साहित्य:
२ हिरवी सफरचंदे (ते ग्रॅनी स्मिथ वगैरे हिकडे मिळत नाही त्यामुळे काय कळत नाही.) बाजारात एकच प्रकारची ठेवलेली असतात. ती उचलून घेऊन यायची. आंबट नसतील तर खायची नायतर लोणचे करून टाकायचे असा साध खाक्या आहे). तर हिरव्या स.चं च्या (फारच बुवा मराठी नाव मोठे) फोडी करून घ्यायच्या हव्या तशा.
केप्र/काटदरे/प्रवीण/बेडेकर चा तयार कैरी लोणचे मसाला(आपली, आपल्या मातेची लॉयल्टी कोणावर असेल त्या प्रमाणे). हा पण आपल्या तिखट खायच्या वकुबाप्रमाणे.
१/२ चमचा काश्मिरी लाल तिखट (हे स. चं चा मू़ळ हिरवा रंग राहून न द्यायचे काम करते.)
मीठ चवीप्रमाणे
गूळ हवा असल्यास. घालून आणि न घालता दोन्ही बरे लागते.
नेहेमीची यशस्वी चरचरीत/चळचळीत/जीवंत फोडणी (तेल, मोहरी, हिंग आणि हळद)
कृती:
सांगायची गरज आहे का? सगळे एकत्र करून गार झालेली फोडणी घालून ढवळून लगेच खाऊ शकता. मूगाच्या डाळीची खिचडी अथवा घावन्/धिरडे/आंबोळी पंथियांबरोबर चांगले लागते.
अधिक टीपा:
परवाच केले आणि डोक्यात विचार आला की हिरव्या स.चं चे लाल लोणचे अशी दोन्ही कडे एन्ट्री मारावी का?
कोणाला कैरी चे म्हणून फसवायला जाऊ नये. लगेच कळून येते आणि मग लोक हात आणि तोंड लावत नाहीत. सांगून वाढले तरी खोडसाळ लोक तेच करतात हा भाग वेगळा.