फॅमिली क्रॉनिकल्स ५ : आमचे घर रिमॉडेलिंगचे प्रयोग!

आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो. तहान लागल्याखेरीज विहीर खोदायची नाही हे तत्व! पूर्वी तर आमच्या राजा-राणीच्या संसारवेलीवर फुलं का काहीसं फुलायच्या आधी, शनिवार-रविवार सकाळी उठलो की आम्ही टि.व्ही. समोर सोफ्यावर तंगडया पसरून जे बसून रहायचो की बस्स! भूक लागली, काहीतरी नाश्ता बनवूया असा उच्चार दोघांपैकी जो पहिले करेल त्याने उठून मुकाट नाश्ता बनवायचा हा एक अलिखित नियम होता. त्यामुळे व्हायचं एवढंच की ११-११.३० वाजेपर्यंत दोघंही कुळकुळत पोटातले कावळे घेऊन बसून रहायचो पण उठून करावं लागेल या भीतीने ते ओठावर आणण होईल तेवढ टाळायचं! शेवटी एकाची विकेट पडायची आणि मग त्याचा नंबर लागायचा नाश्ता बनवायला.

हे असं असताना आमच्या आजूबाजूला नेमकी लोकं अशी भेटतात ना! ओळखीतल्या एकांनी एकदा घरातलं सगळं किचन - म्हणजे कॅबिनेटस, जमिनीवरचं हार्डवूड सगळं उखडून काढलं आणि सारं नविन बसवलं. हे असं काही घरच्या घरी (म्हणजे स्वतःचं स्वतःला) करता येतं हेच आम्हाला माहिती नव्हतं... पुलंनी म्ह्टलय तसं - कापूस गादीतच जन्माला येऊन तिथेच वाढतो आणि नष्ट पावतो - तसं आमचं प्रामाणिक मत - या सर्व गोष्टी घराबरोबरच येतात आणि यथावकाश घराबरोबरच नष्ट होतात. यात आपल्याला काही उलाढाल करता येते हे गावीच नव्हतं आमच्या.

तर आता ह्यांनी हे असं संपूर्ण किचन उसकून सगळं नविन बसवलं हे दुसर्‍या कोणाकडे महान आश्चर्य म्हणून आम्ही व्यक्त केलं तर त्यांनी ऐकवलं त्यात काय - आम्ही सगळ्या घरामध्ये हार्डवूड बसवले स्वतः. हे काही फारसं कठीण नाही हे ही वर जोडलं. अरेच्या! आपण फार म्हणजे फारच 'हे' आहोत असं वाटू लागलं.

तसं नाही म्हणायला आमच्या खात्यावर एक ऐतिहासिक असं टेबल बांधल्याची नोंद आहे. एके काळी एक टेबल बनवलेलं आम्ही. म्हणजे त्याचे सगळे भाग तयार आणून ते एकत्रित बांधायचे काम (assemble) केलेलं. ते टेबल बनतोय असा आमचा आपला भाबडा समज होता. प्रत्यक्षात ती निघाली एक ऐतिहासिक इमारत - leaning tower of Pisa! तरीही न डगमगता आम्ही त्यावर कॉम्प्युटर ठेवलाच आणि येणार्‍या-जाणार्‍यांना अभिमानाने आमचं creation दाखवायचो. लोकही दूरून-दुरून तो बघायला यायचे. पण कसं कोण जाणे - एक दिवस आमचा तो टॉवर त्यावरच्या कॉम्प्युटर सकट जमिनदोस्त झाला. आपण बांधलेल्या पहिल्या-वहिल्या गोष्टीचा तो शेवट पाहून परत त्या भानगडीत पडायचं नाही असा आम्ही पणच केला.

अनेक वर्ष तो पण conveniently पाळला पण. मग मात्र एका दुर्देवी क्षणी फसलो. आजू-बाजूचे फारच काही-काही प्रॉजेक्टस करतायत आणि आपण असेच बावळट राहिलोय अशी उगिचच टोचणी लागू लागली. त्या तिरमिरीत काहीतरी उसकूयाच आता असं म्हणून डायनिंग रूम मधलं (वॉल-टू-वॉल जमिनीवर चिकटवून बसवलेलं) कारपेट उसकायचं ठरवलं, त्याजागी चांगलं हार्डवूड घालूया असा एक जंगी प्लॅन आखला.

मग काय? आधी सुरुवात कशानी? खरेदीने! हार्डवूड घेणं आलं...बरीच शोधाशोध करून आणि आमच्या मते जबरदस्त संशोधन करून बांबू घ्यायचं निश्चित केलं. वा! वा! सुरुवात तर जोरदार! आयत्या वेळी दुकानात गेलो तर तिथल्या सेल्समॅनला ३ मिनीटात लक्षात आलं की यडगावची पाहुणी आल्येत. चला बरे बकरे सापडले असं म्हणून त्याने काहीतरी अचाट प्रकारचा बांबू गळ्यात मारायला सुरुवात केली. हाच सगळ्यात मजबूत हे सांगितलं आणि वर आमच्याकडे आपादमस्तक न्याहाळत तुम्ही चाललात तरी काही होणार नाही असा निर्वाळा दिला! ...भरगच्च डील जाहीर केलं पण त्याच बरोबर हा प्रकार आता discontinue होणार आहे हे ही नमूद केले. हीच ती जिनकी हमको तलाश थी असं ठरवून तडक घेऊन आलो त्या लाकडाच्या मोळ्या घरी.

दुसऱ्या दिवशी आधी पाहिलं ते जमिनीला बसवलेलं कारपेट, त्याखालचं पॅड यांच उत्खनन कार्य पार पाडणं झालं. ते करण्यात मंडळींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. हाती सापडेल त्या आयुधाने ज्युनिअर, सिनिअर - समस्त मंडळींनी आपापले हात साफ करून घेतले. उत्साहाच्या भरात आता पायापण खणून काढतायात की काय अशी परिस्थिती उद्भवली. पण एकंदरीत आम्हीच आमच्यावर खूष झालो. ह्या! उगाच लोकांचं कौतुक केलं; हे एवढं सोप्पं आहे होय! लोकांचं फुका कौतुक केल्याने जरा दु:खीच झालो. असो. आता दुसऱ्या दिवशी ही आणलेली लाकडं ठोकायची की झालं! असं म्हणून त्या उचकटलेल्या जमिनीसमोर एक यथासांग फोटो सेशन झालं सर्वांचं. मग एवढं काम करून आता दमलो बुवा म्हणून तडक जेवायला बाहेर जाऊन मनसोक्त हादाडूनही झालं.. आता आपणही सर्वांसमोर फुशारकी मारत आम्ही केलंय बरं का हे – असं सांगत फिरून, अजून कोणा ४ जणांना न्यूनगंड देऊन सोडू अशी स्वप्नं बघत जेवलो.

दुसऱ्या दिवशीकरीता ज्या मित्राने ‘फारसं काही कठीण नाही’ म्हणत आख्ख्या घरात जमिनीवर लाकडं ठोकून काढलेली त्याला साकडं घालून ठेवलेलं की बाबा ये – आम्हालाही दाखव कशी ठोकायची ही लाकडं आणि आमची बोहोनी करून दे! दुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी न्हा-धोके तो त्याच्याकडील हत्यारं पारजत हजार झाला. ही अशी लाकडं मांडायची आणि मग त्याला हे मोठं हार्डवूड फ्लोरिंग करीता असलेलं स्टेपल मारायचं. असं म्हणत त्याने त्याच्या आयुधाने पाहिलं स्टेपल मारलं. लाकूड जसच्या तसंच. स्टेपल पिन मात्र मान मोडून पडली. असं-कसं झालं, म्हणत तो आणखी जोर लावत परत, परत-परत पिन मारू लागला. आम्ही मागून त्याला पिना मारतोय – "जोर लगाके हैश्या!" – असं म्हणत! वर आणखी “असा कसा रे तू? नक्की तूच केलंस ना तुमच्या घरातलं काम?” – असंही टोचलं. अनेक पिना धारातीर्थी पडल्यावर मग मात्र त्याने हात वर केले. “ही लाकडं आहेत की दगडं?” हे काय आपल्याला जमणेबल काम नाही, उगाच माझं हे स्टेपलर मात्र तुटायचं या नादात - असं म्हणत त्याने त्याची हत्यारं गुंडाळायला सुरुवात केली.

आता आली का पंचाईत? कप्तानानेच असं सुकाणू सोडल्यावर आम्ही तर कसला टिकाव धरतोय?आमचं अवसान पारच गळालं. एव्हाना निरनिराळे उपाय अवलंबून बघत निम्मा दिवस वाया घालवला होता. आता काय करावं म्हणत शेवटी विचार केला – तेथे पाहिजे जातीचे – आता हे स्वत: करण्याचे उद्योग बास झाले. एखादया प्रोफेशनल लाकडं ठोकणाऱ्यालाच बोलवावं झालं आता, असा ठराव तत्काळ पास झाला. त्या कारागिरांना फोनाफोनी करणं चालू झालं.

आता आयत्या वेळी हवं तेव्हा धावून यायला ते बसलेत? कोणी सांगतोय १५ दिवसांनी येतो तर कोणी ४ दिवसांनी आधी येणार पहाणी करायला मग ठरवणार काम करणार की नाही ते! आता यांची मर्जी होत्ये की नाही याची आम्ही वाट बघत बसणार का? ती उचकलेली डायनिंग रूम, तो सगळा पसारा, खिळे, इतर आयुधं आणि त्यातून नाचणारी ज्यु. मंडळी! ते शक्यच नव्हतं. मग काय एक कारागिर भेटला नावसा-सायासाने. त्याच्या अटी – मला फक्त उद्या वेळ आहे – ९ ते ५. त्यात जेवढं जमेल तेवढंच मी करणार. ५ वाजले की काम असेल त्या अवस्थेत ठेऊन निघणार, पुढचं तुमचं तुम्ही बघून घ्यायचं – काय नी काय! मान्य करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते महाशय त्यांची हत्यारं पारजत अवतीर्ण झाले.

मग त्या महाशयांनी त्यांचे प्रयत्न जारी केले. स्टेपल ह्या हार्डवूड वर चालत नाही ह्या आमच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करून त्याने परत एकदा सुरुवात स्टेपलने केली. तासभर ती खटाटोप करून झाल्यावर, बांबू आणलेल्या दुकानाला अनेक फोन करून झाल्यावर, ह्या प्रकारच्या बांबूवर स्टेपल चालत नाही असं त्याने जाहीर केलं. मग आम्ही तुला हे तुझ्याच मायबोलीत सांगत होतो ना रे, आमच्या नाही ना, आँ! – हे आम्ही आपलं मनात म्हटलं. हो, उगीच अपमान झाला तर काका चालते व्हायचे! सध्या तर तूच आमचा तारणकर्ता ह्या भावनेनी त्याच्याकडे बघत होतो.

आता काय म्हणून आम्ही आपले त्याच्याकडे बघत असताना त्याने पुढला पर्याय फेकला – ग्लू – commercial glue! एव्हाना लाकडं जोडायला एक भलं थोरलं स्टेपलर येते या धक्क्यातून बाहेर पडून आता लाकडं जोडायला एक गोंद येतो ही बातमी पचवायला घेतली. मग काका तो ग्लू आणायला अंतर्धान पावले. आता चमत्कार होणार या आनंदात आम्ही होतो. काका ग्लू घेऊन हजर झाले एकदाचे आणि तो ग्लू लाकडाच्या पट्ट्यांना लावून तासभर ठेऊ असा प्लान दिला. त्यानुसार तासाभराने मस्त चिकटलेली ती लाकडं बघायला आम्ही आतुरतेने गेलो. एक पट्टी खेचून बघितली तर काय छानपैकी हातात! commercial glue ला पुरून उरलेले ते बांबू! एव्हाना आम्ही हात टेकले. आता ही लाकडं नेऊन फेकुया त्यांच्या डोक्यावर आणि पैसे परत नाही दिले तरी चालतील पण ही लाकडं तुम्हाला साभार परत असं सांगायची वेळ आलेली.

पण काकांनी अजून एक प्रयत्न म्हणून मोठाले रबरबँड पोतडीतून बाहेर काढले. ते त्या लाकडाच्या पट्ट्यांवरून गुंडाळले. आता हे ४-५ तास ठेवणार असे जाहीर केले. सर्व हार्डवूडला अश्या रीतीने ४-५ तास बांधून संध्याकाळी ते काढून टाकून आता ५ वाजले मी निघालो असं म्हणत काकांनी पोतडीत साहित्य ठेवायला सुरुवात केली. हुश्श! ते बांबू आता एकदाचे लागले होते जागी! पण त्या बाजूच्या दोन पायर्‍यांचं काय – त्या तश्याच उघडया पडल्यात हे विसरले का, असे विचारे पर्यंत काका वदले “आता तुम्हाला कळलंच किती सोप्पं आहे हे! करून टाका त्या दोन पायऱ्या.” आणि पैसे घेऊन पसार झाले. पुढचे दोन दिवस त्या हार्डवूड फ्लोअर्स वर पाय ठेऊ नका अशी एक धमकी देखील जाताना देऊन गेले.

आता झालं? हे प्रकरण परत आमच्या गळ्यात पडलं . पण काही पर्याय नव्हता. आता त्या उघड्या पडलेल्या पायऱ्या झाकणं भाग होतं. मग काकांना स्मरून ती लाकडं डकवली त्या पायर्‍यांवर आणि ते रबरबँड बांधून ठेवले त्यावर. २ नाही तर चांगले ४ दिवस वाट बघून अखेरीस ते सर्व रबरबँड काढून घाबरत पाय टेकवले. सुदैवाने चिकटलेली बुवा ती लाकडं. पण आमच्या त्या पायर्‍यांची कथा काय वर्णावी! एका टोकाला पाय ठेवला की दुसरी बाजू कर्र्रर्र करत इंचभर वर यायची...दुसर्‍या बाजूला तो प्रश्न नव्हता. ती तशीही तर दोन इंच वरच आली होती.

पण तरीही 'आपला' प्रोजेक्ट एकदाचा पार पडला या आनंदात आम्ही होतोच. आता थोडीशी मदत घेतली तर काय! मुख्य काम तर आम्हीच केलं नव्हतं का! यानंतर कोणी घरी येणार म्हटलं की घरी आवर्जून म्युझिक - जरा जोरातच लावायची काळजी मी घेऊ लागले. ती कर्र्रर्र्र्र कर्र्रर्र झाकायला!!! पण लोकं बाकी भोचकच! फार बारीक न्हाहाळणी करतात आणि फार प्रश्न विचारतात.

तर अश्या प्रचंड यशस्वी प्रोजेक्ट नंतर वर्षभरात आम्ही आणखी काही remodeling करायचं ठरवलं. आणि आपल्या चुकांतून शिकतो ना माणूस...म्हणून यावेळी अजिबात स्वत: न करता एक कॉन्ट्रॅक्टर आणू असा ठराव पास केला. या आपल्या कृतीतून आपण एका बिझीनेसला प्रोत्साहन देतोय असा एक उदात्त विचारही केला.

तर यावेळी एक नीट, भलत्या-सलत्या अटी न घालणारा कॉन्ट्रॅक्टर पकडून आणला. या बाब्याने घर बघायला आल्यावर पहिला प्रश्न टाकला – हे या पायर्‍यांवर हार्डवूड कोणी बसवलं? नवरा आजू-बाजूला नाहीये हे बघून मी बिनदिक्कत ठोकून दिलं – आधीच्या कॉन्ट्रॅक्टरने! यावर त्याने त्या न पाहिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला मजबूत शिव्या घालून तो कसा बावळट असणार हे मला ऐकवलं. मी देखील न डगमगता त्याच्या हो त हो मिळवून दिला.

त्याला बहुदा काहीतरी शंका आली असावी. कारण त्याने मी आस-पास नसताना परत नवऱ्याला – या पायर्‍या कोणी शाकारल्या हा प्रश्न परत एकदा विचारला . आणि जगात सत्याचा वसा घेतलेल्या नवऱ्याने आम्हीच लावले असे मान्य पण करून टाकले – व्यवहार चतुराई ती कशी नाहीच! यावर त्या बाब्याने तुम्ही कित्ती बावळट आहात हे त्याला सुनावले. आता मी हे सारं उचकून काढतो – अशी तंबीही देऊन टाकली.

ह्या बाब्याने ही Divide and conquer strategy पुढे सर्व remodeling च्या दरम्यान भरपूर वापरून घेतली. कुठलीही गोष्ट त्याला हवी तशीच करून, कारे बाबा असं केलंस – असं विचारलं की - मला बाजूला गाठून तुझ्या नवऱ्यानेच असं कर सांगीतलं आणि त्याला बाजूला घेऊन बायकोने सांगितलंय - अश्या खेळी करून त्याच्या मनाप्रमाणे आमच्या घराचं remodeling करून दिलं. आता काय आपण अगदी ‘हे’ आहोत ते एव्हाना पटल्याने फारश्या भानगडीत न पडता त्याने जे केलं ते मान्य करून घेतलं. निदान ते कर्र्र्रर्र्र कुर्रर्र आवाज तर नाहीत ना हे समाधान!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle