झोपेतून जागी होत असताना अजून तिचे डोळेही उघडले नव्हते , पण खिडकीवर टपटप आवाज ऐकला आणि उबदार पांघरुणातून उठलीच ती . तो आला होता , भेटायला , किती दिवसांनी . तिचा पाऊस ! आणि तिला त्याने साद घातली होती , त्याच्या पद्धतीनी . तिला सगळ्या त्याच्या पद्धती माहित होत्या . टपटप , रिपरिप टपक-टापक, धो-धो , टाप -टप् , तिचा लाडकाच ना तो. मग खिडकीत त्यांची गाठभेट आणि त्याच्या अजूनच उनाडक्या , अजूनच टापुर -टुपूर , ‘वेडा कुठला’ म्हणाली ती , पण तिथेच उभी राहिली . तोही जरा मग शहाणपणाची चादर पांघरलेल्या यड्यासारखा , तिला दाखवण्यासाठी म्हणून जरासा शांत झाला.
पाऊस म्हणले की आठवतात ती पुस्तके! खिडकीशी बसून चहा पीत पाऊस बघणे यातच खरे सुख! हॉस्टेलला असताना माझी कॉट अगदी खिडकीशी होती. पडद्यांना खिळे मारायला परवानगी नव्हती म्हणुन फक्त काचेच्या दारे असलेल्या खिडक्या! सेमेस्टर सिस्टीममुळे अभ्यासाव्यतीरिक्त फार काही वाचायला वेळ मिळायचा नाही तरी एखादी कादंबरींका होईना वाचली जायची. कॉलेज नुकतेच चालू झालेले असायचे. मस्त पावसाची झिम्मड, भिजणारे गवत खिडकीतून बघताना चहा हा हवाच! मी पट्टीची चहाबाज वगैरे अजिबात नाही. रोज हवाच असे नाही, पण पाऊस आणि पुस्तक या काँबीनेशन बरोबर तो हवाच!
पावसानंतर - ऊन-पावसाचा खेळ झाल्यावर बरेचदा बाहेर डेकवर गेलं की पूर्वेकडं इन्द्रधनुष्य दिसतं. गेल्या महिन्यात पाऊस पडल्यावर मुद्दाम आहे का बघायला गेले तर हे बघायला मिळालं!