श्रीहरी स्तोत्रम् ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे.
************
तूच नारायणा ,कधी गळ्यात पुष्पहार घालून बसतोस आणि मी तुला हरी हरी म्हणून हाका मारते आणि तू 'ओ ' तर देत नाहीसच पण सर्पमाळ व रूद्राक्षाने सुशोभित होऊन येतोस. मगं मला वाटते की हा आशु-तोष तर नक्की ऐकेल.. मला कधी कळणार की तुम्ही एकच आहात.
काल एका मैत्रिणीला भेटलेले. तशी खूप ओळख मैत्री नव्हती. पण तरीही तिला माझ्याशी खूप मनातलं बोलावसं वाटलं. कितीतरी दबलेलं, खदखदणारं बाहेर पडलं. किती तरी समुद्र वाहून गेले.
काय अन कोणत्या शब्दात आधार देत गेले कोणजाणे. पण हळूहळू शांत झाली,यातच समाधान.निघताना तिच्या चेहऱ्यावरची नव्याने जगण्याची उर्मी दिसली, अन म्हणून परतले मी. पण मनातली हूरहूर संपत नव्हती.
आज सकाळी तिचा स्वत:हून फोन आला. खूप भरभरून बोलली, नवीन काही करण्याचा विचार, योजना मांडल्या. अन त्यातून हे मनातली अत्तरे उमटली.