“कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?” हुशार मकूने हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली.
अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे. आपलं कपाट उघडून पहा. सत्राशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडे, वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. ठराविक ठिकाणी घालायचे ठराविक कपडे आहेत. ‘मेरावाला क्रीम’ पासून म्हणाल तितके रंग आणि छटा आहेत. आपण मध्यमवर्गीयच आहोत, काटकसरीही आहोत पण कपड्यांचं कपाट भरून वाहतंय.
“बाह्य सौंदर्याला अर्थ नाही. मनाचे सौंदर्य महत्वाचे.” सोशल मिडियावर एका ढुढ्ढाचार्यांनी ठामपणे आपले मत मांडले. मग कातडी आणि त्यावरच्या आवरणाकडे लक्ष देणाऱ्या बायकामुलींच्या गाभ्यात कांदेबटाटे आणि दुष्टपणा ठासून भरलेला असतो तो कसा हे सांगणाऱ्या प्रतिक्रियांचा त्या मतावर पाऊस पडू लागला.
यात चुकीचे काही नाही. आपल्याला हेच शिकवलेले असते पहिल्यापासून. प्रत्यक्षात मात्र आपण उलट वागत असतो. कातडी आणि आवरणावरूनच व्यक्तीचे मोजमाप करत असतो.
“ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाह्यलीस का तिची? कॉटन बिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाईन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात? ” ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रीणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूज काकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. मस्तपैकी हातमागावरची साधी कॉटन साडी नेसल्या होत्या. ठकूच्या मैत्रिणीची साडी चारशे रुपयांची आणि कुजबूज काकूंची साधी साडी हातमागाची म्हणजे हजार दीडहजाराच्या घरातली तरी असावीच. ठकूने हसून खांदे उडवले.