बिननावाचं 'निनावं'

नावात काय ठेवलंय असं शेक्सपियर साहेब बोलुन गेलेत. पण नाव हवंच नाही का प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टीला? त्याशिवाय ओळखणार कसं हो? आणि कसं आहे ना, नावागणिक त्या त्या पदार्थ/व्यक्ती/वस्तूची एक खास अशी ओळख असते. आता पुरणपोळी हे नाव उच्चारलं की ती न खाताही जीभेवर तिची चव रेंगाळतेच की नाही? तर असं हे 'नाममाहात्म्य'. पण काही अभागी जीवांच्या वाटेला हे नावदेखील येत नाही हो..

पारंपारीक सी. के. पी. पक्वान्नांपैकी एक पदार्थ असाच आहे नामानिराळा.... बिननावाचा.....पण बिनकामाचा खचितच नाही. त्यातल्या त्यात जे गोड खाण्याचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी तर विशेष जिव्हाळ्याचा एक पदार्थ आहे तो म्हणजे 'निनावं'. याला नाव का ठेवलं गेलं नाही हे एक कोडंच आहे, न सुटलेलं, कुणी कधी दखलही न घ्यावी इतका टाकाऊ तर तो नक्कीच नाही.किंवा मग पूर्वीचे ॠषीमुनी साक्षात परब्रम्हाचे दर्शन झाल्यावर त्याचे यथार्थ वर्णन करण्यास बसले आणि "नेति नेति" असे उद्गारुन त्यांनी तो नादच सोडून दिला, असे काहीसे या निनाव्याच्या बाबतीत घडले असण्याची शक्यता आहे बरं का... त्याचे उचित वर्णन करु शकेल असा शब्द/नाव कुणाला सुचलंच नसावं आणि म्हणून तो राहिला निनावी.

आता त्याची प्रस्तावना इतकी लांबलीच आहे तर हा पदार्थ कधी केला जातो ते ही सांगतेच.

श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा, उपास, अनुष्ठानांचा. तो सुरु होण्याआधी जशी दिव्याची अमावास्या असते तसंच श्रावण संपल्यावर, म्हणजे पिठोरी अमावास्या झाली की त्यानंतरचा दिवस सी के प्यांसाठी असतो 'दाटा' दाटा म्हणजे श्रावण समाप्तीप्रित्यर्थ ऑफिशिअली मासे/मटण खाण्याचा हा दिवस. संपूर्ण महिना जीवतीची प्रतिष्ठापना घरांघरांत केली असते आणि तिच्यासमोर कलशात एक नारळ ठेवून तोही पुजला असतो. हा नारळ खरेदी करतांनाच चांगला बघून एक महिनाभर टिकेल असा घेतला जातो. या दाट्याच्या दिवशी जीवतीची पूजा करुन, गुळाचे बोट तिच्या तोंडी लावून तिला निरोप दिला जातो आणि तिच्यासमोर ठेवलेला हा नारळ प्रसाद करुन घरात संपवला जातो. पण प्रसाद म्हणजे कुठलाही नाही बरं. तर या जिवतीच्या नारळाचंच निनावं बनत असतं, ते ही दाट्याच्या दिवशी. अशी ही निनाव्याची परंपरा.

आता एक स्पॉइलर अ‍ॅलर्ट देऊनच ठेवते - हा पदार्थ नारळाच्या दुधात बनतो. त्यामुळे फिटनेस फ्रीक लोकांनी अंमळ दुर्लक्षच करावं. निनाव्याकडे की फीटनेसकडे ते तुम्हीच तुमचं ठरवा :P

आता साहित्य आणि कॄती पाहूयात.

साहित्य

१. नारळाचे दाट दूध - एक ते दीड वाटी
२. बेसन - १ वाटी
३. गुळ - किसून/चिरुन १ वाटी ( गोड खाण्याच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी/जास्त करु शकता).
४. साजूक तूप - ४-५ मोठे चमचे
५.जायफळ पावडर - स्वादानुसार
६. केशर काड्या ४-५
७. बदाम, पिस्ते - सजावटीसाठी काप करुन

कॄती

नारळाचे दाट दूध साधारण दीड वाटी होईल इतके काढून घ्यावे. बेसन कोरडेच मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावे. थंड होऊ द्यावे. तोपर्यंत गुळ चिरुन घ्यावा. नारळाच्या दुधात गुळ व रूम टेंपरेचरला आलेले बेसन एकत्र करावे. व्यवस्थित एकजीव करावे. बेसनाच्या गुठळ्या किंवा गुळाचे बारीकसे खडेही राहता कामा नयेत. जायफळ पावडर व केशर काड्या घालाव्यात.यानंतर कढई मंद गॅसवर ठेवून त्यात साजूक तूप साधारण २-३ मोठे चमचे घालावे. तूप गरम होताच नारळाच्या दुधाचे बेसन , गुळ घातलेले मिश्रण त्यात घालून सतत ढवळत रहावे. मिश्रण लगेचच घट्ट होऊ लागते. सतत हलवत राहिले की गुठळ्या होत नाहीत. तेव्हढी काळजी घ्यावी. साधारण पिठल्याची कंसिस्टंसी आली की कढईखाली एक लोखंडी तवा ठेवून वर झाकण ठेवून शिजू द्यावे. अधुनमधुन हलवावे. तळाशी खरपूस तर वरती घट्ट, वड्या पडण्यासारखे होईपर्यंत ते गॅसवर ठेवावे. वरुन साजूक तूप २-३ चमचे सोडावे. निनावं तयार आहे. वरुन बदाम, पिस्ते लावुन सजावट करावी.

आता माझा शॉर्टकट सांगते. पिठल्याइतके झाले की त्यानंतर हलवतांना त्रास होतो त्यामुळे मी पिठल्याची कंसिस्टंसी आली की बेकींग ट्रेला तुपाचा हात लावून मा. वे. मोड वर ३-४ मिनिटे आणि त्यांनर कंवेक्शन वर साधारण १० मिनिटे ठेवते. त्यामुळे छान वड्या पडतात आणि खरपूसही होते शिवाय बरेच कष्ट वाचतात.

टीप्सः-
१. नारळाचे दुध दाटच असायला हवे. यासाठी खोवलेल्या ओल्या नारळाच्या किसात, किस जेमतेम बुडेल इतपत पाणी घालून काही वेळ ठेवायचे. अर्धा तास पुरे आणि मग ते मिक्सरला बराच वेळ फिरवायचं, दाट दुध निघतं.

२. बेसनाच्या गुठळ्या आणि गुळाचे खडे अजिबात राहता कामा नयेत.

३. सतत घाटत रहाणे.

ninave.jpg

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle