आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.
हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!