"मॅडम, ये हमारा रिसीट और लायसेन्स, एक बार चेक कर लिजीए." तो कागदपत्र तिच्या हातात देत म्हणाला. तिने ते नीट वाचून परत दिल्यावर त्याच्याकडे बॅग दिली.
ती मोठी काळी ट्रॉली बॅग ओढत तो समोरच्या वॅगन-आर कडे निघाला, तशी तीपण त्याच्यामागे भराभर जायला लागली. त्या बॅगेच्या वजनाची आता तिला लाज वाटत होती. पाच दिवसांसाठी एवढं समान! आईने मुलीला तिथे उपाशीच रहावं लागेल असं ठरवून चिवडा, बाकरवडी, रवा लाडू, बेसन लाडू असं सगळं पुरेपूर भरून दिलं होतं. त्यात आणखी थंडी असेल म्हणून स्वेटर्स आणि स्टोल होते ते वेगळेच. तो सामान ठेवेपर्यंत ती ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसून रिलॅक्स झाली होती. पुढे बसल्यामुळे एक तर व्ह्यू छान मिळणार होता आणि ती अलर्ट राहणार होती. प्रोतीकने येऊन कार सुरू केली.
तिने लगेच पारुलला अपडेट पाठवला. 'ऑन द वे टू दार्जिलिंग इन सर्च ऑफ प्रिन्स चार्मिंग!" पारूलचे लगेच दोन heart eyes स्मायली टपकले.
तिने फोन मांडीवर सॅकच्या खिशात ठेवला. "तो भैय्या पहूंचनेमे कितना टाइम लगेगा?" ड्रायव्हरकडे पहात तिने विचारले.
"तीन घंटा तो लगेगा, बारिश रही तो चार भी लग सकते है" तो जरा गंभीर चेहऱ्याने म्हणाला. "ज्यादासे ज्यादा साडे छे तक पहूंचही जाएंगे."
हम्म.. ती बॉटलमधून घोटभर पाणी पीत म्हणाली.
"मॅडम गाना लगाऊ?"
"नही, रहने दो.. शांती अच्छी लग रही है.." म्हणून ती खिडकीतून बाहेर पळणारी ओक, मेपल, बर्च वगैरे लांबोडकी झाडे आणि बारीक पावसात त्यांच्या झुकलेल्या फांद्या-पानांवरून टपटपणारे पाणी पहात राहिली. रस्त्याकडेची जमीन पोपटी मखमली कार्पेट पसरल्यासारखी गवताने भरून गेली होती. त्यातही पाणी साचून जमीन डबडबली होती. पुढे वळणे घेत जाणारा अगदी अरुंद रस्ता, शेजारी दरीत दिसणारे हिरवेगार चायबागान, प्रत्येक वळणावर डोकावणारी हिमशिखरे आणि वर निळसर आकाशात फिरणारे पिंजलेल्या कापसासारखे ढगांचे पुंजके बघून तिला अचानक ह्या हॉलिडेवर येणं हा बेस्ट डिसीजन होता हे खरोखरीच पटलं.
थोडावेळ काचेबाहेर बघितल्यावर अचानक तिला रिअलाइज झालं की इंद्रनील इथेच कुठल्याही वळणावर आपल्याला दिसू शकतो. याच हवेत कुठेतरी श्वास घेतो आहे.. याच आकाशाखाली राहतो आहे. या विचारांनीच तिला एकदम थरथरायला झालं. तिने हूड डोक्यावर ओढून हाताची घट्ट घडी घातली.
पुढचा सगळा रस्ता पेशन्सची परीक्षा बघणारा होता. अरुंद वळणे, त्यात टूरिस्ट कार्सची दाटी आणि रस्त्यातले खड्डे! त्यात हा जरा लाजरा ड्रायव्हर त्यामुळे बडबडही करू शकत नाही. पण कामात मात्र अगदी व्यवस्थित होता त्यामुळे पटला तिला. साधारण सहा वाजता ते 'वेलकम टू दार्जिलिंग' साइनबोर्डपाशी पोहोचले. ड्रायव्हरने तिला बुकिंग केलेल्या हॉटेल शोनार बांग्लासमोर सोडले आणि साईटसीइंगला जायचे असेल तर सकाळी कॉल करायला सांगितला.
ती चेकइन करून, आंघोळ करून बाथरोब आणि डोक्याला टॉवेल अश्या अवतारात बेडवर येऊन पडली तेव्हा आठ वाजले होते. तिने रिसेप्शनला कॉल करून चौकशी केली तेव्हा समजले की अख्खं दार्जिलिंग संध्याकाळी साधारण सात वाजताच बंद होऊन जातं. "बापरे, हे तर पुणेकरांच्याही वरताण निघाले की!" म्हणत तिने तोंड वाकडं केलं. तसेही तिच्यात बाहेर जायचे त्राण उरले नव्हते. शेवटी तिने रूम सर्विसकडून एक दालखिचडी मागवून खाल्ली आणि लगेच ब्लॅंकेटमध्ये गुरगुटून झोपून गेली.
सकाळी सहा वाजताच तिला खिडकीतून येणाऱ्या विचित्र आवाजाने जाग आली. खिडकीत डोकावून पाहिले तर बाहेर विंडोसीलवर दोन पिवळ्या-नारिंगी चोचींच्या, काळ्या मैना बसून क्रॉक क्रॉक करत जोरदार भांडत होत्या. त्यांच्या कलकलाटाला कंटाळून तिने काचेवर जोरात टकटक केल्यावर त्या घाबरून उडून गेल्या.
लवकर उठलेच आहे तर त्या फेमस ग्लेनरी'ज बेकरीचं दर्शन घेऊन येऊ म्हणून ती पटापट तयार झाली. सॅक पाठीला लावून माल रोड वरून चालतच ती ग्लेनरी'ज ला पोचली. पांढऱ्या रंगवलेल्या लाकडी फ्रेम्स असलेल्या काचेच्या भिंती, खिडकीत ठेवलेल्या लहान फुलझाडांच्या कुंड्या आणि काचेच्या दारं खिडक्यांमुळे बेकरीला एकदम ब्रिटिश लुक होता. अर्थात दार्जिलिंग ब्रिटिशांची सिजनल राजधानीच होती हे जिथे तिथे कलोनिअल आर्किटेक्चर, घरांचे रंग, फुला-पानांमध्ये डोकावतच होतं.
आत गेल्यावर डिस्प्लेचा खजिना बघून ती वेडीच झाली. चारी बाजूनी काचेची कपाटच कपाटं निरनिराळ्या कुकीज, चॉकलेट्स, बिस्किट्स, पेस्ट्री, पाईज, मफीन्स, रोल्स आणि कित्येक रंगीबेरंगी कॅण्डीजनी ठासून भरली होती. ती वर जाऊन ओपन सिटिंग एरियामध्ये बसली. लहानसं गोल टेबल आणि वर पावसामुळे लाल गार्डन अंब्रेला लावलेली होती. आजूबाजूला लाल, पिवळ्या, निळ्या फुलांनी डवरलेल्या कुंड्या आणि फुलांच्या डोक्यावरून कोवळ्या उन्हात सगळीकडे त्याचा चमचमता मुकुट झळकवणारा कांचनजंगा!
कितीतरी वेळ आपण फक्त समोर पहात बसून राहिलोय हे अचानक तिच्या लक्षात आलं. तिने इकडे तिकडे पाहिलं पण कोणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते, बरेचसे लोक गप्पा आणि खाण्यातच मश्गुल होते. हुश्श! म्हणत तिने वेटरला बोलवून तिची दार्जिलिंग टी पॉट, की लाईम पाय आणि व्हेज पफ्सची ऑर्डर दिली आणि न राहवून चार ब्लुबेरी मफीन्स पॅक करायला सांगितले. कलोनियल एराची साक्ष देत चांदीच्या केटलमधून मोठ्या पांढऱ्याशुभ्र कपात चहा सर्व झाला. त्याचा तो लालसर सोनेरी रंग पाहूनच तिला आह! दिस इस दार्जिलिंग! असं झालं. रमतगमत नाश्ता करून ती ऑलमोस्ट दोन तासांनी बाहेर पडली. तोपर्यंत माल रोडची सगळी दुकानं उघडून सगळीकडे फॅशनेबल कपडे, स्वेटर्स, लाकडी वस्तू आणि भरपूर तिबेटी जंक ज्यूलरी दिसत होती. थोडावेळ रेंगाळत विंडो शॉपिंग करून तीने प्रोतीकला कॉल केला.
त्याची कार येईपर्यंत ती जवळच्याच एका कॅफेत फक्त पाण्याची बॉटल विकत घेऊन बसली. ऑफ सिझनमुळे कॅफेवाले लोक निवांत होते. मोबाईल बाहेर काढल्यावर न राहवून तिने शेवटी इंस्टा उघडलंच. आणि शुअर इनफ तिथे नवा फोटो होता! फिक्या सोनेरी पिवळ्यापासून गडद लाल होत जाणाऱ्या चहाच्या पांढऱ्याशुभ्र सिरॅमिक बोल्सची रांग आणि शेजारी चमच्यात सोनेरी चहा धरलेला एक मोठा तळवा, जो तिच्या चांगल्याच परिचयाचा होता..