचे काही विषय वेगळे होते, जे विषय कॉमन होते त्याला आम्ही एकत्र बसायचो. माझा स्पेशल विषय इंग्लिश होता .आणि माझा स्वभाव भित्रा होता त्यामुळे या तिघी मला माझ्या क्लासरूम पर्यंत सोडायला यायच्या. आता त्या गोष्टीचे मला हसू येते आहे. माझ्या घरी अभ्यास करायला अडचण पडायची म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हाजराच्या घरी अभ्यासाला जायचो तिला आम्ही शेखी म्हणायचो. तिचा बंगला मोठा होता. चारी बाजूला मोकळी जागा आणि छान बाग होती. आम्ही त्या बागेत बसून चौघीजणी अभ्यास करायचो. कधी कधी सुट्टी दिवशी आम्ही शिवाजी हायस्कूलमध्ये अभ्यासाला जायचो. तिथला एक वयस्कर शिपाई आमच्या ओळखीचा होता तो आम्हाला एखादी क्लासरूम उघडून द्यायचा. आम्ही डबे वगैरे घेऊन तिथे अभ्यास करायचो. कधी कधी बेंचेस जोडून आळीपाळीने डुलकी पण काढायचो. आता या घडीला सगळे मजेशीर वाटते आहे.

आमचे कॉलेज सकाळी असायचे आणि पावणे सातच्या बसने जावे लागायचे. माझा कॉलेजमधला दुसरा एक इंग्लिश डिपार्टमेंटचा ग्रुप होता. यामध्ये छाया करमरकर, माधवी दातार, सिंधू मोहोळकर, कुंजन कुलकर्णी जी आटपाडीची होती. आम्हाला सगळे पंचकन्या म्हणत. आमच्या दोन ग्रुप पैकी आता हाजरा, माधवी. आणि सिंधू हयात नाहीत. कधी कधी मी छायाच्या घरी पण अभ्यासाला जायची आणि कधी सिंधूच्या घरी पण जायची. छाया चे घर पण मोठे होते. तिचे वडील डॉक्टर होते आणि माधवीचे पण. छाया नेहमी गाडीने कॉलेजला यायची. कधीकधी ती कॉलेजमधल्या ऑफिस मधून घरी फोन करायची. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते त्यामुळे आम्हाला कौतुक वाटायचे. मात्र परमेश्वरी कृपेने कधीच कुणाचा हेवा वाटला नाही. वर्षातून एकदा गॅदरिंग असायचे तेव्हा मात्र शेखीचा भाऊ जाफर आम्हाला गाडीतून कॉलेजला सोडायचा कारण गॅदरिंग रात्रीच्या वेळी असायचे. गाडीतून जाताना खूप भारी वाटायचे. एरवी आमचा सगळा प्रवास साध्या बसने असायचा कधी आराम बस नाही. पण त्याचीही कधी खंत वाटली नाही. परमेश्वराने गरजेनुसार वेळोवेळी सगळे काही पुरवले त्यासाठी त्याचे नेहमीच आभार मानते.

छायाला एक सवय होती, वर्गात पुढे बसलेल्या मुलीच्या साडी वरचे डिझाईन ती वहीवर काढायची. त्यातले एक अजूनही माझ्याकडे आहे. साधारण 1976-77 मधले असेल. तिला व्हाट्सअप ला फोटो काढून पाठवला तर तिलाही विशेष वाटले. कॉलेजमधली अजून एक मज्जा म्हणजे त्यावेळी आम्ही मुलं मुली एकमेकांशी अजिबात बोलायचो नाही. अगदी गल्लीतला मुलगा असला तरी. काही मुले परगावची असायची. त्यांचे डबे बस ने यायचे त्याचे आम्हाला विशेष वाटायचे. असे असले तरी कॉलेजच्या इलेक्शनच्या वेळी मात्र बरीच मुले घरी म्हणजे घराबाहेर आली होती प्रचार करायला. मुलांपैकी एक सीआर असायचा आणि मुलींपैकी एल आर असायची. गॅदरिंगच्या वेळी फिश पाँड प्रकार होता. सगळे काही लक्षात नाहीत पण एका मुलीचे नाव छबी होते तिला,'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी ', एक भडकमकर नावाचे सर होते ते अतिशय बारीक होते त्यांना 'इथे ओशाळला बोर्नविटा' असे फिश्पाँड पडलेले आठवतात. दुसरे म्हणजे गॅदरिंगच्या दिवशी एल आर जे त्यावेळी मागेल ते देण्याची पद्धत होती. एल आर स्टेजवर आली आणि तिने काय मागितले हे काही आम्हाला कळले नाही पण बरीच जण बाजूला पळत सुटली. आम्हाला वाटले काय झाले काही संकट तर नाही ना? आम्ही सुद्धा पळण्याच्या सावध पवित्रात बसलो. तेवढ्यात कळले की दुसरे काही नाही एल आर ने सायकलच्या पुंगळ्या मागितल्या. त्यामुळे ज्यांच्या सायकल्स होत्या ते पुंगळ्या वाचवायला आणि ज्यांच्या नव्हत्या ते पुंगळ्या काढायला पळाले होते. हा प्रकार समजल्यावर आम्हाला हसू आवरेना. एकंदरीत ते दिवस फुलपाखरी होते, ना कसली जबाबदारी ना कसली काळजी फक्त अभ्यास एके अभ्यास. एका सेमिस्टरला मला आणि आशाला अगदी एकसारखे म्हणजे काहीतरी 67 पॉईंट 50 म्हणजे वरचे पॉईंट पण सारखे पडले होते.

आशाने एक कविता केली होती. मग मी पण एक हिंदी कविता केली आमच्या कॉलेजचा वार्षिक अंक होता,'हिरवळ 'त्यामध्ये आमच्या

कविता छापून आल्या होत्या. शेखीने पण एक कविता दिली होती. गंमत म्हणजे ते एक हिंदी गाणे होते पण कोणी काही त्यावर आक्षेप घेतला नाही. शेखीची आई जरा स्वभावाने कडक होती. त्यामुळे आम्ही थोडे जपून असायचो. तरी ती प्रेमळ होती. तिचे वडील खूप प्रेमळ होते. मी बँकेचे- पोस्टाचे व्यवहार करायची त्याचे त्यांना फार कौतुक वाटायचे. आमचे ग्रॅज्युएशन झाल्यावर मी एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला जाणार आहे असे सांगितल्यावर, हाजराला ते म्हणाले तू पण जा शामा बरोबर आणि तू पण एम्प्लॉयमेंट कार्ड काढ. अर्थात तिला काही गरज नव्हती. पण तिलाही थोडी माहिती व्हावी म्हणून त्यांनी तिला सांगितले. तिच्या हातात सतत सोन्याच्या कंगन, पाटल्या, गोठ वगैरे असायच्या त्यांचा आवाज मला खूप आवडायचा. तिचा स्वभावही खूप विनोदी होता. आम्ही रस्त्याने जाताना समोरच्या व्यक्तीबद्दल अगदी मोठ्याने ती विनोदी काहीतरी बोलायची, मला हसू आवरायचे नाही आणि ही निरागस चेहरा करून चालत असायची. तिला मी म्हणायची ,"अगं त्या माणसाला काय वाटेल ?"तर म्हणायची, त्याला काय कळणार आपण त्याच्याबद्दल बोलतोय का कुणाबद्दल ते".

माझे एम ए पूर्ण झाल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न करायला लागले. त्यावेळी आई अगदी तहसील कार्यालयातला शिपाई असला तरी त्यालाही म्हणायची, "माझ्या मुलीसाठी एखादी नोकरी बघा हो". मला काही ते आवडायचे नाही. तहसील कार्यालयात आईला दीडशे आणि मला पन्नास रुपये असे माझे लग्न होईपर्यंत किंवा मला 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत मिळणार होते. सुरुवातीला तहसील कार्यालयात जाऊन ती पेन्शन घ्यावी लागायची. तिथे एक तानाजी माने नावाचे क्लार्क होते. तेही स्वभावाने चांगले होते. एकदा मी त्या कार्यालयाच्या जाहिरातीवरून रेकॉर्ड रूम मध्ये डेली वेजेस नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या मानेंना मी हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की,"तुलाही नोकरी नक्की मिळेल पण तू ती करू नकोस".

वडील गेल्यानंतर आईला व मला मिळणारी दोनशे रुपये पेन्शन, आईची शिलाई आणि मला वर्षातून एकदा मिळणारी स्वातंत्र्यसैनिकांची स्कॉलरशिप यावर आमचा दोघींचा उदरनिर्वाह चालू होता. मला वर्षातून एकदा मिळणारे सातशे वीस रुपये आम्ही बँकेत ठेवायचो. कॉलेजला वार्षिक उत्पन्नाचा दाखला देताना मी आठ हजार की काहीतरी उत्पन्न दाखविले होते. आमच्या सरांनी मला बोलावून विचारले की एवढे कमी उत्पन्न तुमचे असे वाटत नाही. त्यावर मी त्यांना सांगितले की त्यापेक्षा कमी कसे दाखवायचे म्हणून तर मी तेवढे दाखवले आहे, खरं तर तेवढेही नाही. त्यांना मी खरी परिस्थिती सांगितली होती. कॉलेजला असताना मला फक्त दोनच साड्या होत्या त्यावेळी खटावच्या वायल मिळत. माझ्या मैत्रिणी मला विचारत ,"तू रोज साड्यांना इस्त्री करतेस का?". त्यांना मी सांगायची की,"माझी आई साडी धुवून व्यवस्थित वाळत घालते आणि नंतर छान घडी करून ठेवते". तेव्हा घरी इस्त्री पण नव्हती.. माझे शिक्षण होऊन वर्ष होत आले तरी नोकरीचा काही चान्स दिसेना. मी नेहमी पेपर मध्ये जाहिराती पाहून अर्ज करायची आणि तो रजिस्टर ने पाठवायची. मला बाहेर जायला नकोसे वाटायचे त्यामुळे घरमालकांचा शरद होता त्याच्याजवळ ते सगळे तयार करून द्यायची. असे बरेच अर्ज मी पाठवले होते. पण एकाचेही काही पुढे झाले नाही. नंतर नंतर तर रजिस्टरचा खर्चही फार वाटायला लागला त्यामुळे पोस्टात असणाऱ्या रजिस्टर वरच नोंद करून अर्ज पाठवायला लागलो.

एकदा घरमालकांचा शरद परगावी गेला होता. त्याचवेळी झेडपीची जाहिरात पेपर मध्ये आली .तो फॉर्म भरून दोन दिवसात पाठवायचा होता. मग काय एका दिवसात आम्ही मायलेकी त्या मानेंकडे अर्ज कसा भरायचा इथपासून ते तो पाठवेपर्यंत सकाळ पासून संध्याकाळपर्यंत घरातून फक्त चहा पिऊन बाहेर होतो. तेव्हा रिक्षा वगैरे काही नव्हत्या सगळीकडे पायपीट करत फिरत होतो. घरी येऊन आदल्या दिवशीची होती ती भाकरी आणि चटणी खाऊन शांत बसलो. त्या अर्जावर पण काही लवकर उत्तर येईना.

शेवटी एकदाचा साध्या पोस्टकार्ड वर पण छापील स्वरूपात इंटरव्यू चा कॉल आला. इंटरव्यू सातारा झेडपी मध्ये होता. त्यापूर्वी मी हाजराच्या घरी गेले होते. त्यांचे रोजे सुरू होते. तिच्या बाबांना ही बातमी सांगून नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले ,"श्यामा आज माझा 27 वा रोजा आहे, माझा तुला आशीर्वाद आहे की ही नोकरी तुला मिळणार". सगळीकडून असा ग्रीन सिग्नल होता तरीही धाक धुक होतीच. कारण यापूर्वी मी खूप अर्ज केले होते आणि एकाचेही उत्तर आले नव्हते. त्या मानेंच्या ओळखीचे एक शिंदे साहेब म्हणून होते. ते झेडपी मध्ये अकाउंट ऑफिसर होते. इंटरव्यूला जाशील तेव्हा त्या शिंदे साहेबांना भेट असे माने यांनी सांगितले होते. मी आणि आई सातारा झेडपी मध्ये गेलो होतो पण त्यावेळी त्या शिंदे साहेबांना आधी भेटावे हे काही लक्षात आले नाही. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी इंटरव्यू कसा झाला वगैरे विचारले, तेव्हा त्यांना सगळे सांगितले. इंटरव्यू च्या वेळेस आतून जो मुलगा किंवा मुलगी बाहेर येत होती त्यांना आम्ही लाईन मध्ये बसलेले विचारत होतो काय विचारले म्हणून? इंटरव्यूला औरंगाबादचे 10 जण होते ते आलटून पालटून प्रश्न विचारत होते. मला जास्त काही नाही एक दोन प्रश्न विचारले होते ते म्हणजे स्त्रियांसाठी कोणी काम केले मी,"महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महात्मा फुले" ही नावे सांगितली होती. नंतर त्यांनी विचारले की,'मनी इज अ सोर्स ऑफ ऑल हॅपिनेस' या वाक्याचे भाषांतर सांगा मी म्हणाले की,"पैसा हे सर्व सुखाचे साधन आहे". झाले एवढेच. परमेश्वराने त्यावेळी मला बुद्धी दिली शिवाय माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद. मला ही नोकरी मिळाली ती दादांच्या कृपेमुळेच असे मला मनोमन वाटते. कारण अर्ज करताना स्वातंत्र्य सैनिकांचे वारस असल्यास तशी कागदपत्र जोडण्याबद्दल जाहिरातीत उल्लेख होता. मी माझ्या वडिलांच्या सन्मान पत्राची हाताने लिहून सर्टिफाइड केलेली कॉपी त्याला जोडली होती, त्यावेळी झेरॉक्स मशिन नव्हते. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्या शिंदे साहेबांना भेटून चालत चालत निघालो. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांचा ड्रायव्हर हाका मारत आला. तो म्हणाला," तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे म्हणून". आम्हाला वाटले आता काय झाले? गेलो परत त्यांच्याकडे. ते म्हणाले,"अगं तुझा इंटरव्यू चा नंबर वगैरे काही सांगितला नाहीस". तो मी त्यांना दिला. त्यानंतर चार दिवसांनी आम्ही शिंदे साहेबांना भेटायला गेलो कारण ते कराडमध्येच राहत होते. त्यांना विचारले तर ते म्हणाले,"तुझा इंटरव्यू तर चांगला झाला आहे". तेवढेच समाधान वाटले. आता प्रतीक्षा ऑर्डरची होती. कधी कॉल लेटर येते म्हणून वाट पाहत होतो. दहा महिने झाले तरी काही ते आले नाही. कोणी म्हणायचे की आणखी दोन महिने झाले तर ते काही येणार नाही. मग मन खूप उदास व्हायचे. पण आशा काही सुटायची नाही.

कराडमध्ये एक गुजराती गृहस्थ होते, ते भविष्य सांगत असत. माझ्या आईच्या मैत्रिणीने म्हणजे दिलीपच्या आईने एकदा तिला त्यांच्याकडे नेले होते. त्यांच्यावर तिचा विश्वास होता.एकदा आई त्या गुजराती काकांकडे गेली आणि म्हणाली की,"जरा माझ्या मुलीच्या लग्नाचे किंवा नोकरीचे काही जमेल का बघता का?". त्यावर त्यांनी थोडा वेळ शांत बसून सांगितले की,"लग्नाचा तर काही सध्या योग दिसत नाही पण तिला बरोबर 21 दिवसात नोकरीचा योग आहे". आईने मला त्यांच्याकडून आल्यावर हे सांगितले. मी म्हणाले,"आज एप्रिल ची तीस तारीख आहे बघूया किती खरे ठरते ते". आणि अशीच साधारण महिन्याभराने आईने भजी केली नाही म्हणून मी चिडून कॉटवर पडले होते. तेवढ्यात घरमालकांचा जयंत आला, तो म्हणाला,"अगं झोपलीस काय तुझे नाव मी झेडपीच्या ऑर्डर मध्ये पाहिले". तेव्हा निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि आमच्या गल्लीतला थोरात म्हणून एक मुलगा उपोषणाला बसला होता, त्यामुळे तिथेच त्याच्या हातात ऑर्डर दिली होती. आणि हा जयंत कशासाठी तरी तिथे गेला होता आणि त्याने ते पाहिले. ती बातमी ऐकल्यानंतर जो आनंद झाला तो काय वर्णावा. अगदी सिनेमात पाहतो तसे वाटले. जयंत म्हणाला,"समोरच्या वाड्यातल्या मुळकांच्या मुलाला सांगू की ते रजिस्टर लवकर आणून दे म्हणून" कारण तो पोस्टात होता. पण कसले काय पोस्टात माझ्या दादांचे यादव नावाचे मित्र होते. ते त्याला म्हणाले,"तिलाच इकडे पोस्टात यायला सांग". पोस्ट जवळच होते. मग मी पाच रुपये घेऊन पोस्टात गेले. ते यादव म्हणाले" पेढे दे ". तेव्हा मी म्हणाले,"हे काय पेढ्यासाठी पाच रुपये घेऊन आले आहे". तेव्हा ते म्हणाले,"असू दे असू दे आधी जाऊन हजर हो मग बघू पेढ्याचे". मग काय ऑर्डर घेऊन आले तरंगतच घरी.आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मे महिन्याची 21 तारीख होती वर्ष होते 1980. त्या गुजराती काकानी सांगितल्याप्रमाणे 21 व्या दिवशी ते पत्र आले.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.