टाकाऊतून टिकाऊ : मेणबत्ती

चहाचा मग आतून जरा काळा दिसायला लागला म्हणून तो बाजूला पडला होता. पूर्णपणे पांढरा असल्याने बाहेरून रंगवून त्याचा पेनस्टँड वगैरे करावा म्हणून जपून ठेवला होता.

माझ्या कडे असलेल्या कँडलजार मधील सुगंधित मेणबत्ती पेटायला त्रास होत होता कारण वात छोटी आणि आजूबाजूला मेण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरं त्याचा सुगंध इतका मस्त आहे की ते मेण तसंच टाकून द्यायला जीवावर येत होतं.

आज अचानक या दोन गोष्टींची सांगड घालून डिझायनर मेणबत्ती बनवता येऊ शकेल हे लक्षात आलं.

प्रथमतः त्या कँडल जार मधील अतिरिक्त मेण चमच्याने काढून घेतलं. त्यामुळे आता त्यातील वात दिसायला लागली आणि तोही पुन्हा वापरण्याजोगा झाला.

मग फुलपुडीचा दोरा मिळवला. थर्माकोलचे रंगित गोळे होतेच घरी, ते घेतले.

जारमधून काढलेलं मेण त्या चहाच्या कपात टाकून मायक्रोवेव मध्ये वितळवलं. एकदम नाही. सतत बाहेर काढून चाचपणी केली कारण पहिल्यांदाच मेण मायक्रोवेव मध्ये वितळवत होते.

त्या वितळलेल्या मेणात फुलपुडीचा दोरा चारपदरी करून बुडवून बाहेर काढून सरळ करून सुकवला. दोन मिनिटांत सुकतो. मग तो एका चापात अडकवून तो चाप मेण वितळवलेल्या कपावर ठेवला. फक्त वरचा भाग सोडता बाकीचा दोरा त्या मेणात मधोमध उभा राहिला. ( अ‍ॅक्च्युअली मेणबत्ती करताना फोटो काढले नाहीत. त्यामुळे खालचे फोटो नंतर पुन्हा दुसरा कप घेऊन वगैरे काढले आहेत. त्यामुळे त्या दोर्‍यावरही मेण नाही आणि कपातही मेण नाहीये. )

वरून ते थर्माकोलचे रंगित गोळे टाकले. हलके असल्याने ते तरंगत राहिले. तो कप मग फ्रीज मध्ये ठेवला.
दहा मिनिटांत मेणबत्ती तयार.

मग ही मेणबत्ती बाहेरून अ‍ॅक्रिलिक रंगांत रंगवली. तीन वेगवेगळे सीन्स रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. :)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle