इंद्रनील हताश होऊन तिच्याकडे पहात राहिला.
"मनवा, बाय ऑल मीन्स यू हॅव द राईट टू से नो. बट ऍट लीस्ट टेल मी व्हाय.." तो हळूच म्हणाला.
"सॉरी इंद्रनील, आय एम टोटली ओव्हरव्हेल्म्ड विथ योर डिक्लरेशन अँड नाउ दिस प्रपोजल. आय कान्ट एक्सप्लेन. प्लीज लीव्ह मी अलोन. ऍट लीस्ट फॉर समटाईम... वुड यू?" ती सोफ्यावरून उतरून उभी रहात, लाल झालेलं नाक हाताने अजून पुसत म्हणाली.
"श्योर" म्हणत तो तसाच बसून ती त्याच्या समोरून चालत तिच्या खोलीकडे जाऊन दार बंद करेपर्यंत पहात राहिला.
दार लावून ती आत आली तेव्हाही रडतच होती. लॅचच्या आवाजाने जोई जागा होऊन पडल्या पडल्याच तोंड उचलून करुण नजरेने तिच्याकडे बघायला लागला. त्याच्या त्या दुःखी डोळ्यांकडे बघून तिला अजूनच दाटून आलं. "ओ बेबी, तुला खूप एकटं वाटलं ना जो.. आयम सॉरी.." म्हणत तिने त्याच्याशेजारी जाऊन त्याला रडत रडत मिठी मारली.
तिच्या डोळ्यातून गळणारे टपोरे थेंब त्याच्या मानेवर पडून तिथली फर ओली झाली तेव्हा जोई पण कूं कूं आवाज करत तिच्या हाताला चाटून तिला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करत होता. मध्येच त्याचा तो छोटासा शेपटीचा आकडा हलवून दाखवत होता. त्याच्याबरोबर बसून तिला बरंच शांत वाटायला लागलं तेव्हा हळूच उठून ती उशीत तोंड खुपसून झोपली.
तेव्हा इंद्रनील फक्त सोफ्यावर आडवा होऊन सिलिंगकडे टक्क डोळ्यांनी पहात होता.
सकाळी ती उठली तीच ठसठसणारा खांदा घेऊन. झोपेत कुठलीतरी शीर वाकडी तिकडी दुखावली गेली होती. ती इंद्रनील दिसतो का पहायला बाहेर आली तो सगळं घर रिकामं होतं. तिने त्याच्या खोलीत जाऊन पाहिलं तर त्याची एक डफल आणि एक ट्रॉली बॅग जशीच्या तशी होती. बेडही रात्री कुणी न झोपल्यासारखा व्यवस्थित टक केलेला होता.
तिने जोईला खायला देऊन, बाहेर गेटला कुलूप लावून त्याला बाहेर खेळायला सोडून दिलं. कडकडीत पाण्याने आंघोळ केल्यावर तिच्या खांद्यातली चमक जरा थंडावली. अंगात एक अघळपघळ शिफ्ट ड्रेस अडकवून तिने केसांची जुडी करून एका जाड रबरमध्ये अडकवली. लॅपटॉप उघडला आणि आपला मोठ्या चौकोनी काळ्या फ्रेमचा चष्मा डोळ्यावर ओढून कामात बुडून गेली. खिडकीतून अधून मधून जोई फुलपाखरांमागे उड्या मारत पळताना दिसत होता. दिवसभर सारख्या तिच्या मनात इंद्रनीलच्या आठवणींच्या लाटा येत जात होत्या. त्याच्या डोळ्यातली चमक, हसताना एका बाजूने किंचित खाली वळणारा त्याच्या ओठाचा कर्व्ह, त्याचे मोठेमोठे उबदार हात.. पण ती जीव खाऊन त्यांना परतवून लावत होती. डोळ्यात भरती आणणारं हे खारं पाणी तिला परवडण्यासारखं नव्हतं.
पारुलकडून आलेली एक केस रिव्ह्यू करता करता ती काही वर्षे मागे गेली. लॉ कॉलेजपासून ती, राहुल आणि पारुल असं त्रिकुट होतं. एकत्र अभ्यास, पुरुषोत्तम, म्युझिक फेस्ट्स अश्या सगळ्या सारख्या आवडीतून एकत्र आले आणि अगदी अनसेपरेबल झाले. टपरीवरचा काचेच्या लहान ग्लासातला वाफाळता मसाला चहा आणि पार्किंगमधल्या महान गप्पा ह्यानेच त्यांचा दिवस सुरू होऊन तिथेच संपत होता. दरेक सेमिस्टर नंतर राहुलचा तिच्यातला इंटरेस्ट हळूहळू वाढत गेला. पारुल बाजूला पडून दोघेच एकत्र मुव्हीज आणि सिक्रेट डेट्सवर जाऊ लागले. पारुल आणि तिने अरूणिमाकडेच इंटर्नशिप संपवून एम्प्लॉयी म्हणून जॉब सुरू ठेवला होता तर राहुल हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू करून पुणे-मुंबई चकरा मारत होता.
रिलेशनशिपमध्ये पडल्यापासून कॉलेजमधला हॅपी गो लकी राहुल हरवून त्याच्या जागी तिला हळूहळू एक वेगळाच राहुल अधून मधून दिसायला लागला होता. सारखा तिला लहान समजून उपदेश देणारा, तिऱ्हाईत लोकांशी बोलताना तिला काही कळणारच नाही असं दाखवून तिला गप्प बसवणारा, प्रत्येक गोष्टीत तिला तिचा कमीपणा दाखवून देणारा राहुल, प्रोफेशनली मीच कसा बेस्ट आहे हे क्षणोक्षणी आठवून देणारा राहुल!
या सगळ्या गोष्टीत त्याच्या उंचीचा मोठा हात होता, कायम तो खाली तिच्याकडे पाहायचा तेव्हा तो आपल्याला खिजवून दाखवतो आहे असं तिला वाटत रहायचं. आधीच लहानपणापासून दोघे जुळे भाऊ आणि वडील अश्या तीन तीन उंच डॉमीनेटिंग फिगर्स तिने सहन केल्या होत्या त्यामुळे तिच्या मनात ती बुटकी असल्याची एक सूप्त कमीपणाची भावना मूळ धरून होतीच. राहुलच्या अश्या वागण्यामुळे तिला खतपाणी मिळत गेलं.
रिलेशनशीपच्या तीन वर्षात राहुलने तिच्या आयुष्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात घेऊन टाकला होता. तिने कपडे कसे घालावे इथपासून तिने कुठल्या केसेस हँडल कराव्या इथपर्यंत तो तिला डॉमिनेट करत करत होता. तीही त्याच्या प्रेमात वेड्यासारखी त्याचं सगळं बरोबर आहे, प्रेमामुळे हा त्याचा हक्कच आहे असं प्रिटेंड करत जगत होती. तिचा कॉन्फिडन्स अटमोस्ट लो पॉइंटवर होता. कोर्टरूममध्ये उभं राहिल्यावरही पाय थरथरत होते. ती डाऊन असताना प्रत्येक वेळी पारूल तिला हर प्रकारे सपोर्ट करत होती. शेवटी ती मनवाच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि घटत चाललेलं वजन न बघवून तिला तिच्या काकांकडे काऊंसेलिंगसाठी घेऊन गेली.
ती तिच्या नॉर्मल सेल्फकडे हळूहळू परत येतानाच एके दिवशी कोर्टात तिला राहुलच्या मुंबई ऑफिसमधला कलीग भेटला. त्याच्याशी गप्पा मारता मारता तिला समजलं की राहुलचे त्याच्या बॉसच्या मुलीबरोबर अफेअर सुरू आहे आणि लवकरच ते लग्नाचाही प्लॅन करत आहेत. कलीग्जना त्याने मनवा त्याची फक्त क्लासमेट होती एवढेच सांगितले होते. अचानक तिला त्याच्या कमी झालेल्या पुणे ट्रिप्स, फोन नेहमी बिझी असणे या सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या. ती पूर्ण ब्लॅंक होऊन तिथून कशीबशी घरी पोहोचली पण या गोष्टीचा तिच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता.
दोन दिवस पारुलने तिला समजावून शेवटी तिने त्याला फोन करून फोनवरच ते नाते संपवून टाकले होते. तेव्हाही त्याचा ऍटीट्यूड कमी झाला नव्हता. त्याने तीच कशी इम्मॅच्युअर आहे, कमकुवत आहे आणि इतर अनेक विशेषणे लावून मीच हे नाते संपवतोय हे ओरडून ओरडून सांगितले होते. तरीही ती तिरस्काराने का होईना अजूनही त्याला पूर्णपणे विसरू शकली नव्हती. त्याच्यावरच्या रागाने तिने स्वतःला प्रचंड कामात गुंतवून घेऊन करिअरचा बराच पल्ला गाठला होता. तेव्हा तिला काही करून ती कमजोर नाही, कुणाहीपेक्षा इंफिरीयर नाही हे सिद्ध करायचे होते. घरी सगळ्यांना तिची काळजी होती पण त्यांच्या काळजीने तिला अजून घुसमटायला होत होते. आता बाहेरून सगळं छान छान दिसत असलं तरीपण मनात तीला अजूनही न्यूनगंड छळत होता. अजूनही ती तिच्या अंधाऱ्या जागेतून बाहेर येत नव्हती.
तिला जोईच्या भुंकण्याने अचानक जाग आली तेव्हा लक्षात आले की गेला तासभर ती लॅपटॉपसमोर टेबलवर डोकं टेकून झोपून गेली होती. तिने दार उघडून जोईला आत घेऊन स्वीगीवर मुद्दाम तिच्या आवडीचा जंक लंच ऑर्डर केला (खड्ड्यात गेलं हेल्दी फूड! म्हणत) आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. तासाभराने तिच्या पोटात कावळे ओरडायला लागल्यावर आलेली बर्न्ट गार्लिक बटर फ्राईड राईस आणि ऑरेंज चिकनची डिलिव्हरी घेऊन तिने खाता खाता फेसबुक ओपन केले. ढोल्या राहुल आणि त्याच्या ढोल्या बायकोचे कुठल्याश्या ऍनिवर्सरीचे युरोपमध्ये एकमेकांच्या पाप्या घेतानाचे फोटो फीडमध्ये आल्यावर तिने डोळ्यात पाणी येईतो हसून घेतले. पारूलने तिच्या क्युट, गुब्बू ईशानचा फोटो प्रोफाइल पिक लावला होता, त्याला एक बदाम देऊन, aww बाबुडी म्हणून कमेंट करून झाली. जोईला मध्ये मध्ये चिकनचे पिसेस दिल्यामुळे तोही खूष होऊन त्याने नाचून नाचून शेवटी सोफ्यावर पडी टाकली. मध्येच इंद्रनील रायचौधरी सर्च करून तिने त्याची प्रोफाईल उघडली. तो विशेष ऍक्टिव्ह दिसत नव्हता. प्रोफाइल पिक म्हणून जोईबरोबर मस्ती करतानाचा एक कॅण्डीड फोटो होता. ती त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर झूम करून अजाणता कितीतरी वेळ बघत बसली..
पुन्हा काम करता करता रात्र होऊन, झोपायची वेळ झाल्यावरही इंद्रनील घरी आला नव्हता. तिने एकदा कॉल केल्यावर त्याचा busy, will be late इतकाच मेसेज आल्यावर ती रागाने झोपायला निघून गेली.
सकाळी ७ वाजता कानाशी वाजणाऱ्या फोनने तिला जाग आली, तेव्हा अरूआंटी कॉल करून सांगत होत्या "मनवा, वी हॅव जस्ट लँडेड, कॅब लेके आधे-पौने घंटेमे पहूंच जाएंगे. हाऊ आर यू बेटा? जोईने ज्यादा तंग तो नहीं किया?"
क्रमशः