आजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय? असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं? त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही. :) अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार ? अजून थोडी वर्षं तरी नोकरी करायलाच लागणार. मी तर पक्कं ठरवलंय अजून दहा वर्षं नोकरी करणार फ़क्त. मग स्वप्नील ऑफिसला, यश कॉलेज आणि मी आरामात घरी राहणार. हि रोजची मरमर झेपत नाही. घरातून घाईने निघाले.
त्यात आज जाऊबाईकडे जायचं होतं, पूजेचं सामान द्यायला. सामान घेऊन बसमध्ये चढले तर एक सीट मोकळी नाही. इतकं सामान घेऊन बाई उभी आहे म्हणून एक माणूस उठला नाही मेला. वर उभ्या राहिलेल्या बाईकडे टक लावायला असतातच टगे. सामान द्यायला गेले तर ऐकवलंच," अगं किती दिवस तुझ्याकडे वर्षातून एकदाच असते पूजा, इथे रोज असते ना. रोज आई मला विचारत होत्या आणलस का म्हणून." इतकी खडूस आहे. सासूसासरे हिच्याकडे असतात म्हणून आपलं रोज ऐकून घ्यायचं हिचं. तिथून ऑफिसला रिक्षानेच गेले मग.
जरा रिक्षात बसल्यावर बघावं म्हणून फोनवर फेसबुक उघडलं तर रावी म्याडमचा प्रोफाईल फोटो होता नवीन पोस केलेला. घ्या ढिगाने कमेंट आणि लाईक्स. हिला काय पोरं बाळ नाहीत. फिरते नवऱ्यासोबत सगळीकडे. आणि यांच्या नवऱ्याना बरे चालतात हे असले कपडे घातलेले आणि फोटो पोस्ट केलेले? आमची जरा बसताना मागून जीन्स खाली आली की डोळे मोठ्ठे होतात. आता इतके तर होणारच ना? मी काय मुद्दाम करतेय का? जाऊ दे. किती दिवस झाले छान एक फोटो काढायला पाहिजे. कुठे खास काही करणं होतंच नाही त्यात यश झाल्यावर पोट वाढलंय. जीमला जायला हवं, कधी करणार काय माहित. निदान डाएट तरी सुरु करते. मग बारीक झाले ना मी पण असे फोटो टाकते की नाही बघ रावीबाई.
ऑफिसला पोचले तर चिडचिड झाली. काल उशिरा पर्यंत थांबून घेतलेल्या कॉलवर एकही मेल नव्हती ऑनसाईटकढून. एक तर यांना उशिरा थांबून केलेल्या कामाची किंमत नाही. आणि जरा इश्यू झाला की वर तक्रार करायला मोकळेच. सकाळ सकाळी म्यानेजरचा मेल पाहून अजून चिडचिड झाली. आता या शर्माला प्रमोशन देणार म्हणे. मी काय मेलेय का? याची कामं कोण करून देतं? लवकर घरी गेले तरी घरून कॉल घेते. याच्यासारखं बॉससोबत ड्रिंक्सला जात नाही, मागे मागे करत नाही म्हणजे बाकी कशालाच किंमत नाही का? च्यामारी ! कितीही काम केलं तरी बायकांना प्रमोशन द्यायचं म्हणालं की बोंब. सोडूनच जायला पाहिजे, म्हणजे मग कळेल यांना किती काम करते मी ते. काही नाही, आता लवकरच सुरु करते नवीन नोकरी बघायला. याच्यापेक्षा भारी नोकरी मिळवेन आणि जाईन मग यांच्या नाकावर टिच्चून.
दुपारी विराट डेस्कवर आल्यावर जरा डोक्यातला राग शांत झाला. इतका स्मार्ट दिसतो, म्हणजे विराट कोहलीच आमच्या फ्लोअरचा. सारखा मैम, मैम करत असतो. जरा याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून इतकं अहो जाहो कशाला करायचं? त्याच्या गोड बोलण्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे मला. त्याच्याशी जरा माऊच वागते की काय अशी शंका येते मला कधी कधी. पण काय करणार? किती विचार करणार आणि कशा कशाचा? ही राशी, सात महिने प्रेग्नंट आहे. कधी दांडी मारेल सांगता येत नाही. उद्या ती सुट्टीवर गेल्यावर मला यालाच काम सांगायला लागणार आहे ना? चहानंतर बॉसकडे गेले तर म्हणे, "काम चांगलं आहे पण तुमचा विचार पुढच्या प्रमोशनला करू. यावेळी काही करू शकत नाही". घ्या, म्हणजे धार सोडताही येत नाही. सगळे नुसते गोड बोलून काम करून घेतात. ऑन साईटला जावं तर स्वप्नीलची नोकरी अशी इथली. माझ्यासोबत येणार आहे का सोडून? बसायचं मग इथेच आपण पण अडकून. वैताग आहे सगळाच.
घरी फोन केला तर आई बाबांचं रडगाणं. दोघेही ऐकत नाहीत. किती हट्टीपणा करतात? जरा सांभाळून घ्यायचं ना? त्यात ही ताई, पोरांचं सोडून स्वत:च्या धंद्याचं बघत राहते. कशाला हवाय हिला इतका व्याप? कधी वाटतं आपणच पैसे द्यावे तिला ज्यादा, पण त्यासाठी इकडे घरी कोण उत्तरं देत बसणार? जाऊ दे. यशला बघितल्यावर जरा बरं वाटलं. जेवायलाही 'बाहेरून आणू' म्हणाले तर 'चालेल' म्हणाला स्वप्नील. ते एक बरं आहे, सांभाळून घेतो तो. नाहीतर दिरासारखं रोज घरचंच जेवण पाहिजे दोन वेळेला म्हणालं तर मला काही जमलं नसतं. जरा रात्री निवांत टीव्ही बघत बसावं म्हटलं तर सासूबाईचा फोन. पुढच्या आठवड्यात नंदाबाई येणार आहेत. म्हणजे गेला विकेंड. तिला बरं आहे, तिकडे घरी नवरा सगळं ऐकतो आणि इकडे आम्ही आहेच सेवेला. मेलं आमचं नशीब कुठे इतकं चांगलं?
झालं एकदाचं आवरून घर. उद्याच्या डब्याचं बघायला पाहिजे. बाईला पैसे द्यायचेत. परवाचा ड्रेस तिने खराबच केला. आता वापरता येणार नाही. आजही व्यायाम करायला जमलं नाही. उद्यापासून डाएट सुरूच करते नक्की. उद्या यशच्या शाळेत जायचं आहे. त्याचं आजचा होमवर्क ठेवला का बघते. रिझ्युम अपडेट केला पाहिजे. इथलीच कंपनी पाहिली पाहिजे. जास्त लांबचा प्रवास करता येणार नाही. का जाऊ दे? सध्या चालू आहे ठीक तर? प्रमोशनच बघू पुढच्या वेळी. नवीन ठिकाणी अजून कसले लोक मिळतील काय माहित? झोपावं आता, आजचा दिवस संपला. निदान एक तरी सिरीयल बघावी,"नांदा सौख्य भरे" लागली असेल आता.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/