काल एका मैत्रिणीला भेटलेले. तशी खूप ओळख मैत्री नव्हती. पण तरीही तिला माझ्याशी खूप मनातलं बोलावसं वाटलं. कितीतरी दबलेलं, खदखदणारं बाहेर पडलं. किती तरी समुद्र वाहून गेले.
काय अन कोणत्या शब्दात आधार देत गेले कोणजाणे. पण हळूहळू शांत झाली,यातच समाधान.निघताना तिच्या चेहऱ्यावरची नव्याने जगण्याची उर्मी दिसली, अन म्हणून परतले मी. पण मनातली हूरहूर संपत नव्हती.
आज सकाळी तिचा स्वत:हून फोन आला. खूप भरभरून बोलली, नवीन काही करण्याचा विचार, योजना मांडल्या. अन त्यातून हे मनातली अत्तरे उमटली.
तिला फोन करून एेकवलं. ती निशब्द,तिने फोनच बंद केला. पाच मिनिटानी तिने परत फोन केला. आणि म्हणाली तू दिलेले मनाचे अत्तर आयुष्यभर पुरेल. मगाशी बोलायला शब्दच फुटेना म्हणून फोन बंद केला.
तिच्याच आग्रहावरून ही कविता पब्लिश करतेय. ती म्हणाली कितीतरी जणी मनातले सारे बोलूही नाही शकत कोणाजवळ. तुझ्या कवितेतून त्यांनाही हे मनातले अत्तर मिळू दे.
काहींना वाटेल कि हल्ली कुठे असं कोणी असतं... पण माझा अनुभव वेगळं सांगतो मला.
------
मनाची अत्तरे
किती किती काटे कुटे, किती रप रप चिखल
जुन्या जुन्या अन्यायांचे, किती किती हिशोब ठिशोब
या अपेक्षा, त्या कर्तव्यांचे, किती ठेवलेले ओझे
वाहताना विसरलेले मी, माझे सारे जगणेच साधे
राहिले ओढत एकटी एकटी, नीट संसाराचा गाडा
भावनांच्या साऱ्या साऱ्या, झाला रे पुरा राडा
प्रेम, जिव्हाळा, माया, लागणी; नाही कुठे कुठेच सापडली
आज वळून बघताना, दिसे माझी मीच हरवलेली
का, किती, कशाला, कोणासाठी; मर मर मी मेलेले
माझ्या अस्तित्वाचे आजवर, जड मढे मी पेललेले
आता पुरे पुरे, हे सारे; बास प्राक्तनाची लक्तरे
आता ल्यायचीच फक्त, फक्त माझ्या मनाचीच अत्तरे