"जो! नॉट फेअर! असा ओठ बाहेर काढून, डोळ्यातून कितीही मध सांडलास ना तरी मी अजिबात पाघळणार नाही. तू माझ्याशेजारी झोपू शकत नाहीस, ok? उतर आधी, जा बरं तुझ्या बेडवर. गो!" मनवा समोर बोट दाखवत जास्तीत जास्त कडक दिसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
दुःखी तोंड करत, नाईलाजाने जोई खाली उतरला. त्याच्या निळ्या मऊ अंथरुणात गुबगुबीत पंज्यांवर त्यांचं सुरकुतलेलं, गोंडस तोंड ठेऊन तिच्याकडे पुन्हा आशेने पाहू लागला. हसून खाली उतरून मनवाने हळूच त्याच्या डोक्यावर थोपटून त्याचं आवडतं, त्याच्या लाडक्या मालकिणीने विणलेलं ब्लॅंकेट त्याच्या कानांपर्यंत ओढून घेतलं. "गुड नाईट!" म्हटल्यावर लगेच ब्लॅंकेटमध्येच हललेलं छोटंसं गोल शेपूट दिसल्यावर तिला हसूच आलं. "कसला गोडू आहेस रे तू.." हळूच पुटपुटत तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
