'ही अजून इथेच कशी?', तिलु उठून उभी राहिली.
'तुझं झालं ना vacuum करून'
'हो. निघतच होते.' लुना म्हणाली. दारात थांबून तिने मागं वळून पाहिलं. 'पुढच्या वेळेस पियानो on करून वाजव. त्याच्या मागं बटन आहे.'
'अरे देवा! तू कधी पाहिलंस?', तिलुने विचारलं.
'काल दुपारी. त्याच्या आदल्या दिवशी वाजवलेलं ऐकलं मी. तू छान वाजवत होतीस.'
'पण ते हिंदुस्थानी संगीत...'. तिलुचे शब्द हवेतच विरले. ऐकायला लुना होती कुठं. लांब ढांगा टाकत पार दुसरीकडे निघून गेली होती.
त्याचं असं झालं होतं की तिलुला आल्यापासूनच स्विमिंग पूलाशेजारी ठेवलेला पियानो खुणावत होता. कशीबशी हिंमत करून ती खाली गेली. आसपास कोणी नाही असं पाहून तिने एक दोन वेळा पियानो वरून बोटं फिरवली. 'म्हणजे आपण विसरलो नाही तर', तिलुने खुशीत वर पाहिलं.
'That was pretty good! You play very well'
कुणी उंचापुरा तरूण तिला म्हणाला. तो तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.
'No. I don't'.
तिलुने पुटपुटत elevator गाठला होता. पळतच रूममध्ये येऊन पडली होती ती.
'तो काय तुला खाणार होता का? कशाला घाबरायचं?', विनूनं विचारलं.
'तसं नाही पण..'
'मग? पळून का आलीस? बोलायचं'
'आता तूही दादासारखंच बोलायला लागलास'
'त्या दिवशी पण तसंच. कारचा ताबा घे, खाली जाऊन चाबी घे म्हणून सांगितले तरी ऐकलं नाहीस. पडद्याआड उभी राहिलीस'
'ए ऐक ना. आपण फिरायला कुठे जाऊ या? तू येणार का उद्या लवकर? नॅशनल पार्कला जाऊ या का?'
तिलुने शिताफीने विषय बदलला. त्यानंतर विनू फक्त आजुबाजुला असलेल्या नॅशनल पार्क्स बद्दलच बोलला.
दुसर्या दिवशी तिलु दुपारी दबकतच खाली पियानो जवळ आली. बोटं फिरवली पण हाय! पियानो बोले ना! तिला आश्चर्य वाटलं. तिने मदतीसाठी आजुबाजुला पाहिलं पण दुपार खूपच अंगावर आल्याने की काय, कुणी रिसेप्शनवर दिसलं नाही तिला. वायर काढून ठेवली असल्याचं तिच्या लक्षात आलं नाही. थोडी हिरमुसून परतली होती तिलु.
'पण हे सगळं लुनाला कसं कळलं?', तिलुचं डोकं पार भंजाळलं होतं.