तो हात बघून तिने एक खोल श्वास घेऊन डोळे उघडले. 'हे आता कुठे शोधून काढू? कुठले चहा आहेत हे? टी टेस्टिंग दिसतंय..' म्हणत ती विचारात पडली. 'काश, इथे तो बाबांचा लाडका ब्योमकेश बक्षी असता! धोतराचा सोगा धरून तरातरा जाऊन शोधून काढलं असतं त्याने. आता इथे मलाच शरलॉक झालं पाहिजे' विचारात असतानाच समोर कॅबचा हॉर्न वाजला.
ती पटकन बॉटल सॅकमध्ये कोंबून जाऊन गाडीत बसली. "प्रोतीक, ये फोटो देखो. ये जगह कौनसी है बता सकते हो?" तिने उत्सुकतेने विचारले.
त्याने फोटो बघून मान हलवली. "ये किसीभी चायबागान का हो सकता है. यहां बहोत है ऐसें."
हम्म.. ती जरा हिरमुसली. "तो आज क्या देखें? तुमही बताओ." 'पारुलने प्लॅन केल्यामुळे सगळे पटेल स्पॉटच असणार' हे पुढचं वाक्य मनात म्हणत तिने विचारलं.
"आपको यहांकी रिअल लाईफ देखनी है तो चाय बागान देखना पडेगा. लेकिन वो कल देखो. आपको एकदम उपरसे दार्जिलिंग देखना है? तो हम रंगीत व्हॅली रोपवेपर चलते है. सीधा चार हजार फीट उपर है!" तो गर्वाने म्हणाला."फिर नीचे आनेके बाद पीस पगोडा और टॉय ट्रेन देखेंगे." आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो असं म्हटल्यासारखा मख्ख चेहरा करत त्याने गाडी सुरू केली.
त्याला एवढं तरी बोलताना बघून तिला बरं वाटलं. 'रंगीत व्हॅली बघू तरी किती रंगीत आहे' मनात म्हणत पुन्हा ती चहाचे रंग आठवायला लागली. पुन्हा रंगीबेरंगी चौकोनी घरं आणि हिरवाईतून वाट काढत गाडी सिंगमडीला रोपवे बुकिंगच्या पायथ्याशी थांबली. तिने उतरून पायऱ्या चढून वर जाऊन तिकीट काढले. ऑफ सिझनमुळे रांगेत दोन तीनच लोक होते. केबल कारला तिकीट देणारा मुलगा गोंडोला म्हणत होता. बssर, गोंडोला तर गोंडोला म्हणत ती पुढे गेली. चारी बाजूनी काचा असलेली एक चार लोकांच्या कपॅसिटीची गोंडोला होती. तिने अजून एका एकट्या मुलीला एकत्र बसायची ऑफर दिली.
त्या दोघी बसल्यावर हजारो फुटांवरून गोंडोला खाली जायला लागल्यावर दोघी घट्ट डोळे मिटून एकत्र किंचाळल्या पण डोळे उघडताच खालचा खूप सुंदर व्ह्यू दिसायला लागला. समोरची मुलगी लगेच डीएसएलआर काढून म्यूट क्लिकक्लिकाट करायला लागली. मनवा शांत बसून समाधी लागल्याप्रमाणे खालची बदलणारी दृश्ये पहात होती. गुबगुबीत, हिरव्यागार टी इस्टेट्स, त्यात काम करणाऱ्या बायकांचे रंगीबेरंगी ठिपके, ऊंचच ऊंच सूचिपर्णी वने, उचंबळत वाहणाऱ्या आणि पुढे जाऊन एकत्र होणाऱ्या दोन नद्या, रंगीत आणि रम्मन. उंचावरून कडाडून झेपावणारे धबधबे. गोंडोलाच्या काचेबाहेर हात लावायच्या अंतरावर घुटमळत असलेले ढग, लांबवर चमकणारी हिमालयाची शिखरे, काचेला चिकटून हळूच ओघळणारे पावसाचे बारीक बारीक थेंब आणि चहूबाजूचे धुके!
ती मंत्रमुग्ध होऊन काचेतून बाहेर पहात होती. बाहेरच्या शांततेत तिला हळूहळू स्वतःच्या आत कुठेतरी खोलवर दबून राहिलेली शांतता सापडत होती. तिला तिच्या काऊन्सलरने दिलेल्या डोडिंस्कीच्या पुस्तकातला एक quote आठवत होता. 'In solitude, there is healing. Speak to your soul, listen to your heart. Sometimes in the absence of noise we find the answers.' तिचे स्वतःचेच बाकी सगळे आवाज बंद होऊन शांततेत फक्त तिच्या अंतरात्म्याचा आवाज जाणवत होता.
केबल कारला परत येण्याची काही लिमिट नसल्यामुळे निवांत कितीही वेळ थांबता येईल हे इन्स्ट्रक्टरने आधीच सांगितल्यामुळे दोघी रिलॅक्स होत्या. शेवटच्या स्टॉपवर उतरून फोटोग्राफर मुलगी हॅपी व्हॅली टी इस्टेट बघायला गेली आणि मनवा एक एस्प्रेसो घेऊन सिटआऊट मध्ये गेल्या सगळ्या दिवसांचा विचार करत बसली. एस्प्रेसोचा एक घोट घेतल्यावर भुकेची जाणीव झाली म्हणून तिने बॅगेतून दोन ब्लूबेरी मफीन्स काढून गट्टम केले. थोड्या वेळात फोटोग्राफर मुलगी येऊन त्यांनी परतीची गोंडोला पकडली. तोच रस्ता परत कापताना तिच्या मनाचा जवळजवळ निर्णय झाला होता त्यामुळे तिला अचानक आजूबाजूच्या ढगांपेक्षा हलकं हलकं वाटायला लागलं होतं.
केबलकार थांबल्यावर उतरून तिने लगेच ड्रायव्हरला कॉल केला तेव्हा कळलं की तो वाट बघून चक्क घरी जाऊन झोपला होता! तिच्या फोनमुळे उठून आता परत येईतो पंधरा वीस मिनिटे रिकामी होती. ती गेटबाहेर जाऊन कडेला एका मोठ्या दगडावर जाऊन बसली तेवढ्यात ती फोटोग्राफर मुलगी तिच्यासाठीही एक समोसा आणि जिंजर टी घेऊन आली. गप्पा मारता मारता कळलं की ती मुलगी म्हणजे मोना गुप्ता, प्रोफेशनने दिल्लीच्या एका फाईव्ह स्टारमध्ये शेफ आहे आणि दर तीन महिन्यांनी आठ दिवस सुट्टी घेऊन सोलो ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि फोटोग्राफी करते. "वाह, काय मस्त! इंटरेस्टींग लाईफ आहे." ती मनात म्हणाली.
इतक्यात प्रोतीक आलाच, तिला घाईत थँक्स म्हणून बाय करत मनवा निघाली. आता वेळ खूप कमी असल्यामुळे त्यांना फक्त जापनीज पीस पॅगोडा आणि बतासिया लुपमधले गोरखा रेजिमेंटचे वॉर मेमोरियल बघता आले.
तिथून निघेपर्यंत आभाळ चांगलंच भरून आलं होतं आणि थंडगार वाऱ्यात तिला काहीतरी स्पायसी खायचा मूड होता. मघाशीच मोनाने सुचवलेले चौक बाजारातले बेस्ट तिबेटन फूड मिळणारे कुंगा रेस्टॉरंट तिच्या लक्षात होते. तिथे कॅब सोडून ती घाई घाईने आत गेली कारण साडेसहा सातलाच ते बंद होणार होते. एक क्युट हसऱ्या चेहऱ्याचे तिबेटी कपल हॉटेल चालवत होते. बेसिक लाकडी फर्निचर, लॅम्पशेड्स आणि काचेच्या टेबलांमुळे अगदी घरगुती वातावरण, त्यात त्या शेफ काकूंचा आग्रह. पात्तळ, चमकत्या शुभ्र लेयरचे मऊसूत चिकन मोमोज, परफेक्ट स्पायसी थुकपा सूप आणि भरपूर बॉइल्ड पण क्रंची भाज्या घातलेले ग्लास नूडल्स! प्रेमाने जास्तच पोट भरून खाऊन ती डायरेक्ट तिबेटी स्वर्गात पोहोचली.
ती गळ्याभोवती ग्रे-पिंक इन्फिनिटी स्कार्फ अडकवत बाहेर पडताना अचानक समोर एक उंच माणूस एका मुलीला मिठी मारत बाय म्हणून कारमध्ये बसताना दिसला.
"इज दॅट इंद्रनील?" म्हणत ती पुढे होईपर्यंत कार एव्हाना रिकाम्या झालेल्या मॉल रोडवरून वेगाने निघून गेली होती.