काही काही झाड नकळत्या वयापासून माझ्या मनात ठाण मांडून बसली आहेत,त्याच मुख्य कारण म्हणजे माझ बालपण त्या झाडांभोवती खेळण्यात गेलं आहे. माझं माहेरच घर म्हणजे त्याकाळच्या शहरवजा गाव असलेल्या अंबरनाथमधल मस्त पुढे मागे अंगण असलेलं कौलारू घर. घराला लागून आमचं शेतसुद्धा होत आणि मी चौथीत जाईपर्यंत आम्ही भात, भुईमूग अशी पीकही घेत होतो शेतात. साहाजिकच घराच्या भवताली भरपूर विविध प्रकारची झाड होती.आमचं घर रस्त्यापासून बरच खालच्या पातळीवर होत तर रस्त्यावरून घरात यायला ज्या पायऱ्या होत्या त्याच्या बाजूला एक देवचाफा होता, जो अजूनही भरभरून फुलत उभा आहे आणि त्याच्या बाजूला चक्क शाल्मलीचा भलामोठा वृक्ष होता.