भटकंती -१०
भटकेपणा बर्याच प्रकाराचा असतो. प्रत्यक्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनातल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य!
अश्या बर्याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं. माझं लहानपणीचं घर. वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभं आहे. तोक्यामधलं एक सुंदर तळं, त्यात पानगळीच्या सुंदर रंगांचं प्रतिबिंब पाहता पाहता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीचीच पर्वती! आठवणीतली सफर. :)
हे भटकणं म्हणजे फक्त ती निव्वळ जागा नसून, जागा, माणसं, आवाज, खादाडी, गंध ह्या सगळ्यांच्या आठवणींचं मस्त मिश्रण असतं! अश्या आठवणीतल्या जागा परत पाहायचा योग आला तर ते एकाच वेळी दुखरं अन तरीही हवंसं फिलिंग असतं!
अमदाबाद, अशीच एक मनातली जागा.
१९९३ फेब्रुवारी, टपरीवर चहा पिताना गप्पा झाल्या ट्रेनिंगला अमदाबादला जायचं, बोलीभाषेत अम्दाबादच! आर्किटेक्चरच्या चौथ्या वर्षाला एक टर्म कोण्या आर्किटेक्टच्या ऑफिसात काम करून, हवेत गेलेल्या कलाकारांना जमिनीवर आणायचा, हा युनिवर्सिटीचा स्तुत्य उपक्रम आहे! तर 'औकातीच्या बाहेर गमजा मारणे' हा आमचा आवडता टाईमपास चहाबरोबर नेहेमीप्रमाणे चर्चेला होता. स्वतःवर अत्यंत खूष असणे, जगात काहीच अशक्य नाही ,अन हे सुंदर जग आता आपलीच वाट पाहतंय, की ये अन मला पादाक्रांत कर, अश्या बाळबोध गोड गैरसमजूतींनी ओतप्रोत भरलेलं, उबदार घरट्यात सुखरूप बसून, उंच उडायची स्वप्न पाहणारे मस्त रंगीत वय अन दिवस होते ते. जायचं तर जगात भारी आर्किटेक्टकडेच हे ही नक्की होतं ( आपापलंच ! :dd: ) मी अन रुपालीनी लिस्ट केली अन सरळ पत्र पाठवून दिली. तेव्हा मेल पाठवणे वगैरे जमाना यायचा होता. माहितीचा स्त्रोत छापिल पुस्तके अन माणसे हा असायचा. दोन आठवडे उत्तर आलं नाही म्हटल्यावर प्रत्यक्ष जाऊन येऊ, असं ठरवलं. आता प्रवास करायचा म्हटल्यावर घरी सांगणे, विचारणे प्रकार आला. अहिंसा एक्स्प्रेस तेव्हा मंगळवारी अन शुक्रवारी धावायची. पुणे-अहमदाबाद. जायचं नक्की केलं तो सोमवार म्हणून शुक्रवारी जायचं ठरलं. पुणे स्टेशनला जाऊन तिकीटं काढली. अन कॉलेजात कर्मधर्मसंयोगानी भेटलेल्या एका प्रोफेसरांनी सुचवलं म्हणून त्यांनीच दिलेली रेकमंडेशन लेटर्स न्यायचं ठरवलं. तिथे शिकत असलेले सिनियर्स एखादा दिवस राहायला देतील, अशी कल्पना होती. नैतर लांबच्या नातेवाइकांचा पत्ता होता. (आज विचार करताना मला माझ्या पोकळ आत्मविश्वासापेक्षा, आईच्या धारिष्ट्याचं नवल अन कौतुक वाटतं). तिथे जाताना केलेल्या कामाचं बाड (पोर्ट्फोलिओ) बरोबर घेतला होता. एव्हाना टर्म संपत आली होती पण शेवटपर्यंत काम चालू, हा बाणा असल्यानी अपूर्ण शिट्स होती. मी अन रूपालीनी ती चक्क ट्रेनमधे रंगवून पूर्ण केली होती. आजूबाजूच्या प्रवाश्यांना करमणूक! कालूपूर स्टेशनावर पाठीवर सॅक अन काखोटीला पोर्ट्फोलीओचं बंडल, अश्या आम्ही उतरलो, अन तिथे आमच्या 'अमदावाद इरा'ला सुरवात झाली . :)
लिस्टप्रमाणे ६ आर्किटेक्ट्सकडे जाणार होतो, अन शेवटी बी. व्ही. दोशी यांच्या 'संगाथ' या स्टुडिओला भेट (इथे काय आपला पाड लागणार नाही, तेव्हा फक्त पंढरीला गेल्यावर विठूरायाला 'हाय' म्हणायचं इतकंच ठरलं होतं.) असा दिवसभराचा प्लॅन होता. माझ्या डोक्यात तेव्हा आर्किटेक्चरल जर्नॅलिझम वगैरे चालू होतं. यथावकाश मला अन रूपालीलाही एकेक आवताण मिळालं. दिवाळीनंतर रूजू व्हायचं होतं. काम संपून भटका मोड ऑन झाला. अन पहिलं ठिकाण सेप्ट (स्कूल फॉर एन्व्हेरॉन्मेंटल प्लॅनिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी), खुद्द दोशींनी प्लॅन केलेलं अन स्थापिलेलं बेस्ट आर्किटेक्चरल कॉलेज! तिथे आमचे काही सिनियर्स शिकत होते. गेटापाशीच भेटले अन त्यांनी सुचवलं आधी दोशींच ऑफिस पाहून या, मग इथे जरा आम्हाला सबमिशनला मदत करा. मग काय निघालो. ते पोर्टफोलीओचं बाड तिथेच ठेवायची बुद्धी सुचली नाही, हे बरं झालं. कारण संगाथ (दोशींच ऑफिस)ला हातातली बाडं पाहून आमची ही मुलाखत झाली. अन सिलेक्शन लिस्ट जाहिर होईपर्यंत बाहेर थांबायला सांगितलं. दोशींकडे इंटर्व्यु देऊन आलो यार!! हे पण मोठंच पुण्य कमवलं की! तेवढ्यात राधिकाबेननी, (दोशिंची मुलगी ही पण आर्किटेक्ट आहे) सिलेक्ट झालेल्यांची लिस्ट वाचली. चक्क माझं नाव झळकलं होतं त्यात. बातमी पचनी पडेपर्यंत आम्ही दोघी गेटाबाहेर. दोशींनी कार्बुसिएकडे काम केलंय म्हणजे आपले आजोबा गुरुजी झाले की ते आता! मी जवळपास ट्रान्समधे! विजय रस्त्यावरच्या एका पब्लिक टेलिफोनवरून आईला फोन करून बातमी सांगितली अन अस्मादिकांचा रथ चारंगुळे वरून ग्लाइड झाला म्हणा, पुण्याला येइपर्यंत.
पुण्याला कॉलेजात येऊन चालू सेमिस्टरची परिक्षा देणे, वगैरे निव्वळ फॉर्मॅलिटी! मी पोचले होते तिथे ऑलरेडी! ही जायची संधी मिळाली तेव्हाची युफोरिक परिस्थिती, अन त्यानंतर तिथे घालवलेले जवळजवळ ८ महिने!! कामाचा अनुभव मिळाला, हा निव्वळ छोटासा भाग म्हणावा इतका डोंगरभर जगायचा अनुभव, मिळालेलं मैत्र, माझी धन्नो (एम ८०) घेऊन केलेली भटकंती, केलेल्या प्रत्येक कृतीला मी अन मीच जबाबदार असणार आहे, ही भलतीच जबाबदारीची जाणीव, चार रुपये तास असा मिळणारा पगार अन शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ केलेली एक्स्कर्शन्स! माझा, आजवरच्या आयुष्यातला सगळ्यात आवडता कालखंड!
घरी, आधी माझे आईबाबा बहिणी, मग नवरा; बोलता बोलता डोळे चमकले की, आता अमदावादच्या सुरस कथा आख्यान लागणार, हे समजून घ्यायचे. :) त्यानंतर त्यापेक्षा मोठं जग पाहिलं, व्यक्ती म्हणून, आर्किटेक्ट म्हणून जबाबदार्यांचे विविध रोल निभावले. अन आता जवळपास २५ वर्षांनी, माझा लेक त्याच वळणावर उभा दिसला. घरट्याबाहेरचे स्वप्न घरट्यातून पाहणारा! एक अमदावाद ट्रीप झालीच पाहिजे, असं वाटलं... आमच्या ढीग गप्पा होतात नेहेमी, अन (ऑल्मोस्ट) कूल मॉम आहेस, असा किताबही आहे खात्यावर. पण, तेव्हाच्या इन्नाची स्टोरी सविस्तर सांगितलीच नव्हती कधी. मग एका विकेंडला ठरवून टाकली ट्रीप!
ट्रीप म्हणजे दोन समांतर ट्रॅक चालू होते मनात. पुणे एअरपोर्टला बोर्डिंगची वाट पहाताना, जहांगिर हॉस्पिटलच्या समोर, जलाराम ट्रॅव्हल्सची बस अन सॅक पाठीवर लावलेली एक मुलगी अन तिला सोडायला आलेलं खानदान आठवत होतं. आईनी फार सुचना दिलेल्या आठवत नाहित, तिनी तोवर जाणता (माझ्या) अजाणाता शिकवलेल्या, रुजवलेल्या गोष्टींवर अन बहुतेक माझ्यावरही विश्वास असावा! अहमदाबादला तेव्हा मला जागा शोधेपर्यंत रहायला, एका ओळखीच्यांच्या मुलाच्या मित्राच्या आजोळी बोलून ठेवलं होतं. लाल दरवाजा परिसरात त्या आजी रहायच्या. तिथे जाऊन जागा शोधणं, हे मी आपापलं करायचं होतं. आज विमानानी सव्वा तासात पोचताना, तेव्हा सापूतार्यात बंद पडलेली बस आठवली. जंगलातले काजवे पण. मनातला साउंड ट्रॅक म्युट केलेला होता. अन लेकाला सादर करायचं आख्यान साबरमतीच्या काठावरच, असं ठरवलं होतं.
उतरल्यावर रिक्षात बसून पहिल्यांदा सेप्टला गेलो. तिथल्या टपरीवर बन-मस्का अने बे मसाला चाय, हा सकाळचा ब्रेक फास्ट असायचा. अन तोच खायचा होता! चहा अन बनमस्क्याबरोबर केलेल्या चर्चा, घातलेले वाद, जुळलेली प्रकरणं सगळं आठवलं. तो टुटी फ्रुटीवाला बन तोही बचकभर मस्का लावलेला खाल्ला, अन अख्यानाचं पहिलं नमन सुरू केलं. पार आमचे कारनामे, घर शोधतानाची गंमत, रात्रंदिवस स्तुडिओत काम, फोटोग्राफी, पहिल्यांदा एकटीनी हॉटेलात जाऊन खाल्लेला पराठा, अन चक्क मी घरच्या आठवणींनी गाळलेले डोळे, बहिणींना, आईला लिहिलेली पत्रं, त्यांची पत्रं, भरपूर भटकंती, तेव्हा अचानक कळलेली जबाबदारीची व्याख्या, हुसेन वगैरे मंडळींबरोबर काम करायची संधी. बरीच बडबड केली. लेक म्हणाला, तू इन्टरेस्टिंग होतीस यार इन्ना, कूल एकदम. :ड
संगाथ, आमच्या पंढरीची वारी ही करणं, क्रमप्राप्त होतं लेकाबरोबर. टाइम लाइन नावाचं त्यांच्या आजवरच्या कामाचं प्रदर्शन तिथे एका नव्या दालनात लावलेलं दिसलं. मी ज्यावर तेव्हा काम केलं, ते दोन प्रोजेक्ट्सही झळकलेले दिसले त्यात. हुसेन दोशी गुफाच्या इनॉगरेशनच्या फोटोमधेही मी सापडले. तिथले आमचे गप्पा मारायचे कोपरे, तेव्हाचे ड्राफ्टिंग बोर्ड्स अन मोजके ५-६ कॉम्प्युटर्स, लायब्ररी, मॉडेल मेकिंग रूम कालानुरूप बदलल्या. पण तिथे काम करायला आलेल्यांचं स्पिरिट तेच, तसंच दिसलं!
बाकी ट्रीपमधे आमचे खादाडी अड्डे, खरेदीची ठिकाणं, ड्राइव्ह इन थिएटर, आय आय एम, कोरियांनी डिझाइन केलेला गांधी आश्रम, सरखेज रोजा, अडालजची स्टेप वेल दाखवणारे कार्यक्रम झालेच. पण महत्वाचा प्रवास, मला वाटतं, मी अहमदाबादला गेले तेव्हा माझी आई ज्या थांब्यावर उभी होती तिथवर, मी पोचणे, हा होता! स्वतःचं जग एक्सप्लोअर करायला, आपलं बोट सोडून जाणारी पोरं! अन स्वतःवर अन त्याहून जास्त पोरावर विश्वास असणारी आई. वन फुल सर्कल! भटकंती! आठवणीतली!