"DHR 126!" व्हॉटस दॅट?? पारुल तिचं लांब नाक अजून वाकडं करत म्हणाली. "लेट्स गूगल!" म्हणत तिने टपाटप टायपिंग सुरू केलं.
"झालं सुरू" म्हणून मान हलवून मनवा गप्प तिच्याकडे बघत बसली.
लगेच "येस्स" म्हणून तिने मान वर केली. "मनवा डार्लिंग, आपका प्रिन्स चार्मिंग यहा छुपा बैठा है!
दार्जिलिंग - हिमालयन रेल्वे!"
आता डोकं खाजवायची वेळ मनवाची होती. हा पंधरा वीस दिवसात काम संपवून गेला तरी कसा? आत्ता दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनमध्ये काय करतो आहे..
"टू फीट गेज रेल्वे दॅट रन्स बिटवीन न्यू जलपायगुडी अँड दार्जिलिंग इन द इंडियन स्टेट ऑफ वेस्ट .." "ओ हाsलो! विकिपीडिया! स्टॉप इट. तेवढं माहितीये.." जरा मूडमध्ये येत मनवाने तिला मध्येच थांबवलं.
"हम्म.. तो अब.." पारुल विचार करता अचानक चुटकी वाजवून म्हणाली, "अब तू निकल! टेक अ हॉलिडे!"
"आर यू मॅड??" मनवा किंचाळत म्हणाली. "इतना सारा काम पडा है, ट्रेनीज छुट्टीपे है. अँड यू थिंक ऑफ अ हॉलिडे??"
"अरे तुला क्काय करायचं? मी आणि मॅम बघून घेऊ. जा सिमरन जा.. जीले अपनी जिंदगी! कोई मिला तो मिला, नही तो गो सोलो. योलो!" पारुल डोळा मारत म्हणाली.
"आयडिया बुरा नही है.." बारीक हसत मनवा म्हणाली.
दोन दिवसात पारुलने काय जादू केली कुणास ठाऊक, मनवाच्या सोलो हॉलिडे प्लॅनसकट तिकिटं तयार होती. तिकिटं तिच्या हातात देताना पारुल हळूच तिच्या कानात म्हणाली, " वो मिला तो ठीक. नही तो और कोई मिल ही जाएगा, और वो भी नही मिला तो कोई नही, शुद्ध हवा तो मिल ही जाएगी!" आणि दोघी खुसखूसत हसायला लागल्या.
सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ती पुण्याहून दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसलीही होती. दिल्लीत ब्रेक घेऊन पुढे बागडोग्राची कनेक्टिंग फ्लाईट होती. ती निघाली तर खरी, पण आता तिची धडधड वाढली होती. आपण नक्की काय शोधतोय, कशाच्या भरवश्यावर दार्जिलिंगला चाललोय हे तिला काही समजत नव्हते आणि दार्जिलिंगला जाऊन करणार काय हा भलामोठा प्रश्न आ वासून उभा होता. जाऊदे आता तिकीट काढलंय ते कॅन्सल करण्यापेक्षा जाऊनच येऊ म्हणत तिने कानाला हेडफोन्स लावले. दिल्लीला पोहोचेपर्यंत तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले. पुढच्या फ्लाईटला अजून दीड तास वेळ होता.
ती ग्राउंड फ्लोरच्या कॅफे दिल्ली हाईट्समध्ये गेली. इंटिरियर मस्तच होतं. कोपऱ्यातल्या मस्टर्ड सोफ्यावर बसून तिने चिली चीज टोस्ट आणि कॅफे मोकाची ऑर्डर दिली. आणि ते येईपर्यंत दिल्लीच्या वल्ली न्याहाळायला सुरुवात केली. सकाळी दहा वाजता पटियाला पेग लावणारे एक टेबलाला पोट टेकलेले, टोकेरी मिशाळ आणि विशाल अंकल, कोपऱ्यात एका सोफ्यात एक व्यक्ती आहे की दोन असा संशय येण्याइतपत एकमेकांच्या मांडीवर बसलेलं एक बारकुडं कपल, फोनवर कंटीन्युअस बाssरिक आवाजात बोलणारी एक फॉर्मल्सधारी एमबीए टाइप्स आणि अश्या रंगीबेरंगी क्राउडमध्ये ती! व्हाइट स्नीकर्स, डार्क ब्लू डेनीम्स, पांढरा स्कूप नेक टी शर्ट वर नेव्ही ब्लू हूडी आणि शेजारी ठेवलेली तिची लेदर बॅकपॅक.
तिची ऑर्डर येऊन पटापट खाऊन बाहेर जाईपर्यंत तिची फ्लाईट आलीच होती. बागडोग्रा! कधी न ऐकलेल्या नावाच्या गावी ती आयुष्यात पहिल्यांदाच जाणार होती. ही सोलो ट्रिपच तर आयुष्यात पहिल्यांदा होती. दुपारी दीड वाजता ती बागडोग्राला लँड झाली तेव्हा तो एवढूसा एअरपोर्ट बघून तिला पुण्याचा एअरपोर्टही मोठा वाटू लागला. उतरून चालत ती फर्स्ट फ्लोरवरच्या एअरपोर्ट रेस्टरंटमध्ये गेली. तिथून तिने बुक केलेल्या कॅबला फोन करून थांबायला सांगितले.
कुठे दिल्लीचा तो स्वँकी कॅफे आणि कुठे हे साधंसुधं रेस्टरन्ट! पण तिथली माणसं, वेटर्स इतके साधे आणि प्रेमळ दिसत होते.. वेटरने सुचवल्याप्रमाणे तिने स्टार्टर म्हणून लोकल बेटका ग्रिल्ड फिश (आयुष्यात पहिल्यांदा!) आणि शिजवलेल्या भाज्या घेतल्या, बाकी नेहमीचा पंजाबी मेन कोर्स होताच. पहिल्यांदा फिश खात असली तरी तिला तो आवडलाच एकदम आणि घरी फिशचं नाव काढल्यावर लहान मुलांसारखे चमकणारे इंद्रनीलचे डोळे आठवले. जेवायला सुरूवात करण्याआधी तिने फिशचा फोटो काढून आईला पाठवला आणि बागडोगराला पोचून जेवायला बसलेय म्हणून सांगितलं. लगेच आईचे गालावर हात ठेवलेले चार पाच निळे स्मायली आले. जेवून बॅग कलेक्ट करून ती बाहेर येईपर्यंत अडीचची टळटळीत दुपार झाली होती पण पावसामुळे सगळीकडे फक्त हिरवाई आणि शांतता पसरली होती. आजूबाजूला इतका हिरवा रंग आणि वर निळंभोर मोकळं आकाश बघून तिला पारुलचं वाक्य आठवलं, कुछ नही तो शुद्ध हवा तो मिलेगी! तेच मनात रिपीट करत ती पुढे झाली.
समोरून गडबडीने एक जीन्स, टीशर्ट घातलेला लहानसा, बारीक डोळेवाला मुलगा पळत पळत तिची बॅग घ्यायला आला. "हॅलो मॅडमजी, अ.. मै ड्रायवर, दार्जिलिंगका बुकिंग है. आपने फोन किया था.." त्याचं लाजणं बघून कॅब नंबरकडे नजर टाकून तिने विचारलं,"हां, नाम क्या बताया तुमने?"
"प्रोतीक" तोंडाचा शक्य तितका गोल करत तो म्हणाला.