कभी यूँ भी तो हो - ५

भाग ४

'मनवा गोखले'
हे नाव त्याच्या मनात ओल्या वाळूतल्या पावलांसारखं पुन्हापुन्हा उमटून जात होतं. मिड जूनचा रिमझिम ऊन - पाऊस आणि लंच अवरनंतरचा तुरळक ट्रॅफिक असलेला बंडगार्डन रोड या दोन्ही जमून आलेल्या गोष्टींमुळे तो रिलॅक्स होऊन ड्राइव्ह करत होता. "मनवा! कुछ तो बात है बंदीमें" असं तो मोठ्याने बोलून गेला.

त्याच्या डोक्यात ती इतकी स्पष्ट कोरली गेली होती की आताही ती शेजारी बसल्याइतकी त्याला जाणवत होती. लहानखुरी, तिचे खांद्यावर पसरलेले कुरळे मध्येच लालसर स्ट्रीक्स चमकून जाणारे केस, घारे पण तितकेच नितळ, निरागस डोळे, इवलेसे सरळ नाक आणि नाजूक टपोरे ओठ! दोन्ही मऊ हातांच्या कोपरापर्यंत आता फेड होत चाललेली मेहंदी. ओह आणि तिच्या त्या नर्डी क्युट नाईट ड्रेसमधून दिसलेले  ऍबसल्युटली टू डाय फॉर कर्व्हज.. हाऊ कुड ही मिस दॅट! ती अख्खी रात्र त्याने कूस बदलत बदलत घालवली होती. त्यात थकव्याचा भाग असला तरी मोठा भाग भिंतीपलिकडे असलेल्या मनवाचाही होता.

हवी ती कंपनी शोधून त्या ऑफिसमध्ये पोचल्यावर त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. प्रेझेन्टेशन देता देता एकदोन वेळा फंबल झाल्यावर त्या लोकांनी जेट लॅग असेल म्हणून सांभाळून घेतलं. कॉन्ट्रॅक्ट साइन होऊन परत निघाल्यावर त्याचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. इतका आतपर्यंत तो आजवर कुणामुळेच अफेक्ट झाला नव्हता. अगदी बाबामुळेही नाही.

तो पाचवीत असतानाच माँला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आणि घराचं वातावरणच बदलून गेलं. आधी तिची औषधं, सारखे हॉस्पिटल व्हिजीट्स आणि सहा महिन्यात तिच्या जाण्याने घरभर भरून राहिलेलं दुःख यातून त्याचे बाबा कधी सावरलेच नाहीत, त्यांचं जग दिवसभर फक्त त्यांच्या शेअर ब्रोकिंग फर्ममध्ये कामाला वाहून घेणे आणि संध्याकाळी पिणे इतकंच उरलं होतं. इंद्रनीलला देण्यासाठी त्यांच्याकडे प्रेमच शिल्लक नव्हतं..

पुढची सगळी वर्ष पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये काढून इंद्रनील मोठा झाला होता. प्रत्येक सुट्टीत त्याला प्रेम देणारं एकच घर होतं, ते म्हणजे अरुमासी आणि अशोकअंकल. सख्ख्या आईवडिलांसारखेच प्रेम त्यांनी नीलला दिले होते. नील जमशेदपूरला एमबीएच्या सेकंड यरला असताना त्यांच्या बाबांनी मुंबईत दुसरे लग्न केले, तेव्हापासून तर त्याने त्यांच्या नावाचा कप्पाच मनात बंद करून टाकला होता. नंतर प्लेसमेंटस झाल्यापासून त्याने स्वतःला कामात असे झोकून दिले की बाकी काही विचार करायला वेळच मिळणार नाही. मुंबईत रहाण्याची वेळ आलीच तर तो त्याच्या अंधेरीच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये रहाणे प्रीफर करे.

एजन्सीच्या कामामुळे देशोदेशी, चित्रविचित्र वेळी प्रवास या सगळ्याने तो हल्ली कंटाळला होता. कॉलेजमधल्या डेट्स आणि नंतर एखाद दोन कॅज्युअल रिलेशनशीप्स झाल्या पण त्याच्या अश्या स्केड्युलमुळे त्यात काही अर्थ नव्हता. न संपणाऱ्या होटेल रूम्स, अनस्टेबल लाइफस्टाइल हे सगळं आधी छान वाटलं तरी आता बत्तीसाव्या वर्षात आल्यावर त्याला एक आपलंसं घर, आपली प्रेमाने वाट बघणारं कुणीतरी असावंसं वाटायला लागलं होतं हे त्याने मनात मान्य करून टाकलं.

मनवा गोखले! काय शोधतो आहे मी तिच्यात? ती अशी आपल्याला अचानक भेटण्यामागे काय अर्थ आहे? कदाचित हीच ती मुलगी आहे जी मला समजून घेईल.. हीच माझी सोलमेट असेल का? माहीत नाही, पण माहिती करून घेण्याची प्रचंड इच्छा आहे. अश्या अनंत विचारांचा गोंधळ डोक्यात घेऊन त्याने कार रिव्हर्स घेतली आणि गेटकडे गेला. मेन रोडवर पाऊस आणि गाड्यांचा चिखल झाला होता. त्यातून एकेक सिग्नल कंटाळून पार करताना एफएम मधून एकावर एक जाहिराती आणि पकाऊ गाणी गळत होती.. तेवढ्यात अचानक 'मनवा लागे.. लागे रेss सावरे..' सुरू झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.

त्याने गाडी पेट्रोल पंपाबाहेरच्या फ्लोरिस्टसमोर थांबवली आणि निशिगंधाचा एक जायंट गुच्छ विकत घेतला. संध्याकाळच्या भयंकर ट्रॅफिकमधून औंधला घरी पोहोचायला त्याला साडे सहा वाजले. अशोक अंकलची कॅम्री गॅरेजमध्ये पार्क करून, एका हातात निशिगंधाचा गुच्छ धरून त्याने हळूच दार उघडलं, एक खोल श्वास घेतला आणि "मनवाss आय एम होम!" म्हणून ओरडला.

भाग ६

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle