कभी यूँ भी तो हो - १८

दार्जिलिंगला पोहोचल्यापासूनच तिचे डोळे इंद्रनीलला शोधत होते, पण खराखुरा आणि इतक्या जवळ तो दिसेल अशी शक्यता तिला कधीच वाटली नव्हती. आत्ता इथे पारुल असती तर तिने "सारी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश कर रही है" वगैरे फिल्मी डायलॉग नक्की मारला असता, असा विचार येऊन तिला थोडंसं का होईना हसू आलं.

अचानक वरून रिमझिम पाऊस सुरू झाला. तिने पटकन हूड डोक्यावर सरकवून पळत हॉटेलचा रस्ता पकडला.

दुसरा दिवस उजडताच प्लॅनप्रमाणे प्रोतीक येऊन हॉटेलच्या एंट्रन्सपाशी थांबला होता. सकाळचे सात वाजले तरी धुक्याच्या जाड पडद्यातून पलीकडचे काहीच दिसत नव्हते. ती उत्साहाने पळत येऊन गाडीत बसली आणि त्याच्या गुड मॉर्निंगला उत्तर देऊन, पेन ड्राईव्ह देत म्हणाली, "चलो आज गाना सुनते है!" आज तिच्या कपड्यांनीही रंग बदलले होते.  गुडघ्यापर्यंत पोचणारा, पांढऱ्यावर रंगीबेरंगी पानंफुलं आणि कंबरेला बारीक ब्राऊन बेल्ट असणारा ज्यूट स्ट्रॅप्सवाला कॉटन ड्रेस, वर स्काय ब्लू डेनिम जॅकेट, पाठीला रोजची लेदर सॅक, पायात नेहमीचे व्हाइट स्नीकर्स कारण टी इस्टेटमध्ये खूप चालायचे होते आणि उगीच बरोबर आणलेले ब्राऊन रेबॅन एव्हीएटर्स ज्यांचा सध्या काहीही उपयोग नव्हता.

प्रोतीकच्या ठप्प चेहऱ्यावरदेखील तिला बघून दोन क्षण आश्चर्याचे भाव दिसले!

त्याने गाडी सुरू करून पेन ड्राइव्हवरची गाणी प्ले केली. शफल मोडवर पहिलंच गाणं तिचं आवडतं 'शिकायतें मिटाने लगी' लागल्याबरोबर तिने समाधानाने डोकं मागे टेकून डोळे मिटले. असेंडिंग नोट्सबरोबर मान वर खाली हलवत तिनेही 'अंधेरे को बाहोंमेss लेकेs, उजालेने घर बसाया है' जरा जोरात म्हणून घेतलं. प्रोतीक तिच्याकडे बघून हळूच हसत होता. जरावेळाने गाणं संपल्यावर तिने डोळे उघडून बाहेर पाहिले तर अजूनही सगळीकडे धुकेच धुके होते. "आज हम एक्झॅक्टली कहां जानेवाले है भैय्या? तिने प्रोतीककडे पहात विचारले.

"मॅडमजी, आज हम जा रहे है कर्शीयांग व्हिलेज. वहां पर है द फेमस, टॉप नंबर वन मकाईबाडी टी इस्टेट! दार्जिलिंग की नंबर वन चाय. बस दो घंटे लगेंगे" तो खुषीत म्हणाला.

त्याचा चक्क उत्साही हसरा चेहरा बघून ती चकित झाली. आज नक्की काय पिऊन आलाय हा? हवेतच तिने जरा नाक सुक सुक करून वास घेऊन बघितला. पण नाही, तसं काही जाणवत तरी नव्हतं.

"अरे वाह, लेकिन तुम इतने खूष क्यूँ दिख रहे हो आज?" तिने सरळच विचारून टाकलं.

"वो हमारा पुराना घर इधर ही है ना. हमारे मा बाबा मकाईबाडीमे काम करते थे. हम पहले इस्कूलमे थे तब इधर ही रहते थे. फिर हम दार्जिलिंग मे घर बनाये. अभी कर्शीयांग का घर टुरिस्ट को किरायेपे देते है. वो नया साईट है ना, एयर बीएनबी, उसपेभी रेजिस्टर किया है." तो आठवणीत रमत म्हणाला.

"अच्छा!" म्हणून आज इतकी खुषी, बरोबर आहे.

दोन तास गाणी ऐकत, मजेत ते मकाईबाडीच्या मेन गेटजवळ पोहोचले.

मकाईबाडीमध्ये प्रोतीक तिच्याबरोबर फॅक्टरीत येणार होता. तिथे त्याच्या ओळखीचे बरेच लोक होते. गेटमधून आत गेल्यावर उतरते हिरवे छत असलेली टी फॅक्टरी समोर होती. आधी फॅक्टरी बघून मग टी गार्डन बघायला जा असं प्रोतीकचं म्हणणं ऐकून ती आधी फॅक्टरी बघायला गेली. आत ठिकठिकाणी असलेले स्पेशल ऑरगॅनिक दार्जिलिंग चायपत्तीचे ढिगारे ते पूर्ण प्रोसेसिंग होऊन विक्रीसाठी तयार मकाईबारी असा बॉटल ग्रीन शिक्का आणि पाच हिरव्या पानांचा फुलासारखा लोगो असणारे चौकोनी लाकडी बॉक्सेस ही सगळी प्रोसेस तिला तिथल्या गाईडने फिरून दाखवली. 

ती आत आल्यापासून तिथे काम करणाऱ्या दोन बायका अधूनमधून तिला आपल्या मागे मागे करताना दिसत होत्या. आधी तिने दुर्लक्ष केले पण एका रोलिंग मशीनपाशी चहा पाने रोल होताना पाहून झाल्यावर तिने मागे वळून पाहिले तर दोघी खुसखुसत तोंडावर हात घेत पळून गेल्या.

गाईड तिला मकाईबाडीची जगातली पहिली टी फॅक्टरी असण्याची हिस्ट्री, त्याचे मालक, त्यांनी कसे दार्जिलिंगमधले पहिले ऑरगॅनिक टी प्रॉडक्शन सुरू केले वगैरे माहिती सांगत होता. तेव्हाच मकाईबाडीच्या टी टेस्टिंगबद्दलही त्याने सांगितले. उत्साहाने येस्स म्हणून ती टेस्टिंगसाठी तयार झाली. का ते तिलाच जास्त ठाऊक होते!

गाईड पटापट टेस्टिंगसाठी रांगेत ठेवलेल्या बोल्समध्ये वेगवेगळ्या चहाचे गरम पाणी घालून काढलेले एक्स्ट्रॅक्ट ओतत होता. ते फिका पिवळा ते लाल होत जाणारे रंग पाहून तिला नीलच्या फोटोचीच आठवण झाली. 'बॉटल ग्रीन कडा असणारे बोल्स! बहुतेक हेच होते ते!' ती मनात म्हणत होती. गाईडने सांगितल्याप्रमाणे चमच्याने एकेक चहा सुर्र करून टेस्ट करून झाल्यावर तिने ब्लॅक स्प्रिंगटाईम ब्लूमचे पाव किलोचे दोन आणि पारुलसाठी एक शंभर ग्रॅम ऑरगॅनिक ग्रीन टीचा लाकडी बॉक्स विकत घेतला.

फॅक्टरीतून बाहेर पडून ती आता प्रोतीक बरोबर टी गार्डनकडे चालायला लागली. सगळीकडे उंचावर भलेमोठे चहाचे कप ठेऊन त्यावर सूचना लिहिल्या होत्या. खाली ठिकठिकाणी बायका चहापत्ती तोडून पाठीवरच्या उंच बांबूच्या टोपलीत टाकत होत्या. डोंगर उतारावर सगळीकडे चहाची गब्दूल झुडपे असलेले मळे होते. सगळीकडे पत्ती तोडायचे काम धडाक्यात सुरू होते.

पुन्हा तिला मघाशी दिसलेल्यापैकी दोन वेण्या घातलेली मुलगी वाकून तिच्याकडे पाहून शेजारणीला काहीतरी सांगताना दिसली. तिने पटकन प्रोतीकला ती मुलगी दाखवून तिला बोलावून आणायला सांगितले. त्याच्याशी बोलताना खूप आढेवेढे घेत अखेर ती मुलगी आली. 'एय, तुम दोनो मेरे पीछे क्यू आ रही हो? और मेरे बारेमे कुछ बात भी कर रही थी. है ना?" मनवाने कपाळावर आठ्या आणत विचारले.

"अम्म.. वो होमारा शाबजी आपके बारेमे ष्टोरी बताता है.. हम आपका फोटो रोज देखता है घरमे. फ्रिजपे लगाया आपका फोटो.." त्या मुलीने घाबरत घाबरत सांगितले.

"क्या?" ती ओरडूनच म्हणाली. "क्या? कैसे? मेरा फोटो?? क्या नाम क्या है तुम्हारे इस साबजी का?"

"इंद्रोनील रॉयचौधरी.." तिने घाबरून उत्तर दिले.

मनवाचा झालेला आ बंदच होत नव्हता!

प्रोतीकने तिला दोन तीनदा मॅडम.. मॅडम म्हणून हाका मारल्यावर ती भानावर आली.

"कहा मिलेंगे तुम्हारे साबजी?" तिने जरा रागानेच विचारलं.

"वो..नीचे नर्सरीमे.. "

ऐकून मनवा उत्साहाने "भैय्या, मुझे नर्सरीका रस्ता दिखाओ" म्हणत प्रोतीकमागे उतारावरून, चहाच्या झुडुपांमधून धडपडत, मधेच घसरत भराभर चालत निघाली.

ते खाली पोहोचले तर समोर टी इस्टेट नर्सरी म्हणजे जमिनीच्या एका मोठ्या तुकड्यात गादी वाफे तयार करून त्यात चहाच्या मोठ्या झाडांची कटिंग्स लावून रोपं बनवली जात होती. जिकडे तिकडे लहान रोपांच्या सरळ रांगा आणि त्यात डुलणारी दीड ते दोन फुट उंचीची हिरवीगार, टवटवीत रोपे.

इतक्यात तिला डावीकडून तो परिचित, मखमली आवाज आला. एका रांगेच्या शेवटी खाली गुडघ्यावर बसून इंद्रनील एका नवीन मुलाला रोपाखालच्या चिखलात हात घालून "शिकोर ओरो माटी होते हाबे.." म्हणून समजावून सांगत होता. त्याने मान खाली केल्यामुळे काळ्या कॅपमधून त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याने खाकी कार्गो शॉर्टस आणि रिबॉकचा छातीवर मोठ्या फॉन्टमध्ये RUN लिहिलेला काळा ड्रायफिट टी शर्ट घातला होता. पायात वूडलँडचे जाड फ्लोटर्स होते.

"हां दादा" म्हणत त्या मुलाने दुसऱ्या रोपाखाली अजून माती ओतत मान डोलावली.

"भालो!" म्हणत इंद्रनीलने मान वर करून बघितले.

त्याला बघून काही कळायच्या आत मनवा "इंद्रनीssल!!" म्हणून किंचाळून पळत त्याच्यापर्यंत पोहोचली. तिला समोर पाहून धक्का बसून तो उभा राहिला आणि तिने समोर धरलेले त्याचे चिखलाने माखलेले हात चुकवत त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या छातीवर हळूच डोके टेकले. प्रोतीक आणि इतर मंडळी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असताना तो चिखलाचे हात तिच्यापासून लांब धरत खांदे उडवत हसला. तेव्हा त्याच्या डोळ्यात शेकडो लाईटबल्ब्स एकत्र उजळले होते.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle