लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा.