हा लेख मी २०११ च्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता.
काल जपान मधे ओसाका येथे पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्यामुळे मार्च २०११ च्या काही आठवणी जाग्या झाल्या म्हणून हा लेख परत इथे टाकत्ये.
-----------------
११ मार्च २०११ - शुक्रवार. दिवस नेहमीसारखाच उजाडला. सकाळपासून हवा मस्त होती. आज माझ्या लेकीला, अवनीला, ट्रेन ऐवजी स्वत:च्या सायकलवरुन शाळेत जायचं होतं. त्यामुळे सकाळी दोघी आपापल्या सायकलवरून गेलो. ट्रेननी ती एकटी ये-जा करते पण अजून सायकलनी एकटीला पाठवत नाही. त्यामुळे आता दुपारी पण तिला आणायला जावं लागणार, ह्या कल्पनेने नाही म्हटलं तरी जरा कंटाळाच आला होता.
मला कधी पासून जपानी खाद्यसंस्कृतीवर लेख लिहायचा आहे पण त्या विषयाचा आवाका एकतर प्रचंड आहे आणि त्यात माझ्या डोक्यात इतके काही आहे की ते सलग उतरवून होणार नाही. तेवढा वेळ पण नाही आहे सध्या. कदाचित अशा छोट्या छोट्या गोष्टींचे काही लेख लिहू शकेन.
तर सुरूवात बेंतो पासून. कारण हा पण जपानी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि डब्यातला खाऊ या धाग्यावर बर्याच जणींना हे बेंतो प्रकरण आवडले म्हणून हा लेखप्रपंच!